शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र. 3 - माळा

 माळा 

            पहाट जसजशी उजळत जाई, तसतसा सोनमाळाकडचा आवाज वाढतंच जायचा. हा ss, हा sss! हुर्रर्र ss, हुर्रर्रर्र sss! लांडी बघ ss लांडी बघ sss! असा एकच गलका तिकडं चालू असायचा. अधून मधून गोफणीचाही आवाज यायचा. ऐन थंडीच्या दिवसात एका विशिष्ट लयीत जेवढा जोरात आवाज काढता येईल तेवढा काढला जायचा. अगदी पहाटे पासूनच ही मंडळी सोनमाळाकडं निघायची. नदी ओलांडून सौंदर ओढ्यातून पुढं पांदीला लागलं की पलीकडंच्या चढावर सपाट सोनमाळ लागायचं. तांबडी, काळी माती असलेलं चांगलं तीन - चार नंबराचं हे शिवार होतं. त्यामुळे दोन्ही हंगामातील पिकं इथं घेतली जायची. गावातल्या तीन चार बड्या असामींच्या सुग्याही याच माळावर लागायच्या. 

            पावसाळ्यात बाजरी,  हुलगा, मूग, मटकी अशी खरिपाची पिकं याच मळ्यात घेतली जायची. तर रब्बीच्या हंगामात गरजेपुरता गहू, हरबरा आणि साऱ्या सोनमाळावर ज्वारीच अधिक पेरली जात असे. ज्वारीच्या मध्ये मध्ये काही करडईचे तर काही जवसाचे पाटेही पेरले जात असत. त्यामुळे राखणीच्या दिवसात सोनमाळावर दरवर्षी सात - आठ ‘माळं’ हमखास उभा राहायचे. उजाडू लागताच या माळ्यांवर उभा राहून मोठमोठ्यानं आरोळ्या देत पाखरं राखणीचं काम जोरजोरानं चालू असायचं. पिकाची राखण तशी दिवसभर चालूच असायची; पण सकाळ -  संध्याकाळच्या वेळी राखणीचा आवाज अधिकच वाढायचा. माळ्यावर उभा राहून राखण करायलाही खूपच मज्जा यायची. सुगीच्या दिवसात वडील जेंव्हा चाव्हराच्या मळ्यात खोती घ्यायचे तेंव्हा माळ्यावर उभा राहून गोफण फिरवायचा आनंद आम्हीही खूप वेळा घेतलाय.

            ज्वारी पोठऱ्यात येऊ लागली की शिवारात माळा बांधायची लगबग सुरु होत असे. एका वेळी दोघं तिघं बसतील किंवा उभा राहतील असा दणकट बैलगाडीच्या साटीच्या आकाराचा हा माळा बांधला जात असे. जेथून सर्व शिवार सहज पणे नजरेखाली येईल अशी शिवारातील उंच किंवा चढाची जागा माळ्यासाठी निवडली जायची. शक्यतो एखाद्या मोठ्या झाडाजवळ जर अशी जागा मिळाली तर ती अधिक सोयीची मानली जात असे. कारण त्या झाडावरची पाखरं सहज हाकलता यायची आणि दिवसभर माळ्यावर सावलीही राहायची.

            माळ्यासाठी बाभूळ, लिंब किंवा कोणत्याही चिवट झाडाची आठ दहा दणकट लाकडं जमा केली जात असत. सुरुवातीला सहा सात फूट लांबीची चार मोठी लाकडं मेढीसारखी जमिनीत रोवली जायची. नंतर या मेढींच्या वरच्या टोकाला मांडीसारखे चार आडवे वासे काथ्या किंवा सुताच्या दोरीने घट्ट  बांधले जात. हे वासे मेढीच्या दुबाळक्यात किंवा ज्या ठिकाणी उभ्या लाकडाला आडवा खण आहे अशा ठिकाणी बांधले जायचे. ते खाली निसरू नयेत म्हणून ज्या ठिकाणी ते बांधले जायचे तिथे मेढीवर कुऱ्हाडीने खाच पाडली जात असे. 

            अशा रितीने माळ्याचा सांगाडा उभा झाला की, वरच्या चार आडव्या वास्यांवर मग आडवी उभी लाकडं किंवा बाभळीचा साळा अंथरला जायचा. त्यावर बाजरीचं सरमाड किंवा वैरणीच्या पेंढ्या अंथरून खालच्या लाकडातून ओवून त्या काथ्याने घट्ट आवळल्या जायच्या. माळा डळमळू नये म्हणून चारही मेढींना आधारासाठी तिरकी लाकडे उभी केली जात असत. या माळ्यावर सहजपणे चढता उतरता यावे म्हणून छोटीशी सीडीदेखील केली जात असे. अशा रितीने एकदा माळा बांधला की शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडत असे. पिकाच्या राखणीचं मोलाचं काम हा माळा करत असे. माळ्यावर उभा राहून राखण करणे ही पिक राखणीची अत्यंत प्राचीन पारंपरिक पद्धत असल्याने शिवारात सुगीच्या काळात सर्वत्र असे माळे उभा केलेले दिसत असत. 

            शेतीसाठी माळा किंवा मचान ही पिकं राखण्याची पद्धत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. भारतासह जगभरात शेतजमिनीचे संरक्षण करण्यासाठी या पद्धतीचा  उपयोग केला गेला आहे. वैदिक काळात भातशेती, गहू, ज्वारी, बाजरी यांसारखी पिके घेतली जात होती. या पिकांवर पशुपक्ष्यांचा मोठा उपद्रव होत असे. पशुपक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी या काळात “मचान” हा प्रकार प्रथम उदयास आला. लाकडी ओंडके व बांबू वापरून एक उंच व्यासपीठ उभारले जाई, जिथे एक व्यक्ती बसून पिकांची राखण करीत असे. प्रामुख्याने दक्षिण भारतात आणि गंगा-यमुना खोऱ्यात या प्रकारचा वापर त्याकाळी अधिक प्रमाणात होत होता.

              महाजनपद व मौर्यकाळात शेती अधिक सुव्यवस्थित झाली. तसेच या काळात सिंचन व्यवस्थेतही सुधारणा झाली. मौर्य सम्राट अशोकाच्या काळात तर मोठ्या शेतजमिनींवर मचानासारखी वास्तू उभारली जात असे, यासाठी ‘रक्षापद’ या शासकीय पदाची निर्मिती केली गेली होती. या माध्यमातून माळी किंवा राखणदार या व्यक्ती शेताची निगराणी करत असत. म्हणूनच राखणदार किंवा माळी ज्या मचानावर उभा राहायचा त्यास ‘माळा‘ असे म्हटले जाऊ लागले असावे. पुढे गुप्त व उत्तरगुप्त काळात विकसित शेतीसाठी विविध पारंपरिक तंत्रांचा स्वीकार केला गेला. या काळात उंचावर मचान उभारून तिथे लाकडी घंटा किंवा मोठा आवाज करणारी उपकरणे ठेवली जाऊ लागली. याच काळात नदी काठच्या शेतीसाठी उंच उंच माळे उभारण्याला प्रारंभ झाला होता.

               मध्ययुगात राखण पद्धती आणखीचं विकसित झाली. या काळात मोठमोठे जमीनदार आपल्या शेतजमिनींसाठी राखणदार नेमू लागले. या काळात बांबू, लाकूड आणि गवताचा उपयोग करून मजबूत माळे बांधले जात असत. काही ठिकाणी मोठ्या शिवारात एकापेक्षा जास्त माळे उभारून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी शिट्या किंवा ढोल-ताश्यांचा वापर केला जात असे. पुढे ब्रिटिश काळात पारंपरिक शेती बरोबरच नवीन तंत्रज्ञानयुक्त शेती करण्यात येऊ लागली. खास करून ऊस, तंबाखू, कापूस या बागायती पिकांसाठी मोठ्या जमिनींवर लाकडी माळे उभारले जात असत. स्वातंत्र्योत्तर काळ तथा आधुनिक युगामध्ये तांत्रिक प्रगतीमुळे पिक संरक्षणासाठी नवीन उपाय आले. विजेचे कुंपण, ट्रॅप कॅमेरे आणि यांत्रिक अलार्म यांचा वापर होऊ लागलेला दिसतो. 

            महाराष्ट्रात  पारंपरिक पद्धतीनेचं शेतीची राखण केली जात असे. काळाबरोबर इथल्या राखण पद्धतीतही बदल होत गेलेला दिसतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ ही मुख्य अन्नधान्याची पिके केली जातात. कोकण वगळता इतर भागात अन्नधान्य म्हूणन प्रामुख्याने ज्वारीचेच पिक अधिक प्रमाणात काढले जाते. ज्वारी हेच महाराष्ट्राचे मुख्य पिक मानले जाते. ज्वारीची भाकरी हेच इथल्या लोकांचे प्रमुख अन्न आहे. ज्वारीला पोषक बागायती आणि जिरायती जमीन, अनुकूल नैसर्गिक वातावरण आणि योग्य बाजारपेठ या घटकांची उपलब्धता असल्यामुळे महाराष्ट्रात ज्वारीचे मुबलक उत्पादन मिळत असे. त्यामुळे महाराष्ट्रात कोकण व्यतिरिक्त उर्वरित सर्वच भागातील सर्वच गावांमध्ये ज्वारी हे पिक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. मात्र महाराष्ट्रात ऊस, भूईमूग व कापूस ही नगदी पिकेही माफक प्रमाणात पिकविली जात होती. एकूणच या काळात शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले जात नव्हते. 

            एक काळ असा होता की गावाच्या सर्व शिवारात सुगीच्या दिवसात ज्वारीच्या राखणीचा एकच हंगामा चालयचा. रब्बीच्या हंगामात ज्वारीच्या शिवारातच माळे असायचे. इतर पिकांवर सहसा पाखरं बसत नसत. दाणे चिकात येण्याच्या सुमारास चिमणी, मैना अशा लहान अंगकाठीची तथा बारीक चोचीची पाखरं दाणे चाखण्यासाठी वा टिपण्यासाठी कणसांवर बसत असत. करडीच्या बोडांवर मात्र करकोचा किंवा लांब चोचीचे पक्षी ताव मारत असत. सकाळ, सायंकाळ तथा शिरवाळाच्या वेळी पाखराची जास्त वर्दळ असे. दुपारच्या पहारी मात्र उन्हं अन् उजेड असल्यामुळे या वेळी पाखरं पिकावर फारशी येत नसत. पाखरांपासून पिकाचं राखण करायचे म्हणजे पाखरं जीव मारायची असा या राखणीचा उद्देश नसायचा. पाखरांनी चिकात आलेले किंवा हुरड्यात आलेले सर्वच दाणे खाल्ले तर उत्पादन कमी होईल असा विचार असल्याने केवळ आरडून ओरडून वा गोफणीच्या माध्यमातून आवाज काढून पाखरांना घाबरवायचे काम केले जायचे. गोफणीच्या माध्यमातून कधी बारीक खडे वा एकदा कच्चा ढेकूळ फेकला जायचा. गोफणीचा आवाज अन् त्यातून फिस्करल्या जाणाऱ्या बारीक खड्यांच्या आवाजामुळे पाखरं दूर उडून जायची. असं असलं तरी राखणीच्या काळात पिकाचे अनेक वेळा नुकसानही ही पाखरं करायची. अशा  पाखरांपासून पिकाचे राखण करायला माळा खूप उपयोगी पडायचा. 

                  त्याकाळी माळा म्हणजे मळ्याचं वैभवच समजलं जायचं. शेतकऱ्याच्या शेतात समृद्धीचं दान देण्यात या पुरुषभर उंचीच्या माळ्याचं मौलिक योगदान होतं. माळा म्हणजे त्या शिवरातलं शेतकऱ्याचं एक छोटंस घरटंच असायचं. सुगीच्या वेळी माळ्याच्या जवळपास एखादी खोप केली जायची. त्यामध्ये थंडगार पाण्याची घागर, दुपारी जेवण वा थोडीशी वामकुक्षी घेण्यासाठी एखादी घोंगडी वा चादर असायची. अगदी दानं भरण्याच्या सुमारास तर वस्तीपासून दूर असलेल्या शिवारात राखणकऱ्यांचा मुक्कामच असायचा. 

                 सगळीकडे ज्वारीचं पिकं असल्यामुळे मोठ्या शिवारात आजूबाजूला  चार - पाच तरी माळे असायचेच. राखण करता करता माळ्यावरूनच एकमेकांबरोबर गप्पा मारल्या जात असत. प्रत्येक जण जरी आपले शेत राखत असला तरी त्यांच्या आरडण्या ओरडण्याने किंवा गोफणीच्या आवाजाने शेजारच्या पिकाचेही राखण घडायचं. कधी सकाळची न्याहरीही माळ्यावरच व्हायची. अशावेळी कारभारनिशी सुगीसंबंधाच्या किंवा इतर गुजगप्पा रंगायच्या.  सुट्टीच्या दिवशी घरातल्या लहानांच्या पलटनी शिवरातच घुसायच्या. माळ्यावर उभा राहून राखणीचं कामं त्यांच्यासाठी अप्रूपच असायचं. त्यांच्या बारीक कोवळ्या हाकारीनं देखील सारं शिवार गजबजून जायचं. शाळेचा गृहपाठ देखील कधी कधी माळ्यावरचं रेखाटला जायचा. चार भिंतीच्या वर्गातून मिळणाऱ्या पुस्तकी ज्ञानापेक्षा चरचराचं सर्व ज्ञान या चार पायाच्या माळ्यावर बसून त्यांना अगदी सहजपणे मिळायचं. दुपारी जेवणाच्या निमित्ताने सर्व मळेकरी एकत्र येऊन माळ्या भोवती गोल पंगत धरत असत. त्यातून पिक पाण्याच्या, सुख - दुःखाच्या गप्पांचा फड रंगत असे.

            राखणीचा काळ साधारण महिनाभर चालायचा. त्यामुळे या काळातील सगळी कामे माळ्याभोवतीच असायची. सकाळ, रात्रीची शकोटी असो वा हरभऱ्यांची आगटी असो ती माळ्याजवळच पेटवली जायची. मित्र मंडळी, पाहुणे- रावळे वा सोयरे - धायरे यांच्या मैफली सजविणारी हुरडा पार्टीही रंगायची ती या माळ्याजवळच. दुपारच्या वेळी वाळकं, काकडी, खरबूज, शेंदाडं यांचा मनसोक्त आस्वादही माळ्यावरच घेतला जायचा. कणसाचे बेढे होऊन खळं तयार होईपर्यंत शिवारातील सर्व कामाच्या तजविजी चालायच्या त्या या माळ्यापासूनच. त्यामुळे माळा हे त्याकाळी सुगीच्या हंगामातील नियोजनाचं एक मुख्य केंद्रचं बनलेलं असायचे. ज्वारी पोठऱ्यात आल्यापासून ते काढणी, खुडणी आणि खळ्याचे सर्व सोपस्कार पूर्ण होऊन धान्याची रास सजेपर्यंतच्या शेतातील सर्व घडामोडींचा एकमेव साक्षीदार म्हणजे हा माळा असायचा. असा हा समुद्धीचा साक्षीदार आज मात्र आधुनिक कृषी विकासाच्या युगात अंधार कोठडीत पडलेला दिसत आहे. 

            स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात अनेक सिंचन प्रकल्प उभारले गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू जमिनी पाण्याखाली आल्या.  शिवाय याच काळात अगदी कमी प्रमाणात सुरु असलेली खाजगी साखर कारखानदारी सहकारात परावर्तीत झाली. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने उभे राहिले. हरित क्रांतीच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान युक्त नवनवीन साधने, उपकरणे, रसायनिक खतांची निर्मिती व उपलब्धता, संकरीत बियाणे, नव्या पिक पद्धती, बाजारपेठांची निर्मिती, कृषी मालाची आयात - निर्यात यामुळे शेतीतून शेतमाला शिवाय इतर आर्थिक स्रोत उत्पन्न होऊ लागले. याच काळात शेतीविषयक सरकारी धोरणे, सहकारी बँका व सोसायट्यांची निर्मिती, कर्ज उपलब्धता यामुळे पारंपरिक शेतीचे पूर्णत: बाजारीकरण झाले. अशातच ट्रॅक्टर वा तत्सम साधनांनी जमीनीचे सहजपणे सपाटीकरण होऊ लागले. आधुनिक सिंचन पद्धतीमुळे तर बहुतांश कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली आले ; आणि महाराष्ट्राचे प्रमुख पिक असलेल्या ज्वारीच्या शेतांत हळूहळू ऊस, कापूस, कांदा, भुईमूग अशा हातात पैसा खेळवणाऱ्या पिकांनी दाटी होऊ लागली. विशेषतः ऊसपिकाचे मळे आज सर्वत्रच फुललेले दिसत आहेत. 

              त्यामुळे आज कमी पर्जन्य छायेचा किंवा पुरेशा सिंचन सुविधा उपलब्ध नसलेला, डोंगराळ तथा माळरानाचं काही क्षेत्र सोडलं तर महाराष्ट्राच्य अनेक भागातून ज्वारीचं पिकं हद्दपार झालेलं दिसत आहे. परिणामी माळ्यावर उभा राहून गोफण फिरवण्याचा आनंद आज हिरवला गेला आहे. शेतातील पिकं तर बदलली आहेतच; शिवाय संकरीत बियाणे आणि पिकाची कणसं पाखरांना खाताच येणार नाहीत असं नवीन संशोधित वाण यामुळे राखणीचं काम खूप सोपं झालं आहे. फटाके, वेगवेगळा आवाज काढणारी स्वयंचलित यंत्रे यामुळे आज जिथं ज्वारी पिकतेय तिथे आज माळा बांधलाच जात नाही. संकरीत वाणांच्या निर्मितीमुळे दाण्यातील सकसता व पोषकता लोप पावली असल्याने पाखरंही आता पाहिल्यासारखे पिकाकडे फिरकत नाहीत. मळ्यात पाखरांची   चैतन्यदायी किलबिल आज ऐकूच येत नाही. शिवारात फिरताना हिरवपण असूनही सर्वत्र उदासीनताच भरून येते आहे. माळा नसल्यानं मळ्याचं सत्त्वच आज हरवल्यासारखं झालं आहे. 

             सुगीचं कामं आटोपलं की जवळच्या झाडाखाली माळ्याची लाकडं जनावरांच्या गव्हाणीला वापरली जायची. आयत्या वेळी पर्याय म्हणून या माळ्याच्या छोट्या लाकडाचे कुऱ्हाड वा खोऱ्यांसाठी दांडे बनवले जायचे. दणकटपणा कमी झाला तर स्वयंपाकासाठी जळणाच्या कामी माळा उपयोगी पडायचा. आता चुलीही निर्धूर झाल्या आहेत. त्यामुळे आपलं स्वतःच समग्र अस्तित्व समर्पित करून शेतकरी जीवनात वैभव फुलवणारा हा माळा आज मात्र अडगळीत कुजत पडलेला दिसत आहे. 

            आशा एकचं आहे की, अजूनही अनेक आदिवासी भागांत आणि पारंपरिक शेती करणाऱ्या लोकांमध्ये माळ्यांचा वापर काही प्रमाणात सुरू आहे. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती पुनरुज्जीवित होत असल्याने माळ्याचा पुनर्वापर वाढू लागल्याचं सुचिन्ह दिसत आहे.  शेतकरी, कष्टकरी जीवनात सुख समृद्धीची श्रीमंती फुलविणारा हा माळा पुन्हा एकदा सन्मानाने आणि दिमाखाने उभा राहावा. मळा पाखरांनी गजबजून जावा. माळ्यावरून गोफणीचा पुन्हा आवाज घुमावा. आणि शिवारात राखणीचा सोहळा पुन्हा सजावा. समृद्धीचा वसा आणि वारसा उंचावणारा हा माळा पुन्हा शिवारात दिमाखात उभा राहावा. मानवी जीवन आणि लोकसंस्कृतीला वैभवाचे दान देणारा आणि शिवाराचा मान राखणारा हा माळा पुन्हा डोलात उभा राहवा हीच अपेक्षा. प्रयत्न करूया मळ्यात माळा जपण्याचा ! 


डॉ. अशोक शिंदे,
प्राद्यापक, मराठी विभाग, 
मुधोजी कॉलेज, फलटण
मोबाईल- 9860850344


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा