चोपणी
सुगीची कामं उरकली की, काही दिवसातच ऊन्हं चांगली चटकू लागत. शिवारातलं धन घरी सुरक्षित येऊन पडलेलं असायचं. रानातल्या नांगरटीही एव्हाना उरकत आलेल्या असायच्या. अशा काळात शेत कामातून लोकांना काहीशी उसंत मिळायची. मात्र अख्खा हंगाम शेता - शिवारात गेल्यामुळे पुढचा हंगाम येईपर्यंत घरातील बाकीची कामं उरकून घ्यायचीही हीच वेळ असायची. अशातच यात्रा - जत्रा आणि लगीनसराई देखील पुढ्यात येऊन ठेपलेली असे. त्यामुळे घर अंगणाच्या आवरा आवरीचं काम या काळात पहिल्यांदा हातात घेतले जाई. या आवरा आवरीतील मुख्य काम म्हणजे घराचा आणि अंगणाचा ‘परवर’ करणे हे होय. वर्षा, दोन वर्षा आड हे काम हमखासपणे केले जात असे.
या काळापासून उन्हाची तीव्रता आणखीच वाढत जाते. अशावेळी घर, ओटा किंवा ओसरीची जमीन थंड रहावी म्हणून ग्रामीण भागात असे परवर केले जात असत. मागील सलग दोन तीन वर्ष केवळ शेणाने सारवल्यामुळे या जमिनीच्या पृष्ठभागावर शेणाचे थर किंवा पापुडे तयार होत असत. काही ठिकाणच्या जमिनीला छोट्या भेगा देखील पडलेल्या असत. अशा वेळी परवर केल्याने जमीनीची पातळी सपाट होईल व जागाही एकजीव घट्ट होईल आणि उन्हाळ्यात घरात गारवा, थंडावा राहील या हेतूने हे परवर केले जायचे. समद्या गावात याच काळात हे परवर करण्याचं काम अगदी जोरात चाललेलं असायचं.
परवर करणे हे कुटुंबाचे सामुदायिक काम असे. या कामात घरातील लहान थोर अगदी आनंदाने आपली जबाबदारी उचलत असत. आधी घराच्या आतील जागेचा परवर केला जायचा. मग ओसरी किंवा ओट्याचा परवर केला जायचा. घरातील लहान मंडळी तर या कामाची आतुरतेने वाट पाहत असायची. कारण या कामात त्यांना मनसोक्त सहभाग घेता येत असे. परवर करणे म्हणजे घरातील जमीन उकरून पुन्हा घट्ट करण्याची प्रक्रिया. हे काम पूर्ण व्हायला किमान पाच- सात दिवस लागायचे. सुरवातीला घरातील बैठकीची व वावरण्याची सर्व जमीन कुदळ किंवा टिकावाने खोदली जात असे . साधारणत: ही जमीन अर्धा - पाऊण फूट खोल उकरली जायची. हे काम घरातील पुरुष मंडळी करायची. यावेळी त्यामध्ये आवश्यकतेनुसार माती, शेण मिसळून ती जमीन खोऱ्याने हावार केली जायची. नंतर त्या खोदलेल्या जमिनीत घरातील महिला हंडा-घागरीने पाणी आणून त्यात ओतत असत. या मिश्रणाचा चांगला चिखल गाळ होईपर्यंत त्यात पाणी ओतले जायचे. या वेळी घरातील लहान मुलं हा चिखलगाळ एकजीव करण्यासाठी सज्ज असत. ते आपल्या पायांनी सगळी जमीन तुडवून माती- पाणी एकजीव करत. यावेळी घरातील जमिनीची पातळी सर्वत्र एकसमान केली जायची. त्यांनतर तीन चार दिवस ही जमीन सुकू दिली जायची. आणि नंतर खऱ्या अर्थाने परवर करायला सुरुवात व्हायची.
परवराचे काम चालू असताना घरात ये-जा करण्यासाठी दारापासून आत विशिष्ट अंतरावर लहान सपाट दगड मांडले जायचे. हे दगड चिखलात चांगलेच रुतून बसलेले असत. तीन चार दिवसात हा चिखल चांगला सुकायचा. एकदा का जमीन चांगली सुकली की मग रुतलेले दगड काढून परवराच्या चोपणीला सुरुवात होत असे. परवराच्या चोपणीसाठी दीड, दोन फूट लांबीचं एक लाकडी साधन वापरले जायचे. त्यास ‘चोपणी’ असे म्हणत.
घराचा परवर करण्याच्या कामात सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे ही चोपणी होय. चोपणीला हातात धरण्यासाठी लाकडाच्या अंगचाच साधारण अर्धा फूट लांबीचा गोल गुळगुळीत दांडा असतो. दांड्याच्या पुढे साधारण एक, दीड फूट लांबीचा खाली सपाट पृष्ठभाग व वर अर्ध गोलाकार किंवा वरच्या दोन्ही बाजूनी तासलेला षटकोनी आकाराचा लाकडी भाग असतो. ही चोपणी एका हाताने सहजपणे हाताळता येईल अशी साधारण दोन, अडीच किलो वजनाची असते. एकदा का ओली केलेली जमीन चांगली सुकली की मग या चोपणीचं काम सुरू व्हायचं.
परवर चोपण्याचं किंवा जमीन घट्ट करण्याचं काम ही चोपणी करते. प्रथम चोपणीचा दांडा हातात धरून ती जोरात सुकलेल्या जमिनीवर विशिष्ट रीतीने मारली किंवा आपटली जाते. तिच्या या आघाताने जमीन दबली जाते व घट्ट होते. सलग दोन, तीन दिवस या चोपणीने परवर चांगला चोपला किंवा ठोकला जातो. परवर चालू असताना जमिनीची पातळी सगळीकडे एकसमान येईल याची काळजी घेतली जाते. कुठे खोलगा वा उंचवटा राहणार नाही हेही पाहिले जाते.
परवर करते वेळी खालची जागा एकदम टणक आणि मजबूत होईल अशारितीने चोपणी चालवली जाते. अशा प्रकारे चोपणीच्या दोन, तीन फेऱ्या होतात. या कामात सवडीने घरातील सगळेच जण आपला वाटा उचलतात. चोपणीच्या शेवटच्या फेऱ्यात मात्र परवर सुशोभित करण्याचं काम केले जाते. बांगड्यांच्या काचा, इतर फुटक्या काचा, गोट्या, दामुके, चिंचुके इ. वस्तूंपासून तयार झालेल्या परवरावर सुंदर नक्षी काढल्या जातात. घराचे प्रवेश द्वार, कोपरे आणि मध्यभागी काही नावे, विविध फुलांचे आकार, गोल, चौकोनी आकार असे आकर्षक नक्षीकाम केले जाते. वरील वस्तू वा पदार्थ परवरावर विशिष्ट पद्धतीने मांडून वरून त्यावर चोपणीने चोपले की त्या वस्तू जमिनीत घुसून त्याची सुंदर नक्षी बनत असे. या नक्षीकामामुळे घर - अंगणात प्रसन्नता निर्माण होत असे. असं हे परवराचचं काम चोपणीशिवाय शक्य होत नसे . अशा प्रकारे हे सर्व काम पूर्ण झाल्यावर मग परवर शेणानं सारवला जातो, आणि पुढे त्यावर वावर सुरू होतो.
परवराच्या या संपूर्ण प्रक्रियेत ही चोपणी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. अशी चोपणी गावातील सुतारा कडून तयार करून घेतली जाते. यासाठी जांभूळ, बाभूळ किंवा लिंबाचे लाकूड वापरले जाते. आमच्या गावात बयाजी नाना अशा चोपण्या करण्यात तरबेज होते. एकदा ही चोपणी करून घेतली की ती पुढे कित्येक वर्षे चांगली टिकत असे. चोपणी हे आपल्या ग्रामीण संस्कृतीत गृह निर्मितीच्या कार्यात उपयोगी पडणारे एक उपयुक्त साधन आहे. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत चोपणीस महत्त्वपूर्ण स्थान असलेले दिसते. घराचा परवर करणे ही प्रक्रिया देखील प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसून येते.
प्राचीन काळापासून वास्तव्यासाठी असलेले ‘घर’ ही पवित्र जागा मानली गेली आहे. यामध्ये भूमीशुद्धी, जलशुद्धी व अग्नीशुद्धी करण्याची प्रथा होती. यास ‘वास्तू पूजन’ वा.’गृह संस्कार’ असे म्हटले जात असे. या परंपरेनुसार उन्हाळ्यात भूमीला थंडावा व शुद्धता मिळावी म्हणून माती खोदणे, पाणी टाकून घट्ट करणे, त्यावर गायीच्या शेणाचे लेपन करणे असे विधी होत असत. यामुळे घर पवित्र तर व्हायचेच; पण रोगटपणा व कीटकांपासूनही संरक्षण मिळत असे. याकाळात प्रामुख्याने मातीची व लाकडी घरे असत. उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्यात भेगा पडत व सततच्या वापराने धूळ निर्माण होत असे. म्हणून ‘परवर’ या प्रक्रियेची गरज निर्माण झाली. यामुळे घरातील जमिनीत पाणी व ओलावा पुन्हा भरल्याने जमीन घट्ट होऊन थंडावा मिळत असे. हा परवर करण्यासाठी चोपणी हे साधन वापरले जात असे.
प्राचीन काळापासून ग्रामीण समाजात ठोकणे, बदडणे किंवा चोपणे या आवश्यक कामांसाठी लाकडी साधनांचा वापर करण्याची परंपरा होती. ज्वारी, बाजरी व गहू या अन्नधान्याचे कणीस ठोकण्यासाठी मोगरी तर लाकडी खुंटी किंवा बांबू जमिनीत ठोकण्यासाठी ठोकणी या साधनांचा वापर केला जात असे. याच धर्तीवर परवर चोपण्यासाठी चोपणी तयार झाली असावी. मातीच्या घरात ओटा, देवघराचा परवर करताना चोपणीचा वापर केला जात असे. प्राचीन काळापासून चोपणीने जमिनीला घट्ट करण्याची प्रक्रिया केली जात होती. प्राचीन काळापासून ते ब्रिटिश राजवटी पर्यंत ग्रामीण घरांमध्ये चोपणीचा वापर सुरूच होता.
स्वातंत्र्योत्तर काळात पारंपारिक माती, लाकडाचा वापर करून बांधली जाणारी धाब्याची किंवा चौसोपी खणांची गृहरचना हळूहळू मागे पडत गेली. नवीन पाश्चिमात्य तथा रोमन शैलीची गृह निर्मिती होऊ लागली. आधुनिक काळात तर बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून घराचे पूर्ण रुपडेच बदलले गेले आहे. एकमजली बंगाला, ट्विन बंगलो, बहुमजली इमारतीतील सदनिका अशी घरे बांधली जात आहेत. बँका व सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब, सामान्य लोकांनाही अशा प्रकारची घरे मिळत आहेत. झोपडीचेही रूप आता पुरते पालटले आहे. खेड्या पाड्यात काही प्रमाणात असलेली मातीची घरे वगळता आज सर्वत्र सिमेंट-काँक्रीटची घरे दिसत आहेत. केवळ शहरी नव्हे तर ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूरांची घरेही आता आधुनिक शैलीयुक्त बांधली जात आहेत. माती, लाकडाशिवाय बांधल्या जाणाऱ्या या घरांना ओसरी अंगणाचा तर जणू शापच लागला आहे असे वाटते.
या सिमेंट-काँक्रीटच्या घरात आज चकचकीत, गुळगुळीत फरशी बसवली जात आहे. त्यामुळे ‘परवर’ करण्याची प्रक्रियाच बंद झाली आहे. परिणामी परवराला साकार करणारी चोपणी आज कुठेतरी अडगळीत जाऊन पडली आहे. घराचा परवर करणे ही केवळ घराची आतील जमीनपुनरुजीवित करण्याची प्रक्रिया नसून ती प्रक्रिया म्हणजे आपल्या लोकसंस्कृतीचा एक सांस्कृतिक, धार्मिक व आरोग्यदायी ठेवा होय. चोपणीने चोपताना घरातील स्त्रिया ओव्या, गाणी म्हणत ही प्रक्रियाउत्सवात रूपांतरित करत असत. परवर चोपणीच्या निमित्ताने शेजारी सख्या - मैत्रिणी मदतीला येत असत. यामुळे प्रेम व परस्पर सहकार्य वृत्ती वाढीस लागत असे. सण, वार, उत्सव या धार्मिक आणि मुंज , विवाह या कौटुंबिक कार्यासाठी परवर ही परंपरा महत्वाची ठरत असे. घर अंगणात चोपणी फिरल्याने परवर नजरेत भरत असे.
चोपणी केवळ परवर साकारत होती असे नाही तर लाक्षणिक अर्थाने ती विकृत प्रवृत्तीही चोपून काढत सरळ, सपाट करत होती. ‘चोपून सरळ करणे’ हा संस्कारजन्य शब्दसमूह या चोपणीच्या कृतीतूनच उगम पावला असावा. चोपणीमुळे केवळ घराचे सौंदर्य वाढत नव्हते; तर तिच्या कार्यामुळे कौटुंबिक आरोग्य टिकत असे. परवरामुळे स्वच्छता, पावित्र्य राखले जात व उन्हाचा दाह कमी होऊन घरात स्वास्थ्य नांदत असे. परवर करताना माती, पाणी, शेण हे नैसर्गिक साहित्य वापरले जात असल्याने पर्यावरणीय दृष्टीने येथे शाश्वत जीवनपद्धतीचा अंगीकार होत असे.
चोपणी हा कलात्मक दृष्ट्याही मौलिक ठेवा आहे. चोपणीने परवर चोपणे ही सुद्धा एक कलाच आहे. चोपणीने परवर चोपताना ती जमिनीवर आपटताना ती किंचित आपल्याकडे ओढावी लागते. असे न केल्यास एखादवेळी तिच्या ठोकण्याबरोबर चिखलाचा पोपडा तिला चिटकून वर येऊ शकतो. त्यामुळे चोपतानाही अलगदपणे आघात करणे ही वैशिष्ट्यपूर्ण कला चोपणीच्या रूपाने विकसित झाली. शिवाय वैविध्ययुक्त आकाराच्या चोपण्या देखील वस्तुकलेचा उत्तम नमुना मानला जातो. परवर चोपताना लहान थोरांना आपले कला, कौशल्य आजमावण्याची उत्तम संधी मिळत असे. विविध वस्तूंच्या मध्यमातून रचलेलं नक्षीकाम हे परवर असेपर्यंत कौतुकाचं निमित्त असायचं. या सर्व सांस्कृतिक बाबींची साक्षीदार असलेली ही चोपणी आज मात्र कुठेतरी कोपऱ्यात वाळवीने वेढलेली दिसत आहे.
आधुनिक पद्धतीच्या घरांमुळे आज चोपणीचा वापर बंद झाला आहे. अपवाद म्हणून अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी पारंपरिक मातीच्या घरांत परवर केला जातो. तेथे ‘चोपणी’ वापरली जाते. या ठिकाणी अजूनही चोपणी जपली जात आहे. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. परवर करणे ही केवळ घर दुरुस्तीची पद्धत नव्हती तर भारतीय संस्कृतीतील भूमीपूजन, शुद्धीकरण व गृहसंस्कारया परंपरेचा ती अविभाज्य भाग होती. त्यामागे घरात स्वच्छता, शुद्धता व चैतन्य निर्माण करणे हा उद्देश होता. केवळ चोपणीच्या रूपाने हे साफल्य साध्य होत असे.
असा हा घराचे पुनरुजीवन व चैतन्य फुलवणारा समृद्ध साक्षीदार आज त्याच्या अस्तित्त्वाच्या अखेरच्या घटका मोजतोय. त्याचं कार्य आज जवळ जवळ संपलेच आहे. मात्र त्याचे कार्य व रूपाचा वारसा पुढच्या पिढीसाठी जिवंत ठेवायचा असेल ; तर त्याच्या स्मृती वा त्याचे वस्तूरूप अवशेष आपणास जतन करणे अनिवार्य आहे. म्हणूनच चोपणी जेथे ज्या अवस्थेत आहे त्या रूपात तिला जपूया ! गृह संस्कृतीच्या हा मौलिक ठेवा सुरक्षित राखुया ! सद्या तरी एवढेच करूया !
✍️ डॉ. अशोक शिंदे
प्राध्यापक, मराठी विभाग,
मुधोजी महाविद्यालय, फलटण