मोट
भल्या पहाटे गावखरीच्या विहिरीवर घुमणाऱ्या मोटंच्या मंजुळ ललकारीने गाव हळूहळू जागं व्हायचं. नाना आपल्या गोड आवाजात वडिलावंss वडिलावंss! गवळ्याss बैलाला रंss वडिलावंss! हरण्याss बैलाला रं वडिलावंss! असं म्हणत एकेका बैलाचे नाव घ्यायचा. थोडा वेळ थांबायचा आणि मग हांss चलंss! असं म्हणताच कुई कुई कुई कुई आवाज आणि तो संपता चलगेच भडाडाडाss असा आवाज व्हायचा. नानाच्या या ललकारी बरोबरच सारं गावंही कामाला जुंपायचं. आम्हा लहानग्यांची जाग देखील त्या ललकारीनेच उमलायची. बाहेर ओटा-अंगण सडा सारवनाने सुगंधीत झालेलं असायचं. उगवतीचं तांबूस पिवळं ऊन हळूहळू उजेडात मिसळून जाऊ लागायचं. गडद सावल्याही हळूहळू उजळू लागत. घराघरात कामाची एकच घाईगर्दी सुरु होत. मग गावखरीच्या बाजूने येणारा आवाजही हळूहळू कमी होत जायचा. मात्र एव्हाना नानाचा एक पारुग पुरा झालेला असायचा.
गावखरीची विहीर आमच्या घरापासून जवळच होती. गाव आणि विहिरीच्या मधून एक मोठी वाट जात होती. त्यामुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ असायची. चांगली पाच परसाची ही विहीर अख्या गावखरीच्या नंबराला पाणी पुरवत होती. सात हाताचा घेर असलेली ही विहीर काळ्या पाषानी दगडांनी बांधलेली होती. काठापासून एक परस उंच आणि पुढे उतार असलेली धावदेखील भक्कम कोरीव चिरांची होती. धावेचा उतार चांगला पन्नास-साठ फूट लांबीचा असावा. विहिरीच्या बाजूला धावेवर मजबूत दोन दगडी पायटे बसवलेले होते. त्यांच्या खाली दगडी तोडी बसवल्यानं एक थारुळं तयार झालं होतं. या पायट्यांच्या आतल्या तोंडाला जी भोकं होती, त्यात दोन चौकोनी मजबूत लाकडी खांब उभे केले होते. या खांबाना आधार म्हणून धावेच्या उताराच्या बाजूला दोन तिरके लाकडी खांब विशिष्ट पद्धतीने जोडले गेले होते. उभ्या खांबांच्या खालच्या ववरच्या अशा दोन्ही टोकांना गोल भोकं होती. वरच्या बाजूला एक जाड लोखंडी सळी घालून त्यात मघोमध एक लाकडी चाक वसवलेले होते. तर खालच्या बाजूला एक लांब लाकडी पसरट चाक बसवलेलं होतं. या खालच्या पसरट चाकाला कणा असं म्हटलं जायचं. आणि या सर्व व्यवस्थेला‘वडवान ’ असं म्हटलं जातं असे. या वडवानामुळेच मोटंचं पाणी थारूळ्यात पडून पाटातून पिकाला जायचं. विहिरीच्या काठावर मावळतीच्या दिशेला मोठा लिंबोरा होता. विहिरीच्या धावेवर दिवस भरत्याची सावली पडायची. त्यामुळे मोट दिवसभर चालली तरी बैलं थकत नसतं.
मात्र गावखरीवर पाण्याची पाळी असली की चांदणी उगवताच नाना खरसड वस्तीवरून मोटंचा सारा सर्जाम गाडीत भरून निघायचा. संग कोणीतरी जोडीदार असायचाच. मग विहिरीवर पोहोचताच दोघेजण गाडीतून एकेक करत मोटंसह सारं सामान खाली घ्यायचे अन मग मोटंची जुपाजूपी व्हायची. नानाची मोट म्हणजे लोखंडी जाड पत्र्याचा वरची बाजू उघडी असलेला एक घनाकार डबाच होता. मोटंचा वरचा उघडा भाग बुडाच्या भागापेक्षा थोडा लांब होता. या खालच्या बाजूच्या मधोमध पत्र्याची एक गोल झडप (दरवाजा) वर उचलली जाईल अशारितीने बिजागरीने बसवलेली होती. मागच्या बाजूच्या दोन्ही बाजूला एक साखळी बसवून साखळीच्या मध्यावर एक लोखंडी कडी होती. तशीच साखळी पुढच्या तोंडालाही होती. सुमारे दीड-दोनशे लीटर पाणी मावेल असा तिचा आकार होता.
सुरवातीला मोट थारूळ्यावर ठेवली जायची. एक लांब जाड असा दोर ज्याला नाडा म्हटलं जायचं तो नाडा वडवानाच्या वरच्या चाकातून ओवून मोटंच्या मागच्या बाजूच्या साखळीच्या कडीला घट्ट बांधला जायचा. नंतरमोटंच्या पुढच्या बाजूच्या साखळीच्या कडीला आणखी एक दोर घट्ट बांधला जायचा. त्यास सौंदर म्हटले जायचं. मग नाना शिळवटीत दोन बैल झुंपायचा. आधी शिळवटीच्या वरच्या जुवावर नाडा आणि मग शिळवटीच्या खालच्या पट्टीला सौंदर गुंडाळून घट्ट बांधले जायचे. हे करताना नाडा सौंदरापेक्षा लांबीने जास्त घेतला जायचा. मोट विहिरीच्या पाण्यात समतल राहावी म्हणून ही व्यवस्था असायची. मग दोन्ही बैलं धावेच्या पुढच्या टोकाला उभी करून नाना आपल्या जोडीदाराच्या मदतीने मोट हळू हळू विहिरीत सोडत असे. एकदा का मोट वडवानातून विहिरीत गेली की मग दोन्ही बैलं मागे मागे सरकत वडवानापासून विशिष्ट अंतरावर येऊन थांबत आणि येथूनच नानाची ललकारी सुरु होत.
मोट पाण्यात टेकताच खालच्या बाजूची झडप पाण्यामुळे वर उचलली जात व मोटेत पाणीभरू लागे. मोट पाण्याने पूर्ण भरेपर्यंत नाना बैलांची नावं घेऊन आळवत असत. मोट पूर्ण भरताच नाना हांsss चलंsss!असं म्हणायचा. दोन्ही बैलं जोर लावून धावेवर चालू लागायची. मोट पाण्याच्या पातळीच्या वर येताच खालून उचललेली झडप वरच्या पाण्याच्या दाबाने पुन्हा खालीघट्ट बसायची. पाण्याने पूर्णपणे भरलेली मोट वर येत असताना चाकांचा व नाडा-सौंदर यांचा कुईकुई असा मंजुळ आवाज यायचा. मोट वडवानाजवळ येताच वरचा नाडा ताणला जाऊन मोटचे तोंडनेमकं थारूळ्यावर टेकत व आतील पाणी भडाडाss! आवाज करत थारूळ्यात पडायचं आणि पाटाने पिकाला जायचं. यावेळी बैलं धावेच्या पुढच्या टोकापर्यंत पोहचत असत. मोट रीती झाली की नाना दोन्ही बैलांच्या मोरखीला लावलेला कासरा मागे ओढत आणि बैलं पुन्हा मागे मागे सरकू लागत. याचवेळी नानाच्या ललकारीचा अंतरा सुरु व्हायचा. दुसरा जोडीदार दारूळ्या म्हणून शेतातदारं धरायचा. अशा प्रकारे न्याहारीच्या वक्तापर्यँत नानाची मोट चालायची. मोट ओढताना बैलांना थकवा येऊ नये आणि पिकालाही पाणी मिळावे असा दुहेरी हेतू या ललकारी गाण्यात होता.
साधारणत: पावसाळा संपून हिवाळा सुरु व्हायच्या दरम्यान या मोटा विहिरीवर दिसायच्या. खरीपाची पिकं शक्यतो पावसावर येत होती. दुष्काळाचा काही काळ वगळता पाऊसकाळ त्याकाळी अधिक असायचा. त्यामुळे विशेषतः रब्बी हंगामातच मोटा चालवल्या जात असत. पिकांना पाणी पुरविण्याचं मोट हे त्याकाळी एकमेव साधन होतं. आमच्या गावात सर्वच विहिरीवर अशा मोटा चालायच्या. पिकांना पाणी पुरविण्यासाठीची ही मोटंची योजना म्हणजे कृषी संस्कृतीला समृद्ध करणारी क्रांतिकारी घटना म्हटली पाहिजे.
भारतीय कृषी संस्कृतीचा प्रारंभ प्राचीन काळात झाला आहे. भटकंतीचे जीवन सोडून स्थीर जीवन स्वीकारल्यावर मानवाने हळूहळू शेती आणि पशुपालन हे दोन मुख्य व्यवसाय सुरु केले. सामान्यत: भारतीय कृषी संस्कृतीची सुरुवात नवाश्मयुगात झाली असे म्हटले जाते. याच काळात मानवाने अन्न पिकवायला आणि स्थीर जीवन जगायला सुरुवात केली. इ.स.पू. ७००० च्यासुमारास ‘मेहरगढ’ (बलुचिस्तान, पाकिस्तान) येथे शेती आणि पशुपालनाचा पुरावा आढळतो. याच काळात मानवाने शेतीसाठी प्राणी (बैल) आणि गहू व जवस ही पिकं घ्यायला सुरू सुरुवात केली होती. ही शेती पूर्णतः नैसर्गिक आणि हंगामी स्वरूपाची होती. प्रारंभीच्या काळात लहान लहान गटवा समूह करून मानव त्याकाळी शेती करत असे. पुढे हळूहळू शेतीसाठी पाण्याची साठवण करत पिकाच्या सिंचनाला प्रारंभ झाला.
सिंचनाचा प्रारंभ साधारणतः सिंधू संस्कृतीच्या काळात झाल्याचे मानले जाते. या काळातसिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित असलेल्या हडप्पा संस्कृतीत शेतीचे विस्तृत पुरावे आढळतात. याच काळात नहर किंवा पाटयाद्वारे पाणी आणणे आणि जमिनीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे हीकामे सुरू झालेली होती. पुढे वैदिक काळात शेतीला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले दिसते. शेतीच्या नांगरटीसाठी बैलांचा उपयोग आणि पाणी व्यवस्थापनाचे प्रारंभिक स्वरूप यांचा उल्लेखही ऋग्वेदात आढळतो. त्यानंतर मौर्य साम्राज्याच्या काळात कृषीसंस्था अधिक सुव्यवस्थित झाली असल्याचे दिसते. नंतर मध्ययुगीन काळात शेतजमिनींचा विस्तार होऊन विविध पिके घेतली जाऊ लागली. विशेषतः याच काळात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून लोखंडी औजारे, पाणी उपसण्यासाठीची साधने आणि त्यासाठी प्राण्यांचा वापर सुरु झाला. यावरून याच काळात विहीरव मोट यांचा शेतीसाठी वापर सुरु झाल्याचे दिसून येते.
भारतात विहिरीतून पाणी उपसण्यासाठी मोटेचा वापर वैदिक काळात इ.स.पू. १५०० -१०००या दरम्यान सुरू झाल्याचे उल्लेख आहेत. सिंधू संस्कृती आणि नंतरच्या हडप्पा संस्कृतीमध्ये विहिरी आणि पाण्याच्या व्यवस्थेचे ठळक पुरावे सापडतात, सिंधू संस्कृतीतील काही स्थळांवर विहिरींचे अवशेष आढळले आहेत. या विहिरींचा उपयोग सिंचनासाठी करण्यात येत असे. नंतर वैदिक काळात उत्तर भारतात गंगेच्या खोऱ्यात विहिरींच्या पाण्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग सुरू झाला होता. या काळात मोटेचा थेट उल्लेख नसला तरी बैलाच्या साहाय्याने सिंचन केले जात असल्याचे सूचित केले आहे. दक्षिण भारतातील याच काळात दुष्काळी भागांमध्ये देखील मोटेचा वापर केला जात होता. मौर्य साम्राज्याच्या काळात चाणक्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात मोटेचा उल्लेख आहे. या काळात लोखंडी नांगरासोबतच मोटेचा वापर शेतीच्या कामासाठी केला जात होता. पुढे मध्ययुगीन काळात पर्शियन चाकाचा (रेहट) भारतात मोठ्या प्रमाणावर वापर सुरूझाला. उत्तर भारतात आणि राजस्थानात विशेषतः दुष्काळी भागांमध्ये विहिरी आणि मोट यांचा उपयोग वाढला. या काळात मोटेसाठी बैल किंवा उंटासारख्या प्राण्यांचा उपयोग केला जाऊ लागला.
महाराष्टाच्या कृषीसंस्कृतीत मध्ययुगीन काळापासूनच सिंचनासाठी विहीर व मोट यांच्या वापर अधिक प्रमाणात असल्याचा पाहावयास मिळतो. मोट हेच पिकांना पाणी देण्याचे प्रमुख साधन म्हणून त्याकाळी वापरले जात होते. महाराष्ट्र हा तसा विषम हवामानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे पावसाचे प्रमाणही कमी जास्त असल्याचे जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात कधीओला तर कधी सुका दुष्काळ पडल्याचे अनेक संदर्भ सापडतात. सिंचनाची ही परंपरा येथे कित्येक शतकांपासून चालू होती. महाराष्ट्रात लोखंडी पत्रा आणि कातडी अशा दोन प्रकारच्या मोटा वापरल्या जात होत्या. दोन्हीचेही कार्य सारख्याच प्रकारचे होते.
एक काळ असा होता की पहाटे तांबडं फुटल्यावर कोंबड्याचं आरवणं आणि मोटेवरची ललकारी यांनी गाव शिवार दुमदुमून जात असे. आपला मुख्य व्यवसाय शेती हाच असल्यामुळे गावातील सर्वच लोक या व्यवसायात गुंतून राहत होते. प्रारंभीच्या काळात घरातील सर्वच लोक शेतीची सर्व कामं करायची. प्रत्येकाची आवड व कामातील गती वा कोशल्य यानुसार कामं केली किंवा वाटली जात असत. मोटकरी हे आपल्या कृषी संस्कृतीतील महत्वाचं आणि मानाचं पात्र होते. मोट हाकालने ही एक कलाच होती. बैलांशी लळा जिव्हाळा आणि गाता गोड गळा याद्वारे मळा फुलविण्याचे उत्तम कसब मोटकऱ्याकडे असे. मोटकरी आणि दारूळ्या यांची जोडी जमली तर सुगी भरभरून साजरी होत असे. दरवर्षी पडलेल्या पावसाचं प्रमाण, विहिरीच्या पाण्याचा अंदाज घेऊन त्याकाळी बागायती शेती केली जात असे. त्यामुळे अन्नधान्य पिकांसह काहीच नगदी पिकांचे उत्पादन घेतलं जात असे. लहरी किंवा बेभरवश्याच्या हवामानाच्या काळात मोटंच्या माध्यमातूनच वर्षभर लागणारी चंदी पिकत होती. धान्याच्या रूपातून घरात समृद्धीचं भरलेपण आणण्याचं मोलाचं कार्य त्याकाळी मोट करत असे.
विहिरीवर मोट सुरु असली की आसपासचे लोक पाण्याशी संबंधित कामं उरकून असतं. पिण्याचं पाणी असो की सडा शिंपणासाठी लागणारं पाणी असो, आसपासच्या बायांबापड्या बिनदिक्कत विहिरीवर येत असंत. कोणी धुणं धुवायचं, तर कोणी घरी पाणी घेऊन जायचं. याकामांच्या निमित्ताने गावात आलेल्या नव्याने आलेल्या सुनाबाळींच्या एकमेकींशी ओळखी व्हायच्या. सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी बोलल्या जायच्या. काही पुरुष मंडळी तर आपल्या आंघोळी देखील यापाण्यानं उरकून घेत असतं. मोट चालू असली की जनावरांना पोटभर पाणी प्यायला मिळायचं. शेळ्या-मेंढ्याचा कळप असो वा दुभती जनावरं असो त्यांची पाण्याची जागा हीच असायची. कामाला जाणारे लोक असोत वा शाळकरी मुलं असोत मोटंचं पाणी पिल्याशिवाय पुढं पाय टाकतनसंत. वाटेनं जाणारा वाटसरूही मोटंच्या थंडगार पाण्यानं आपली तहान भागवूनच पुढच्या मार्गाला लागायचा. सणा- सुदीच्या काळात तर आमच्या गावखरीच्या विहिरीवर लोकांची खूपच वर्दळ असायची.
मोट हे केवळ पिकांना पाणी देण्याचं साधन होतं असं नव्हे तर मोटंच्या माध्यमातून गावची सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वीण अधिक घट्ट होत असे. त्याकाळी विहिरीची संख्या खूपच मर्यादित होती. पांद किंवा खोलगट उताराच्या तळाशी विहिरी असायच्या. त्यामुळे मोटचं पाणी ठराविक भागातच पोहचत असे. म्हणूनच बागायची क्षेत्र त्याकाळी कमी प्रमाणात असायचे. विहिरीवर एका वेळी एक किंवा दोनंच मोटा चालायच्या. कधी कधी भावाभावात शेताच्या वाटण्या व्हायच्या. त्यामुळे मोटच्या बाबतीत सर्वजण एकमेकाशी गुण्यागोविंदाने व सामंजस्याने वागायचे. पिक व पाण्याची गरज पाहून एकमेकांना मदत करायचे. विहिरीला पाणी अधिक असेल तर कधी कधी मोट आणि बैलासह शेजारच्या शेतकऱ्याला आपल्या वाटणीचं पाणी देखील दिले जायचे. शेजारी, पाजारी, पाहुणे, सोयरे यांना देखील मोटंच्या माध्यमातून मदत केली जात होती.
मोटकऱ्याला आणि दारूळ्याला न्याहरी घेऊन कारभारीन येत असे तेंव्हा नात्यांचे गोड नाजूक धागे अधिक बळकट होत असत. मोट हाकलणं हे मजेचे कामं वाटत असल्यामुळे घरातील अनेक मुलं मोटेकडं आकर्षिली जात होती. काही मुलं तर मोटेत बसून विहिरीत खाली वर येण्या- जाण्याचा आनंद घेत असत. शेती- मातीशी त्यांचा लळा- जिव्हाळा अधिक घट्ट होत असे. विहिरीवर पाण्या- धुण्याच्या निमित्ताने आलेल्या आसपासच्या व्यक्तींचे आपसात प्रेमाचे स्नेहाचे संबंध निर्माण होत असत. कधी कधी नवी नातीही जुळली जायची. खरंच मोट हे त्या काळात ग्रामीण लोकजीवनाशी जोडले गेलेले एक प्रमुख असं कृषी साधन होतं. या मोटेशी संबंधीत गाव शिवाराशी अनेक प्रकारचे अनुभव व आठवणी जोडल्या गेलेल्या असायच्या.
आज आधुनिक काळात यंत्र- तंत्राच्या माध्यमातून कृषी व ग्रामजीवनात अनेक नवनवी साधने, हत्यारे अवतरली आहेत. यामुळे कृषी व ग्राम जीवन पूर्णत: बदलून गेले आहे. नवनव्या तंत्रज्ञानाने सिंचनाच्या नव्या पद्धती अवतरल्या आहेत. शेतकरी देखील आता काळाप्रमाणे बदलत अशा सहज, सुलभ व्यवस्थेचा अंगीकार करू लागले आहेत. साधारणतः स्वातंत्रोत्तर काळात भारतीय शेतीमध्ये विविधांगी बदल सुरु झाले. केरोसिन वा इंधनाची उपलब्धता जसजशी वाढत गेली तसतशी त्याच्याशी संबंधित साधनेही निर्माण होऊ लागली. याच काळात यांत्रिकीकरणातून ‘इंजिन’ यापाणी उपसणाऱ्या साधनाचा जन्म झाला. याचकाळात मोठ्या नद्यांवर मोठमोठे धरणे बांधली गेली.त्यामाध्यमातून कालवे व पाटांच्याद्वारे जलसिंचन प्रकल्प उभारले गेले. या धरण प्रकल्पाच्यारूपाने जलविद्युत या आणखी एका नव्या ऊर्जास्रोताचा जन्म झाला.
या आधुनिक तथा यांत्रिक साधनांचा शेतीमध्ये वापर व वावर वाढू लागला आणि शेकडो वर्षपारंपरिक पद्धतीने पाटातून झुळझुळ, खळखळ नाद निर्माण करणारी मोट अंगणात तोंड खाली घालून बसू लागली. विहिरीवरची तिची ललकारी हळूहळू ठॉक ठॉकss ठॉक ठॉकss अशा कर्णकर्कश आवाजात रूपांतरित झाली. जलविद्युत क्रांतीमुळं पुढील काळात विहिरीवरील उरल्या सुरल्या मोटा जाऊन तिथं विद्युत मोटारी बसल्या. विहिरी शेजारी ‘इंजिनघर’ नावाच्या नव्यावास्तूचा अवतार झाला आणि धाव व वडवान उदास भासू लागलं. काळ लोटेल तसा यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढू लागला. आधी लोखंडी आणि नंतर प्लास्टिकचे पाईप निर्माण झाले. थारूळ्यात पडून पाटानं झुळझुळू वाहणारं पाणीही थेट पिकाच्या वाफ्यात मूकपणे वाहू लागले. एवढं कमी होते की काय म्हणून आता तर ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीने पाणी थेट पिकाच्या मुळातच टिपकत असताना दिसत आहे. एके काळी ‘मोट चालली मळ्यात माझ्या, चाकं वाजतंय कुई कुई! पाटाचं पाणी झुळूझुळूवांनी फुलवत जातंय जाई जुई!!’ असं मळ्याच्या समृद्धीचं गाणंगाणारा मोटकरी मात्र आज मुकपणे या व्यवस्थेचा गोंगाट सहन करत आहे.
एकेकाळी मोटंनं निर्माण केलेले वैभव आज आधुनिकीकरणाच्या क्रूर झडपेने उध्वस्थ केले गेलेआहे. विहिरीवर रुबाबाने ताल धरणारी मोट मागील काही काळात अंगणात राहून कोंबड्या डालण्याचं वा इतर वस्तू झाकण्याचं कामं निमूटपणे करत होती. एक निर्जीव वस्तू म्हणून गप्प बसलेल्या या मोटेकडे बघताना मागील सारा काळ सजीव होऊन जाई. तिला पाहून वा स्पर्श केल्याने तिच्या अस्तिवाचा व कर्तृत्वाचा आठव येई. मात्र आज ती मोट अंगणातही दिसेनाशी झालीय. कारण अंगणच नाहीसं झालंय. काळानुसार बदल होणं हा निसर्गाचा स्वभावच आहे. मानव त्याला उपवाद नसेलच; मात्र एकेकाळी लोकजीवनात अमाप सौख्य आणि अफाट वैभव उभा करणारी सिंचनाची ही पारंपरिक व्यवस्था हळूहळू डोळ्याआड होताना मनाला खूप वेदना होतात. परिवर्तन अटळ आहे. नवसंस्कृतीचं निर्माणही अनिवार्यच आहे. या बदलात नवनवे संस्कार, नवे शब्द, नव्या संकल्पना अवतरणारचं. हे जगरहाटीच चक्रही सतत फिरतच राहणार आहे. ते सर्व स्वीकारावेच लागणार. मात्र यामुळे आज अडगळीत पडलेल्या हा समृद्ध वारसा किती काळ टिकणार?
मोट, नाडा, सौंदर, चाक, कणा, वडवान, शिळवट ही केवळ साधने नव्हती, तर मानवी जीवनाच्या प्रगतीत मानसिक व भावनिक आधार व आकार देणाऱ्या अमूल्य ठेवी होत्या. आज अडगळीत का होईना त्या दिसतात तरी. मात्र धाव, पायटा, थारुळं, पाट या वास्तुंचं काय? एकादवेळी अडगळीत असलेली समृद्धी अजूनही काही काळ जपता येईल अथवा टिकेलही; मात्र तो ललकारी देणारा मोटकरी आणि बांधावरून आरुळ्या ठोकणारा तो दारूळ्या कसा साठवायचा? शिवाय अवघ्या गावात पहाटेची घुमणारी ती ललकारी, चाक- कण्याची कुईकुई धून अन् पाण्याची मंजुळ झूळझूळ हा ध्वनीनाद कशा आळवायचा?
एखादवेळी शब्द, चित्र, शिल्प, लिपी या अक्षर साधनाद्वारे वा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हे सर्व टिकवताही येईल. पण त्या साधनांशी जोडले गेलेले आणि त्या साधनांमुळं जोडले गेलेले भावनिक नातं कसं जपायचं? या सर्वच व्यवहारात केवळ चैतन्यहीन निर्जीवता असेल नाही का? नव्याचा उदय होताना जुन्याचं नष्ट होतं जाणं किती वेदणादायी असतं ना! प्रयत्न व्हावा ही समृद्धी जपण्याचा!
डॉ. अशोक शिंदे
मोबाईल - ९८६०८५०३४४