गंज
खळ्यावरील धान्याची रास एकदाची कणगीत पडली की मग गंज रचायच्या कामाला सुरुवात होत असे. याकाळात उन्हं चांगली चटकत असतात. त्यामुळं कडबाही चांगलाच वाळतो. शिवाय याच दिवसात रानं - शिवारं उघडी, मोकळी झाली असल्यामुळे वारा - वावटळीही सुरू होतात. तसेच अधून मधून एखादा अवकाळीही बरसण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर कडबा रचून मोकळं व्हायचं या विचाराने संभाजी आबा गंजीच्या कामाला लागत असत. संभाजी आबा ही आमच्या गावातील तशी मोठी आसामी. दरवर्षी आबाचा चाव्हरातला एखादा तरी नंबर जोंधळ्याच्या असायचाचं. त्यासाठी आबांकडं दोन - चार खोतकरीही हमखास असायचे. खळं उरकलं की मग कडबा खराब होऊ नये म्हणून आबाची गंजीसाठी एकच घाई चालायची.
गंज नेहमी गोठ्याच्या जवळच रचली जाते. सुरवातीला खळ्यावरचा सर्व कडबा गोठ्याच्या परिसरात आणला जातो. खळं जर गोठ्याजवळ असेल तर या कडबा तिथेच गंजीला लावता येत असे. मात्र खळं दूर असेल तर बैलगाडीने हा सर्व कडबा गंजीच्या ठिकाणी वाहून आणावा लागत असे. आबांचं खळं वस्तीजवळच असल्यानं बैलगाडीची गरज पडत नसे. आबा सर्वप्रथम गंजीची जागा निश्चित करायचे. मग ती जागा सपाट व स्वच्छ केली जात असे. नंतर आबा दोन तीन गड्यांच्या मदतीनं खळ्यावरचा सर्व कडबा त्या जागेभोवती आणून घेत असत. हा कडबा ठेवताना समान उंचीच्या तथा लांबीच्या पेंढ्याचे ढीग करून ठेवले जायचे. यासाठी खुडणी चालू असतानाच खळ्याच्या परिसरात खुडलेल्या पेंढ्यांच्या ज्या बुचड्या लावल्या जातात. या बुचड्या जमिनीवर उभ्या करताना समान उंचीच्या आठ - दहा पेंढ्यांचे शेंडे जुळवून गोल आकारात त्या उभ्या करून ठेवल्या जातात. गंजीच्यावेळी या उभ्या केलेल्या बुचड्या वाहून आणून त्यांचे गंजीच्या जागेभोवती ढीग लावले जात असत. अशी सर्व पूर्वतयारी झाल्यावर मग गंज रचण्याला सुरुवात व्हायची.
गंज रचने हे कौशल्याचे काम असते. गंज रचणाऱ्या कलाकाराला गंजाड्या असं म्हटलं जात असे. आमचे वडील गंज रचण्यात एकदम तरबेज होते. शिवाय ते आबांचे नेहमीचे खोतकरू. त्यामुळे गंज रचण्याचे काम दरवर्षी आमच्या वडिलांकडेच असायचे. गुडाची संख्या, पेंढ्यांचा आकार व उंची यावर गंजीची लांबी, रुंदी व उंची अवलंबून असते. हे सगळं गणित विचारात घेऊन भाऊ गंज धरायचे. गंजीचा आकार खालून वर पर्यँत चारही बाजुंनी निमूळता होत जातो. त्यामुळे गंज एखाद्या दडगोलाकार शंकुप्रमाणे टुमदार दिसते. अशा आकाराच्या वीस ते पन्नास फूट लांबी, आठ ते दहा फूट रुंदी आणि पंधरा ते वीस फूट उंची असलेल्या अनेक गंजी त्यावेळी सर्वत्र दिमाखदारपणे उभ्या असलेल्या दिसायच्या. मोठा जमीनदार असेल तर त्यांच्या वस्तीवर अशा दोन - दोन, तीन - तीन गंजी देखील लावलेल्या दिसत असत. आबांकडे देखील अशाच आकाराच्या किमान दोन गंजी दरवर्षी रचल्या जायच्या. गंज नेहमी खालतं - वरतं (पूर्व - पश्चिम) अशी रचली जाते. त्यामुळे वारा, वादळ किंवा काव्हरामध्ये गंज दमदापणे उभी राहत असे.
गंज रचायला सुरुवात करताना भाऊ पहिल्यांदा तिचा पाया तयार करायचे. या पायावर म्हणजेच गंजीच्या खालच्या पुष्ठभागावर गुडघाभर उंचीचं पाचरट, सरमाड किंवा चघाळ अंथरलं जायचं. यामुळे भर पावसात गंजीच्या कडब्यापर्यंत जमिनीचा थेटवा पोहचत नसे. नंतर भाऊ गंजीचा पाहिला थर रचायला घ्यायचे. या थरात गंजीची रुंदी व लांबी निश्चित होत असे. या थराला कडब्याच्या सर्वात उंच पेंढ्या लावल्या जात असत. या थराची सुरुवात पेंढ्यांची बुडखे दक्षिणेकडे आणि शेंडे उत्तरेकडे अशा रितीने पूर्वेकडून पश्चिमेकडे पेंढ्या मांडून केली जाते. आता हाच पहिला थर पुन्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे पेंढ्या मांडत पूर्ण केला जात असे. मात्र या वेळी यावेळी पेंढ्यांचे बुडखे उत्तरेला व शेंडे दक्षिणेला केले जायचे. तसेच उत्तरेकडे शेंडे असलेल्या दोन पेंढ्यांच्या मध्ये या बाजूच्या पेंढ्या रचल्या जात असत. यामुळे दक्षिणोत्तर अशा दोन्ही दिशांना कडव्याची बुडखे येत असत. अशा रितीने पूर्वेकडून पश्चिमकडे आणि पुन्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे पेंढ्या रचून गंजीचा पहिला थर पूर्ण होत असे.
दुसऱ्या थराची सुरुवात भाऊ पश्चिमेकडून करत असत. या थरालाही उंच पेंढ्याचं वापरल्या जायच्या. मात्र या थराच्या पेंढ्यांची बुडखे पश्चिमकडे केली जात असत. उत्तरेकडून दक्षिणेकडे या थराच्या पेंढ्या लावल्या जायच्या. या थराला गंजीच्या रुंदीइतक्याच पेंढ्या बसायच्या. पुन्हा अशाच प्रकारे पूर्वेकडे बुडखे व पश्चिमेकडे शेंडे करून पूर्व बाजूचा थर लावला जायचा. गंजीचा हा दुसरा थर लावताना पूर्व - पश्चिम बाजूला पेंढ्यांची बुडखे येतील अशी योजना केली जात असे. मात्र गंजीची लांबी जर पूर्व - पश्चिम बाजूने लावलेल्या पेंढ्यांच्या लांबीपेक्षा जास्त असेल तर दुसऱ्या थराच्या दोन्ही बाजूंनी रचलेल्या पेंढ्यांच्या शेंड्यांमध्ये मोकळी जागा राहत असे. शक्यतो प्रत्येक गंजीच्या दुसरा थर हा असाच असायचा; कारण कडब्याच्या उंचीच्या दुपटीपेक्षा गंजीची लांबी अधिकच असायची. या मधल्या मोकळ्या जागेत भाऊ पुन्हा पहिल्या थराप्रमाणे दक्षिण व उत्तरेला बुडखे येतील अशा पेंढ्या रचत असत. अशाप्रकारे या दोन्हीही थरांची बुडखे ही चारही दिशांना लागलेली असायची. असे हे दोन थर रचले की गंजीची एक वीण पूर्ण होत असे. अशारितीने मग ही समान उंचीच्या सर्व पेंढ्याची दोन थरांची वीण एकावर एक विनत भाऊ गंज वर रचत जायचे.
साधारणत: गंजीच्या मध्यापर्यंत किंवा त्यापेक्षा थोड्या उंचीपर्यंत अशा उंच तथा लांब पेंढ्यांच्या थरांची वीण रचली जायची. हे थर लावत असताना गंजीची रुंदी व लांबी थोडी - थोडी वाढेल अशी योजना भाऊ करत असत. यामुळे गंज मध्यभागी काहीशी फुगीर होत असे. गंजीच्या वरचा भागाला चहुबाजूंनी निमुळता आकार यावा म्हणून ही योजना असायची. याकामात गंजाड्याचा अनुभव व कौशल्य कामी येत असते. गंजीचा हा पाहिला टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या टप्प्यात गंजीला आकार देण्याबरोबरच गंजीचा तोलही राखला जाईल याची दक्षता घ्यावी लागते. अन्यथा वारा, वादळात गंज ढासळण्याची शक्यता असते. शिवाय या टप्यात वेळोवेळी सर्व थरांची बुडखे एकसारखी दिसतील अशी रचना करावी लागते. यासाठी गंजाड्या चोपणी किंवा ठोकणीचा वापर करत असतो. गंज अशी अगदी चाहूबाजुंनी घट्ट झाल्याने पावसात देखील कडबा भिजत नसे.
नंतर गंजीचा दुसरा टप्पा सुरु होत असे. या टप्प्यात कमी उंचीच्या किंवा आखूड पेंढ्यांचे थर रचले जातात. हे थर देखील खालील थरांप्रमाणेच रचले जातात. मात्र हे थर रचताना कमी लांबीच्या पेंढ्या वरच्या थराला राहतील अशी काळजी भाऊ घेत असत. हे थर वर जाताना गंजीची उंची वाढत जाते मात्र रुंदी हळूहळू कमी कमी होत जाते. यामुळे गंज चारही बाजूंनी निमुळती होत जाते. या आखूड पेंड्यांच्या निमुळत्या होत जाणाऱ्या थरांना ‘लांडे’ थर असे म्हटले जाते. हे थर रचताना मात्र गंजाड्याचं पूर्ण कसब पणाला लागते. गंजीचा आकार आणि उरलेला कडबा यांचा मेळ घालत भाऊ या थरांची रचना करत असत. हा टप्पाही चहूबाजूंनी चोपून काढला जायचा. या टप्यातचं खरी गंज आकराला येई. आखूड पेंढ्या संपल्यावर शेवटचा टप्पा म्हणजे अतिआखूड पेंढ्याची रचना करणे होय.
गंजीचा हा तिसरा टप्पा खूप महत्वाचा असतो. या टप्प्यात अगदी मोजक्याच पेंढ्या रचायच्या असतात. या टप्यात गंजीची लांबी व रुंदीही बरीच कमी झालेली असते. अगदी तीन - चार पेंढ्या बसतील एवढीच गंजीची रुंदी राहिलेली असते. या थरात बुडं पश्चिमेकडे व शेंडा पूर्वेकडे येईल अशी रचना केली जाते. सुरुवातीला बुडं पश्चिमेकडे येतील अशा पेंढ्या लावल्या जातात. या पेंढ्यांच्या अर्ध्यातून पुढे पुन्हा पुढच्या पेंढ्या लावल्या जातात. अशारितीने शेवटच्या थराचे शेंडे पूर्व बाजूच्या कडेवर पोहचे पर्यंत पेंढ्या लावल्या जातात. शेवटी पूर्व बाजूकडे बुडखे येतील अशारितीने शेवटच्या पेंढ्या लाऊन भाऊची गंज पूर्ण व्हायची. या शेवटच्या वरच्या थराला सरडा थर म्हटले जाते. या थरामुळे गंजीचे तोंड बंद होते. यानंतर वरच्या थरावर पाचरट किंवा सरमाड टाकून शेवटी गंज शेकारली जायची. त्यावर काही लाकडाचे ओंडकेही ठेवले जायचे. शेवटी अधिक दक्षता म्हणून गंजीच्या उजव्या - डाव्या बाजूला प्रत्येकी दोन खुंट्या ठोकून गंजीवरून दोर किंवा तारा ओढून त्यांना बांधल्या जायच्या. अशारितीने गंज पूर्ण करूनच भाऊ खाली उतरायचे. काही भागात चिखलाने देखील गंजीचा वरचा भाग लिंपण्याची पद्धत आहे. एखाद्या वेळी गंजीला आग लागली तर चिखलाच्या लेपामुळे ती अधिक वेगाने धुसमत नसे. आगीवर lakrcनियंत्रण आणता येत असे.
गंजीचे हे काम किमान दोन - तीन दिवस चालायचे. उन्हाचा कडबा कडक होत असल्यामुळे थर रचताना अडचण येई. त्यामुळे सकाळ सायंकाळच्या वेळात पेंढ्या सादळायच्या त्यामुळे हे काम उरकलं जायचं. या कामात भाऊंना दोन तीन गड्यांची मदत व्हायची. दोघे जण कडबा वाहून आणायचे. तर एक जण नेमक्या आकाराच्या व उंचीच्या पेंढ्यांची बुडखे जमिनीवर आपटून सपाट करत भाऊंकडे फेकायचा. गंज जसजशी वरवर जाईल तसतशा पेंढ्या उंच फेकाव्या लागत असत. कधी कधी तर सीडी किंवा बैलगाडीच्या साटीत उभा राहून पेंढ्या द्याव्या लागत. त्यामुळे गंजाड्या प्रमाणेच याकामी हा गडीही चलाख व हुशार असावा लागतो. तसेच कडबा वाहणारे देखील तितकेच जाणकार असावे लागतात. नंतर चाऱ्यासाठी गंज खोलताना गंजीचा शेवटचा थर आधी काढला जातो. मग हळूहळू उलट्या क्रमाने गंज अगदी सहजतेने उलगडत जाते. अगदी शेवटचा थर उपसून घेईपर्यंत ही वीण सहज उसवत जाते. अगदी शेवटच्या थरापर्यंत गंज ठामपणे व दिमाखात उभीच असते. एकदा रचलेली गंज ढासळलेली मला तरी कधीच दिसली नाही. हेच तर खरे गंजाड्याचे कसब असते. अशी ही गंज सर्वांच्या सहकार्य आणि सहयोगातूनच पूर्णत्वाला जात असे. बाजरी आणि भाताच्या वा गवताच्या पेंढ्याची मात्र गोल सुडी लावली जाते. या सुड्याही खूप भक्कम असतात. मात्र त्या फार दिवसासाठी नसतात. ज्वारीची गंज मात्र खूप काळ टिकून राहते. अशी ही गंज एकदाची पूर्ण झाली की मग मात्र आबांचा जीव भांड्यात पडत असे. कारण गंजीमुळे जनावरांच्या वैरण वा चाऱ्याची चिंताच दूर होत असे. वर्ष दीड वर्ष सर्वच जनावरांना स्वादिष्ट व रूचकर कडवा खायला मिळायचा. जनावरांसाठी चारा साठवण म्हणून गंज अत्यंत महत्वाची चारारचना पद्धती आहे. भारतीय कृषी संस्कृतीत गंज ही अत्यंत उपयुक्त चारासाठवण मानली जाते. भारतीय कृषी संस्कृतीत गंजीला प्राचीन परंपरा देखील असलेली दिसते .
भारतात प्राचीन काळापासून शेती आणि पशुपालन हे परस्परपूरक घटक राहिले आहेत. गुरांसाठी आवश्यक असणाऱ्या कोरड्या चाऱ्याच्या साठवणीसाठी ‘गंज’ ही पारंपरिक पद्धत वापरण्यात येत होती. जमिनीवर चारा ठेवून त्याची शास्त्रशुद्ध रचनेत साठवण करण्याची ही एक नैसर्गिक आणि टिकाऊ पद्धत होती. गंज तयार करण्याच्या पद्धती भौगोलिक परिस्थिती, हवामान, शेतकऱ्यांची जीवनशैली आणि काळानुसार बदलत गेलेल्या दिसतात. वैदिक व प्राचीन काळात ऋग्वेद, अथर्ववेद आणि गृह्यसूत्रांमध्ये गोपालनाचा उल्लेख आढळतो. त्यामुळे गायी-म्हशींसाठी चारा साठवण्याची गरज होती हे लक्षात येते. या काळात गवताच्या ढिगांवर माती, पालापाचोळा किंवा गवताच्या चटया टाकून गंज तयार केली जात असे. गंज पावसाळ्यात वाहून जाऊ नये म्हणून त्याभोवती काटेरी झुडुपे किंवा लाकडी कुंपण घालण्याची पद्धतही याकाळी होती. काही ठिकाणी गवताचा साठा उंचावर ठेवण्यासाठी लाकडी खांबांचा आधार घेतला जात असे.
मौर्यकाळात शेती अधिक प्रगत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुपालन आणि चारा साठवणीच्या पद्धती विकसित झालेल्या दिसतात. याकाळात गंज ही जमिनीवर वर्तुळाकृती किंवा चौकोनी स्वरूपात ठेवली जात असे आणि त्यावर थर देऊन संरक्षण केले जाई. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ‘गंजागार’ असा उल्लेख आढळतो. गुप्तकाळात पशुपालन हे कृषीसंस्कृतीचा अविभाज्य घटक झाले होते. विटांच्या भिंती किंवा बांबूंच्या चौकटीत चारा ठेवण्याची पद्धत लोकप्रिय झाली. अशी गंज ओलसर होऊ नये म्हणून त्यावर शेण आणि मातीचा थर दिला जात असे. याकाळात शासकीय स्तरावर ‘गंजागृहे’ विकसित केली गेली होती. मध्ययुगीन कालखंडात गंज साठवणीच्या पद्धतीत अधिक सुधारणा करण्यात आलेल्या दिसतात. मुघल आणि मराठा साम्राज्यात चाऱ्याच्या साठवणीसाठी मोठी गंज तयार करण्यात आली. विशेषतः मराठा साम्राज्यात मोठ्या गोठ्यांसाठी जमिनीवर चाऱ्याचे ढीग तयार करून त्यांना दोरखंडांनी बांधून ठेवले जात असे. गंज पावसाळ्यात खराब होऊ नये म्हणून त्यावर कडबा, पालापाचोळा, विटांचे आवरण किंवा टीनपत्रे ठेवण्यात येत असत. याकाळात ग्रामीण भागात गव्हाणीमध्ये चारा संरक्षित ठेवला जात असे.
ब्रिटिशकाळात पारंपरिक गंज साठवणीच्या पद्धती जरी अस्तित्वात होत्या, तरी आधुनिकतेच्या प्रभावाने काही सुधारित पद्धती वापरण्यात येत होत्या. काही ठिकाणी दगडी किंवा लोखंडी पत्र्याच्या शेडखाली गंज तयार केली जात असे. मोठ्या मालकाच्या शेतांमध्ये कोरडा चारा जास्त काळ टिकावा यासाठी चाऱ्याचे गठ्ठे करून त्यावर प्लॅस्टिक वा कापडाचे आच्छादन केले जात असे. या काळात गहू, ज्वारी, बाजरी आणि गवताच्या पेंढ्या वेगवेगळ्या गंजींमध्ये साठवण्याची पद्धतही विकसित झाली होती.
स्वातंत्र्योत्तर काळात पारंपरिक गंज अजूनही ग्रामीण भागात अस्तित्वात असल्याचे दिसते. मात्र तीचे स्वरूप अधिक सुधारित झाले आहे. काही ठिकाणी सिमेंटच्या भिंती असलेल्या गंजींचा वापर केलेला दिसतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज ‘सिलेज’ पद्धतीही प्रचलित झाली आहे. या पद्धतीत प्लास्टिकच्या आच्छादनाखाली चारा साठवला जातो. मोठ्या डेअरी फार्ममध्ये लोखंडी स्टोअरेज आणि शेड असलेली गंज वापरण्यात येते. अशा प्रकारे विविध काळात गंजीची रचना बदलत गेलेली दिसते. परंतु यामुळे पारंपरिक गंजीचा आकार आणि आणि दिमाखदारपणा मात्र आज दिसेनासा झालेला आहे.
एकेकाळी या गंजींवरून शेतकऱ्याची श्रीमंती मोजली जात असे. कारण त्यामुळे गोठ्यातील बैल वा दुभती जनावरं आणि जमिनीचाही अंदाज येत असे. आज आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधने आल्याने शेती कामात बैलांचा वापर खूप कमी झाला आहे. शिवाय सिंचन व अत्याधुनिक तथा संशोधनात्मक साधन निर्मितीमुळे शेती व्यवस्थापन पूर्ण बदलले आहे. बहुतांशी क्षेत्रात आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. पारंपरिक व नैसर्गिक शेती पद्धतीतील अनेक पिकांचे प्रमाण कमी झाले आहे. याउलट फळ - फूल बागा व नगदी पिकांचे प्रमाण कित्येक पटीने वाढलेले दिसतेय. आहारातही तुलनेने ज्वारीचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज ज्वारीची शिवारंही खूप कमी झालेली दिसतात. गोठ्यात आता केवळ दुभती जनावरेच राहिलेली दिसतात. त्यातही संकरीत जनावरांचेच प्रमाण अधिक. आणि अशा जनावरांचे चारा व्यवस्थापनही निराळेच.
या सर्व बाबींचा परिणाम म्हणून आज गंजींचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसत आहे. आज हिरवा चारा अधिक प्रमाणात वापरला जाताना दिसतोय. यामध्ये ऊसाचे वाढे, कडवळ, मका, लसूनघास याबरोबरच विविध पिकांचा हिरवा चारा म्हणून अधिक वापर होताना दिसतोय. असा चारा टिकविण्याच्या काही नवीन तथा आधुनिक पद्धतीही वापरल्या जात आहे. कुटी मशीन मुळे कमी जागेत, कमी कष्टात व कमी खर्चात चारा साठवण सुलभ झाली आहे. मुरघास ही अलीकडं नव्याने आलेली चारा साठवण पद्धती सर्वत्र दिसत आहे. या सर्व आधुनिक पद्धती जनावरांसाठी उपयुक्त वा फायदेशीर असतील देखील. मात्र त्या गंजीला पर्याय ठरू शकणार नाहीत हे तेवढेच खरे. कारण गंजीत साठवलेला कडबा केवळ टिकाऊ, चविष्ट वा स्वादिष्ट नसायचा तर तो चारा जनावरांसाठी सकस आणि पोषकही असायचा. गंजीतून पेंढी काढतानाच जनावरांच्या तोंडात लाळ उत्पन्न होत असे. गोठ्यामध्ये गव्हाणीत कडब्यावर तुटून पडलेली गुरे - वासरे पाहणे यात समाधान आणि सौभाग्याची प्रचिती येत असे. अशी ही गंज म्हणजे बळीराजा आणि गोठ्यातील पशुधनासाठी एक वैभवाची निशाणी असायची.
गंज ही केवळ चाऱ्यासाठीच उपयुक्त होती असे नव्हे तर गंज ही कौटुंबिक समृद्धीचं एक उत्तम प्रतिकही होती. गंजीकडे अभिमानाने पहात कुणब्याला आपल्या वैभवाची जाणीव व्हायची. अडी - अडचनीच्या काळात गंज महत्वाची भूमिका बजावत असे. दुष्काळात पाहुणे रावळे तथा शेजारी वा बांदकरी यांच्या मदतीसाठी गंज पुढे व्हायची. कौटुंबिक आर्थिक संकटाच्या काळातही गंज खंबीरपणे उभी राहायची. लग्नकार्याच्या काळात तर गंजीचं अधिकच महत्त्व असायचं. वऱ्हाडी सोयऱ्या -धायऱ्याच्या बैलांच्या कुसा भरायचं पुण्यकर्म गंजीमुळे साधलं जात असे. ओसरीत कणगी आणि अंगणात गंज दिसली की कारभारी निर्धास्त राहत असे. गंजीतून पेंढी काढून आणण्याची मजा काही वेगळीच असायची. याकामी लहान मंडळी अतिउत्साही असत. शिवाय गंजीच्या भोवतीनं लपंडाव वा पकडा पकडी खेळण्याचा आनंदही काही औरच असायचा. कधी कधी गंजीच्या अडोस्याला सावलीत जिबल्या व चंफुल्यांचाही डाव रंगत असे. लहान मुलांचं भावविश्व समृद्ध करणारं गंज हे त्याकाळी एक उत्तम ठिकाण होतं. काही पाळीव पशु पक्षीही गंजीच्या सावलीत आपला दाह शमवत असत.
काळाच्या गतीत गंजीचं हे सगळं वैभव आज लोप पावताना दिसत आहे. गंज ही मानवी सृष्टीला चैतन्य आणि हिम्मत देणारी रचना होती. कसलीही संकटं खंबीरपणे झेलून ठामपणे उभा राहता येते ही प्रेरणा देणारी गंज आज कडेलाटावर आहे. गंज काळाच्या पडद्याआड गेली तर त्या रचनाकलेचं काय होणार? कसल्याही अस्मानी संकटाला खंबीरपणे रोखून, तोलून धरणारी गंज हा मानवी कलाप्रतिभेचा अनोखा आविष्कार होता. रचताना तिची वीण घट्ट आणि भक्कम होत जाते; तर उलगडताना ती तितकीच सहज व सुलभपणे सैल होते. हा अनोखा कलाविष्कार आज काळाच्या पोटात गडप होऊ पाहतोय. हे कलासंचित जपायला हवयं. पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा टिकायला हवायं. म्हणूनच मानवी जीवनाला चैतन्य, कणखरता आणि भक्कमतेची समृद्धी बहाल करणारी ही गंज पुन्हा अंगणात सदैव दिमाखात दिसायला हवी. एवढीच अपेक्षा !
✍️ डॉ. अशोक नामदेव शिंदे
प्राध्यापक, मराठी विभाग,
मुधोजी महाविद्यालय, फलटण