पाक्षिक सदर - ‘अडगळीतील समृद्धी’ लेख क्र- १
कंदील
सांजवेळ झाली की आजी ओसरीत खुंटीवर टांगलेला कंदील खाली घ्यायची. आजीचं कंदील लावणं (पेटवीनं) म्हणजे घरातील लहानग्यांसाठी आनंदाची आणि कुतूहलाची एक पर्वणीच असे. आजीभोवती गोल करत काहीजण मांडी घालून तर काहीजण दोन पायावर बसून एकटक अथपासून इतिपर्यंत सर्वकाही पाहत असत. पहिल्यांदा आजी चुलीतली थोडी राख बशीत घ्यायची. मग कंदिलाच्या खालच्या भागात रॉकेल भरण्यासाठी गोलाकार डब्यासारख्या असलेल्या टाकीला दोन पायाने अलगदपणे पकडायची. एका हाताची चार बोटं कंदिलाच्या दोन खांबांच्या वरच्या टोकाला जोडणाऱ्या तारेच्या कडीला आणि त्याच हाताचा अंगठा कंदिलाच्या झाकणाच्या गोल कडीत अडकवून थोडा वर ओढायची. मग तारांच्या सांगाड्यात सुरक्षित अशी वर निमूळती व खाली डेरेदार असलेली कंदिलाची काच दुसऱ्या हाताने हळूच बाजूला घ्यायची. बशीतली राख काचेत टाकून आजी किंचित ओल्या कपडाने आतून बाहेरून काच स्वच्छ करायची. मग पुन्हा जशी होती तशी काच बसवायची आणि आवश्यकतेनुसार नरसाळ्याने कंदिलाच्या टाकीत रॉकेल भरायची. नंतर कंदिलाची वात पेटवली जायची. ही वात पेटविताना काचेचा भाग थोडासा वर उचलावा लागत असे. यासाठी एक खटका असे. तो थोडासा दाबला की काचेसहित सांगाडा थोडा उचलला जायचा. मग वात पेटवली जायची. खटका पुन्हा खाली पूर्ववत केला की मंदपणे प्रकाश काचेतून बाहेर पसरत जायचा आणि घर हळूहळू प्रकाशत जायचं.
या कंदिलाची वात खाली - वर करण्यासाठी कंदिलाच्या टाकीला तारेचे जे एक गोल चाक असायचे ते पुढे मागे फिरवले की वात हवी तेवढी वर-खाली घेता येत असे. हे चाक म्हणजे आम्हां घरातल्या लहानग्यांचे खास आकर्षण असे. घरातील मोठ्यांचा डोळा चुकवून कोणीतरी हमखास एकदा का होईना ते चाक फिरवण्याचा आनंद लुटत असे. मात्र हे करताना एखादवेळी कंदील भडकला किंवा विझला तर मग आजीचा ओरडाही खावा लागत असे. बाकी काहीही असो आजी ज्या पद्धतीने कंदील लावायची तसा आपण एकदा तरी कंदील लावायचाचं याची घरात चढाओढ सुरु असायची. मग कधीतरी आजीच्या कडक निरीक्षणात अशी संधी एकेकाला मिळायची. सांजवेळची ही गंम्मत आठवली की आजही कंदिलाच्या प्रकाशापेक्षा तो लावण्यात मिळणारा आनंद कितीतरी पटीने अधिक तेजस्वी होता हे जाणवतं.
घरात कंदील असणं हे एकेकाळी समृद्धीचं लक्षण मानले जात असे. म्हटली तर नाजूक म्हटली तर मजबूत असणारी ही देखणी वस्तू ग्रामीण लोकजीवनाला रात्रीच्या अंधारात प्रकाश देण्याचं मौलिक काम करत असे. माजघरात एका लाकडी खुंटीला अडकवलेला हा कंदिलंच तेव्हा प्रकाशाचा एकमेव स्रोत होता. एकदा कंदील प्रकाशमान झाला की मग पुढची सारी कामं सुराला लागायची. कंदिलाच्या काचेतून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाने घरात प्रसन्नता व चैतन्य पसरत असे. घराचा कानाकोपरा उजळून टाकणारा हा कंदील घराला घरपण बहाल करत असे.
कंदिलाचा प्रकाश हे अग्नीचेच एक रुप होय. अग्नीचा शोध म्हणजे मानवी जीवनाच्या प्रगतीतील एक क्रांतिकारी क्षण होय. इथपासूनच मानवाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला एक नवी दिशा प्राप्त झाली असे म्हणता येईल. या अग्नितून प्रकाश आणि ऊर्जा देखील उत्पन्न केली गेली. अग्नितून निर्माण झालेल्या प्रकाशरुपाचे एक सुंदर व सुरक्षित माध्यम म्हणजे हा कंदील होय. कंदील हे रात्रीच्या अंधारात प्रकाश किंवा उजेड देणारे मानवनिर्मित साधन आहे. सर्वप्रथम रात्रीच्यावेळी गुहेत पडणारा अंधार नाहीसा करण्यासाठी मानवाने या प्रकाशरुपी अग्नीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी उजेडासाठी जळते लाकूड किंवा लाकडाचा ओंडका वापरला जात होता. मात्र यामध्ये प्रकाशाबरोबर उष्णताही निर्माण होत असे. मात्र मानवाला उष्णतेशिवाय प्रकाश हवा होता. या गरजेतूनच पुढे मानवाला दिवा गवसला. हाच दिवा नंतरच्या काळात अनेकविविध रूपात रात्रीच्या अंधाराबरोबच मानवी जीवनही उजळीत गेलेला दिसतो.
पुराणाश्मयुगकालीन इ. स. पूर्व सुमारे सत्तर हजार वर्षांपूर्वी मानवाला दिव्याचा शोध लागला असे मानले जाते. दगडाच्या खोलगट भागात प्राण्याची चरबी व त्यात शेवाळ वा तत्सम भिजणारा पदार्थ वातीसारखा ठेऊन तो दिवा पेटवला जात असे. असा पुराणाश्मयुगातील एक ओबड- धोबड दिवा ‘लमूस्ट्ये‘ येथे १९२८ मध्ये सापडला आहे. पुढे कृषीसंस्कृतीच्या काळात या दिव्यांच्या रुप व आकारात गरज व उपलब्धतेनुसार नवेपण येत गेले. दगडाच्याऐवजी मग शिंपला, माती किंवा काशा असे पदार्थ वापरून असे दिवे निर्माण होऊ लागले. चरबी ऐवजी तेल व तूप हे पदार्थ इंधन म्हणून वापरले जाऊ लागले. पुढे खनिजांचा शोध लागल्यानंतर दिव्याचे हे रुप आणखीच बदलत गेले.
रोमन संस्कृतीत पुरातन काळापासून दिव्यांचा वापर होत होता. कंदील या दिव्याचा वापर सर्वप्रथम रोमन संस्कृतीत झालेला आढळतो. सोळाव्या शतकाच्या सुरवातीस युरोपात कंदील वापरला जात होता. पुढे अठराव्या शतकात कंदिलाचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला. १८५० च्या दरम्यान जेम्स यंग यांनी दगडी कोळश्याच्या उर्ध्वपातनाने काढलेले केरोसीन सदृश्य तेल वापरणारे दिव्यांचे प्रकार युरोपात प्रचलित होते. पुढे १८५९ मध्ये एडविंन एल. ट्रेक यांनी केरोसीनचा शोध लावला. तेव्हापासून कंदिलाचा वापर अधिक लोकप्रिय झाला. यानंतरच्या काळात पुढे कंदिलाचा वापर जगभर वाढत गेला.
भारतीयांना अग्नी व प्रकाशाचे ज्ञान पुरातन व प्राचीन काळापासूनच असल्याचे दिसते. यज्ञकुंडाच्या रूपाने अग्नी व प्रकाशाचा वापर ऋषीमुनीजन करत असल्याचे पुरावे सांगितले जातात. भृगू राजाने अग्नीचा शोध लावला असे ऋग्वेदात सांगितले आहे. रामायण, महाभारत काळात तर सोन्याचे किंवा रत्नाचे दिवे वापरल्याचे वर्णन आढळते. मोहेंजेदडो येथे उत्खननात इ. स. पूर्व ३७००-३५००० या काळात वापरात असलेले मातीचे उंच खांबावर टांगण्याचे दिवे व त्यांचे खांबही सापडले आहेत. मध्ययुगीन काळातही दिव्यांचे वेगवेगळे प्रकार वापरत असल्याचे आढळते. सोळाव्या व सतराव्या शतकात दक्षिण भारतात पितळ व कासे यांचे नक्षीचे दिवे वापरले जात होते. उत्तर भारतात मोगलकाळात पितळी दिवे वापरल्याचे उल्लेख आढळतात. अशा प्रकारे पुराणाश्मयुगात जळत्या लाकडापासून सुरु झालेला हा दिवा नंतर अश्मयुग, प्राचीन, अर्वाचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात चूड, टेंभा, मशाल, काकडा, पणती, दिवटी, पोत, निरांजन, समई, लामणदिवा, आकाशदिवा अशा वेगवेगळ्या रूपात प्रकाशू लागला. यंत्रयुगात वेगवेगळ्या वस्तूंचे शोध व निर्मिती होऊ लागली. त्यामुळे दिव्यांचे रुप व आकाराबरोबरच त्यातील इंधनही काळानुरूप बदलत गेले. केरोसिनचा शोध लागल्यानंतर भारतात चिमणी आणि कंदील यांचा वापर वाढत गेला. दोन लाकडी पट्ट्याच्या खाचेत काच बसवून त्यात दिवा ठेऊन कंदील सदृश्य वस्तू भारतात प्रारंभी वापरली जात होती. मात्र यंत्रयुगात केरोसीन व कंदिलाची निर्मिती झाल्यापासून पुढे कंदिलाचा वापर वाढत गेला.
महाराष्ट्रीय ग्रामसंस्कृतीला वैभवप्राप्त करून देण्यात कंदिलाचे मोठे योगदान आहे. कंदिलाच्या प्रकाशाने घर, ओसरी, अंगण तर उजळून निघायचेच पण प्रवासात आणि इतर कामातही कंदील सदैव सोबत असायचा. कंदिलाच्या विशिष्ट रचनेमुळे वादळ, वारा, पाऊस यामध्ये देखील कंदील आपले काम चोख बजावत असे. एकदा का त्याची कडी हातात धरली की तो कितीही दूरवर घेऊन जाता येत असे. बैलगाडीच्या धुरीला कंदील अडकवून देखील कित्येक वेळा त्याकाळी रात्रीचा प्रवास केला जात होता. रानातील वस्तीला तर कंदिलाची सदैव संगत असायची. रात्रीच्या वेळी शेतातील मशागतीची व सुगीची अनेक कामे कंदिलाशिवाय पूर्ण होत नसत. जनावरांचा चारा- पाणी, पिकांना खत - पाणी, काढणी, कापणी, खुडणी या कामात उजेडाबरोबरच विचू, काटा आणि लांबड्यापासून संरक्षण करण्यात कंदिलाची भूमिका महत्त्वाची असायची. खळ्याच्या काळात तर कंदील सदैवच साथीला असायचा.
सांजंच्या वेळी कंदील ओसरीला किंवा माजघरात लावला की रात्रीची सगळी कामे सुरु व्हायची. स्वयंपाकांसाठी कंदिलाऐवजी एक पत्र्याचा दिवा असायचा त्यास चिमणी म्हटले जायचे. कंदिलाच्या जोडीला घरात अशा एक दोन चिमण्या हमखास असायच्याच. त्या रॉकेलवर पेटायच्या. खरं तर अशा रॉकेलच्या चिमण्या एखाद्या काचेच्या बाटलीला किंवा पत्र्याच्या वा प्लास्टिकच्या डब्याच्या झाकणाला मधोमध छिद्र पाडून त्यात एक कापसाची किंवा कपडाची वात लावली की तयार व्हायच्या. खटल्याच्या किंवा मोठ्या असामीच्या घरात मात्र दोन- तीन कंदील असायचे. महत्त्वाच्या कामाला कंदील तर बाकी कामासाठी अशा चिमण्या असायच्या.
शाळेतील मुलांचा गुहपाठ, रात्रीचं जेवण, गप्पाचा फड मात्र कंदिलाशिवाय रंगायचा नाही. बुजुर्गांची संस्कार शिदोरी तर कंदिलाच्या प्रकाशात अधिकच स्वादिष्ट लागायची. कंदिलाच्या साक्षीनेच रात्री उशिरापर्यंत आजी आजोबांच्या कथाही ऐकल्या जायच्या. मंदिरातील पोथी, पारायण , कीर्तन व भजन असो वा करमणूकीच्या निमित्ताने गावात वा पंचक्रोशीत आलेले नाटक, तमाशा असो कंदिलच सर्वाना वाट दाखवत असे. अडीनडीच्या काळात वा काही विशेष निमित्ताने शेजारी पाजारी कंदिलासह केरोसीनचीही देवाणघेवाण होत असे. दसरा व दिवाळीच्या सणाला कंदिलाची खरेदी केली जात असे. मुलीच्या लग्नातही रुखवतावर कंदील हमखास दिला जायचा. पंचाची मिटिंग असो वा पंचमीचा फेर असो कंदील नेहमी सर्वांनाच खंबीरपणे साथ द्यायचा. एवढंच नव्हे तर पहाटे पहाटे झाडावर बसून भविष्य कथन करणारा लोकसंस्कृतीचा उपासक पिंगळा देखील कंदील सोबत घेऊनच फिरत असे. एकूणच कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक वा अध्यात्मिक जीवनाला समृद्धीचा प्रकाश देणारा कंदील हा ग्रामीण आणि कृषी संस्कृतीतील एक संपन्न आणि वैभवशाली घटक म्हणून गणला जात होता. अंधाराला डोळं आणि रात्रीला दिवस दाखवणारा हा कंदील तत्कालीन ग्रामीण लोकजीवनाचा खरा खास आधारचं होता.
विसाव्या शतकात झालेल्या विविध क्रांत्या आणि औद्योगीकिकरण यामुळे लोकजीवन कमालीचे बदलले गेले. वेगवेगळ्या मार्गाने विजेची निर्मिती होत गेली. अणुऊर्जा, औष्णिक ऊर्जा, जलविद्युत या मानवनिर्मित ऊर्जास्रोतांसह पवनऊर्जा, सौरऊर्जा असे पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्माण झाले. त्यामुळे ग्राम व कृषीजीवन पूर्णतः बदलून गेले. आज सर्वत्र विजेचे दिवे लखलखताना दिसतात. काही काळ वीज गेल्यावर हे विजेचे दिवे विझायचे आणि थोडा वेळ का होईना पण प्रकाशाची जागा पुन्हा कंदील घ्यायचा. पुन्हा सर्व स्मृति नव्याने जाग्या व्हायच्या. आजकाल मात्र वीजही फार काळ जात नाही. अशातच सौरदिवे रात्रीचे प्रकाशतात आणि जनरेटर नावाचे जे यंत्र आले आहे, त्यामुळे विजेचे दिवेही विझत नाहीत. यामुळे कंदिलाचा मंद सतेज उजेड आता अनुभवताच येत नाही.
कित्येक शतके असंख्य पिढ्यांना प्रगतीची व समृद्धीची वाट दाखविणारा, अंधारात चाचपडणाऱ्या कित्येकांना आत्मविश्वासरुपी उजेड देणारा, संकटात वा काट्याकुट्यात फसलेल्यांना नेमकी वाट दाखविणारा, घर शांत झोपल्यावर सासुरवासीनींना माहेरचं पत्र वाचून दाखविणारा, अनेक विद्यार्थ्यांचा ज्ञानमार्ग प्रकाशित करणारा, कष्टाने जमवलेली पै न पै मोजणाऱ्यांचा आनंद उजळून टाकणारा हा कंदील मात्र आज स्वतःच दिसेनासा झाला आहे. घराघरात समृद्धीचं चांदणं पेरणारा कंदील आज कुठेतरी अडगळीच्या गडद अंधारात लुप्त झालाय. स्वतःच्या प्रकाशानं अवघे घर शिवार लख्ख करणारा कंदील आज आधुनिकतेच्या अंधारी प्रवाहात गडप झाला आहे.
एकेकाळची घराला लख्ख करणारी ही वस्तू आज अंधाऱ्या जागेत खितपत पडलेली आहे. एक काळी ज्याचे तेज, देखणेपण, सुदंरता घराचे वैभव मानले जायचे; तो कंदील आज निस्तेज व अस्ताव्यस्त स्थितीत अडगळीत पडलेला आहे. ज्याच्या अस्तित्वाने घराघरात समृद्धी फुलली तो समृद्धीचा वारसा आज कोमेजून गेला आहे. आज नव्या रूपात विजेचे इंधन लेऊन कंदील जरी दिवाणखान्यात वा माजघरात चकाकत असला; तऱी तो केवळ उजेड देतोय त्यातले चैतन्य मात्र हरवलेले आहे.
गेली कित्येक शतकं ग्रामीण लोकजीवनाला प्रकाशित करणारा हा लोकसंस्कृतीचा समृद्ध वारसा आधुनिकतेच्या भौतिक प्रकाशाच्या अंधारात अदृष्य होत आहे. मानवाच्या प्रगतीच्या या पाऊलखुणा पुसल्या जात आहेत. हे असेच राहिले तर पुढच्या कित्येक पिढ्यांना हा वैभवशाली वारसा आधुनिकतेचा कितीही लख्ख प्रकाश असला तऱी दिसणार नाही. गेली कित्येक शतके मानवी जीवनाला उजळीत करणारा हा प्रकाशवारसा जर आज जपला गेला नाही तर माहिती आणि तंत्रज्ञान युगाच्या नंतरही पुढील कित्येक पिढ्यांचे जीवन अंधारमय होण्याची भीती वाटतेय. म्हणूनच समग्र मानवी जीवन समृद्ध करणारी अडगळीत पडलेली ही समृद्धी डोळ्याआड होऊ नये एवढीच अपेक्षा!
डॉ.अशोक नामदेव शिंदे
(मोबाईल - 9860850344)
प्राध्यापक, मराठी विभाग,
मुधोजी महाविद्यालय, फलटण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा