सोमवार, २७ मार्च, २०२३

औचित्य

 चैत्र -चैतन्य

           मध्यान्हाचे कडक ऊन उन्हाळ्याची चाहूल देत असतानाच सकाळ-सायंकाळ आसमंतात मंद गारवा जाणवू लागतो, शिशिरातील निष्पर्ण वृक्षराजी नाजूक कोवळ्या पोपटी पालवीने झळकू लागतात, भिरभिर वाऱ्याने पानांची सकसळ वातावरणात मंजूळ नाद पसरवते आणि हळूहळू सर्व सृष्टीच्या सृजनोत्सवाची विलोभनीय रूपे धराकाशात अवतरू लागतात; तेव्हा आपण समजावे की आता चैत्रागमण होत आहे. या काळात कोवळ्या हिरव्या अंकुराचे नवपल्लवात रूपांतर होऊन नवचैतन्याला बहर येतो. नवलाई ल्यालेली झाडे-वेली जणू सृष्टीचा सृजनोत्सवच साजरा करत असतात. चैत्रारंभी निसर्ग सौंदर्यासंह फुलत जाणारे सण, सुदिन, उत्सव, समारंभ लोकजीवनात कमालीचा आनंद भरत असतात. नैसर्गिक, प्राकृतिक, भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक पर्यावरणाचा उत्कट आणि मनोरम आविष्कार चैत्रातच प्रगटतो. चैत्राचा हा उदय सर्व सृष्टीला नवी उमेद व नव उत्साह प्रदान करत असतो.

       शालिवाहन शक- संवत्सराचा प्रारंभच चैत्राने होतो. इ. स. ७८ साली गोममीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाने आपल्या असीम शौर्याने शालिवाहन सामाज्यावर आलेले शकांचे आक्रमण परतवून लावले. तेव्हापासून शालिवाहन शक कालगणनेस  प्रारंभ झाला. हिंदू नववर्षाचा प्रारंभही चैत्रानेच होतो. भारतीय पौणिमांत पंचांगात हा महिना पंधरा दिवस आधीच म्हणजे साधारणतः २१ किंवा २२ मार्च या दिवशी सुरू होतो. या दिवशी चंद्र 'चित्रा' नक्षत्राच्या  सानिद्यात येतो म्हणून या महिन्याला 'चैत्र' हे नाव लाभले आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे सूर्य मीन राशीन असताना चैत्र सुरु होतो, तर सूर्य मेष राशीत प्रवेशल्यावर तो संपतो. प्रमाणित हिंदू कालगणना आणि भारताच्या राष्ट्रीय नागरी कालगणनेनुसार चैत्र हा वर्षारंभाचा महिना मानला जातो. चैत्र प्रतिपदेला घरसजावट करून दारास आंब्याचे तोरण, अंगणात सडा- सारवण व रांगोळी काढून ओसरीला खण, साखरगाठी, कडूनिंब मोहर व कलशाची गुढी उभारून पारंपारिक रितीने नववर्षाचे स्वागत केले जाते.  याच दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची उत्पत्ती करायला प्रारंभ केला असाही पौराणिक संदर्भ दिला जातो. एकूणच नववर्षाच्या स्वागतासाठी चैत्रात सर्व निसर्गच आतुर झालेला दिसतो.

             चैत्र हा वसंताच्या ऐन बहारीचा महिना. वसंत ऋतुचा प्रारंभ फाल्गुणात होतो; मात्र तो फुलारतो चैत्रातच. उष्ण उन्हाच्या झळा सोसत अग्नीज्वालासम भासणारे पळस, पांगारा, गुलमोहर आपल्या स्वर्गीय सौंदर्याचा अविष्कार करतात ते याच काळात. आंब्याचा मोहर देखील याच महिन्यात फळाळतो. चिमुटभर हळ्दी अलगदपणे पाकळ्यांवर सांडावी तसा फुलारलेला गंधाळ चाफा, सुवासिक मोगरा, गडद पिवळ्या रंगाची सुरंगीची छोटी छोटी सुंगधी फुले, जाई-जुई, शेवंती, सायली, काजू, शेवगा, लिंब अशी शेकडो रंग, रूप, गंध छटा ल्यालेली रानबावरी फुले- फळे सृष्टीला आौकिक नजराना बहाल करतात तो देखील याच महिन्यात. कोकीळच्या सुरात सूर मिसळून बुलबुल आदि पक्ष्यांची मधूर लकेर भूआकाशात नादचेतना निर्माण करते तीही यावेळीच. अवध्या निसर्गाच्या अंग- प्रत्यंगातून, वृक्षलताच्या पानाफुलातून, नद्या -नाल्यांच्या संथ नादमय पदन्यासातून, पाखरांच्या कुजनातून हे वसंत विभ्रमाचे वैभव क्षणोक्षणी प्रत्ययास येते ते या चैत्रातच! 

         चैत्र हा खरा वसंतात्मा. चैत्रातच सृष्टी नवचैतन्याने न्हावून निघते. अनेक रंगाकार विविध फुलांच्या रुपाने डोळ्याचे पारणे फेडतात. नयनरम्य निसर्ग सौंदर्य, विविध वृक्षांवर डोलणारी मधुर रसाळ फळे व लोंबत्या वाटोळ्या आकारांची पाखरांची कबरी घरटी यातून चैत्रातील मनोरम, मनमोहक, स्वादिष्ट व नवनिर्मितीचे अनोखे अनुपम रुपच प्रत्ययाला येते. या महिन्यात पिंपळवृक्षाचे विहंगम रूप नजरेस भरते. त्याच्या हिरव्या, पोपटी, कोवळ्या लवलवणाऱ्या पालवीच्या छटा मन मोहून घेतात. नवपल्लविने डवरलेल्या गहिऱ्या गुलाबी रंगाचे झेंडूचं जणु पिंपळ शेन्ड्यावर फुलारल्याचा क्षणभर भास होतो. पिंपळासम पिंपरण, नांदरुक, करंज  आदि वृक्षांच्या पालवींचे चैतन्यही पाहण्याजोगेच असते. वसंतातील या सृष्टी सर्जनाचं खरंखुरं नितांत रमणीय परिपूर्ण अन् उत्कट दर्शन घडते ते चैत्रातच! चैत्राचे हे आल्हाददायक विलोभनीय रूप आणि नवसर्जनाचे विभ्रम अनुभवयाचे असेल तर ते गावी, खड्यात,  मोकळ्या राना- शिवारातच! चैत्रानुभुतीचा अवीट गोडवा खऱ्या अर्थाने गावीच चाखायला मिळतो. सृष्टीचा या सृजन सोहळा लोकसंस्कृतीच्या ऊस्फूर्त आविष्काराने अनुभवन्याची मजा काय औरच असते.

              चैत्रमासात लोकसंस्कृतीशी संबधीत सण, उत्सव व समारंभास उधान आलेले दिसते. या महिन्यात लोकजीवनाचे अनेक सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक बंध निसर्गाच्या साक्षीने व साथीने उमलत, उकलत जातात. अनेक विजयोत्सवाचे प्रतिक म्हणून गुढीपाडवा हा सण या महिण्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कडूनिंब व गुळाच्या प्रसादातून नकळतपणे कडूपणा विसरून  गोडवा निर्माण करण्याची शिकवणच यातून दिली जाते. सांस्कृतिक, धार्मिक संदर्भासोबतच या सणातून आहार, आरोग्य व पर्यावरणीय बंधही बळकट होत जातात. तामिळनाडूत 'पुलंडू', कनार्टक व आंध्रात  'अगादी' तर देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने नववर्षाचा हा आरंभदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 

        चैत्री नवरात्रारंभही याच दिवसापासून सुरु होतो.  महिनाभरासाठी माहेरी आलेल्या चैत्रगौरीच्या पूजनाचा हा सण! याच दिवसापासून देवघरातील अन्नपूर्णमाता (पार्वती) देवीची मूर्ती पाळणा वा इतर आसनावर बसवली जाते. रोज गोडधोडाचा नैवध्य, सुवासिनिंचे औक्षण आणि चैत्रांगण सजवून चैत्रगौरीचा उत्सव साजरा होत असतो. गौरीच्या स्वागत,  सन्मानासाठी संपूर्ण महिनाभर अंगणात पार्वतीदेवीची शस्त्रे, वाहन व सौभाग्यालंकाराने  चित्रित केलेली रांगोळी म्हणजे चित्रांगण हे चित्तवेधक व विलोभनीय कला कौशल्याचे दर्शन घडवते. भारतीय संस्कृतीचा कलात्मक आविष्कार येथे प्रकटतो. 

         चैत्र प्रतिपदेला गुढीपाडव्यासह, गौतम जयंती, छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी हे महत्त्वपूर्ण समारंभही साजरे होतात. याशिवाय चरक जयंती, गौरी तृतीया, मत्स्यजयंती, सोभाग्य सुंदरी व्रत, सम्राट अशोकाष्टमी, रामनवमी, शंभू महादेव एकादशी, महावीर जयंती, झुलेलाल जन्मोत्सव व हनुमान जयंती अशा बहुविध धर्माच्या सन- सुदिनांनी हा चैत्र बहरून जातो. सृष्टीसौंदर्य व लोकजीवनाचा समृद्ध आविष्कारही चैत्रातच अनुभवायला मिळतो. गावोगावीच्या लोकदैवताच्या यात्रा-जत्रा- ऊरूस याच काळात सुरु होतात. शेतशिवारातील धन घरात निवाऱ्याला आल्याने ग्रामजीवनाला काहीशी मोकळी उसंत या काळात मिळते.

           यात्रांच्या या काळात समग्र लोकजीवनच कमालीचे आनंदून गेलेले दिसते. विविध प्रकारच्या वस्तू , खेळण्या, चवींचे पदार्थ व पाहुणचार यांमुळे अबालवृद्धात कमालीचा उत्साह याकाळात अवतरतो. याशियाय कुस्ती,  तमाशा तथा लोकरंजनाच्या फडांच्या माध्यमातून क्रीडा व लोकसंस्कृतीचे संवर्धन साधले जाते. आमरस, कैरीचे पन्हे, खरबुज, टरबुज, काकडीच्या गोड - थंडगार गर- फोडी तप्त वातावरणात आल्हादमय शिडकावा निर्माण करतात.  याचकाळात पै- पाहुण्यांच्या गोड- खारट - तिखट पदार्थाच्या जेवणावळींचा घम‌घमाट व उन्हाळी वाळण तळणाचा स्वादिष्ट चमचमाट यामुळे मानवी जीवनाचे नातेबंध अधिक बळकट होतात. परीक्षा संपून सुट्टीचा हा काळ असल्याने याकाळात अनेक बाळगोपाळांचे बालपण आजोळी मनमुराद ओसंडत असते. सणासुदीच्या निमित्ताने का होईना पण काही दिवस सासुरवासिनीला माहेरपणाचा मोहर अनुभवण्याची संधी याकाळात मिळते. सूर्य देखील मानवी मनाचे व रानावनाचे हे मोहक चैत्र वैभव पाहण्यासाठी उशीरापर्यंत क्षितीजावर रेंगाळत असतो. एकूणच समस्त चराचरातूनच हा चैत्रानंद ओसंडून वाहत असतो.

            सर्व सृष्टीला विपुल वैभवाचं हे अपूर्व लेणं बहाल करणारात, चराचरातून चेतना फुलवणारा, रूप,रंग, नाद, गंध आणि स्पर्श या इंद्रिय संवेदनासह धरेवर स्वर्गीय सृष्टीचा अद्भूत सोहळा रेखाटणारा हा चैत्र म्हणजे चैतन्याचे अलौकिक भांडारच आहे. 


                             डॉ. अशोक शिंदे,

                              मराठी विभाग     

                             मुधोजी महाविद्यालय, फलटण

                             दूरभाष्य क्र. ९८६०८५०३४४

बुधवार, १ मार्च, २०२३

काव्यास्वाद

 धग ! 


रात्री झोपण्याआधी

विस्तव विझवून

माय ठिवायची

चुलीवर तांब्याभरून


आण म्हणायची की

लक्षीमी येती कव्हाणूक

तिलाही लागतेच की

तहानभूक 


कितीतरी राती मी 

जाग जाग जागायचो

जरा चाहूल लागताच

हळूच उठून बघायचो


चुलीकडे पाहत 

माय कूस बदलायची

पहाटेपर्यंत तिची

अशीच झोप चालायची


ना क़धी लक्ष्मी आली 

ना कधी पाणी कमी झालं

पुढे काळाच्या ओघात

मलाही समदं उमजलं


पण एक कोडं

अजूनही सुटंत नाय 

चूल असो की 

असो माझी माय 

तांब्याभर पाण्यानं

धग निवत असेल काय! 

          ✍ अशोक शिंदे