मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र. १७ सूप

                   सूप 

           सायंकाळच्या वेळेला आजी ओट्यावर धान्य नीट करायला बसायची. दोन-चार दिवसातून एकदा असं तिचं हे काम चलायचं. आधी ती कणगीतून एका घमेल्यात ज्वारी काढायची आणि तिच्या नेहमीच्या जागेवर आणून ठेवायची. मग ती ओसरीत खुंटीला अडकवलेलं सुप घ्यायची. यावेळी एक रिकामं घमेलंही तिच्याजवळ असायचं. कधी कधी मी तिला कणगीतील धान्य आणि खुंटीवरचं सूप काढून देत असे. हे काम करताना मी नेहमी तिच्याजवळ बसूनच असायचो. यामध्ये तिला कसलीही घाई गडबड चालायची नाही. तिची धान्य निवडण्याची एक आगळी- वेगळी पद्धत असायची.

            एका पायाची मांडी तर दुसरा पाय पुढे पसरून आजी धान्य नीट करायला बसायची. तिच्या एका बाजूला ज्वारीचं भरलेलं तर दुसऱ्या बाजूला मोकळं घमेलं ठेवलेलं असायचं. आणि पुढ्यात सूप असायचं. या सुपानचं ती ज्वारी नीट करायची. सुरवातीला ती दोन ओंजळी ज्वारी सुपाच्या खोलगट भागात घ्यायची. मग दोन्ही हाताने सूप धरून ते विशिष्ट रीतीने हालवायची. या हलवण्याला ती घोळणं असं म्हणायची. सुपात धान्य घोळताना ती तिचे दोन्ही हात कधी खालीवर तर कधी मागेपुढे करत ती घोळवत असे. या घोळण्यामुळं ज्वारीतील हलका कचरा वर यायचा. यामध्ये हलक्या काड्या- कुड्या, बोंड, फोलकटं असायची. मग आजी हळूच त्यावर फूक घालायची.  त्यामुळे काही हलके पदार्थ पुढे उडून जायचे. मग हाताच्या बोटाच्या मागच्या अंगाने वर आलेलं उरलेलं सगळं हलकेपणे सूपाच्या पुढच्या सपाट उतरत्या बाजूने खाली सारायची. 

           घोळून झाल्यावर आजी मग पाखडायला लागायची. आजीचं पाखडणं मोठं गमतीचं असायचं. मी तिच्याकडे बघतच बसायचो. पाखडताना ती सूपाच्या दोन्ही बाजू घट्ट पकडायची. सूप पकडताना दोन्ही आंगठे सूपाच्या आतल्या बाजूला असायचे आणि तळहात व उरलेली चार बोटे सूपाच्या खालच्या बाजूला धरलेली असायची. सुपातली ज्वारी आतल्या आत मोकळी होऊन, नको असणारा कचरा हळूच पुढे ढकलला जाईल असं तिचं पाखडणं असायचं. त्यामुळे ती दोन्ही हातांनी सुपाला वर- खाली, मागे - पुढे आणि सुपातील ज्वारी आतल्या आत खाली वर होईल अशी हलवत असे. हे करताना ती सुपाला हळूच उलटा झटकाही देत असे. हा उलटा झटका देताना आजी सुपाच्या खालच्या अंगाला आपल्या बोटांनी चटकवायची. त्यावेळी ‘चटक’ ‘चटक’ असा आवाज यायचा. आणि गंमत म्हणजे याच वेळी ती तोंडानेही तसाच ‘चटक’ ‘चटक’ आवाज काढत असे. हे पाहताना मला खूप मज्जा वाटायची. आजी जेव्हा सूप हलवायची, तेव्हा तिच्या हातांच्या हालचालीत एक विलक्षण ताल असायचा. सूप हलक्या झोक्याने पुढे ढकलले की जड दाणे सूपात टिकून राहायचे आणि हलका कचरा उडून दूर जायचा. 

             या पाखडण्यामुळे सुपातील ज्वारी आतल्या आत उलट्या उद्या मारायची. त्यामुळे छोटे छोटे मातीचे कण, बारीक खडे किंवा काही इतर जड पदार्थ सुपाच्या पसरट भागात जमा व्हायचे. मग आजी पुन्हा हलक्या हाताने सुपाला थोडासा झटका देऊन तो कचरा खाली पाडायची. यावेळी सुपात स्वच्छ झालेली  किंवा निवडलेली ज्वारी आजी दोन्ही हातांनी मोकळ्या घमेल्यात भरायची. घोळून आणि पाखडूनही शेवटी सुपात अगदीच बारीक खडे, धूळ किंवा काही जड काड्या, बोंडं शिल्लक राहायची, तेंव्हा आजी त्यातील ज्वारी निवडून काढायची तो कचरा टाकून द्यायची. हे झाल्यावर पुन्हा दोन ओंजळी धान्य सुपात घेऊन ते नीट करायची. असं आजीच हे घोळणं आणि पाखडणं सगळी घमेलेभर ज्वारी संपेपर्यंत चालायचं. मग ही निवडलेली ज्वारी दळणासाठी तयार असायची. अशाच प्रकारे ती बाजरी, गहू आणि काही कडधान्ये निवडून स्वच्छ करून ठेवत असे. 

               धान्य निवडणं किंवा ते स्वच्छ करणं हे काम सर्व घरोघरी चालायचं. आजी, आई किंवा घरातील एखादी प्रौढ बाई हे सगळं काम करायच्या. यावेळी त्या हमखास लहान मुलींना जवळ घेऊन बसायच्या. धान्य कसं निवडावं याचं शिक्षणचं असायचं ते. धान्य निवडणं ही एक प्रक्रिया असली तरी ती एक कला देखील आहे. या कामी ‘सूप’ हे साधन खूप उपयोगी पडायचं. प्रत्येक घरात हे सूप असायचेच. बांबूच्या पट्ट्या विशिष्टरितीने विणून हे ‘सूप’ तयार केलं जायचं. बुरुड समाजाचे कारागीर हे काम करायचे. पेठेच्या गावात किंवा बाजारच्या गावात हे सूप मिळायचे. आमच्या परिसरात दादा पवार यांचा सूप विणण्यात हातखंडा होता. सूपाची रचना म्हणजे ग्रामीण कलेचा एक सुंदर नमुनाच. बांबूच्या किंवा त्यासदृश्य वनस्पती यासाठी वापरल्या जायच्या. 

            सूप बांधताना त्याच्या विशिष्ट आकार व भक्कमतेकडे अधिक लक्ष दिले जात असे. प्रथम बांबूच्या बारीक पट्ट्या काढून सूपाचे मागच्या बाजूचा अर्धगोलाकार भाग तयार केला जायचा. हे विणकाम करताना मागील बाजूच्या कडा साधारण चार बोटं उंच केल्या जातात. त्यामुळे सूप चालवताना धान्य खाली सांडत नाही. सुपाचे विणकाम नेहमी मागून पुढे केले जाते. मागचा उंचवट्याचा भाग विणून तसाच मागच्या बाजूने खालून पुढे आणला जातो. यावेळी उंच कडा जराशा उतरवल्या जातात आणि सूपाच्या पुढच्या भागात तर त्या एकदम तळात मिळावल्या जातात. यावेळी पुढील बाजूस थोडा झुकाव किंवा उतार दिला जातो. ही तिरकी किंवा चढती रचना वाऱ्याचा झोत आणि धान्याची घसरण यासाठी आवश्यक असते. सूपाची वीण आडवी उभी असते. ही वीण इतकी तंतोतंत असते की त्यातून धान्याचे कण खाली गळणार नाहीत याची काळजी घेतली जाते. अशा प्रकारे साधारण दीड फूट रुंद आणि दीड-पावणे दोन फूट लांब सूप तयार केले जाते. 

           सूप विणताना विणीचा ताण आणि कडांची मजबुती या दोन बाबी विशिष्टपणे संतुलित करणे हे कारागिरीचे कसब असते. दादाला हे कौशल्य उत्तमपणे आत्मसात होते. आमच्या गावात प्रत्येक घराच्या ओसरीत किंवा आत खुंटीला असे सूप अडकवलेले असायचे. धान्य निवडणे किंवा दळण करणे याकामी महत्त्वाचे साधन म्हणून सूप उपयोगी पडते. कृषी संस्कृतीच्या प्रारंभापासूनच सूप वापरले जात होते. भारतीय ग्रामीण संस्कृतीत प्राचीन काळापासून सूप हे धान्य निवडण्याचे प्रमुख साधन असल्याचे दिसते. कृषी संस्कृती विकसित झाल्यानंतर धान्य पाखडण्याची गरज गरज निर्माण झाली. त्यातून सूप हे साधन तयार झाले. सुरुवातीचे सूप विविध वनस्पतींच्या काड्या, पानं, किंवा गवत यांच्या जाळ्या करून बनवले जात असे. पुढील काळात यासाठी बांबू ही वनस्पती सर्वांत सोयीची व टिकाऊ असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याच्या बारीक चपट्या, गोल पट्ट्यांची वीण करून सूप  बनवले जाऊ लागले. 

                मध्ययुगीन काळात ते सूप सर्वत्र रूढ झालेले दिसते. संस्कृत भाषेतील शूर्प किंवा सूर्प या शब्दापासून 'सूप' हा शब्द तयार झाला आहे. सुपडू, सुपली, सुपू अशी त्याची अन्य रूपे वा नावे आहेत. या काळातच सूपाचा चौकोनी आकार निश्चित झाला. या काळात काही भागांत लाकडी सूप, तर काही ठिकाणी तांब्याचे किंवा पितळेचे सूपही वापरले जात होते. या काळात अनेक पारंपारिक कार्यात सूपाचा वापर होत असे. परंतु धान्य पाखडणे हे गृहिणीचे अनिवार्य काम असल्याने हे सूप घराघरात आवश्यक वस्तू म्हणून हमखास वापरले जात असे. साधारणत: चौकोनी आकाराचे हे सूप विविध प्रकारचे धान्य घोळणे, पाखडणे याशिवाय प्राचीन काळापासून लोकजीवनातील इतर अनेक कामातही उपयोगी पडत असे. अगदी स्वातंत्र्योत्तर काळातही लोक संस्कृतीत सूप आपले स्थान टिकवून होते. 

           मात्र आज आधुनिक काळात कृषी आणि ग्रामीण जीवनात विविध बदल झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरण यामुळे नवनवीन यंत्र सामग्री विकसित होत आहेत. लोकजीवनातील सर्वच कामांचे स्वरूप आज बदललेले दिसते आहे. घरकाम व इतर कामासाठी लागणाऱ्या सर्वच पारंपरिक साधनांचे मूळ रूप बदलून आज त्याचे नवीनीकरण वा आधुनिकीकरण झालेले आहे. यामुळे  अनेक साधनांना नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. सूपाबाबत देखील असाच बदल घडलेला दिसतो. यांत्रिकीकरणाने आज घराघरांत इलेक्ट्रिक ग्राइंडर, क्लीनिंग मशीन इ. साधने उपलब्ध झाली आहेत. शिवाय आज तर तयार पीठ देखील बाजारात सहजपणे मिळत आहे. त्यामुळे घरोघरी सूपाने पाखडण्याची वा दळण करण्याची पद्धत आज बंदच झाली आहे. या यंत्रांमुळे सूपाचा वापर घटला आहे. तसेच सूपाचे मूळ बांबूचे रूप जावून त्याजागी फायबर वा प्लास्टिकची सुपेही बाजारात येऊ लागली आहेत. त्यामुळे त्यात यांत्रिकता येऊन त्याविषयीची आत्मीयता नष्ट होत आहे. मूळ  सूप मात्र आज घरात कुठेतरी कोनाड्यात सुकून पडलेलं दिसतेय. 

           आमच्या काळात सूप ग्रामीण जीवनाशी  एकरूप होऊन गेलेले साधन होते. धान्य निवडण्याशिवाय लोकजीवनात इतर बाबतीत देखील सुपाचा वापर होत असे. सूपाच्या रुपाने कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपली जायची. कोणताही विधी, सण, समारंभ सूपाशिवाय पूर्ण व्ह्यायचा नाही. सूपाला समृद्धीचे व शुचिर्भूततेचे प्रतिक मानले जायचे. काही प्रदेशात बाळ जन्माला आल्यावर त्याची प्रकृती खूपच नाजूक असेल तर त्याला दुपट्यात घालून सुपामध्ये ठेवले जाते. त्यामुळे त्याला उचलणे व हलवणे सोपे होते. श्रावणात खेळल्या जाणाऱ्या मंगळागौरीमध्ये ‘नाच ग घुमा' या खेळात, उजव्या व डाव्या हातात सूप उडवून नाचविले जाते. लग्नामधील देवकं अगदी आजसुद्धा सुपामध्ये पुजली जातात. लग्नकार्य पूर्ण झाल्यावर देवक पुजल्यानंतर हे सूप जाहीरपणे वाजविले जात असे. त्यामुळे ‘कार्याचे सूप वाजले' हा शब्द समूह बोलीत कायमचा रुजला आहे. 

          आज तर विविध कार्याची सांगता झाल्यावर ‘सूप वाजले’ हा वाक्प्रचार वापरला जातो. धार्मिक विधींमध्ये विविध पूजा मांडणे, यज्ञकर्मामध्ये अग्नीला वारा घालणे आणि विविध व्रतांमध्ये दान करणे इत्यादींमध्ये सुपाचा वापर केला जात असे. दारी आलेल्या उपासकास सूपातून धान्य दान करण्याची प्रथाही आपल्याकडे आहे. याशिवाय उन्हाळ्यात वाळवणाच्या कामात शेवया वाळवण्यासाठी सुपं वापरली जात असत. काही प्रदेशात अंतिम संस्कार आणि अस्थी विसर्जनावेळी सुपात नैवेद्य घेऊन जाण्याचीही प्रथा आहे. 

         सूप हे केवळ धान्य निवडण्याचे साधन नव्हते; तर ती एक कला होती. विणकाम कलेचा सूप एक उत्तम नमुना होतं. ग्राम संस्कृती आणि कारागिरीचा सुंदर संगम सुपात दिसायचा. तसेच सूप ग्रामीण लोकजीवनाचा अविभाज्य भाग होता. आहार संस्कृतीचे सूप महत्त्वपूर्ण साधन होते. विशेष म्हणजे ते  स्त्रियांच्या श्रमसंस्कृतीचे, घरगुती अर्थव्यवस्थेचे आणि निसर्गपूरक जीवनशैलीचे प्रतिक होते. सूप हाताळणे ही सुद्धा एक कलाच होती. वारा, दिशा आणि हातांची हालचाल व गतीचा योग्य मेळ घालून धान्य निवडणे व दळण करणे हे कौशल्याचे काम असायचे. या कामाच्या माध्यमातून हा कलेचा वारसा पुढच्या पिढीला दिला जात असे. सूपामुळे धान्य निवडण्याची प्रक्रिया पूर्णत: नैसर्गिकरित्या होत असे. कोणत्याही यांत्रिक प्रक्रियेशिवाय केवळ वैशिष्ट्यपूर्ण आकार, हाताची योग्य हालचाल आणि घोळणे व पाखडण्याची कला याद्वारे  धान्य निवडीची प्रक्रिया करणारे हे सूप मात्र  आज आधुनिक युगाच्या साधन सामग्रीच्या गराड्यात हरवून गेले आहे. 

              आज धान्य स्वच्छ करण्यासाठी घरात जी विविध यंत्रे आली आहेत. त्यात धान्य निवडले जात आहे. मात्र या आधुनिक साधनातून केवळ श्रीमंतीचंच दर्शन घडते. याउलट आई, आजीच्या हातातील सूप हे समृद्धीच तथा बरकतीचं लक्षण असायचं. या सूपाची खूप काळजी घेतली जायची. ते अधिक काळ टिकावं म्हणून आजी त्याला शेणाने सारवायची. त्याला जर बीळं पडली तर त्यात आजी कापडाच्या चिंध्या खोसायची. ओसरीत किंवा घरात खुंटीला अडकवलेलं सूप हे त्या घराच्या समृद्धीचं प्रतिक असायचं. सूपामुळे धान्याइतकीच नात्यातील निर्मळता देखील जपली जायची. सूपाच्या निमित्ताने घरातील स्त्रियांमध्ये श्रमसंस्काराची  परंपरा निर्माण व्हायची. सूपामुळे आज्या- नाती, माय- लेकी, सासू -सुना, नणंद -जावा ही नाती श्रम, कला आणि प्रेमानं बांधली जायची.

            मुलीच्या विवाहात सूप, दुरडी, टोपली देण्याची प्रथा आजही दिसते; मात्र ही केवळ परंपरा म्हणूनच केले जाते. काही ग्रामीण व आदिवासी भाग वगळता प्रत्यक्षात आज सूपाचा पारंपरिक वापर होताना दिसत नाही. धान्य निवडण्याचा हा पारंपरिक वारसा, गृह समृद्धीचं प्रतिक, श्रम व कलेचा सुंदर नमुना आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हे वस्तूरूप साधन आज लोप पावत चाललेलं आहे. एकेकाळच्या लोकजीवनाच्या वैभवाचा हा साक्षीदार कुठेतरी अडगळीत पडलेला दिसत आहे. केवळ विशिष्ट वेळी तो नजरेला पडत आहे. सूप फक्त घराच्या कडेला, भिंतीच्या रॅकमध्ये किंवा एखाद्या सणाच्या दिवशीच आपलं अस्तित्व दाखवतं. एकेकाळी प्रत्येक घराचा अभिमान असलेलं हे साधन, आता नष्ट होईल की काय याची भीती वाटत आहे. 

          सूपाचं अस्तित्त्व केवळ साधनरूप नाही , तर कलारूप आहे. सुप नाही चालवले गेलं तर पाखडणं, घोळणं, निवडणं या कलाही काळाच्या ओघात लोप पावतील. सूप नाही वापरलं गेलं तर विणकला व हस्तकला कारागिरीचं काय होणार? म्हणूनच सूपाचा तो खर्र… खर्र…, चटक … चटक … आवाज, 

धान्यावर खेळणाऱ्या वाऱ्याचा नाद आणि 

आजीच्या हातांची तालबद्ध, लयबद्ध हालचाल… आजच्या पिढीला अनुभवायची असेल तर लोकजीवनात कला, समृद्धी, सुफलता व सुचिर्भूततेचे प्रतिक असलेले हे सूप घराघरात पुन्हा वापरायलाच हवे!

✍️ डॉ. अशोक शिंदे

           

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

कावड - अडगळीतील समृद्धी लेख- १६ कावड

 कावड 

            त्यावर्षी आम्ही नुकतंच चव्हाणवस्ती वर राहायला आलो होतो. तीन- चार घरांची ती वस्ती. तिथे एका छोट्याशा झोपडीत आम्ही राहायला सुरवात केली. दुसऱ्या दिवशी मी सकाळी झोपेतून उठलो तेव्हा मला ‘करऽऽकरऽऽ’ ‘करऽऽकरऽऽ’ असा आवाज सुरैल आवाज ऐकू लागला. मी बाहेर येऊन आवाजाच्या दिशेने पाहिले तर मारती तात्या कावड घेऊन येत असलेले मला दिसले. जसे जसे तात्या जवळ आले तसतसा ‘करऽऽकरऽऽ’ आवाज आणखीच गाजू लागला. तात्या त्या आवाजाच्या नादात एका लयीत पावले टाकत चालत येत होते. तात्याच्या उजव्या खांद्यावरची कावडही एका विशिष्ट लयीत हेलकावे घेत होती. या हेलकाव्यामुळेच तो ‘करऽऽकरऽऽ’ असा मधुर आवाज येत होता.  तात्या कावड घेऊन थेट रांजणाजवळ गेले. तेथे त्यांनी आपली कावड खाली टेकवली. दोन डब्याला अडकवलेली लोखंडी हुके काढली. काठी भिंतीला उभी केली आणि एकेक डबा रांजणात ओतून ते पुन्हा कावड घेऊन पाणी आणायला निघाले. तात्यांची ही रोजनिशीच होती. सकाळी उठणे, कावड उचलणे, विहिरीवर जाणे आणि अंघोळ करून कावड भरून आणणे. 

           या वस्तीवरील सर्व घरी पाणी भरण्याची अशीच पद्धत होती. वस्तीजवळच एक ओढा होता. त्याला पावसाळ्यात पाणी यायचे. या काळात घरातील कपडे लत्ते आणि इतर साहित्य धुण्यासाठी या ओढ्याचे पाणी असायचे. शिवाय वस्तीजवळच शेतं असल्यामुळे तिथपर्यंत दंडाला विहिरीचे यायचे. मात्र स्वयंपाक, भांडी आणि पिण्यासाठी लागणारे पाणी विहिरीवरूनच आणावे लागत होते. उन्हाळ्यात ओढा आटल्यावर तर घर खर्चासाठी लागणारं सर्वच पाणी विहिरीवरूनच  आणावे लागत असे. वस्तीपासून सुमारे अर्धा पाऊण किलोमीटर अंतरावर भोपत्यांच्या मळ्यात ही विहीर होती. तात्या तेथून कावडीने रोज सकाळी सकाळी पाणी आणत असत. तात्याप्रमाणेच या वस्तीवरील शिवाजी नाना, दत्तूभाऊ आणि अंबादास दादा हे देखील सकाळीच कावडीने पाणी भरायचे. 

            विहीर बरीच लांब असल्यामुळे या विहिरीवर शक्यतो पाणी भरण्यासाठी स्त्रीया येत नसत. त्यामुळे या विहिरीवर सकाळी कावड्यांचीच गर्दी असायची. जवळच्या निंबाळकर वस्तीवरील अनेक बापेलोकही या विहिरीवर आपापल्या कावडी घेऊन येत असत. एका दिवसासाठी किमान रांजणभर पाणी लागायचे. त्यामुळे किमान दोन तीन कावडी तरी रोज आणाव्या लागत असत. त्याकाळी दूरवरून पाणी आणण्यासाठी प्रत्येक घरी अशी  कावड असायचीच. प्रत्येक घरच्या ओसरीला दोन खुंट्यांवर अडकवलेली किंवा भिंतीच्या कोपऱ्यात उभी केलेली कावडीची काठी हमखास दिसायची. आम्ही शाळेत जाताना अनेक कावडी आम्हाला भेटायच्या. विविध प्रकारच्या कावडी आणि त्या घेऊन चालण्याच्या वेगवेगळ्या चाली आम्ही रोज पाहायचो. प्रत्येक जण आपल्या झोकात आणि तालात दंग होऊन कावड घेऊन चालायचे. 

            कोणी एका खांद्यावर सरळ काटकोनात काठी ठेऊन एक हाताने ती पकडत, तर कोणी एका खांद्यावरच पण काहीशी तिरकी आणि एका हात वरून टाकत  काठी ठेवत; तर कोण कोण दोन्ही खांद्यावर काठी ठेऊन दोन्ही हात काठीवर टाकत असत. काही जण काठीऐवजी गजांना पकडत असत. तसेच काही जण तर एकदा कावड खांद्यावर ठेवली की हात न लावता थेट घरापर्यंत येत असत. काही जण काहीसे वाकत, झुकत असत; तर काही एकदम ताठ चालत. यापैकी मला मारती तात्याची कावड घेऊन चालायची पद्धत खूप आवडायची. मी रोज सकाळी अंधोळीसाठी तात्याबरोबर विहिरीवर जायचो. तात्यासुद्धा विहिरीवरच अंघोळ करायचे. तात्या कावड घेऊनच विहिरीवर निघायचे. त्यामुळे तात्यांची कावड मी रोज पाहायचो. मोटारीच्या पाईपला थेट डबा लावून त्यात ते पाणी भरायचे मग विशिष्ट अंगावर दोन डबे ठेवायचे कवडीची काठी खांद्यावर घेऊन लोखंडी हुक डब्याच्या कडीत गुंतवून तात्या कावड उचलायचे. नंतर तात्या डाव्या खांद्यावर कावड ठेवून दोन्ही हातानी काठी पकडत आणि थोडेसे तिरकस होऊन चालत असत. त्यांच्या कावडीचा आवाजही जोरातच येत असे. 

           तात्यांनी ही कावड खास पाटसच्या रामानाना करून घेतलेली होती. रामनाना कावड करण्यात माहीर होते. त्यांनी तात्याच्या कावडीसाठी साधारणतः सहा - साडे सहा फूट लांबीची वेताची (बांबू) काठी वापरली होती. नानांनी ही काठी सुरवातीला बरोबर निम्मी निम्मी फाकळवली. पुन्हा ती आहे तशी जोडून दोन्ही शेंड्यांना रबरी वाद्या घट्ट आवळल्या. या आधी नानानी छोट्या कामठीचे दोन तुकडे काठीच्या चिमटीत रबरीवादीजवळ सरकवून दाबून बसवले होते. या योजनेमुळेच तात्याची कावड इतरांपेक्षा अधिक जोरानं आवाज करत असे. नंतर नानांनी या काठीच्या दोन्ही बाजूंनी अर्धा फूट आत एकेक भोक पाडून त्यामध्ये लोखंडी कडी बसवलेली होती. या कडीच्या दोन्ही दांड्या टोकदार असल्याने त्या काठीच्या भोकातून वर घेऊन त्या पुन्हा काठीवर गोलाकार पिळवून घट्ट बसवल्या होत्या. नंतर या कडीमध्ये दोन्ही बाजूंना एक लोखंडी गज अडकवून तो कडीतून निसटणार नाही अशा प्रकारे वळवून बसवला होता. या दोन्ही बाजूंच्या गजांची खालची टोके वरच्या बाजूंनी वळवलेली होती. हे गज साधारण दीड दोन फूट लांब होते. अशा प्रकारे नानांनी ही कावडीची काठी तयार केलेली होती. 

           नंतर नानांनी कावडीसाठी दोन डब्बे तयार केले होते. यासाठी त्यांनी तेलाचे मोकळे झालेले डबे वापरले होते. डब्याच्या तोंडाला आतल्या बाजूने बरोबर मध्यावर मनगटाएवढ्या जाडीचा बांबूचा तुकडा बाहेरच्या बाजूने खिळे ठोकून बसवला होता. या बांबूला मध्यावर नानांनी एक लोखंडी कडी आवळून बसवली होती. काठीच्या दोन्ही बाजूचे गज अडकवण्यासाठी ही योजना नानांनी केलेली असावी. अशा प्रकारे मारती तात्याची कावड तयार केली होती. तात्यांची कावड पाहून आम्ही सुद्धा घरी अशीही कावड रामनानांकडून करून घेतली होती. त्यामुळे सकाळी सकाळी मी देखील तात्यांबरोबर कावड घेऊन पाणी आणायला जात असे. दूरवरून पाणी आणण्यासाठी कावड हेच त्यावेळी मुख्य साधन असायचे. कावडीने एकाचवेळी तीस पस्तीस लिटर पाणी आणले जायचे. घरातील पुरुष मंडळी हे काम करत असत. कावडीसाठी काठी आणि पाणी भरण्यासाठी दोन समान आकाराची भांडी वापरली जात असत. कोणी कोणी कावडीसाठी बादल्या किंवा इतर भांडी देखील वापरत असत. 

            आमच्या वस्तीवर दत्तूभाऊंची कावड बादल्यांची, तर बाकी सर्वांच्याच कावडी डब्यांच्या होत्या. काठीस लोखंडी गजाऐवजी सुती दोर बांधून त्यामध्ये माठ, घागर किंवा हंडा ठेऊनही काही भागात कावडीने पाणी आणले जात असे. ग्रामीण भागात शेती, पिण्याचे पाणी व दैनंदिन वापरासाठी विहिरी, ओढे, नदी, तळी यातून पाणी आणावे लागत असे. घडे किंवा माठ भरून पाणी वाहून नेणे हे त्यावेळी कष्टाचे काम होते. हे काम स्त्री आणि पुरुष दोघेही करत असत. मात्र एकाच वेळी अधिक पाणी आणण्याचा पर्याय म्हणून या काळात दोन्ही खांद्यांवर वजन समानरित्या पेलण्याची पद्धत विकसित झाली असावी. ही व्यवस्था म्हणजेच ‘कावड’ होय. कावड हे ग्रामीण संस्कृतीतील घरामध्ये पाणी भरण्याचे महत्त्वाचे साधन आहे. भारतीय परंपरेत कावडीस मोलाचे स्थान असलेले पहावयास मिळते. 

          प्राचीन काळात ग्रामीण भारतात पाणी वाहनासाठी बांबू किंवा लाकडाच्या कावडींचा वापर केला जात असे. या काळात धार्मिक वा पवित्र कार्यासाठी  कावडीचा वापर केला जात असे. विशेषत: शंकरासाठी जलाभिषेक करण्यासाठी कावडीने पाणी आणले जात असे. म्हणूनच ‘कावड यात्रा’ ही संकल्पना शैव भक्तांतून उदयास आली असे म्हटले जाते. आजही अनेक भक्तलोक पवित्र गंगेचे पाणी घेऊन ते शिवाला अर्पण करतात.

मध्ययुगीन काळात धार्मिक कार्याबरोबरच इतर कार्यासाठीही पाणी भरण्यासाठी कावड वापरली जाऊ लागली. यापूर्वी गावात पखालीने पाणी आणले जात असे. रेड्याच्या पाठीवर कातडी पिशवी म्हणजेच पखाल ठेऊन हे पाणी गावात घरोघरी वाटले जात असे.

             प्रारंभीच्या काळात लांब बांबू किंवा लाकडी दांड्याच्या दोन्ही टोकांना दोऱ्या बांधून त्यावर माठ, घडे किंवा रांजन ठेऊन कावडी वापरल्या जात असत. कावडीचा दांडा खांद्यावर ठेवून संतुलन साधत एकाच वेळी दोन भांडी वाहून नेता येतात. या प्रक्रियेत खांद्यावर दाब समान राहतो, त्यामुळे वजनाचा त्रास ही कमी होतो. म्हणूनच ही कवडीची योजना या काळात अस्तित्वात आली असावी. पुढील काळात विहिरीतून किंवा ओढ्यातून रांजणात पाणी आणण्यासाठी कावड वापरली जाऊ लागली. या काळात लाकडाच्या ऐवजी बांबूचा वापर केला गेला. बांबू वापरल्याने वजन हलके झाले. ब्रिटिश काळात गावात पाणी भरण्यासाठी कावडीचा वापर अधिक वाढला. या काळात कावडीने पाणी वाटप करण्याला व्यावसायिक रूप प्राप्त झाले. याच काळात घरोघरी उदर निर्वाह करण्यासाठी कावडीने पाणी भरून दिले जात असे. अशा उदरनिर्वाह करणाऱ्यांना ‘पाणक्या’ किंवा ‘पाणेरी’ असे म्हटले जायचे. मोठ्या जमीनदार किंवा बागाईतदाराच्या घरी पाणी भरण्यासाठी हे लोक मजुरीने किंवा विशिष्ट वस्तूच्या मोबदल्यात कावडीने पाणी भरत असत. 

             पुढे स्वातंत्र्योत्तर काळात विहिरीवर मोटरपंप, पाईपलाइन तसेच शासकीय पाणी पुरवठा योजना, नळयोजना सुरू झाल्या. घरोघरी नळाद्वारे पाणी येऊ लागले. थेट स्वयपाक घरात चोवीस तास पाण्याची उपलब्धता झाली. विहिरीतील मोटारीचा पाईप आता थेट पिकाच्या वाफ्यात किंवा सरीत पोहचला आहे. त्यामुळे विहिरीवरून पाणी भरण्यास अडचणी येत आहेत. गावात आड आणि बारवा दिसतच नाहीत आणि दिसल्याच  तर आटलेल्या अवस्थेत दिसतात. थेट हवे तेथे पाणी उपलब्ध झाले असल्याने आज कावडीला कामच राहिले नाही. आज ग्रामीण भागात अगदी तुरळक ठिकाणचा अपवाद वगळता कावडीचा वापर होताना दिसत नाही. कावडीची काठी आणि डब्बे आज कुठेतरी अडगळीत पडलेले दिसतात. काही ठिकाणी तर तिचे अवशेष देखील पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे लोकव्यवहारातून आज ही कावड हळूहळू हद्दपार होण्याच्या मार्गांवर आहे.

               कावड हे धार्मिक, सामाजिक व कौटुंबिक संस्कृती समृद्धीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. विशेषत; धार्मिक परंपरेत शिवभक्तांची‘कावड यात्रा’ अजूनही सुरु आहे. कावडीने केवळ पाणी वाहिले जात नाही तर विविध वस्तू पदार्थही कावडीच्या साहाय्याने वाहिले जात असत. रामायणात तर श्रावण बाळ आपल्या माता पित्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रेला घेऊन चालायचा उल्लेख आहे. कावडीने पाणी आणणे हे केवळ कष्टाचे काम नसायचे, तर ते एक कौशल्याचे काम असायचे. ओझे घेऊन स्वतःचा तोल सांभाळत कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पाणी वाहण्याचे कावड हे खूप महत्वाचे साधन होते. यामुळे श्रमसंस्कृतीसह शारीरिक सबलता व सक्षमता अंगी निर्माण होत असे. 

          कावडीने पाणी वाहणे म्हणजे एक प्रकारचा व्यायाम असायचा. त्याकाळी कावडीने दूरवरून पाणी वाहण्याची तरुणांमध्ये चुरस लागायची. मित्र, सवंगडी एकत्रित अगदी आनंदाने हे काम करत असत. कावडीद्वारे घरातील पाणी वाहण्याचे काम पुरुष करत असल्याने स्त्रियांचे पाणी भरण्याचे कष्टही कमी होत असत. त्यामुळे कौटुंबिक परस्पर प्रेमाची भावना निर्माण होऊन कार्यविभागणीचे तत्त्व पाळले जात असे. म्हणूनच कावड हे श्रम, बल, प्रेम आणि कौशल्याचं प्रतिक मानली जात असे. शेजारी किंवा नातेवाईकांच्या लग्न कार्यात किंवा इतर कार्यक्रमात गाव, वस्तीवरील अनेक जण कावडीने पाणी वाहून संबंधित व्यक्तीला एक प्रकारे आधार देत असत. कधी कधी अडचणीच्या काळात कावडीची देवाण घेवाण देखील होत असे. यातून सामाजिक सहकार्यवृत्ती व स्नेह वाढीस लागत असे.

            पाणी पिण्यास देणे किंवा पाणी पाजणे हे भारतीय संस्कृतीत पवित्र आणि पुण्याचे काम मानले जाते. संत एकनाथांनीही काशीवरून कावडीने आणलेले गंगेचे पाणी तहानलेल्या गाढवास पाजून पुण्यप्राप्ती व भूतदयेचा संदेश दिलेला आहे. त्यामुळे कावडिच्या माध्यमातून विविध घटकांना पाणी देऊन लोक अशा प्रकारे पुण्य पदरी पाडून घेत असत. कावडीने हे कार्य तर साधले जायचेच. याशिवाय कावडीचे रूपही तसे सुंदर, देखणं आणि कलात्मक असल्याने घराच्या ओसरीत दोन खुंट्यांवर अडकवलेली ही कावड म्हणजे घराचं एक वैभवच असायचं. अशा प्रकारे लोकसंस्कृतीच्या धार्मिक व सामाजिक परंपरेचा वारसा असलेली ही कावड आज आपल्या अस्तित्वाच्या अखेरच्या घटका मोजत आहे. 

            एकेकाळचा ग्रामीण साधन संस्कृतीचा हा समृद्ध साक्षीदार आज कुठेतरी अडगळीत धुळीत खंगत पडलेला आहे. घरात पाणी आणून कुटुंबाला नवचैतन्य बहाल करणारा पुण्यप्रदान संस्कृतीचा हा वाहक आज स्वतःच आपल्या अस्तित्वासाठी अखेरच्या घटका मोजत आहे. ग्रामीण जीवन समृद्धीचा हा वैभवशाली साक्षीदार लोप पावल्यास काळ आपणास सदैव दोष देत राहील. आपल्या ग्रामीण संस्कृतीचं हे गतवैभव जपायचं असेल तर कावड केवळ साधनरुपानं नव्हे तर कार्यरुपानं टिकवायचा प्रयत्न व्हायला हवा.

✍️ डॉ. अशोक शिंदे

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र. १५

 चोपणी 

           सुगीची कामं उरकली की, काही दिवसातच ऊन्हं चांगली चटकू लागत. शिवारातलं धन घरी सुरक्षित येऊन पडलेलं असायचं. रानातल्या नांगरटीही एव्हाना उरकत आलेल्या असायच्या. अशा काळात शेत कामातून लोकांना काहीशी उसंत मिळायची. मात्र अख्खा हंगाम शेता - शिवारात गेल्यामुळे  पुढचा हंगाम येईपर्यंत घरातील बाकीची कामं उरकून घ्यायचीही हीच वेळ असायची. अशातच यात्रा - जत्रा आणि लगीनसराई देखील पुढ्यात येऊन ठेपलेली असे. त्यामुळे घर अंगणाच्या आवरा आवरीचं काम या काळात पहिल्यांदा हातात घेतले जाई. या आवरा आवरीतील मुख्य काम म्हणजे घराचा आणि अंगणाचा ‘परवर’ करणे हे होय. वर्षा, दोन वर्षा आड हे काम हमखासपणे केले जात असे.

            या काळापासून उन्हाची तीव्रता आणखीच वाढत जाते. अशावेळी घर, ओटा किंवा ओसरीची जमीन थंड रहावी म्हणून ग्रामीण भागात असे परवर केले जात असत. मागील सलग दोन तीन वर्ष केवळ शेणाने सारवल्यामुळे या जमिनीच्या पृष्ठभागावर शेणाचे थर किंवा पापुडे तयार होत असत. काही ठिकाणच्या जमिनीला छोट्या भेगा देखील पडलेल्या असत. अशा वेळी परवर केल्याने जमीनीची पातळी सपाट होईल व जागाही एकजीव घट्ट होईल आणि उन्हाळ्यात घरात गारवा, थंडावा राहील या हेतूने हे परवर केले जायचे. समद्या गावात याच काळात हे परवर करण्याचं काम अगदी जोरात चाललेलं असायचं. 

             परवर करणे हे कुटुंबाचे सामुदायिक काम असे. या कामात घरातील लहान थोर अगदी आनंदाने आपली जबाबदारी उचलत असत. आधी घराच्या आतील जागेचा परवर केला जायचा. मग ओसरी किंवा ओट्याचा परवर केला जायचा. घरातील लहान मंडळी तर या कामाची आतुरतेने वाट पाहत असायची. कारण या कामात त्यांना मनसोक्त सहभाग घेता येत असे. परवर करणे म्हणजे घरातील जमीन उकरून पुन्हा घट्ट करण्याची प्रक्रिया. हे काम पूर्ण व्हायला किमान पाच- सात दिवस लागायचे. सुरवातीला घरातील बैठकीची व वावरण्याची सर्व जमीन कुदळ किंवा टिकावाने खोदली जात असे . साधारणत: ही जमीन अर्धा - पाऊण फूट खोल उकरली जायची. हे काम घरातील पुरुष मंडळी करायची. यावेळी  त्यामध्ये आवश्यकतेनुसार माती, शेण मिसळून ती जमीन खोऱ्याने हावार केली जायची. नंतर त्या खोदलेल्या जमिनीत घरातील महिला हंडा-घागरीने पाणी आणून त्यात ओतत असत. या मिश्रणाचा चांगला चिखल गाळ होईपर्यंत त्यात पाणी ओतले जायचे. या वेळी घरातील लहान मुलं हा चिखलगाळ एकजीव करण्यासाठी सज्ज असत. ते आपल्या पायांनी सगळी जमीन तुडवून माती- पाणी एकजीव करत. यावेळी घरातील जमिनीची पातळी सर्वत्र एकसमान केली जायची. त्यांनतर तीन चार दिवस ही जमीन सुकू दिली जायची. आणि नंतर खऱ्या अर्थाने परवर करायला सुरुवात व्हायची. 

           परवराचे काम चालू असताना घरात ये-जा करण्यासाठी दारापासून आत विशिष्ट अंतरावर लहान सपाट दगड मांडले जायचे. हे दगड चिखलात चांगलेच रुतून बसलेले असत. तीन चार दिवसात हा चिखल चांगला सुकायचा. एकदा का जमीन चांगली सुकली की मग रुतलेले दगड काढून परवराच्या चोपणीला सुरुवात होत असे. परवराच्या चोपणीसाठी दीड, दोन फूट लांबीचं एक लाकडी साधन वापरले जायचे. त्यास ‘चोपणी’ असे म्हणत.

           घराचा परवर करण्याच्या कामात सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे ही चोपणी होय. चोपणीला हातात धरण्यासाठी लाकडाच्या अंगचाच साधारण अर्धा फूट लांबीचा गोल गुळगुळीत दांडा असतो. दांड्याच्या पुढे साधारण एक, दीड फूट लांबीचा खाली सपाट पृष्ठभाग व वर अर्ध गोलाकार किंवा वरच्या दोन्ही बाजूनी तासलेला षटकोनी आकाराचा लाकडी भाग असतो. ही चोपणी एका हाताने सहजपणे हाताळता येईल अशी साधारण दोन, अडीच किलो वजनाची असते. एकदा का ओली केलेली जमीन चांगली सुकली की मग या चोपणीचं काम सुरू व्हायचं. 

               परवर चोपण्याचं किंवा जमीन घट्ट करण्याचं काम ही चोपणी करते. प्रथम चोपणीचा दांडा हातात धरून ती जोरात सुकलेल्या जमिनीवर विशिष्ट रीतीने मारली किंवा आपटली जाते. तिच्या या आघाताने जमीन दबली जाते व घट्ट होते. सलग दोन, तीन दिवस या चोपणीने परवर चांगला चोपला किंवा ठोकला जातो. परवर चालू असताना जमिनीची पातळी सगळीकडे एकसमान येईल याची काळजी घेतली जाते. कुठे खोलगा वा उंचवटा राहणार नाही हेही पाहिले जाते. 

           परवर करते वेळी खालची जागा एकदम टणक आणि मजबूत होईल अशारितीने चोपणी चालवली जाते. अशा प्रकारे चोपणीच्या दोन, तीन फेऱ्या होतात. या कामात सवडीने घरातील सगळेच जण आपला वाटा उचलतात. चोपणीच्या शेवटच्या फेऱ्यात मात्र परवर सुशोभित करण्याचं काम केले जाते. बांगड्यांच्या काचा, इतर फुटक्या काचा, गोट्या, दामुके, चिंचुके इ. वस्तूंपासून तयार झालेल्या परवरावर सुंदर नक्षी काढल्या जातात. घराचे प्रवेश द्वार, कोपरे आणि मध्यभागी काही नावे, विविध फुलांचे आकार, गोल, चौकोनी आकार असे आकर्षक नक्षीकाम केले जाते. वरील वस्तू वा पदार्थ परवरावर विशिष्ट पद्धतीने मांडून वरून त्यावर चोपणीने चोपले की त्या वस्तू जमिनीत घुसून त्याची सुंदर नक्षी बनत असे. या नक्षीकामामुळे घर - अंगणात प्रसन्नता निर्माण होत असे. असं हे परवराचचं काम चोपणीशिवाय शक्य होत नसे . अशा प्रकारे हे सर्व काम पूर्ण झाल्यावर मग परवर शेणानं सारवला जातो, आणि पुढे त्यावर वावर सुरू होतो. 

            परवराच्या या संपूर्ण प्रक्रियेत ही चोपणी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. अशी चोपणी गावातील सुतारा कडून तयार करून घेतली जाते. यासाठी जांभूळ, बाभूळ किंवा लिंबाचे लाकूड वापरले जाते. आमच्या गावात बयाजी नाना अशा चोपण्या करण्यात तरबेज होते. एकदा ही चोपणी करून घेतली की ती पुढे कित्येक वर्षे चांगली टिकत असे. चोपणी हे आपल्या ग्रामीण संस्कृतीत गृह निर्मितीच्या कार्यात उपयोगी पडणारे एक उपयुक्त साधन आहे. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत चोपणीस महत्त्वपूर्ण स्थान असलेले दिसते. घराचा परवर करणे ही प्रक्रिया देखील प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसून येते.        

            प्राचीन काळापासून वास्तव्यासाठी असलेले  ‘घर’ ही पवित्र जागा मानली गेली आहे. यामध्ये भूमीशुद्धी, जलशुद्धी व अग्नीशुद्धी करण्याची प्रथा होती. यास ‘वास्तू पूजन’ वा.’गृह संस्कार’ असे म्हटले जात असे. या परंपरेनुसार उन्हाळ्यात भूमीला थंडावा व शुद्धता मिळावी म्हणून माती खोदणे, पाणी टाकून घट्ट करणे, त्यावर गायीच्या शेणाचे लेपन करणे असे विधी होत असत. यामुळे घर पवित्र तर व्हायचेच; पण रोगटपणा व कीटकांपासूनही संरक्षण मिळत असे. याकाळात प्रामुख्याने मातीची व लाकडी घरे असत. उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्यात भेगा पडत व सततच्या वापराने धूळ निर्माण होत असे. म्हणून ‘परवर’ या प्रक्रियेची गरज निर्माण झाली. यामुळे घरातील जमिनीत पाणी व ओलावा पुन्हा भरल्याने जमीन घट्ट होऊन थंडावा मिळत असे. हा परवर करण्यासाठी चोपणी हे साधन वापरले जात असे. 

            प्राचीन काळापासून ग्रामीण समाजात ठोकणे, बदडणे किंवा चोपणे या आवश्यक कामांसाठी लाकडी साधनांचा वापर करण्याची परंपरा होती. ज्वारी, बाजरी व गहू या अन्नधान्याचे कणीस ठोकण्यासाठी मोगरी तर लाकडी खुंटी किंवा बांबू जमिनीत ठोकण्यासाठी ठोकणी या साधनांचा वापर केला जात असे. याच धर्तीवर परवर चोपण्यासाठी चोपणी तयार झाली असावी. मातीच्या घरात ओटा, देवघराचा परवर करताना चोपणीचा वापर केला जात असे. प्राचीन काळापासून चोपणीने जमिनीला घट्ट करण्याची प्रक्रिया केली जात होती. प्राचीन काळापासून ते ब्रिटिश राजवटी पर्यंत ग्रामीण घरांमध्ये चोपणीचा वापर सुरूच होता.    

            स्वातंत्र्योत्तर काळात पारंपारिक माती, लाकडाचा वापर करून बांधली जाणारी धाब्याची किंवा चौसोपी खणांची गृहरचना हळूहळू मागे पडत गेली. नवीन पाश्चिमात्य तथा रोमन शैलीची गृह निर्मिती होऊ लागली. आधुनिक काळात तर बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून घराचे पूर्ण रुपडेच बदलले गेले आहे. एकमजली बंगाला, ट्विन बंगलो, बहुमजली इमारतीतील सदनिका अशी घरे बांधली जात आहेत. बँका व सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब, सामान्य लोकांनाही अशा प्रकारची घरे मिळत आहेत. झोपडीचेही रूप आता पुरते पालटले आहे. खेड्या पाड्यात काही प्रमाणात असलेली मातीची घरे वगळता आज सर्वत्र सिमेंट-काँक्रीटची घरे दिसत आहेत. केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूरांची घरेही आता आधुनिक शैलीयुक्त बांधली जात आहेत. माती, लाकडाशिवाय बांधल्या जाणाऱ्या या घरांना ओसरी अंगणाचा तर जणू शापच लागला आहे असे वाटते. 

            या सिमेंट-काँक्रीटच्या घरात आज चकचकीत, गुळगुळीत फरशी बसवली जात आहे. त्यामुळे ‘परवर’ करण्याची प्रक्रियाच बंद  झाली आहे. परिणामी परवराला साकार करणारी चोपणी आज कुठेतरी अडगळीत जाऊन पडली आहे. घराचा परवर करणे ही केवळ घराची आतील जमीनपुनरुजीवित करण्याची प्रक्रिया नसून ती प्रक्रिया म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचा एक सांस्कृतिक, धार्मिक  आरोग्यदायी ठेवा होय. चोपणीने चोपताना घरातील स्त्रिया ओव्या, गाणी म्हणत  ही प्रक्रियाउत्सवात रूपांतरित करत असत. परवर चोपणीच्या निमित्ताने शेजारी सख्या - मैत्रिणी मदतीला येत असत. यामुळे प्रेम व परस्पर सहकार्य वृत्ती वाढीस लागत असे. सण, वार, उत्सव या धार्मिक आणि मुंज , विवाह या कौटुंबिक कार्यासाठी परवर ही परंपरा महत्वाची ठरत असे. घर अंगणात चोपणी फिरल्याने परवर नजरेत भरत असे. 

             चोपणी केवळ परवर साकारत होती असे नाही तर लाक्षणिक अर्थाने ती विकृत प्रवृत्तीही चोपून काढत सरळ, सपाट करत होती. ‘चोपून सरळ करणे’ हा संस्कारजन्य शब्दसमूह या चोपणीच्या कृतीतूनच उगम पावला असावा. चोपणीमुळे केवळ घराचे सौंदर्य वाढत नव्हते; तर तिच्या कार्यामुळे कौटुंबिक आरोग्य टिकत असे. परवरामुळे स्वच्छता, पावित्र्य राखले जात व उन्हाचा दाह कमी होऊन घरात स्वास्थ्य नांदत असे. परवर करताना माती, पाणी, शेण हे नैसर्गिक साहित्य वापरले जात असल्याने पर्यावरणीय दृष्टीने येथे शाश्वत जीवनपद्धतीचा अंगीकार होत असे.       

            चोपणी हा कलात्मक दृष्ट्याही मौलिक ठेवा आहे. चोपणीने परवर चोपणे ही सुद्धा एक कलाच आहे. चोपणीने परवर चोपताना ती जमिनीवर आपटताना ती किंचित आपल्याकडे ओढावी लागते. असे न केल्यास एखादवेळी तिच्या ठोकण्याबरोबर चिखलाचा पोपडा तिला चिटकून वर येऊ शकतो. त्यामुळे चोपतानाही अलगदपणे आघात करणे ही वैशिष्ट्यपूर्ण कला चोपणीच्या रूपाने विकसित झाली. शिवाय वैविध्ययुक्त आकाराच्या चोपण्या देखील वस्तुकलेचा उत्तम नमुना मानला जातो. परवर चोपताना लहान थोरांना आपले कला, कौशल्य आजमावण्याची उत्तम संधी मिळत असे. विविध वस्तूंच्या मध्यमातून रचलेलं नक्षीकाम हे परवर असेपर्यंत कौतुकाचं निमित्त असायचं. या सर्व सांस्कृतिक बाबींची साक्षीदार असलेली ही चोपणी आज मात्र कुठेतरी कोपऱ्यात वाळवीने वेढलेली  दिसत आहे. 

             आधुनिक पद्धतीच्या घरांमुळे आज चोपणीचा  वापर बंद झाला आहे. अपवाद म्हणून अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी पारंपरिक मातीच्या घरांत परवर केला जातो. तेथे ‘चोपणी’ वापरली जाते. या ठिकाणी अजूनही चोपणी जपली जात आहे. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. परवर करणे ही केवळ घर दुरुस्तीची पद्धत नव्हती तर  भारतीय संस्कृतीतील भूमीपूजन, शुद्धीकरण व गृहसंस्कारया परंपरेचा ती अविभाज्य भाग होती. त्यामागे घरात स्वच्छता, शुद्धता व चैतन्य निर्माण करणे हा उद्देश होता. केवळ चोपणीच्या रूपाने हे साफल्य साध्य होत असे. 

             असा हा घराचे पुनरुजीवन व चैतन्य फुलवणारा समृद्ध साक्षीदार आज त्याच्या अस्तित्त्वाच्या अखेरच्या घटका मोजतोय. त्याचं कार्य आज जवळ जवळ संपलेच आहे. मात्र त्याचे कार्य व रूपाचा वारसा पुढच्या पिढीसाठी जिवंत ठेवायचा असेल ; तर त्याच्या स्मृती वा त्याचे वस्तूरूप अवशेष  आपणास जतन करणे अनिवार्य आहे. म्हणूनच चोपणी जेथे ज्या अवस्थेत आहे त्या रूपात तिला जपूया ! गृह संस्कृतीच्या हा मौलिक ठेवा सुरक्षित राखुया ! सद्या तरी एवढेच करूया ! 


✍️ डॉ. अशोक शिंदे 

प्राध्यापक, मराठी विभाग, 

मुधोजी महाविद्यालय, फलटण 

गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

अडगळीतील समृद्धी- लेख क्र. १४

 अडकित्ता

           रात्रीची जेवणं आटोपली की ओसरीत आजोबांचा एक छोटासा मुखशुद्धीचा कार्यक्रम सुरु व्हायचा. ओसरीतल्या देवळीत आजोबांचा एक चौकोनी डबा असे. आजोबा त्याला पानपुडा म्हणायचे. हा पानपुडा घेऊन ते ओसरीत बैठक मारत असत. कधी सतरंजी अंथरून तर कधी बाजेवर बसून आजोबांचा हा कार्यक्रम चांगलाच रंगायचा. पांढरे शुभ्र धोतर नेसलेले आजोबा मांडी घालून बसायचे. आजोबांची मांडी म्हणजे घरातल्या सर्व लहानग्यांची हक्काची जागा. मात्र या जागेवर पहिला अधिकार असायचा तो सगळ्यात धाकट्याचा. पण यावेळी आजोबांच्या मांडीवर मात्र कोणीही बसायचे नाही.

           सगळे जण आजोबांच्या पुढे अर्धगोलाकार बसायचे. प्रत्येकाची जागा ठरलेलीच असायची. ज्याने त्याने आपापली जागा घेतली की मग आजोबांच्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायची. आजोबांचा पानपुडा म्हणजे एक आखीव, रेखीव , कोरीव व जाळीदार नक्षी असलेली सुंदर पेटी होती. आजोबांच्या या पानपुड्यात अनेक पदार्थ आणि वस्तू असायच्या. ही पेटी म्हणजे लहानग्यांसाठी अलीबाबाची गुहाच असायची. आजोबा या पेटीतून एक एक रत्न काढावे तशी एकेक वस्तू बाहेर काढायचे. सर्व जण अगदी कुतूहलाने या वस्तूंकडे बघत असत. 

           सर्वप्रथम आजोबा हिरवी दोन पानं बाहेर काढायचे. ती पाने वाटीतल्या पाण्याने धुवून घ्यायचे. मग त्यांच्या देठांना चिमटीत धरून त्यातील पाणी शिपडायचे. नंतर एक एक करत ती पाने आपल्या उजव्या मांडीवर चोळायचे आणि पुसून घ्यायचे. मग एकाखाली एक जुळवून पानांचे दोन्ही देठ बोटांनी हळूच खुडायचे व ते देठ दाताखाली दाबून ठेवायचे. नंतर आजोबा पानपुड्यातून छोटीशी नाजूक कात्री काढायचे. ही कात्री म्हणजे लहानग्यांचे भारी आकर्षण पण तिला कोणीही हात लावायचा नाही अशी आजोबांची तंबी असायची. या नाजूक कात्रीने आजोबा पानाचा काही खराब भाग कापायचे. दोन्ही पानांचे आकार एकसमान करायचे आणि ती पाने उजव्या मांडीवर ठेवायचे.

           त्यांनतर आजोबा पेटीतून चुन्याची नाजूक डबी काढायचे. उजव्या अनामिकेच्या नखाच्या वरच्या बाजूने त्यातील चुना काढायचे आणि वरच्या पानावर लावायचे.  मग आजोबा एक छोटीशी पांढरी सुती पिशवी बाहेर काढायचे. तिचे तोंड एका बंदाने गाठ मारून बंद केलेले असायचे. आजोबा हळूच तो बंद ओढायचे. तोंड उघडले की त्यातून एक छोटासा लालसर काताचा खडा बाहेर काढायचे. त्याची भुकटी करून ते चुन्यावर टाकायचे. त्यानंतर आजोबा एक सुपारी बाहेर काढायचे. 

            सुपारी बाहेर काढली की आतापर्यंत अगदी शांतपणे बसलेले सर्वजण आणखी सुदरून बसायचे. आता त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असायची. कारण ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत असायचे तो सुपारी कातरण्याचा क्षण समीप आलेला असायचा. आजोबा सुपारी बाहेर काढायचे. तिच्यावर जोराची फूक मारून ती स्वच्छ करायचे. नंतर ते पेटीतून एक अत्यंत देखणी वस्तू बाहेर काढायचे. ती वस्तू म्हणजे अडकित्ता. सुपारी कातरण्याचे हे हत्यार. त्याचा आकार आणि त्याचं कार्य या दोन्हीही गोष्टी अगदीच कुतूहलाच्या असायच्या. हा अडकित्ताच लहानग्यांचे खास आकर्षण असायचा.     

           आजोबांचा हा अडकित्ता साधारण अर्धा फूट लांबीच्या दोन पोलादी दांड्यांनी जोडलेला होता. वरच्या दांडीला निम्म्यापर्यंत एक धारदार पाते व बाकी निम्मा भाग गोल आकाराचा दांडा होता. खालची बाजू निम्यापर्यंत थोडीशी सपाट तर बाकी निम्मा भाग गोल दांडा अशी होती. आजोबा उजव्या हातात हा अडकित्ता घ्यायचे. याची खालची दांडी हाताच्या चार बोटावर व वरची दांडी अंगठ्याखाली येईल अशा रीतीने ते आडकित्ता हातात धरायचे. मग डाव्या हाताचा अंगठा व शेजारच्या दोन बोटांच्या चिमटीत ते सुपारी धरायचे. सुपारी कातरताना आजोबा आडकित्त्याच्या दोन्ही दांड्यांच्या मध्ये सुपारी धरायचे आणि अशा रीतीने तो चालवायचे की सुपारीचे अगदी पातळ पदर खालच्या हाताच्या बोटाच्या चिमटीत जमा व्हायचे. मुलांना याचीच मोठी गंमत वाटायची. आजोबांचा हा अडकित्ता आणि त्यांचे सुपारी कातरणे या दोन्ही गोष्टी लहानग्यांना खूपच आवडत असत. 

           कातरलेल्या सुपारीचे दोन तीन पातळ पापुडे आजोबा पानावर ठेवत आणि त्या पानांची त्रिकोणी घडी घालून ते पान खात असत. यावेळी आजोबा घरातील काही मंडळींनाही अशा पानाचे विडे बनवून देत असत. याचा लाभ काही लहान्यांनाही मिळायचा. पण यावेळी ते लहान मुलांना पान खाण्याबाबतचे नियम व अटीही सांगत असत. मात्र पान खाण्यापेक्षा आजोबांचा अडकित्ता व त्याने कातरली जाणारी सुपारी हे पाहण्यासाठीच घरातील ही लहान मंडळी रोज रात्री आजोबांजवळ येऊन बसत असत. ते जसे अडकित्ता हातात घेऊन सुपारी कातरतात तसाच प्रयत्न ही मंडळी करत असत. अडकित्ता हे पानपुड्यातील सर्वात महत्त्वाचे आणि लहान मुलांच्या आवडीचे साधन होते. अडकित्त्याशिवाय पानपुड्याला व पानविड्याला शोभा नसायची. म्हणूनच प्रत्येक घरात हे साधन असायचेच. 

           अडकित्ता हे दुहेरी तरफेच्या तंत्राचे एक हत्यार असते. सुपारी कातरणे आणि तिचे तुकडे करणे यासाठी ते वापरले जाते. मूळ ‘अडकोत्तू’ या कानडी शब्दाचे अडकित्ता हे मराठी रूप असावे. अडकित्त्याची निर्मिती लोकसंस्कृतीतील इतर उपयुक्त साधनांप्रमाणेच मानवी गरजेतून झाली आहे.  या साधनास सौंदर्याची जोड देण्याच्या प्रयत्नातून त्यावरील नक्षीकाम व त्याचे विविध आकार निर्माण झाले आहेत. काही अडकित्त्याच्या सपाट भागावर सोन्याचांदीचा मुलामा चढवून वेलबुट्या व नक्षी कोरलेल्या असतात. काहींवर आरसे, रंगीबेरंगी काचांचे तुकडे बसविलेले असतात, तर काही अडकित्त्यांना घुंगरेही जोडलेली असतात. तसेच काही अडकित्त्यांचा आकार देवदेवता व पशुपक्ष्यांप्रमाणे असतो. काही खानदानी घरातील अडकित्त्यात सोने, चांदी, पितळ, ब्राँझ इत्यादींचा मौल्यवान धातूंचाही वापर करण्यात आलेला दिसतो. भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या काळांत विविध प्रकारांचे असे अडकित्ते दिसून येतात.

           अडकित्ता हे साधन भारतीय पारंपारिक आहार संस्कृतीशी संबंधित एक प्रमुख साधन मानले जाते. हे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचे साधन आहे. ते केवळ घरगुती उपयोगापुरते मर्यादित नसून लोकजीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात ते खोलवर रुजलेले साधन आहे. प्राचीन काळात लोखंडाची साधने कमी प्रमाणात वापरले जात होती.  याकाळात सुपारी फोडण्यासाठी साधे लोखंडी किंवा तांब्याची धारदार पाती असलेली हत्यारे अस्तित्वात होती. सातवाहन व नंतरच्या दक्षिण भारतीय राजवटींमध्ये पान–सुपारी संस्कृती अत्यंत महत्त्वाची मानली जाऊ लागली. या काळात साधे, दांड्या–फळीचे लोखंडी साधन वापरले जात असे. या काळात शिल्पकला व कौशल्यातून लहान आकाराचे कातरणारे अवजार तयार झाले हे अडकित्त्याचे पहिले रूप असावे. 

              पुढे यादव, बहामनी व मोगल काळापर्यंत पान–सुपारीला राजाश्रय मिळाला. तो एक प्रकारचा शिष्टाचार बनला. या काळात अडकित्ता कलात्मक व शोभेची वस्तू झाली होती. याच काळात पितळ, कांस्य, चांदी, हत्तीचे दात, हाड, आणि कधी कधी सोन्याच्या पत्र्याने मढवलेलेही अडकित्ते बनू लागले. तसेच अडकित्त्याच्या पातीवर हत्ती, मोर, वेली, नक्षीकाम होऊ लागले. या काळात श्रीमंत वा राजेशाही परिवारात अडकित्ते वापरले जात होते. ब्रिटिश राजवटीत ग्रामीण व शहरी भागात पान–सुपारी खाण्याची प्रथा रूढ झाली होती. या काळातच अडकित्ते घराघरात सर्वसामान्य झाले. याच काळात विविध आकार नक्षी काम असलेले अडकित्ते तयार झाले. 

               आधुनिक काळात मात्र शहरी जीवनशैलीत बदल होत गेले. आहारशैली व पदार्थही बदलले. विभक्त कुटुंबपद्धती मूळ रोऊ लागली. नोकरी व्यवसायामुळे जेवणाच्या वेळा बदलल्या गेल्या. घरातील एकत्र पंगती जेवण कमी झाले. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी आजोबांचा वावर कमी होत गेला. अलीकडच्या काळात तर खाणावळी, उपहारगृहे, अतिथीगृहे, हॉटेल्स, रेस्टोरेंट यांची रेलचैल वाढली आहे. पाहुणे आल्यावर तर हमखास एखाद्या हॉटेलवर जेवणाचा बेत ठरवला जातो. तेथे पान स्टॉल असतेच. आता तर केवळ शहरातच नव्हे तर अगदी खेडोपाडी सुद्धा चौका चौकात पानाचे ठेले उभा राहिलेले दिसतात. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे पानांचे प्रकारही प्रसिद्ध होत आहेत. शिवाय अशा पानांचे पार्सल देखील घरी आणण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे आज घरातून पान–सुपारी खाण्याची प्रथा हळूहळू कमी होत चालली आहे. 

             घरात पानपुडा आहे मात्र तो दिवाणखान्यातील काचेच्या कपाटाची शोभा व घराची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम करत आहे. आणि त्यातील अडकित्ता तर आहे की नाही ते दिसत सुद्धा नाही. एकेकाळी घराचे पारिवारिक सौख्य जोपासणारा हा अडकित्ता आज मात्र दिसेनासा झाला आहे. अडकित्ता केवळ कौटुंबिक भोजन संस्कृतीचा घटक नव्हता तर तो धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातही महत्त्वाची भूमिका बजावत होता. आपल्या आतिथ्य परंपरेचा प्रतिक म्हणून या साधनास खूप मान दिला जात असे. 

            धार्मिक विधी, सणवार, किंवा कौटुंबिक विशेष कार्यासाठी उपस्थित पै-पाहुण्यांच्या मेजवानी नंतर मुखशुद्धीच्या पाना इतकाच पान खाण्याचा कार्यक्रम सुद्धा रंगायचा. पाहुण्यांच्या हातात सुपारी कापून देणे हा पाहुण्याचा सन्मान समजला जायचा. पाहुण्यांना पानविडा देताना अतिथ्यसेवेचे समाधान मिळत असे. तोंडातील पान रंगण्यावरूनही यावेळी खूप चेष्टा, मस्करी व्हायची. याप्रसंगी इतर वस्तूंपेक्षा आडकित्ता हाच खास आकर्षण आणि चर्चेचा विषय असायचा.

            अडकित्ता हा कला संस्कृतीचा मौलिक ठेवा आहे. नक्षीकलेची विविध रूपे यामध्ये आढळतात. कारागिराची कलाकुसर वा सर्जनशीलता यामध्ये शिगोशिग भरलेली असते.  घरातील प्रतिष्ठा तथा कुलीनतेचे प्रतिक म्हणूनही अडकित्ता रुबाबात मिरवत असे. राजेशाही काळात तर राणीच्या महालात पानपुड्याचा मोठा थाट असे. त्यातील अडकित्ता सर्वात सुंदर रूपात असायचा. घरातील प्रतिष्ठेच्या वस्तूंमध्ये सर्वात रुबाब असायचा तो या अडकित्त्याचाच. जसा अडकित्त्याचा रुबाब असायचा तसाच तो अडकित्ता चालणाऱ्याचा सुद्धा असायचा. अडकित्त्याने सुपारी कातरणे हे एक कौशल्यच असायचे. यामध्ये घरातील वा गावातील ठराविकच लोक असतात. आमच्या गावचे साळीकराम तात्या सुपारी कातरण्यामध्ये अत्यंत प्रवीण होते. एक अख्खी सुपारी ते एकसलग एकाच वेळी कापून समोरच्यांच्या हातात ठेवत असे. गावात काही लोक तर असे असतात की ते भेट होताच सुपारी कातरून हातात ठेवतात आणि भेटीचा आनंद घेतात. 

            आदरातिथ्य आणि कौटुंबिक, सामाजिक सन्मान आणि समाधानाचे प्रतिक असणारा हा अडकित्ता सुपारी कातरण्याशिवाय इतर कामातही उपयोगी पडत असे. धान्याच्या पोत्याला शिवलेली सुतळी, चपलेची निसटलेली वादी आणि जनावरांच्या दाव्याची न सुटणारी गाठ कापण्यासाठी ऐनवेळी हा अडकित्ताच धावून येत असे. जनावरांचा चारा कातरणे तसेच उन्हाळ्यात लोणच्याच्या कैऱ्या फोडणे यासाठी जे अडकित्ते वापरले जायचे ते या अडकित्त्याचे थोरले भाऊबंदच होत. एकूणच कौशल्ययुक्त कापकामासाठी ग्रामीण संस्कृतीत अडकित्त्याचे स्थान खूप महत्त्वपूर्ण होते. 

           सद्या बदलत्या काळचा परिणाम म्हणा किंवा आधुनिक जीवनशैलीचे प्राबल्य म्हणा, यामुळे आपल्या ग्रामीण परंपरेचा हा मौलिक ठेवा आज आपल्या आहार संस्कृतीतून दूर होत चालला आहे. एकेकाळचा घराची प्रतिष्ठा दिमाखात मिरवणारा हा कुटुंब सोहार्द संस्कृतीचा साक्षीदार आज कुठेतरी निपचित पडला आहे. त्याचे सुबक व रेखीव नक्षीकाम व वैविध्यपूर्ण आकर्षक रूप-सौंदर्य एका बंद कपाटातील बंद डब्यात निस्तेज होऊन पडले आहे. अडकित्त्या बरोबर त्याची कातर कलाही अखेरच्या घटका मोजत आहे. अडकित्ता वापरातून कायमचा बंद झाला तर हळूहळू त्याबरोबर पानपुडा, कात, सुपारी हे पदार्थही दुष्टीआड जातील. 

               दुर्दैवाने आज घरातील एकत्र पंगती भोजनाचे औचित्यच कमी झाले आहे. यास्तव  अडकित्त्याची जागा घेणारे नवे आधुनिक वा तंत्रज्ञानयुक्त पर्यायी साधनही निर्माण झालेले दिसत नाही. तसे असते तर किमान पुढील पिढीला अडकित्त्याचे पूर्वरूप वा अवशेष तरी सांगता आले असते. अडकित्त्याप्रमाणेच बहुतेक घरातील ओसरी आणि आजोबांच्या जागेलाही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मग तो रात्रीच्या जेवणानंतरचा त्यांच्या मांडीवरचा संवाद असो वा मुखशुद्धीच्या निमित्ताने कुतूहल आणि औसुक्याने भरलेला आनंद असो. या पिढीजात संस्कार परंपरेला आजचे बालपण मुकत चालले आहे. 

             म्हणूनच आज दिसेनासा झालेला, अडगळीत गेलेला हा समृद्ध परंपरेचा वारसा असलेला हा अडकित्ता पुन्हा आजोबांच्या हाती दिसावा. नातवाला या कलेचा समृद्ध वारसा लाभावा. यासाठी भारतीय संस्कृतीतील आदरातिथ्य, मंगलकार्य व कलात्मक अभिरुचीचा रुबाबदार साक्षीदार अडकित्ता पुन्हा पानपुड्यासह ओसरीत दिमाखात दिसावा हीच अपेक्षा! 


✍️ डॉ. अशोक शिंदे,

प्राध्यापक, मराठी विभाग

मुधोजी महाविद्यालय, फलटण 

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

आगळ लेख क्र. १३

 आगळ 

             आमच्या गावच्या पूर्वेला एक वस्ती आहे. पूर्वी तिथे अनेक वाडे होते. यामध्ये एक मोठा वाडा होता. भाऊंचा वाडा म्हणून हा वाडा ओळखला जायचा. चहूबाजूंनी उंच व रुंद चिरेबंदी भिंती, उंच भव्य जोतं, पश्चिमेला मुख्य दरवाजा तर पूर्व व उत्तरेला दोन दरवाजे, आत दोन चौक आणि मागच्या बाजूला गोठा असा हा भक्कम वाडा. इथं सतत माणसांची वर्दळ असे. शेतमजूर, गुराखी आणि इतर काही लोक यांचा इथं सतत राबता असे. आमचे वडिलही अधून मधून कामानिमित्ताने या वाड्यात जायचे. त्यांच्या बरोबर मीही कधी कधी या वाड्यात जायचो. 

        मुख्य दरवाज्यातून वाड्यात प्रवेश करताना मोठी चौकट ओलांडावी लागत असे. वाड्याला शोभेल असाच भक्कम देखणा असा हा मुख्य दरवाजा होता. सागाची चौकट आणि दोन पाखी दरवाजावर कोरीव काम करण्यात आले होते. सात- साडेसात फूट उंचीचा हा दरवाजा इतका जड आणि मजबूत होता की, लहान मुलांना सहजपणे तो लावता - उघडता येत नसे. मात्र जवळ कोणी मोठी माणसे नाहीत अशी संधी साधून कधी - कधी आम्ही लहान मुले हा दरवाजा आतून बंद करण्याचा प्रयत्न करायचो. मोठ्या नेटाने दरवाजाच्या दोन्ही बाजू ढकलून तो बंद करण्याचा आमचा प्रयत्न असे.   कधीतरी दरवाजा बंद करण्यात आम्हाला यश यायचं. 

             या दरवाजाच्या आतील बाजूने चौकटीच्या मध्यावर दगडी भिंतीत दोन्ही बाजूंना दोन चौकोनी खाचा किंवा खोबण्या होत्या. यातील उजवीकडील खोबणी दरवाजाच्या रुंदीपेक्षा थोडी लांब होती. तिच्यात एक चौकोनी लाकडाचा ओंडका ठेवलेला होता. हा लाकडी ओंडका लाकडी खणा सारखाच चौरस आणि गुळगुळीत होता. त्याच्या तोंडाला गोलाई देऊन बरोबर मध्यावर एक लोखंडी कडी बसवलेली होती. दरवाज्याच्या डाव्या बाजूची खोबणी भिंतीत साधारण एक फूट आत होती. दरवाजा आतून बंद केला की लोखंडी ओंडक्याच्या कडीला ओढून त्याचे तोंड डाव्या बाजूच्या चौकोनी खोबणीत घुसवले जायचे. एकदा हा लाकडी चौकोनी दांडा आडवा झाला की बाहेरून दरवाजा कितीही ढकलला तरी दार उघडले जायचे नाही. हा चौकोनी लाकडी ओंडका म्हणजेच ‘आगळ’. 

             दरवाजा आतून बंद करून हा आगळ दोन्ही भिंतीत सरकवला की वाडा अगदी पोलादी पेटीत बंद झाल्यासारखा वाटायचा. अशा प्रकारचे आगळ या वाड्याच्या सर्वच दरवाजांना होते. त्यामुळे दरवाजे आतून लावून घेऊन आगळ सरकवला की मग अख्खा वाडाच सुरक्षित व्हायचा. प्राचीन काळापासून वाडा किंवा घराच्या सुरक्षेचं चोख कार्य करणारे  ‘आगळ’ हे ग्रामीण संस्कृतीतील पारंपरिक साधन आहे. साधारणपणे लांबट गोलसर किंवा चौकोनी कडीसारखा लाकडी तुकडा म्हणजे आगळ. मानवी ग्रामीण संस्कृतीत सुरक्षा आणि आधार देण्याचे मोलाचे कार्य ‘आगळ’ या साधनाने साधलेले आहे. भारतीय संस्कृतीच्या विविध कालखंडात या आगळाला विशेष महत्त्व असलेले पहावयास मिळते. 

            प्राचीन काळी सिंधू संस्कृतीत घरांना व्यवस्थित दारे होती. उत्खननात दिसणारे चौकट, खाचा, सरकवणारे आडवे लाकडी साधन हे आगळाचे प्राथमिक रूप असावे असे समजले जाते. वैदिक व उत्तरवैदिक काळात ‘गृहसंरक्षण’ ही महत्त्वाची संकल्पना आली. धार्मिक ग्रंथांत गृहपालक देवता व द्वारपाल यांचा उल्लेख आहे. याच संकल्पनेतून दरवाजा आतून घट्ट बंद करण्याची पद्धत उदयास आली असावी.  गुप्तकालीन व प्राचीन नगररचना या काळात राजवाडे, मठ, देवळे यामध्ये भक्कम लाकडी दरवाजे प्रचलित होते. दरवाजा आतून बंद करण्यासाठी लाकडी सरकवटा किंवा आगळ याच काळात वापरले जाऊ लागले.

          मध्ययुगीन काळात इस्लामी स्थापत्यशैलीत व हिंदू-मराठा स्थापत्यशैलीत आगळाचे व्यापक रूप आढळते. किल्ल्यांचे मोठे दरवाजे आतून अडवण्यासाठी जाडसर लाकडी आगळ वापरले जात असत. गावातील वाड्यांत, हवेल्यांत मात्र साधे लाकडी आगळ लावले जात. आक्रमण किंवा दरोडे यावेळी हे आगळ मोठे बळकट रक्षण साधन ठरायचे. शिवकालीन रायगड, जंजिरा, प्रतापगड या किल्ल्यांत दुहेरी-तिहेरी आगळ आढळतात. ग्रामीण घरांत मात्र आगळ साधेच असायचे. वाडे व देवळात मात्र जाडसर, लांब लाकडी पट्ट्या चौकटीवर लावल्या जायच्या. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांनी कुलूप, चावी, धातूचे सरकवटे आणले, तरी ग्रामीण वाड्यांत व किल्ल्यांत पारंपरिक आगळ टिकून राहिलेले  होते. 

          आधुनिक काळात शहरी भागात लोखंडी व काँक्रीट गज, लोखंडी बोल्ट अशी पर्यायी व्यवस्था आली. मात्र या काळातही ग्रामीण भागात काही ठिकाणी लाकडी आगळाचा वापर होतच होता. कारण ग्रामीण भागात या काळात वाडे टिकून होते. पुढे वाडा संस्कृती हळूहळू लोप पावत गेली. नवीन घरे बांधली जाऊ लागली. त्यामुळे अशा घरात काही ठिकाणी लाकडी आगळाऐवजी लोखंडी सरकवटे बसवले जाऊ लागले. या काळात आगळाचे स्वरूप बदलले असले तरी त्याचा  वापर मात्र सुरूच होता. 

             अलीकडच्या काळात मात्र संपूर्ण देशात आधुनिक पद्धतीची गृहरचना होत आहे. जुणे वाडे, देवळे, गढ्या आज जीर्ण होऊन गेल्या आहेत. या वास्तुंचे बुरुंज, तटबंदी आणि प्रवेशद्वारे देखील ढासळत चालले आहेत. अनेक जूने वाडे पाडून तेथे नवी इमारत वा बंगला उभारला जात आहे. आधुनिक घरांप्रमाणे आज आधुनिक सुरक्षा व्यवस्था देखील निर्माण होत आहे. घरांच्या सुरक्षेसाठी आता नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामध्ये सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक लॉक, अलार्म सिस्टीम अशी आधुनिक सुरक्षा उपकरणे बाजारात आली आहेत. त्यामुळे आगळ ही संकल्पना आता हळूहळू लोप पावत चालली आहे. त्यामुळे जुन्या वाड्या, हवेल्या व देवळातील आगळ आज जीर्ण अवस्थेत दिसत आहेत. 

          आगळ हे केवळ आपल्या घराचे सुरक्षा साधन नव्हते तर ते घराची मर्यादा, सुरक्षितता आणि संस्कृतीचेही प्रतीक होते. प्रारंभी आगळ फक्त शारीरिक सुरक्षा आणि 

गृहसंरक्षणाचे साधन होते. नंतर मात्र ते सार्वत्रिक तथा साम्राज्य संरक्षणाचा अविभाज्य भाग बनले. दुर्गरक्षणाचा मुख्य घटक म्हणून आगळ महत्त्वाचा ठरला. आजच्या आधुनिक काळात त्याचे स्थान लोखंडी वा तांत्रिक साधनांनी घेतले असले तरी  आपल्या ग्रामीण संस्कृती व परंपरेचे प्रतिक म्हणून आगळ जपून ठेवणे गरजेचे आहे. 

            आपल्या घर आणि मालकाला हल्ले, दरोडे, आक्रमण यापासून वाचण्यासाठी भक्कमपणे बंदोबस्त करणारा हा आगळ मात्र आज स्वतःच असुरक्षित झाला आहे. कुठेतरी अडगळीत किंवा वाड्याच्या पडक्या अवशेषात अस्ताव्यस्तपणे तो बुजून गेला आहे. घर, गाव, साम्राज्य आणि संस्कृतीच्या सुरक्षेचा साक्षीदार असलेला हा आगळ आज अस्तंगत पावत चालला आहे. बाहेरच्या जगाचा धक्का बाहेरच्या बाहेर थोपवून मालकाशी इमान राखत अख्या कुटुंबाला शांत व निर्घोरपणे झोपी घालणारा हा आगळ आज मात्र अखेरच्या घटका मोजत आहे. आजच्या यांत्रिक कुलपांच्या आणि इलेक्ट्रॉनिक गजांच्या जगात या साध्या दिसणाऱ्या आगळाचे अस्तित्त्व जपणे  आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. 

            आपली पारंपारिक घरे साधी, पण भक्कम होती. दरवाजा बंद केला आणि आतून आडवा लाकडी आगळ सरकला की घर जणू अभेद्य किल्ला व्हायचं. हे आगळ म्हणजे केवळ लाकूड नव्हतं, तर मनःशांतीचं आणि निर्धोकपणाचं ते औषध होतं. बाहेर दरोडेखोर, लांडगे, वादळं असली तरी आत बसलेलं कुटुंब निश्चिंत झोपायचं ते केवळ आगळाच्या भरवशावर. आगळाने बंद केलेला दरवाजा म्हणजे फक्त बाहेरच्या माणसाला अडवणं नव्हे, तर आतल्या जगाला सुरक्षित ठेवणं होतं. 

          आज मानवी सुरक्षा, मालमत्ता सुरक्षा याकरिता वैयक्तिक, सामूहिक व शासकीय स्तरावर अनेक उपाय योजना वा विविध उपक्रम राबविले जातात. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काही कायदेही करण्यात आले आहेत. मात्र आगळाची मजबुती आणि विश्वासार्हतेची सर त्याला येणार नाही. 

              ज्या आगळाने मानवी संस्कृतीला स्वसंरक्षणाचा मूलमंत्र दिला, सुरक्षिततेची हमी दिली असे हे विश्वासचं प्रतिक आणि घराचा खंबीर राखणदार आपण आहे त्या स्थितीत जपायला हवा. घराच्या सुरक्षेबरोबरच घराचं घरपण शाबूत राखणारा हा ‘आगळ’ सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. म्हणूनच अडगळीत पडलेला हा ‘आगळ’ उचित जागेवर सरकला जावा एवढीच अपेक्षा!


डॉ. अशोक शिंदे

प्राध्यापक, मराठी विभाग

मुधोजी महाविद्यालय, phalatan

Mob. 9860850344