मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

अडगळीतील समृद्धी - लेख क्र. ४

                                       वावडी 

                 काढणी एकदाची उरकलली की सगळेच जण खळ्याच्या कामाला लागतात. शेत आणि घरापासून जवळ किंवा योग्य अंतरावर थोडी उमाठाची व मुरूमाड जमीन असलेली जागा खळ्यासाठी निवडली जाते. खळ्याची ही जागा वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी असल्याचेही दिसून येते. आमच्या गावात तुकाईच्या माळावर अशी अनेक खळी होती. सर्व साधारणपणे खळ्यासाठी कमीत कमी पाच ते दहा गुंठे जागा गरजेची असते. ही सगळी जागा प्रारंभी स्वच्छ व सपाट केली जाते. प्रत्यक्ष खळ्यासाठी यातील मध्यभागाची आठ - दहा हात त्रिज्या असलेल्या गोल आकाराची जागा वापरली जाते. उरलेल्या मोकळ्या जागेत ज्वारीच्या सूड्या, गव्हाचे भारे आणि करडी व हरभऱ्याचे पेटे लावले जातात. प्रत्यक्ष खळ्याच्या मध्यभागी एक लाकडी डांब म्हणजेच तिवडा रोवला जातो. मग ही गोलाकार जागा पाण्याने भिजवली जात असे. अशावेळी चिखलात नाचायला लहान मुलांना लई मज्जा वाटायची. नंतर तिवड्याला एक जाड कासरा बांधून त्याला बैलांची पाथ जुंपून त्यांना गोल गोल फिरवून भिजवलेले खळे खुरवतले जायचे. यामुळे खळ्याची जमीन एकजीव व घट्ट बनत असे. असे खळे शेणाने सारवले की मग ते खुडणी - मोडणीसाठी सज्ज व्हायचे.         

             खळ्याचं काम चालू असतानाच रानात काढून पडलेलं गुड बैलगाडीतून  खळ्यावर आणून त्याच्या सूड्या लावल्या जायच्या. एकदा खळं वाळलं की मग खुडणीला सुरुवात व्हायची. एव्हाना उन्हात बरेच दिवस वाळलेली कणसं मोडून वा खुडून खळ्यात टाकली जायची. या कामात अधूनमधून लहानग्यांची लुडबुड ठरलेलीच असायची. गुडाची कणसं एकदा खुडून झाली की मग उरलेला कडबा गंजीसाठी बाजूला टाकला जायचा. खळ्यातल्या कणसांची मग मळणी सुरु व्हायची. मळणी करताना खळ्यातील कणसं बाजूला जाऊ नयेत म्हणून कणसांच्या कडेने कडब्याच्या पेंढ्यांची कडणी लावली जायची. मळणीवेळी पून्हा बैलांची पाथ जुंपून त्यांना खळ्यात फिरवले जायचे. या बैलांच्या मागे चालायला लहान मुलांना खूप मज्जा येत असे. कधी कधी चालणाऱ्या बैलाचं पडणारं शेण वरचेवर झेलून बाहेर टाकण्याची कामं ही मंडळी  अगदी आनंदाने, उत्साहाने आणि काटेकोरपणे करत असत. खळ्यात कणसाचं मदन होईपर्यंत ही मळणी चालत असे. नंतर मग उफणनीला सुरुवात व्हायची. या उफणणीसाठी खळ्यात मग एक वावडी ठेवली जायची. 

               तीन पायावर उभा असलेल्या या वावडीचा वरचा भाग चांगल्या दणकट जाड फळीचा असतो. एकावेळी एकालाच उभा राहून धान्य उफाणता येईल अशा आकाराची ही फळी असते. साधारणपणे चार पाच फूट उंचीची ही वावडी सुताराकडून करून घेतली जायची. वावडीसाठी चांगल्या लाकडाचा वापर केला जात असे. त्यामुळे अशी वावडी पुढे कित्येक वर्ष वापरली जायची. तीन पायामुळे ही वावडी खळ्याच्या उंच सखल जागेवर अगदी सुस्थीर उभी राहायची. काही भागात चार पायाची वावडीही असायची. या वावडीवर उभा राहून धान्य उफणण्याचे काम अगदी सोपे होत असे. मळणीतून मळलेल्या मदनातून सार आणि असार बाजूला करण्याचे महत्त्वाचे कार्य करणारी ही वावडी सुगीच्या सर्व प्रक्रियांतील एक उपयुक्त साधन होते. सुगीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम यावावडीचंच असायचंनैसर्गिक पद्धतीने शेती करण्याच्या काळात वावडी हे धान्य उफणण्यासाठी वापरले जाणारे प्रमुख आणि उपयुक्त असे साधन होते. प्राचीन काळापासून सुगी करताना धान्य उफणण्याच्या कामात वापरले जाणारे एक पारंपरिक साधन म्हणून कृषी संस्कृतीत वावडीला खूप महत्वाचे स्थान असलेले दिसते. 

              भारतीय कृषी परंपरेत वावडी या साधनाचा वापर व प्रारंभ प्राचीन काळात झाला असल्याचे दिसते. वैदिक काळातील साहित्यात शेतीविषयक विविध साधनांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये विशेषतः ‘शूळ’ आणि ‘सुप’ या साधनांचा उपयोग धान्य वेगळे करण्यासाठी केला जात असे. वाऱ्याच्या मदतीने धान्य आणि भुसा वेगळे करण्यासाठी लाकडी किंवा बांबूची हलकी साधने याकाळात वापरण्यात येत असत. त्या संदर्भात ‘वावडी’ ही संकल्पना याच काळात अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. महाजनपद आणि मौर्यकाळात वावडी चे काही संदर्भ आढळतात.  कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मळणी, धान्य साठवणूक, आणि शुद्धीकरणाच्या पद्धतींचा उल्लेख केला आहे. अशा प्रक्रियांसाठी पारंपरिक साधनांचा उपयोग होत असावा. त्यामुळे या काळात ‘वावडी’ सारख्या साधनांचा वापर वाऱ्याच्या सहाय्याने भुसा वेगळा करण्यासाठी होत असावा असे वाटते. 

                  मध्ययुगीन काळात शेतीमध्ये पारंपरिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला होता. या काळात धान्य उफणून त्यातून भुसा वेगळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांमध्ये सुधारणा झालेली दिसते. याच काळात काही भागांत बांबूची किंवा लाकडाची ‘वावडी’ हा अधिक प्रगत प्रकार विकसित झालेला होता. पुढे ब्रिटिश कालखंडात शेतीमध्ये काही प्रमाणात आधुनिक साधनांचा प्रवेश झाला, पण याकाळात पारंपरिक साधनेही मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. स्वातंत्र्योत्तर काळातही भारतातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांच्या साहाय्याने मळणी केली जात आणि उफणनीसाठी ‘वावडी’ चा वापर सुरू होता. 

         महाराष्ट्रात देखील प्राचीन काळापासून धान्य उफणनीसाठी ‘वावडी’ चा केला जात असे. विशेषत: ज्वारी, बाजरी, गहू या भरडधान्य पिकांसाठी येथे वावडी अधिक प्रमाणात वापरली जात असे. ज्वारी हे महाराष्ट्राचे मुख्य पिक मानले जाते. त्यामुळे ज्वारीच्या सुगीवेळी तर खळ्यावर सर्वत्र ही वावडी उभी असलेली दिसायची. मळणी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या वावडीचं काम सुरु होते. मळणीवेळी बैलांच्या खुरांनी खळ्यात कणसं तुडवली जातात. त्यामुळे कणसातील दाणे बोंडातून वेगळे होतात. हे होत असतानाच कणसाच्या इतर भागाचाही चुरा होतो. खळ्यात मळणीतून तयार झालेल्या या मिश्रणाला मदन असे म्हटले जाते. अशाच प्रकारची मळणी बहुतेक सर्वच पिकांची होत असे. खळ्यात मळणीचे मदन झाले की मग उफणनीला सुरुवात होते.        

              उफणनी म्हणजे खळ्यातील मदनातून धान्य आणि इतर भुसा वेगवेगळे करणे. उफणनीसाठी खळ्यातील मदान गोळा करून त्याचा एका बाजूला मोठा ढीग लावला जातो. मग स्वच्छ केलेल्या खळ्यात वावडी उभी केली जाते. उफणनीसाठी किमान तीन जनांची गरज असते.  एक जण उफाणणारा, जो वावडीवर उभा राहून उफणनी करतो. दुसरा पाटी देणारा, जो मदनाची पाटी भरून पहिल्याच्या हातात देतो. आणि तिसरा हातनीवाला, जो उफणनताना खाली पडलेल्या धान्याबरोबर आलेल्या कणसाच्या काड्या किंवा बोंडे बाजूला काढण्याचं काम करतो. खळ्यातील मदनाचे कमी अधिक प्रमाण लक्षात घेऊन यामध्ये आणखीही काही जणांची मदत घेतली जाते. 

              उफणनीचं हे काम कष्टाचं, कोशल्याचं आणि वेळखाऊपणाचं असते. खालच्याने पाटी भरून दिल्यावर वावडी वरचा माणूस ती पाटी वाऱ्याच्या दिशेला धरतो आणि  हळूहळू हलक्या हाताने ती पाटी विशिष्टरितीने हलवतो. त्यामुळे पाटीतील मदान हळूहळू खाली येते. हे खाली येत असतानाच भुसा वा कूस, बोंडं वाऱ्यामुळे विरुद्ध बाजूला वाहून जातात. याचवेळी दाणे व जे वाऱ्याने वाहून जाऊ शकले नाही ते सर्व खाली पडते. याचवेळी हातानीवाला दाण्याबरोबर खाली पडणारे गबाळ आपल्या हातातील हातनीने अगदी हलक्या हाताने बाजूला करतो. ही हातनी आघाड्याच्या काड्यांपासून तयार केली जात असे. आघाड्याच्या तीन चार झुडपाच्या काड्या बांबूच्या कामठीने पसरट बांधून हातनी तयार केली जात असे.  उफणनीच्या वेळी हातनी चालवणे हे कौशल्याचे काम असायचे. उफणनीचे असे काम चालू असतानाच खाली मोत्या प्रमाणे दाण्यांची रास रचली जात लागते. 

              या उफणनीचे काम तसे जोखमीचे असते. पाऊस, वादळ अशा अस्मानी संकटाची काळजी असायची. त्यामुळे अखंडपणे हे काम चालू असायचं. उफणनी कधी एका दिवसात आटपायची तर कधी कधी दोन - तीन दिवसही चालायची. कारण हे काम पूर्णतः वाऱ्यावर अवलंबून असे. या काळात शेतं - शिवारं उघडी,  मोकळी झालेली असतात. शिवाय उन्हाचा जोर वाढत असल्याने त्याचा हवेचा दाबावर परिणाम होऊन वाऱ्याची दिशा बदलून गतीही वाढलेली असते. त्यामुळे या वातावरणाचा उफनणीसाठी नेमका फायदा करून घेतला जात असे. मात्र हा वारा कधी येईल याचा भरोसा नसायचा. त्यामुळे कधी कधी अनेक दिवस हे उफणनीचे काम चालत असे. वारा जमिनीपेक्षा उंचावर अधिक जाणवतो म्हणून या कामी वावडी खूप उपयोगी पडत असे.  शिवाय वावडीमुळे या कामाचा कंटाळाही येत नसे. 

             उफणनीचं हे कामं कितीही मेहनतीचं असलं तरी उफणनीनंतर खळ्यात धान्याची रास पाहून कुणब्याचा आनंदाला मात्र पारावर राहत नसे. राशीची विधिवत पूजा करून मग धान्य पोत्यात भरले जायचे. नंतर बैलगाडीतून शेतातले हे धन घरी नेले जात असे. उफणन्याचं काम चोखपणे बजावणारी वावडीही मग व्यवस्थित ठेवली जायची. पुढच्या वर्षी खळ्याच्या वेळी ही वावडी पुन्हा कामासाठी सज्ज असायची. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालू असल्याचे दिसते. मात्र अलीकडच्या काही वर्षात सुगीची प्रक्रियाच बदलून गेली असल्याचे दिसते.

               स्वातंत्रोत्तर काळात विविध जलसिंचन प्रकल्प आणि शेतीशी संबंधित मूलभूत संशोधन यामुळे कृषीक्षेत्रात अनेक अमूलाग्र बदल घडून येत आहेत.  विशेषतः हरितक्रांती नंतर अनेक आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यांत्रिक साधने विकसित झाली आहेत. त्यामुळे पिकाच्या पेरणीपासून ते धान्य कणगीत पडेपर्यँतच्या सर्व प्रक्रिया आज अध्ययावत यंत्राद्वारे पूर्ण केल्या जात आहेतत्यामुळे शेतातील कामाची व सुगीच्या काळात उपयोगात येणारी सर्व साधने हळूहळू बाजूला पडलेली दिसतात. वावडी हे साधनही आज असंच कुठेतरी अडगळीत पडलेलं दिसत आहे. 

             आज पेरणी यंत्रापासून ते मळणी यंत्रापर्यंत सर्व आधुनिक यंत्रे सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे काढणी, कापणी, खुडणी, मळणी आणि उफाणनी या सुगीच्या सर्व क्रिया आता एकाच वेळी यंत्राच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत. परिपूर्ण पक्वता, शुद्धता आणि निर्मळता या बाबी यंत्राने साधण्यास मर्यादा येते. त्यामुळे श्रम, वेळ, पैसा यांची बचत आणि अस्मानी  संकटांपासून काहीशी सुटका होत असली तरी नैसर्गिकपणे केली जाणारी सुगीची ही कामे यांत्रिकतेत तितकीशी योग्य तथा व्यवस्थितपणे साधली जात नाहीत. एक साधन वापरातून कमी झाले की त्यामागे त्याच्याशी संबंधित संस्कृतीच नाहीशी होताना दिसते. वावडी ही देखील मानवी सामाजिक आणि सांस्कृतिक समृद्धीचे एक अविभाज्य अंग होती.

              वावडीचं कामं केवळ खळ्यातील धान्य उफणनी करण्याचं असलं तरी सुगी संस्कृतीशी तिचे घट्ट नाते जोडले गेलेले होते. त्याकाळी सुगीचं प्रत्येक काम एकमेकांशी परस्पर संबंधाने जोडले गेलेले असायचे. काढणीच्या वेळी गायली जाणारी भलरी व घातली जाणारी इर्जिक आता होताना दिसत नाही. भलरी हे लोकगीताचं तर इर्जिक हे लोकजीवनातील सहकार्याचं अनमोल संचितचं होतं.  शिवाराच्या कोपऱ्यात ठेवली जाणारी सीतामाई केवळ श्रद्धा नव्हती तर आपल्या ओटीत टाकलेले दान कित्येक पटीनं भरभरून देणाऱ्या काळ्या माईविषयी व्यक्त केलेली ती कृतज्ञता असायची. सर्वा वेचताना होणाऱ्या प्रापंचिक गप्पा, काढणी, मळणी, खुडणीवेळी केली जाणारी सावड, साधनाची केली जाणारी देवाण घेवाण यातून सामाजिक सौख्य आणि सोहार्द वाढीस लागत असे. प्रत्यक्ष खळ्यात जमा झालेल्या राशींतून एखाद्याच्या झोळीत ओतलेल्या शेर - आठव्यानं दातृत्त्व वृद्धिंगत व्हायचं. सुगीच्या वेळी खोती किंवा वाट्यानं काम करणाऱ्यांना खळ्यावरच त्यांचा हिस्सा दिला जायचा. अशा कष्ट आणि मेहनतीतून मिळालेल्या फळाचा आनंद किती स्वादिष्ट असतो याचं दर्शन घडायचं. अशा सुगीशी संबंधित कामातील भावभावनांचा साक्षीदार असायची ती वावडी. 

               शिवारातील धन आणि कष्टाचं फळ यातून मिळणाऱ्या समुद्धीत खळ्यावर उभा असलेल्या वावडीचं मोठं योगदान असायचं. आज यांत्रिकीकरणामुळे वावडीचं काम संपलं आहे. वावडी तर दिसेनाशी झालीच आहे; परंतु त्याबरोबर बैलगाडीने वाहताना गुडाचा रचला जाणारा हेल, खळे, खळ्याभोवतीच्या सूड्या, भारे, पेटे, मदान, हातनी, रास, कडबा आणि गंज या गोष्टीही आज यांत्रिकीकरणाच्या अंधारात गेल्या आहेत. त्यांच्या  बरोबर त्यांची ओळख, अस्तित्त्व व संस्कृतीही अंधारली आहे. 

              आज अजूनही काही भागात पारंपरिक नैसर्गिक सुगी होत असेल. मात्र आधुनिकतेच्या वेगात ही पारंपरिक सुगीसंस्कृती विनाशाच्या मार्गांवर आहे हे मात्र खरे. त्यामुळे एकेकाळी खळ्यात दिमाखात उभा राहून आपल्या पुढ्यात सौख्याची रास पाहणारी ही वावडी आज अडगळीत आडवी होऊन पडलेली आहे. ज्या वावडीमुळे मोत्यासारखे तेजस्वी व स्वच्छ दाणे मिळाले ती मात्र आज अंधाऱ्या जागेत अखेरच्या घटका मोजत आहे. मानवी जीवनातील समुद्धीचा हा साक्षीदार पुन्हा केंव्हा एकदा दिमाखात उभा राहील हे काळंच ठरविल ; पण प्रयत्न करूयात या वावडीचं  कार्य आणि अस्तित्त्व जपण्याचं ! 

                  ✍️ डॉ. अशोक शिंदे 

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र. 3 - माळा

 माळा 

            पहाट जसजशी उजळत जाई, तसतसा सोनमाळाकडचा आवाज वाढतंच जायचा. हा ss, हा sss! हुर्रर्र ss, हुर्रर्रर्र sss! लांडी बघ ss लांडी बघ sss! असा एकच गलका तिकडं चालू असायचा. अधून मधून गोफणीचाही आवाज यायचा. ऐन थंडीच्या दिवसात एका विशिष्ट लयीत जेवढा जोरात आवाज काढता येईल तेवढा काढला जायचा. अगदी पहाटे पासूनच ही मंडळी सोनमाळाकडं निघायची. नदी ओलांडून सौंदर ओढ्यातून पुढं पांदीला लागलं की पलीकडंच्या चढावर सपाट सोनमाळ लागायचं. तांबडी, काळी माती असलेलं चांगलं तीन - चार नंबराचं हे शिवार होतं. त्यामुळे दोन्ही हंगामातील पिकं इथं घेतली जायची. गावातल्या तीन चार बड्या असामींच्या सुग्याही याच माळावर लागायच्या. 

            पावसाळ्यात बाजरी,  हुलगा, मूग, मटकी अशी खरिपाची पिकं याच मळ्यात घेतली जायची. तर रब्बीच्या हंगामात गरजेपुरता गहू, हरबरा आणि साऱ्या सोनमाळावर ज्वारीच अधिक पेरली जात असे. ज्वारीच्या मध्ये मध्ये काही करडईचे तर काही जवसाचे पाटेही पेरले जात असत. त्यामुळे राखणीच्या दिवसात सोनमाळावर दरवर्षी सात - आठ ‘माळं’ हमखास उभा राहायचे. उजाडू लागताच या माळ्यांवर उभा राहून मोठमोठ्यानं आरोळ्या देत पाखरं राखणीचं काम जोरजोरानं चालू असायचं. पिकाची राखण तशी दिवसभर चालूच असायची; पण सकाळ -  संध्याकाळच्या वेळी राखणीचा आवाज अधिकच वाढायचा. माळ्यावर उभा राहून राखण करायलाही खूपच मज्जा यायची. सुगीच्या दिवसात वडील जेंव्हा चाव्हराच्या मळ्यात खोती घ्यायचे तेंव्हा माळ्यावर उभा राहून गोफण फिरवायचा आनंद आम्हीही खूप वेळा घेतलाय.

            ज्वारी पोठऱ्यात येऊ लागली की शिवारात माळा बांधायची लगबग सुरु होत असे. एका वेळी दोघं तिघं बसतील किंवा उभा राहतील असा दणकट बैलगाडीच्या साटीच्या आकाराचा हा माळा बांधला जात असे. जेथून सर्व शिवार सहज पणे नजरेखाली येईल अशी शिवारातील उंच किंवा चढाची जागा माळ्यासाठी निवडली जायची. शक्यतो एखाद्या मोठ्या झाडाजवळ जर अशी जागा मिळाली तर ती अधिक सोयीची मानली जात असे. कारण त्या झाडावरची पाखरं सहज हाकलता यायची आणि दिवसभर माळ्यावर सावलीही राहायची.

            माळ्यासाठी बाभूळ, लिंब किंवा कोणत्याही चिवट झाडाची आठ दहा दणकट लाकडं जमा केली जात असत. सुरुवातीला सहा सात फूट लांबीची चार मोठी लाकडं मेढीसारखी जमिनीत रोवली जायची. नंतर या मेढींच्या वरच्या टोकाला मांडीसारखे चार आडवे वासे काथ्या किंवा सुताच्या दोरीने घट्ट  बांधले जात. हे वासे मेढीच्या दुबाळक्यात किंवा ज्या ठिकाणी उभ्या लाकडाला आडवा खण आहे अशा ठिकाणी बांधले जायचे. ते खाली निसरू नयेत म्हणून ज्या ठिकाणी ते बांधले जायचे तिथे मेढीवर कुऱ्हाडीने खाच पाडली जात असे. 

            अशा रितीने माळ्याचा सांगाडा उभा झाला की, वरच्या चार आडव्या वास्यांवर मग आडवी उभी लाकडं किंवा बाभळीचा साळा अंथरला जायचा. त्यावर बाजरीचं सरमाड किंवा वैरणीच्या पेंढ्या अंथरून खालच्या लाकडातून ओवून त्या काथ्याने घट्ट आवळल्या जायच्या. माळा डळमळू नये म्हणून चारही मेढींना आधारासाठी तिरकी लाकडे उभी केली जात असत. या माळ्यावर सहजपणे चढता उतरता यावे म्हणून छोटीशी सीडीदेखील केली जात असे. अशा रितीने एकदा माळा बांधला की शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडत असे. पिकाच्या राखणीचं मोलाचं काम हा माळा करत असे. माळ्यावर उभा राहून राखण करणे ही पिक राखणीची अत्यंत प्राचीन पारंपरिक पद्धत असल्याने शिवारात सुगीच्या काळात सर्वत्र असे माळे उभा केलेले दिसत असत. 

            शेतीसाठी माळा किंवा मचान ही पिकं राखण्याची पद्धत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. भारतासह जगभरात शेतजमिनीचे संरक्षण करण्यासाठी या पद्धतीचा  उपयोग केला गेला आहे. वैदिक काळात भातशेती, गहू, ज्वारी, बाजरी यांसारखी पिके घेतली जात होती. या पिकांवर पशुपक्ष्यांचा मोठा उपद्रव होत असे. पशुपक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी या काळात “मचान” हा प्रकार प्रथम उदयास आला. लाकडी ओंडके व बांबू वापरून एक उंच व्यासपीठ उभारले जाई, जिथे एक व्यक्ती बसून पिकांची राखण करीत असे. प्रामुख्याने दक्षिण भारतात आणि गंगा-यमुना खोऱ्यात या प्रकारचा वापर त्याकाळी अधिक प्रमाणात होत होता.

              महाजनपद व मौर्यकाळात शेती अधिक सुव्यवस्थित झाली. तसेच या काळात सिंचन व्यवस्थेतही सुधारणा झाली. मौर्य सम्राट अशोकाच्या काळात तर मोठ्या शेतजमिनींवर मचानासारखी वास्तू उभारली जात असे, यासाठी ‘रक्षापद’ या शासकीय पदाची निर्मिती केली गेली होती. या माध्यमातून माळी किंवा राखणदार या व्यक्ती शेताची निगराणी करत असत. म्हणूनच राखणदार किंवा माळी ज्या मचानावर उभा राहायचा त्यास ‘माळा‘ असे म्हटले जाऊ लागले असावे. पुढे गुप्त व उत्तरगुप्त काळात विकसित शेतीसाठी विविध पारंपरिक तंत्रांचा स्वीकार केला गेला. या काळात उंचावर मचान उभारून तिथे लाकडी घंटा किंवा मोठा आवाज करणारी उपकरणे ठेवली जाऊ लागली. याच काळात नदी काठच्या शेतीसाठी उंच उंच माळे उभारण्याला प्रारंभ झाला होता.

               मध्ययुगात राखण पद्धती आणखीचं विकसित झाली. या काळात मोठमोठे जमीनदार आपल्या शेतजमिनींसाठी राखणदार नेमू लागले. या काळात बांबू, लाकूड आणि गवताचा उपयोग करून मजबूत माळे बांधले जात असत. काही ठिकाणी मोठ्या शिवारात एकापेक्षा जास्त माळे उभारून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी शिट्या किंवा ढोल-ताश्यांचा वापर केला जात असे. पुढे ब्रिटिश काळात पारंपरिक शेती बरोबरच नवीन तंत्रज्ञानयुक्त शेती करण्यात येऊ लागली. खास करून ऊस, तंबाखू, कापूस या बागायती पिकांसाठी मोठ्या जमिनींवर लाकडी माळे उभारले जात असत. स्वातंत्र्योत्तर काळ तथा आधुनिक युगामध्ये तांत्रिक प्रगतीमुळे पिक संरक्षणासाठी नवीन उपाय आले. विजेचे कुंपण, ट्रॅप कॅमेरे आणि यांत्रिक अलार्म यांचा वापर होऊ लागलेला दिसतो. 

            महाराष्ट्रात  पारंपरिक पद्धतीनेचं शेतीची राखण केली जात असे. काळाबरोबर इथल्या राखण पद्धतीतही बदल होत गेलेला दिसतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ ही मुख्य अन्नधान्याची पिके केली जातात. कोकण वगळता इतर भागात अन्नधान्य म्हूणन प्रामुख्याने ज्वारीचेच पिक अधिक प्रमाणात काढले जाते. ज्वारी हेच महाराष्ट्राचे मुख्य पिक मानले जाते. ज्वारीची भाकरी हेच इथल्या लोकांचे प्रमुख अन्न आहे. ज्वारीला पोषक बागायती आणि जिरायती जमीन, अनुकूल नैसर्गिक वातावरण आणि योग्य बाजारपेठ या घटकांची उपलब्धता असल्यामुळे महाराष्ट्रात ज्वारीचे मुबलक उत्पादन मिळत असे. त्यामुळे महाराष्ट्रात कोकण व्यतिरिक्त उर्वरित सर्वच भागातील सर्वच गावांमध्ये ज्वारी हे पिक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. मात्र महाराष्ट्रात ऊस, भूईमूग व कापूस ही नगदी पिकेही माफक प्रमाणात पिकविली जात होती. एकूणच या काळात शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले जात नव्हते. 

            एक काळ असा होता की गावाच्या सर्व शिवारात सुगीच्या दिवसात ज्वारीच्या राखणीचा एकच हंगामा चालयचा. रब्बीच्या हंगामात ज्वारीच्या शिवारातच माळे असायचे. इतर पिकांवर सहसा पाखरं बसत नसत. दाणे चिकात येण्याच्या सुमारास चिमणी, मैना अशा लहान अंगकाठीची तथा बारीक चोचीची पाखरं दाणे चाखण्यासाठी वा टिपण्यासाठी कणसांवर बसत असत. करडीच्या बोडांवर मात्र करकोचा किंवा लांब चोचीचे पक्षी ताव मारत असत. सकाळ, सायंकाळ तथा शिरवाळाच्या वेळी पाखराची जास्त वर्दळ असे. दुपारच्या पहारी मात्र उन्हं अन् उजेड असल्यामुळे या वेळी पाखरं पिकावर फारशी येत नसत. पाखरांपासून पिकाचं राखण करायचे म्हणजे पाखरं जीव मारायची असा या राखणीचा उद्देश नसायचा. पाखरांनी चिकात आलेले किंवा हुरड्यात आलेले सर्वच दाणे खाल्ले तर उत्पादन कमी होईल असा विचार असल्याने केवळ आरडून ओरडून वा गोफणीच्या माध्यमातून आवाज काढून पाखरांना घाबरवायचे काम केले जायचे. गोफणीच्या माध्यमातून कधी बारीक खडे वा एकदा कच्चा ढेकूळ फेकला जायचा. गोफणीचा आवाज अन् त्यातून फिस्करल्या जाणाऱ्या बारीक खड्यांच्या आवाजामुळे पाखरं दूर उडून जायची. असं असलं तरी राखणीच्या काळात पिकाचे अनेक वेळा नुकसानही ही पाखरं करायची. अशा  पाखरांपासून पिकाचे राखण करायला माळा खूप उपयोगी पडायचा. 

                  त्याकाळी माळा म्हणजे मळ्याचं वैभवच समजलं जायचं. शेतकऱ्याच्या शेतात समृद्धीचं दान देण्यात या पुरुषभर उंचीच्या माळ्याचं मौलिक योगदान होतं. माळा म्हणजे त्या शिवरातलं शेतकऱ्याचं एक छोटंस घरटंच असायचं. सुगीच्या वेळी माळ्याच्या जवळपास एखादी खोप केली जायची. त्यामध्ये थंडगार पाण्याची घागर, दुपारी जेवण वा थोडीशी वामकुक्षी घेण्यासाठी एखादी घोंगडी वा चादर असायची. अगदी दानं भरण्याच्या सुमारास तर वस्तीपासून दूर असलेल्या शिवारात राखणकऱ्यांचा मुक्कामच असायचा. 

                 सगळीकडे ज्वारीचं पिकं असल्यामुळे मोठ्या शिवारात आजूबाजूला  चार - पाच तरी माळे असायचेच. राखण करता करता माळ्यावरूनच एकमेकांबरोबर गप्पा मारल्या जात असत. प्रत्येक जण जरी आपले शेत राखत असला तरी त्यांच्या आरडण्या ओरडण्याने किंवा गोफणीच्या आवाजाने शेजारच्या पिकाचेही राखण घडायचं. कधी सकाळची न्याहरीही माळ्यावरच व्हायची. अशावेळी कारभारनिशी सुगीसंबंधाच्या किंवा इतर गुजगप्पा रंगायच्या.  सुट्टीच्या दिवशी घरातल्या लहानांच्या पलटनी शिवरातच घुसायच्या. माळ्यावर उभा राहून राखणीचं कामं त्यांच्यासाठी अप्रूपच असायचं. त्यांच्या बारीक कोवळ्या हाकारीनं देखील सारं शिवार गजबजून जायचं. शाळेचा गृहपाठ देखील कधी कधी माळ्यावरचं रेखाटला जायचा. चार भिंतीच्या वर्गातून मिळणाऱ्या पुस्तकी ज्ञानापेक्षा चरचराचं सर्व ज्ञान या चार पायाच्या माळ्यावर बसून त्यांना अगदी सहजपणे मिळायचं. दुपारी जेवणाच्या निमित्ताने सर्व मळेकरी एकत्र येऊन माळ्या भोवती गोल पंगत धरत असत. त्यातून पिक पाण्याच्या, सुख - दुःखाच्या गप्पांचा फड रंगत असे.

            राखणीचा काळ साधारण महिनाभर चालायचा. त्यामुळे या काळातील सगळी कामे माळ्याभोवतीच असायची. सकाळ, रात्रीची शकोटी असो वा हरभऱ्यांची आगटी असो ती माळ्याजवळच पेटवली जायची. मित्र मंडळी, पाहुणे- रावळे वा सोयरे - धायरे यांच्या मैफली सजविणारी हुरडा पार्टीही रंगायची ती या माळ्याजवळच. दुपारच्या वेळी वाळकं, काकडी, खरबूज, शेंदाडं यांचा मनसोक्त आस्वादही माळ्यावरच घेतला जायचा. कणसाचे बेढे होऊन खळं तयार होईपर्यंत शिवारातील सर्व कामाच्या तजविजी चालायच्या त्या या माळ्यापासूनच. त्यामुळे माळा हे त्याकाळी सुगीच्या हंगामातील नियोजनाचं एक मुख्य केंद्रचं बनलेलं असायचे. ज्वारी पोठऱ्यात आल्यापासून ते काढणी, खुडणी आणि खळ्याचे सर्व सोपस्कार पूर्ण होऊन धान्याची रास सजेपर्यंतच्या शेतातील सर्व घडामोडींचा एकमेव साक्षीदार म्हणजे हा माळा असायचा. असा हा समुद्धीचा साक्षीदार आज मात्र आधुनिक कृषी विकासाच्या युगात अंधार कोठडीत पडलेला दिसत आहे. 

            स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात अनेक सिंचन प्रकल्प उभारले गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू जमिनी पाण्याखाली आल्या.  शिवाय याच काळात अगदी कमी प्रमाणात सुरु असलेली खाजगी साखर कारखानदारी सहकारात परावर्तीत झाली. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने उभे राहिले. हरित क्रांतीच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान युक्त नवनवीन साधने, उपकरणे, रसायनिक खतांची निर्मिती व उपलब्धता, संकरीत बियाणे, नव्या पिक पद्धती, बाजारपेठांची निर्मिती, कृषी मालाची आयात - निर्यात यामुळे शेतीतून शेतमाला शिवाय इतर आर्थिक स्रोत उत्पन्न होऊ लागले. याच काळात शेतीविषयक सरकारी धोरणे, सहकारी बँका व सोसायट्यांची निर्मिती, कर्ज उपलब्धता यामुळे पारंपरिक शेतीचे पूर्णत: बाजारीकरण झाले. अशातच ट्रॅक्टर वा तत्सम साधनांनी जमीनीचे सहजपणे सपाटीकरण होऊ लागले. आधुनिक सिंचन पद्धतीमुळे तर बहुतांश कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली आले ; आणि महाराष्ट्राचे प्रमुख पिक असलेल्या ज्वारीच्या शेतांत हळूहळू ऊस, कापूस, कांदा, भुईमूग अशा हातात पैसा खेळवणाऱ्या पिकांनी दाटी होऊ लागली. विशेषतः ऊसपिकाचे मळे आज सर्वत्रच फुललेले दिसत आहेत. 

              त्यामुळे आज कमी पर्जन्य छायेचा किंवा पुरेशा सिंचन सुविधा उपलब्ध नसलेला, डोंगराळ तथा माळरानाचं काही क्षेत्र सोडलं तर महाराष्ट्राच्य अनेक भागातून ज्वारीचं पिकं हद्दपार झालेलं दिसत आहे. परिणामी माळ्यावर उभा राहून गोफण फिरवण्याचा आनंद आज हिरवला गेला आहे. शेतातील पिकं तर बदलली आहेतच; शिवाय संकरीत बियाणे आणि पिकाची कणसं पाखरांना खाताच येणार नाहीत असं नवीन संशोधित वाण यामुळे राखणीचं काम खूप सोपं झालं आहे. फटाके, वेगवेगळा आवाज काढणारी स्वयंचलित यंत्रे यामुळे आज जिथं ज्वारी पिकतेय तिथे आज माळा बांधलाच जात नाही. संकरीत वाणांच्या निर्मितीमुळे दाण्यातील सकसता व पोषकता लोप पावली असल्याने पाखरंही आता पाहिल्यासारखे पिकाकडे फिरकत नाहीत. मळ्यात पाखरांची   चैतन्यदायी किलबिल आज ऐकूच येत नाही. शिवारात फिरताना हिरवपण असूनही सर्वत्र उदासीनताच भरून येते आहे. माळा नसल्यानं मळ्याचं सत्त्वच आज हरवल्यासारखं झालं आहे. 

             सुगीचं कामं आटोपलं की जवळच्या झाडाखाली माळ्याची लाकडं जनावरांच्या गव्हाणीला वापरली जायची. आयत्या वेळी पर्याय म्हणून या माळ्याच्या छोट्या लाकडाचे कुऱ्हाड वा खोऱ्यांसाठी दांडे बनवले जायचे. दणकटपणा कमी झाला तर स्वयंपाकासाठी जळणाच्या कामी माळा उपयोगी पडायचा. आता चुलीही निर्धूर झाल्या आहेत. त्यामुळे आपलं स्वतःच समग्र अस्तित्व समर्पित करून शेतकरी जीवनात वैभव फुलवणारा हा माळा आज मात्र अडगळीत कुजत पडलेला दिसत आहे. 

            आशा एकचं आहे की, अजूनही अनेक आदिवासी भागांत आणि पारंपरिक शेती करणाऱ्या लोकांमध्ये माळ्यांचा वापर काही प्रमाणात सुरू आहे. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती पुनरुज्जीवित होत असल्याने माळ्याचा पुनर्वापर वाढू लागल्याचं सुचिन्ह दिसत आहे.  शेतकरी, कष्टकरी जीवनात सुख समृद्धीची श्रीमंती फुलविणारा हा माळा पुन्हा एकदा सन्मानाने आणि दिमाखाने उभा राहावा. मळा पाखरांनी गजबजून जावा. माळ्यावरून गोफणीचा पुन्हा आवाज घुमावा. आणि शिवारात राखणीचा सोहळा पुन्हा सजावा. समृद्धीचा वसा आणि वारसा उंचावणारा हा माळा पुन्हा शिवारात दिमाखात उभा राहावा. मानवी जीवन आणि लोकसंस्कृतीला वैभवाचे दान देणारा आणि शिवाराचा मान राखणारा हा माळा पुन्हा डोलात उभा राहवा हीच अपेक्षा. प्रयत्न करूया मळ्यात माळा जपण्याचा ! 


डॉ. अशोक शिंदे,
प्राद्यापक, मराठी विभाग, 
मुधोजी कॉलेज, फलटण
मोबाईल- 9860850344