नांगर
वाटच्या वाटसरा sss काय बघतो भवताला sss ! बघतो भवताला न् जोडी खिलारी नांगराला sss !! हं राजाsss चल परधान्या sss !!! अशा गोड सुरात तांबडं फुटायच्या वेळेला गोमाईच्या मळ्यातून माणिक भाऊंचं गाणं ऐकू यायचं. खरं तर या दिवसात सगळ्याच शिवारात असे नांगरणीचे सूर घुमत असत. मात्र गोमायचा मळा गावच्या वऱ्हालाकडं असल्याने त्याबाजूचा आवाज अधिक ठळक यायचा. त्यात भाऊंचा आवाज जरा पहाडी. त्यामुळे त्यांचं गाणं सहज ऐकू यायचं. गोमाईचं शिवार तसं अख्ख बागायतीच. कुठं काळी, कुठं पोयट्याची तर कुठं काहींसीचोपनाची जमीन. त्यामुळे किमान चार बैलांची नांगरट या रानात चालायची. उन्हाच्या आत पहिला पारुग मारायचा असा भाऊंचा बेत असायचा. त्यामुळे चांदणी उगवली की भाऊंची नांगरणीची तयारी सुरु व्हायची. त्यासाठी सायंकाळच्या पाहरीच भाऊ दोन शिळवटी, नांगर आणि लांबलचक दोन वडी असा सारा सर्जाम गाडीत भरून ठेवायचे. मग पहाटे पहाटे बैलगाडी जुपून दोन बैलं माघं साटीला बांधून एका जोडीदाराला संग घेऊन रानात निघायचे.
रानात पोहोचताच गाडीतील सर्व सामान खाली घेतलं जायचं. भाऊंकडं नऊ नंबरी लोखंडी नांगर होता. या नांगराला सहा - सात फूट लांबीच्या दोन लोखंडी पट्ट्या म्हणजेच दांड्या होत्या. ठराविक अंतरावर नट बोल्टांनी जोडलेच्या या दांड्याच्या पुढच्या टोकाला एक त्रिकोणी कडी बसवलेली होती. या कडीत आधीच एक छोटी लोखंडी गोल कडी ओवलेली असे. त्रिकोणी कडीची पुढची बाजू तीन ठिकाणी वळवल्याने तिच्या महिरूपी आकारासारख्या तीन खाचा दिसत असत. प्रत्यक्ष नांगरताना नागराचं तास सरळ येईल अशा हिशोबानं यातील छोटी कडी नेमक्या हव्या त्या खाचेत अडकवली जायची. ही कडी मधल्या खाचेत असेल तर नागराचं तास सरळ पडायचं. मात्र नांगर तिरका किंवा वाकडा चालत असेल तर ही कडी त्यानुसार डाव्या उजव्या खाचेत ठेवावी लागायची.
या त्रिकोणी कडीच्या मागे जमिनीवर चालेल असं लोखंडी चाक बसवलेलं होतं. लोखंडी दांडीच्या मागच्या बाजूला नट बोल्टांनी एक मजबूत लोखंडी तिकाटणं जोडलेलं होतं. या तिकाटण्याची दोन टोके दांडीला तर एक टोक खालच्या बाजूला होतं. या खालच्या टोकाला एक वक्राकार लोखंडी फळी अडकवली होती. या फळीच्या पुढच्या टोकाला एक टोकदार पोलादी फाळ बसवलेला होता. जमिनीत घुसून नांगरण्याचं मुख्य काम या फाळाचंच असे. ही लोखंडी फळी एका विशिष्ट रितीने तिकाटण्याला अडकवलेली असे, जेणेकरून मुरडानाच्या वेळी नांगर उचलताच ती फळी तिकाटण्याच्या दोन्ही बाजूला येऊ शकेल. या फळीला खाली व वर अशी दोन छोटी छिद्रे होती. त्यात एक लोखंडी सळी अडकवली जायची. त्यामुळे नांगरताना फळी हालत नसे. मुरडानाच्या वेळी नांगराची पलटी करताना ती लोखंडी सळी आधी काढून घेतली जात असे. मग नांगर पलटी करताच फळीची खालची बाजू वर यायची. लोखंडी सळी पुन्हा फळीच्या वर आलेल्या छिद्रात अडकवली जायची. तिकाटण्याचा मागच्या टोकाला नंगाराच्या मुठीचा भाग जोडलेला होता. या भागाला हातात धरता येतील अशा दोन मुठी आणि खाली दोन आडवे लोखंडी गज असा सीडीसारखा भाग जोडलेला होता.
सुरुवातीला हा नांगर बांदाला लावला जायचा. मग भाऊ या नांगराची झुपाझुपी करायचे. प्रथम नांगराच्या पुढं दोन शिलवटी ठेवल्या जायच्या. पहिल्या शिळवटीच्या मध्यभागी वडीचा कासरा घट्ट बांधून वडीची मुदन नांगराच्या पुढल्या बाजूच्या कडीतून ओवून तिच्यात एक बुटारणं अडकवलं जायचं. हे बुटारणं म्हणजे लाकडी तुकडा होय. अशारितीने दुसऱ्या शिळवटचीही वड बांधली जात असे. मग दोन्ही शिळवटीत बैलं जुंपली जायची. पहिल्या बैलजोडीच्या वेसनीला कासारा बांधून तो जोडीदाराच्या हाती असायचा. नागराचं तास सोडून बैलं बाजूला जायला लागली तर या कासऱ्याच्या द्वारे बैलं जाग्यावर आणली जात असत. नांगर सुरु करताना भाऊ दोन्ही हातांनी नांगाराच्या मुठी धरायचे आणि जोडीदार नांगराच्या चाकावर कधी उभा तर कधी एका पायानं दाब देत बैलं हाकायचा. नांगरटीला अशी सुरुवात व्हायची.
नागराचं पहिलं तास बांदाच्या विरुद्ध बाजूला पडेल अशा रितीने नांगराची फळी लावली जात असे. नांगरट नेहमी रानाच्या लांबीच्या बाजूने म्हणजेच उभी केली जात असे. उभी नांगरणी झाल्यावर मग शेवटी आडव्या बाजूवर आडतासं घालून नांगरट पूर्ण केली जात असे. बांदाच्या शेवटच्या टोकाला नांगर गेला की मग बैलं मागे वळवली जायची. नांगरही मागे फिरायचा. यावेळी भाऊ दोन मुठी वर उचलून तिकाटण्यातून नांगराची फळी पलटी करायचे. त्याआधी भाऊ ती लोखंडी सळी आधी काढायचे. पलटीमुळे फळीची खालची बाजू वर आली की, भाऊ ती लोखंडी सळी पुन्हा फळीच्या वर आलेल्या छिद्रात अडकवायचे आणि नांगर पुन्हा तासाला लागायचा. असे प्रत्येक मुरडानाच्या वेळी केले जायचे. अशी दोन - तीन तासं चांगली पडली की, मग भाऊंचं गाणं सुराला लागायचं आणि नांगरटही सुताला लागायची. बैलांना कामाचा त्रास जाणवू नये म्हणूनच अशी गाणी गायली जात असत. उन्हाचा प्रहर सुरु होण्याआधी नांगर चालवला जायचा. एकदा ऊन चटकायला लागलं की, नांगर सोडला जायचा. शिवार मोठं असेल तर मग दिवस कलल्यावर शिरवाळ असताना नांगर पुन्हा जुपला जायचा.
साधारणतः सुगी उरकली आणि धान्य कणगीत पडून गुडाच्या गंजी लागल्या की नांगरटीला सुरुवात व्हायची. मात्र त्याआधी उकिरड्यातील वर्षभराचे खत रानात पसरवले जात असे. तो पर्यंत उन्हाळाही चांगलाच जाणवू लागलेला असायचा. नांगरणी ही उन्हाळ्यातच केली जात असे. कारण या दिवसात उन्हामुळे रान चांगलेच भाजून निघायचे. नांगरटीची ढेकळे उन्हामुळे तापतात आणि ठिसूळ बनतात. पुढे पाऊस पडला की सर्व नांगरट विरघळून रान आपोआप हावार होऊन जाते. नांगरट हा जमिनीच्या मशागतीचा पहिला टप्पा होय. जमिनीत योग्यरित्या हवा खेळती राहावी, पिकांना पोषण मिळावे आणि तणांचे नियंत्रण व्हावे यासाठी नांगरणीची प्रक्रिया केली जात असे. नांगरणीसाठी प्राचीन काळापासून वेगवेगळी साधने आणि तंत्रे विकसित होत गेलेली दिसतात. प्राचीन काळात जमिनीला फक्त कुदळी किंवा कोयत्याच्या साहाय्याने उकरून पेरणी केली जात असे. आदिवासी समाजांमध्ये आणि काही दुर्गम भागांमध्ये आजही ही पद्धत दिसून येते.पुढे नांगर तयार केला गेला. त्यानंतर मात्र भारतीय कृषी संस्कृतीत शेती मशागतीचे पारंपरिक साधन म्हणून हा नांगर सर्वकालीन उपयुक्त ठरलेला दिसतो. नांगर या साधनास भारतीय कृषी संस्कृतीत मोलाचे स्थान असलेले दिसते.
भारतात प्राचीन काळापासून नांगर शेतीसाठी एक महत्त्वाचे साधन राहिले आहे. नांगराचा विकास हा तांत्रिक आणि सामाजिक बदलांनुसार होत गेलेला दिसतो. सिंधु संस्कृतीमध्ये सिंधु खोऱ्यातील लोथल आणि कालीबंगन या ठिकाणी नांगराच्या खुणा आढळतात. या काळातील नांगर लाकडी असायचा आणि तो बैलांच्या साहाय्याने ओढला जात असे. याकाळात शेतीसाठी सरळ रेषेत चर पाडण्याची पद्धतही प्रचलित होती. वैदिक काळात ऋग्वेद आणि अथर्ववेद यामध्ये ‘हल’ (नांगर) चा उल्लेख आढळतो. याकाळातही नांगरासाठी बैलांचा उपयोग केला जात असे. जमिनीची नांगरणी करून गहू, तांदूळ आणि जवसासारखी पिके या काळात घेतली जात असत. महाजनपद काळात नांगराचा उपयोग अधिक प्रमाणात वाढला आणि तो शेतीसाठी अत्यावश्यक बनला. पुढे लोखंडाचा शोध लागल्यानंतर, लाकडी नांगराला लोखंडी टोक (फाळ) जोडण्यात आले. अधिक खोलवर नांगरणी करण्यासाठी नांगर असा सुधारला गेला. पुढे मौर्यकाळात कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात नांगरलेल्या आणि नांगर न केलेल्या जमिनीचा उल्लेख आढळतो. याकाळात मोठ्या प्रमाणावर शेती करण्यासाठी लोखंडी फाळ असलेल्या नांगराचा उपयोग वाढलेला दिसतो. तसेच बियाणे पेरण्यासाठी नांगरासोबत विशेष चर खोदणाऱ्या साधनांचाही विकास याचा काळात झालेला होता.
सातवाहन व गुप्तकाळात हा नांगर अधिक विकसित झाला आणि खोलवर नांगरणी होऊ लागली. याकाळात शेती अधिक उत्पादनक्षम बनली. याकाळात काही ठिकाणी दुहेरी नांगरणी सुरू झाली. चोल, चालुक्य, राष्ट्रकूट आणि पाल या राजवंश काळातही मोठ्या भूभागावर शेती करण्यासाठी नांगराचे मोठे प्रकार तयार झाले होते. विशेषतः या काळात दक्षिण भारतात भातशेतीसाठी विशिष्ट प्रकारचे हलके नांगर प्रचलित झालेले होते. तर उत्तर भारतात गहू व ज्वारीसाठी जड लोखंडी नांगर वापरण्यात येऊ लागले. मुघलकाळात मोठ्या जागेवर शेती करण्यासाठी नांगर सुधारण्यात आला. या काळात नांगरणीसाठी बैलांसोबत कधी कधी घोड्यांचाही उपयोग केला जाऊ लागला. भात शेतीसाठी हलके नांगर आणि इतर पिकांसाठी जड नांगर याकाळात प्रचलित होते. ब्रिटिश कालखंडात भारतात नांगरणी अधिक सोपी करण्यासाठी विविध प्रकारचे लोखंडी नांगरही उपलब्ध होत गेले. किर्लोस्कर कंपनीने याचा काळात १९०३ साली भारतात पहिला लोखंडी नांगर तयार केला होता. या नांगरामुळे भारतीय शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षमतेने शेती करणे शक्य झाले. पारंपरिक लाकडी आणि लोखंडी नांगराबरोबरच इंग्रजांनी ट्रॅक्टरसाठी उपयुक्त असे यांत्रिक नांगरही याच काळात आणले.
स्वातंत्र्यानंतरचा काळात नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. पारंपरिक लाकडी व लोखंडी नांगरासोबत आधुनिक रोटावेटर आणि हायड्रॉलिक नांगर वापरले जाऊ लागले. हरितक्रांती नंतरच्या काळात तर लाकडी नांगर पूर्णतः बंदच झाले आणि लोखंडी नांगर देखील हळू हळू मागे पडत गेले. आज तर आदिवासी आणि दुर्गम भाग वगळता महाराष्ट्रात लोखंडी नांगरट होताना दिसतच नाही. अत्याधुनिक तंत्र आणि यंत्राच्या माध्यमातून अशा साधनाची निर्मिती होत असल्याने आज शेती पूर्णतः या साधनांच्या द्वारेच केली जात आहे. नगदी पिकांच्या माध्यमातून हाती येणारा पैसा आणि शासकीय तथा खाजगी संस्थांच्या माध्यमातून शेती आणि शेती पूरक उद्योगासाठी सहज आणि मुबलक उपलब्ध होणारं अर्थसहाय्य यामुळे शेतीच्या मशागतीची सर्वच साधने आज यांत्रिकी स्वरूपाची दिसत आहेत. त्यामुळे शेतीसाठी बैल किंवा इतर प्राण्यांचा वापर होताना दिसत नाही. आज शेतीच्या मशागतीच्या सर्वच कामात ट्रॅक्टरचा वापर होत आहे. ट्रॅक्टरमुळे बैल - गोठा ही पारंपरिक साधने अंगणातून नाहीशी होताना दिसत आहेत.
एकेकाळी बारा बैलांच्या दावणीने शोभून दिसणारा गोठा आज ट्रॅक्टरसाठी पार्किंग शेड बनलाय. गाई - वासरांच्या हंबरण्या - चेकाळण्याने आणि बैलांच्या डरकाळीने घुमणाऱ्या गोठ्यात आज ट्रॅक्टरचं यांत्रिक थरथरणं घरघरत आहे. नांगर लाकडी असो की लोखंडी त्यामुळे जमिनीची नैसर्गिक सर्जनता राखली जात असे. पिकासाठी आवश्यक तितकीच भुई उकरली जात असे. त्यामुळे काळ्या आईची कूस सतत सुदृढ व समृद्धतेने भरली जायची. आता ट्रॅक्टरचा फाळ जमिनीच्या गर्भाचा काळ बनल्याने निर्मितीची सर्व प्रक्रियाच अनैसर्गिक होत आहे. यामुळे जमिनीची सकसता नि सक्षमताच नष्ट होत असल्याचे जाणवत आहे.
नांगरट करणे हे कष्ट आणि कोशल्याचे काम असते. नांगरणीच्या कामात नांगर धरणारा आणि हाकलणारा ही दोघेही कुशल असावी लागतात. रानाच्या प्रतवारीनुसार नांगरटीची खोली आणि तासाचा घास यांचे विशिष्ट प्रमाण ठरवून नांगरणी करावी लागते. याकामी नांगरधाऱ्याची कुशलता महत्त्वाची असते. नांगराच्या पुढच्या चाकाची दिशा व जागेचे अंतर यानुसार तो नांगर लावत असतो. नांगराच्या तासात फाटा पडणार नाही याची काळजी तो घेत असतो. यासाठी बैलं तासाबाहेर जाणार नाहीत याची काळजी हाकलणाराने घ्यायची असते. बैलांना आणि आपल्याही कष्टाला गती आणि विरगुळा म्हणून हे दोघेही सतत मोठमोठ्यानं गाणं गात राहतात. ही गाणी म्हणजे लोकजीवनातील विविध भावभावना व्यक्त करणाऱ्या ओव्याच असतात. या गाण्यातील विशिष्ट लय आणि तालामुळे बैलांमध्ये उत्साह निर्माण होऊन त्यांचा श्रमपरिहार होत असे. याकाळात बैलांच्या वैरणीचीही विशेष काळजी घेतली जायची. त्यांना वेळच्या वेळी पेंड, खुराक दिले जात असे. या बैल मेहनतीतूनच शेतात मोती पिकतात याची जाणीव ठेऊन विशेषत: या काळात बैलांना खूपच जपले जात असे. नांगरणी संपल्यावर अंगातील नांगरला कधी कधी वासरे बांधली जायची. यावेळी अल्लड खोंडांणा आपल्या ताकतीचा काहीसा अंदाजही घेण्याची संधी दिली जात असावी असं मला वाटते. मात्र नांगरटीला जो टिकतो तोच खरा बैलं असं एक सूत्रच त्याकाळी ठरलेले असे. म्हणूनच त्याकाळी नांगरटीसाठी खास बैलं पाळले जायचे. कारण बैलं नांगराने केलेली नांगरणी ही बरकत आणि समृद्धीची नांदीच असायची.
नांगर हे केवळ जमिनीच्या मशागतीचं साधन नव्हते, तर नांगरामुळे लोकजीवनाचे सामाजिक आणि सांस्कृतिक बंध घट्ट होत असत. नांगरट हा कृषी संस्कृतीचा एक उत्सवच असायचा. यामध्ये सर्व घटक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पडायचे. शेतकरी अल्पभूधारक असो वा मोठा जमीनदार असो, त्यांच्या शेताची नांगरट करावीच लागत असे. मोठ्या बगाईतदारकडे तर खास नांगरणीसाठी सोयरे - धायरे आपल्या नांगरणीच्या सर्व सर्जामासह येऊन मुक्कामीच राहायचे. सगळ्या शिवराची नांगरट झाल्याशिवाय ते माघारी घरी जात नसत. ज्यांच्याकडे बैलं व साधनाची कमतरता आहे अशा घटकांनाही शेजारी वा गावातील बड्या असामीकडून सहकार्य केले जायचे. नांगरणीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी सावडीही होत असत. नांगरणीच्या काळात शिवरातच न्याहाऱ्या व्हायच्या. त्यामुळे स्वयंपाक घरात गृहिणी खास नांगरकऱ्यांच्या शिदोरीची विशेष दक्षता घेत असत. यानिमित्ताने सायंकाळी घरी स्वादिस्ट आणि सुरुची अशा विशेष भोजनाच्या पंगती बसायच्या. अशावेळी पाहुण्यांसाठी आणि कामकऱ्यांसाठी जेवणाचा हा खास बेतंच असायचा. अशारितीने नांगरणीच्या निमित्ताने संगत, सहभोजन आणि सहकार्य यातून सामाजिक सौहार्द वाढीस लागायचे.
नांगर जुंपणे आणि हाकलणे हे आनंदाचे आणि मजेचे काम समजून लहान मूले या कामात उगीच घोटाळत असायची. विशेषतः नांगराच्या मुठीजवळच्या लोखंडी शिडीवर बसायला खूप मज्जा यायची. कधी कधी शिरवाळाच्या वेळी भाऊ आम्हाला आळीपाळीने त्यावर बसवायचे. रान जर कडक लागलं तर आम्ही चाकाच्या जवळ दांडीवर तोल सांभाळून बसायचो. नांगरटीच्या आवाजात आवाज मिसळत चालणाऱ्या चाकाकडे पाहणे आमच्यासाठी खूप औसुक्याचे असायचे. कुतूहल किंवा जिज्ञासापूर्ती म्हणून कधी कधी लहानग्यांच्या हाती भाऊ नांगर सोपवायचे तेंव्हा कृषी संस्कृतीत नकळत नाळ जोडली जायची. यातूनच कृषी कर्म- कर्तव्याची जाणीवही व्हायची आणि नांगरटीची शिकवण व संस्कार ही सहजपणे घडत जायचे.
नांगर केवळ जमिनीची नांगरणी करण्याचे साधन नव्हते तर ते लोक संस्कृतीच्या मशागतीचेही उत्तम माध्यम होते. नांगर हे कृषी संस्कृतीत निर्माण झालेले पहिले साधन आहे. तो लाकडाचा असो वा लोखंडाचा, त्याने भुई नांगरण्याचे काम अगदी चोख आणि प्रामाणिकपणे पार पारलेले आहे. म्हणूनच जमीन उकरून काळ्या आईचा कस आणि कुशीला सदैव चिरंजीवित्त्व बहाल करणारा हा नांगर मानवी जीवनाच्या वैभवाचा खरा साक्षीदार होता असे मला वाटते. मानवीसंस्कृतीत नांगरास सुफलीकरणाचं प्रतिक मानले जाते. कृषी संस्कृतीचा प्रारंभच नांगरणीच्या प्रक्रियेतून झाला आहे. मात्र मानव, पशु आणि पक्ष्यांच्या दाणा - चारासाठी जमीन उकरून पिकं फुलविणारा नांगर आज स्वतःच कुठंतरी धुळीत बुजून गेलेला दिसत आहे. एकेकाळी जोमदार पिकाच्या माध्यमातून तमाम कृषीजीवनाला समृद्धी बहाल करणारा हा नांगर आज क्षीण होऊन अडगळीत पडलेला दिसत आहे. धन्याच्या शिवारात फाळ रुतवून दिमाखात उभा राहणारा नांगर आज मात्र भंगारात अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. आपल्या नऊ नंबरी नांगर आणि चाव्हरी बैलांचं कौतुक अभिमानाने सांगणाऱ्या शेतकऱ्यांच्या वैभवाला जणू आज या नव्या युगाची दृष्टचं लागलेली दिसतेय. आधुनिकतेच्या या युगात यांत्रिकीकरणाची चाकं थांबवता येणं कठीण आहे. मात्र तरीही कृषी संस्कृतीचा हा मौलिक पारंपरिक ठेवा जपायला हवा आणि जोपसला जावा. हा गत वैभवाचा मळा पुन्हा बहरावा असं वाटत असेल, तर साऱ्या शिवारात समृद्धीचा हा नांगर पुन्हा फिरावा हीच अपेक्षा!
✍️ डॉ. अशोक शिंदे, फलटण
9860850344