आगळ
आमच्या गावच्या पूर्वेला एक वस्ती आहे. पूर्वी तिथे अनेक वाडे होते. यामध्ये एक मोठा वाडा होता. भाऊंचा वाडा म्हणून हा वाडा ओळखला जायचा. चहूबाजूंनी उंच व रुंद चिरेबंदी भिंती, उंच भव्य जोतं, पश्चिमेला मुख्य दरवाजा तर पूर्व व उत्तरेला दोन दरवाजे, आत दोन चौक आणि मागच्या बाजूला गोठा असा हा भक्कम वाडा. इथं सतत माणसांची वर्दळ असे. शेतमजूर, गुराखी आणि इतर काही लोक यांचा इथं सतत राबता असे. आमचे वडिलही अधून मधून कामानिमित्ताने या वाड्यात जायचे. त्यांच्या बरोबर मीही कधी कधी या वाड्यात जायचो.
मुख्य दरवाज्यातून वाड्यात प्रवेश करताना मोठी चौकट ओलांडावी लागत असे. वाड्याला शोभेल असाच भक्कम देखणा असा हा मुख्य दरवाजा होता. सागाची चौकट आणि दोन पाखी दरवाजावर कोरीव काम करण्यात आले होते. सात- साडेसात फूट उंचीचा हा दरवाजा इतका जड आणि मजबूत होता की, लहान मुलांना सहजपणे तो लावता - उघडता येत नसे. मात्र जवळ कोणी मोठी माणसे नाहीत अशी संधी साधून कधी - कधी आम्ही लहान मुले हा दरवाजा आतून बंद करण्याचा प्रयत्न करायचो. मोठ्या नेटाने दरवाजाच्या दोन्ही बाजू ढकलून तो बंद करण्याचा आमचा प्रयत्न असे. कधीतरी दरवाजा बंद करण्यात आम्हाला यश यायचं.
या दरवाजाच्या आतील बाजूने चौकटीच्या मध्यावर दगडी भिंतीत दोन्ही बाजूंना दोन चौकोनी खाचा किंवा खोबण्या होत्या. यातील उजवीकडील खोबणी दरवाजाच्या रुंदीपेक्षा थोडी लांब होती. तिच्यात एक चौकोनी लाकडाचा ओंडका ठेवलेला होता. हा लाकडी ओंडका लाकडी खणा सारखाच चौरस आणि गुळगुळीत होता. त्याच्या तोंडाला गोलाई देऊन बरोबर मध्यावर एक लोखंडी कडी बसवलेली होती. दरवाज्याच्या डाव्या बाजूची खोबणी भिंतीत साधारण एक फूट आत होती. दरवाजा आतून बंद केला की लोखंडी ओंडक्याच्या कडीला ओढून त्याचे तोंड डाव्या बाजूच्या चौकोनी खोबणीत घुसवले जायचे. एकदा हा लाकडी चौकोनी दांडा आडवा झाला की बाहेरून दरवाजा कितीही ढकलला तरी दार उघडले जायचे नाही. हा चौकोनी लाकडी ओंडका म्हणजेच ‘आगळ’.
दरवाजा आतून बंद करून हा आगळ दोन्ही भिंतीत सरकवला की वाडा अगदी पोलादी पेटीत बंद झाल्यासारखा वाटायचा. अशा प्रकारचे आगळ या वाड्याच्या सर्वच दरवाजांना होते. त्यामुळे दरवाजे आतून लावून घेऊन आगळ सरकवला की मग अख्खा वाडाच सुरक्षित व्हायचा. प्राचीन काळापासून वाडा किंवा घराच्या सुरक्षेचं चोख कार्य करणारे ‘आगळ’ हे ग्रामीण संस्कृतीतील पारंपरिक साधन आहे. साधारणपणे लांबट गोलसर किंवा चौकोनी कडीसारखा लाकडी तुकडा म्हणजे आगळ. मानवी ग्रामीण संस्कृतीत सुरक्षा आणि आधार देण्याचे मोलाचे कार्य ‘आगळ’ या साधनाने साधलेले आहे. भारतीय संस्कृतीच्या विविध कालखंडात या आगळाला विशेष महत्त्व असलेले पहावयास मिळते.
प्राचीन काळी सिंधू संस्कृतीत घरांना व्यवस्थित दारे होती. उत्खननात दिसणारे चौकट, खाचा, सरकवणारे आडवे लाकडी साधन हे आगळाचे प्राथमिक रूप असावे असे समजले जाते. वैदिक व उत्तरवैदिक काळात ‘गृहसंरक्षण’ ही महत्त्वाची संकल्पना आली. धार्मिक ग्रंथांत गृहपालक देवता व द्वारपाल यांचा उल्लेख आहे. याच संकल्पनेतून दरवाजा आतून घट्ट बंद करण्याची पद्धत उदयास आली असावी. गुप्तकालीन व प्राचीन नगररचना या काळात राजवाडे, मठ, देवळे यामध्ये भक्कम लाकडी दरवाजे प्रचलित होते. दरवाजा आतून बंद करण्यासाठी लाकडी सरकवटा किंवा आगळ याच काळात वापरले जाऊ लागले.
मध्ययुगीन काळात इस्लामी स्थापत्यशैलीत व हिंदू-मराठा स्थापत्यशैलीत आगळाचे व्यापक रूप आढळते. किल्ल्यांचे मोठे दरवाजे आतून अडवण्यासाठी जाडसर लाकडी आगळ वापरले जात असत. गावातील वाड्यांत, हवेल्यांत मात्र साधे लाकडी आगळ लावले जात. आक्रमण किंवा दरोडे यावेळी हे आगळ मोठे बळकट रक्षण साधन ठरायचे. शिवकालीन रायगड, जंजिरा, प्रतापगड या किल्ल्यांत दुहेरी-तिहेरी आगळ आढळतात. ग्रामीण घरांत मात्र आगळ साधेच असायचे. वाडे व देवळात मात्र जाडसर, लांब लाकडी पट्ट्या चौकटीवर लावल्या जायच्या. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांनी कुलूप, चावी, धातूचे सरकवटे आणले, तरी ग्रामीण वाड्यांत व किल्ल्यांत पारंपरिक आगळ टिकून राहिलेले होते.
आधुनिक काळात शहरी भागात लोखंडी व काँक्रीट गज, लोखंडी बोल्ट अशी पर्यायी व्यवस्था आली. मात्र या काळातही ग्रामीण भागात काही ठिकाणी लाकडी आगळाचा वापर होतच होता. कारण ग्रामीण भागात या काळात वाडे टिकून होते. पुढे वाडा संस्कृती हळूहळू लोप पावत गेली. नवीन घरे बांधली जाऊ लागली. त्यामुळे अशा घरात काही ठिकाणी लाकडी आगळाऐवजी लोखंडी सरकवटे बसवले जाऊ लागले. या काळात आगळाचे स्वरूप बदलले असले तरी त्याचा वापर मात्र सुरूच होता.
अलीकडच्या काळात मात्र संपूर्ण देशात आधुनिक पद्धतीची गृहरचना होत आहे. जुणे वाडे, देवळे, गढ्या आज जीर्ण होऊन गेल्या आहेत. या वास्तुंचे बुरुंज, तटबंदी आणि प्रवेशद्वारे देखील ढासळत चालले आहेत. अनेक जूने वाडे पाडून तेथे नवी इमारत वा बंगला उभारला जात आहे. आधुनिक घरांप्रमाणे आज आधुनिक सुरक्षा व्यवस्था देखील निर्माण होत आहे. घरांच्या सुरक्षेसाठी आता नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामध्ये सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक लॉक, अलार्म सिस्टीम अशी आधुनिक सुरक्षा उपकरणे बाजारात आली आहेत. त्यामुळे आगळ ही संकल्पना आता हळूहळू लोप पावत चालली आहे. त्यामुळे जुन्या वाड्या, हवेल्या व देवळातील आगळ आज जीर्ण अवस्थेत दिसत आहेत.
आगळ हे केवळ आपल्या घराचे सुरक्षा साधन नव्हते तर ते घराची मर्यादा, सुरक्षितता आणि संस्कृतीचेही प्रतीक होते. प्रारंभी आगळ फक्त शारीरिक सुरक्षा आणि
गृहसंरक्षणाचे साधन होते. नंतर मात्र ते सार्वत्रिक तथा साम्राज्य संरक्षणाचा अविभाज्य भाग बनले. दुर्गरक्षणाचा मुख्य घटक म्हणून आगळ महत्त्वाचा ठरला. आजच्या आधुनिक काळात त्याचे स्थान लोखंडी वा तांत्रिक साधनांनी घेतले असले तरी आपल्या ग्रामीण संस्कृती व परंपरेचे प्रतिक म्हणून आगळ जपून ठेवणे गरजेचे आहे.
आपल्या घर आणि मालकाला हल्ले, दरोडे, आक्रमण यापासून वाचण्यासाठी भक्कमपणे बंदोबस्त करणारा हा आगळ मात्र आज स्वतःच असुरक्षित झाला आहे. कुठेतरी अडगळीत किंवा वाड्याच्या पडक्या अवशेषात अस्ताव्यस्तपणे तो बुजून गेला आहे. घर, गाव, साम्राज्य आणि संस्कृतीच्या सुरक्षेचा साक्षीदार असलेला हा आगळ आज अस्तंगत पावत चालला आहे. बाहेरच्या जगाचा धक्का बाहेरच्या बाहेर थोपवून मालकाशी इमान राखत अख्या कुटुंबाला शांत व निर्घोरपणे झोपी घालणारा हा आगळ आज मात्र अखेरच्या घटका मोजत आहे. आजच्या यांत्रिक कुलपांच्या आणि इलेक्ट्रॉनिक गजांच्या जगात या साध्या दिसणाऱ्या आगळाचे अस्तित्त्व जपणे आपल्यापुढे मोठे आव्हान आहे.
आपली पारंपारिक घरे साधी, पण भक्कम होती. दरवाजा बंद केला आणि आतून आडवा लाकडी आगळ सरकला की घर जणू अभेद्य किल्ला व्हायचं. हे आगळ म्हणजे केवळ लाकूड नव्हतं, तर मनःशांतीचं आणि निर्धोकपणाचं ते औषध होतं. बाहेर दरोडेखोर, लांडगे, वादळं असली तरी आत बसलेलं कुटुंब निश्चिंत झोपायचं ते केवळ आगळाच्या भरवशावर. आगळाने बंद केलेला दरवाजा म्हणजे फक्त बाहेरच्या माणसाला अडवणं नव्हे, तर आतल्या जगाला सुरक्षित ठेवणं होतं.
आज मानवी सुरक्षा, मालमत्ता सुरक्षा याकरिता वैयक्तिक, सामूहिक व शासकीय स्तरावर अनेक उपाय योजना वा विविध उपक्रम राबविले जातात. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काही कायदेही करण्यात आले आहेत. मात्र आगळाची मजबुती आणि विश्वासार्हतेची सर त्याला येणार नाही.
ज्या आगळाने मानवी संस्कृतीला स्वसंरक्षणाचा मूलमंत्र दिला, सुरक्षिततेची हमी दिली असे हे विश्वासचं प्रतिक आणि घराचा खंबीर राखणदार आपण आहे त्या स्थितीत जपायला हवा. घराच्या सुरक्षेबरोबरच घराचं घरपण शाबूत राखणारा हा ‘आगळ’ सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. म्हणूनच अडगळीत पडलेला हा ‘आगळ’ उचित जागेवर सरकला जावा एवढीच अपेक्षा!
डॉ. अशोक शिंदे
प्राध्यापक, मराठी विभाग
मुधोजी महाविद्यालय, phalatan
Mob. 9860850344
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा