रविवार, ८ जून, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र.९ बाज

 बाज 

           संध्याकाळचं जेवण झालं की लगेचचं आबांची झोपण्याची तयारी सुरु व्हायची. ओसरीच्या भिंतीला एका अंगावर टेकवून ठेवलेली उभी ’बाज‘ ते अलगदपणे खाली ओढून चार पायावर आडवी टेकवायचे. हे काम ते एकटेच आणि सहजपणे करत असत. एकदा बाज टाकून झाली की मग आबा त्यावर एक घोंगडी अंथरायचे. ज्या बाजूला डोकं करायचे आहे त्या बाजूला एक उशी ठेवायचे. पायाकडच्या बाजूला चादर किंवा गोधडी असायची. आबांची झोपायची जागा तशी ठरलेली नसायची. कधी ते आत ओसरीत झोपायचे, तर कधी बाहेर अंगणात गोठ्याजवळ. जेंव्हा त्यांना अंगणात झोपायचं असेल तेंव्हा मात्र अंगणात बाज घेऊन जाण्यासाठी ते कोणाची तरी मदत घेत असत. या कामात कित्येक वेळा मी आबांना मदत करत असे. सकाळी उठल्यानंतर आबा आपले अंथरून पांघरून उचलायचे आणि नेहमी प्रमाणे नेहमीच्या जागी बाज ठेवली जायची. कित्येक वर्षांपासून आबा ही बाज वापरत होते. लाकडी सांगाडा आणि काथ्याच्या दोरीने विनलेली ती बाज अत्यंत मजबूत आणि देखणी दिसत असे. 

           आबांनी ही बाज बयाजी नानांकडून बनवून घेतलेली होती. बयाजी नाना म्हणजे आमच्या गावातील एक प्रसिद्ध लाकडी साधने, वस्तू बनविणारा कारागीर. घर, शेती आणि इतर कामासाठी लागणाऱ्या सर्व लाकडी वस्तू नानांच बनवायचे. आबांनी शेतातील जांभळीच्या लाकडाची ही खास  स्वतःसाठी बाज बनवून घेतलेली होती. नानांनीही आपली सर्व कला - कारागिरी ओतून ही बाज तयार केलेली होती. सुबक व रेखीव आकाराचे चार पाय आणि त्या पायांमध्ये तशाच प्रकारच्या घट्ट वसवलेल्या चार बगला यामुळे आबांजी ही बाज एकदम भक्कम झाली होती. नानांनी फक्त बाजेचा हा सांगाडा बनवला होता. या बाजेचे विणकाम मात्र आबांनी स्वतःचं केलेले होते. बाज विनण्याच्या कामात आमचे आबा चांगलेच पटाईत होते. 

           आबांकडे ही कला असल्यामुळे लोक आबांकडून बाज विणून घेण्यासाठी कायम आमच्या घरी येत असत. बाजेचा आकार हा सर्वसाधारणपणे सारखाच असतो. साधारणत: चार हात लांब आणि दोन हात रुंद असा बाजेचा आकार असायचा. त्यामुळे  पूर्वतयारी म्हणून आबा त्यांना विणण्यासाठी  आवश्यक असणारा काथ्या व दावं आणून ठेवायला सांगत असत. एकदा सर्व तयारी झाली की मग आबा ज्यांची बाज विणायची आहे त्यांच्या घरी जायचे. अशावेळी मी सुद्धा अनेक वेळा त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. प्रथम आबा मोकळ्या जागी किंवा अंगणात बाजेचा सांगाडा घ्यायचे. सुरवातीला आबा बाजेच्या लांब बाजूंवर पायापासून एक दीड फूट अंतर सोडून एक दोरखंड किंवा दावं बांधायचे. बाजेच्या एका बगलेपासून हे दावं गुंडाळत दुसऱ्या बगलेला गाठ देऊन बांधले जायचे. हे करत असताना दाव्याचे दोन्ही पदर एकमेकांशी गुंडाळले जात असत. त्यामुळे या दोन पदरांना भक्कमपणा यायचा. आता हे गुंडालेले दोन्ही पदर ताणून राहावेत म्हणून या  दाव्याला मध्यभागी एका लाकडी दांडक्याने पिळकावणे दिले जायचे. या लाकडी दांडक्याचे एक टोक दाव्याच्या पिळ्यात तर दुसरे टोक बाजेच्या आडव्या रुंद बाजूच्या बगलेत अडकवले जात असे. हे काम म्हणजे बाजेच्या विणीचा महत्वाचा टप्पा होय. एकदा हा टप्पा पार पडला की आबा बाज विणण्याच्या कामाकडे वळायचे. 

             प्रत्यक्ष बाज विणायच्या आधी काथ्याचा लांबलचक दोर एका लाकडी कांडकीला गुंडाळला जायचा. शक्यतो हे काम आबा तिथे यायच्या आधीच केले जात असे. आबा काथ्याची ती गुंडाळी घेऊन विणायला सुरुवात करत. प्रथम ते काथ्याच्या दोरीचे एक टोक आधी आडव्या बांधलेल्या दाव्याच्या एका बाजूला गाठ देऊन गठ्ठ बांधायचे. त्यानंतर मग हातात काथ्याची दोरी घेऊन बाजेच्या  बांधलेल्या टोकाच्या विरुद्ध कोपऱ्याच्या दोन्ही बगलांना दोन बोटं अंतर ठेऊन गुंडाळायचे. असे करताना ते आधी उजव्या बगलेच्या वरच्या भागावरून खाली काथ्याचा पदर ओढायचे आणि खालून पुन्हा त्याच पदराच्या वरून आढा देत डाव्या लांब बगलेच्या वरच्या भागावरून खाली ओढून पुन्हा वर घेऊन त्याच पदराला आढा देत असत. अशावेळी काथ्याचा दोर बाजेच्या पायाखालून हव्या त्या बाजूला घेतला जात असे. विरुद्ध कोपऱ्यातून काथ्याचा पदर जिथून सुरुवात केली त्या बाजूच्या कोपऱ्यात याच पद्धतीने ओवला जात असे. अशा रितीने बाजेचा पाहिला वेढा पूर्ण केला जात असे. असेच एकामागोमाग एक असे चार वेढे ओवले की बाजेची चार पदराची पाहिली वीण तयार व्हायची. नंतर दोन बोटं जागा सोडून दुसरी वीण केली जायची. 

           एकदा बाजेची पाहिली वीण झाली की,  मग मात्र आबा पटपट बाकी बाज विणायचे. बाज विणताना काथ्याची गुंडाळी खालच्या खाली इकडून तिकडे फेकली वा ओढली जात असे. कधी ती गुंडाली गरगर देखील फिरत असे. माझे त्या गुंडाळीकडेच अधिक लक्ष असायचे. उजवीकडून डावीकडे अशा रितीने बाज विनली जात असे. बाज विणत असताना आबा अधून मधून काथ्याचा दोराला ताण देत असत. शेवटी ज्या बाजूने विणायला सुरुवात केली गेली होती अगदी त्याच आडव्या दोराच्या दुसऱ्या बाजूला शेवटच्या विणीतील पदर गठ्ठ गाठ देऊन आबा बांधायचे. अशा रितीने बाजेची वीण पूर्ण व्हायची. मात्र ही वीण काहींसी सैल वा ढिली असायची. बाजेवर झोपल्यावर झोल पडू नये यासाठी आबा विणेला ताण द्यायचे. हा ताण देताना ते बोटाएव्हढी जाड सुती दोरी वापरत असत. ही दोरी प्रथम पिळा दिलेल्या दोरखंडाळा बांधून जवळच्या आडव्या बगलेत ओवून पुन्हा दोरखंडात ओवली जायची अशा रितीने एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे ही दोरी ओवली जात असे. अधिक ताण यावा म्हणून आबा तीन, चार वेढ्यांनंतर पुन्हा मागचे वेढे चाळवून घेत असत. शेवटी ओढून ताणून दोरीचे शेवटचे टोक बगलेच्या दुसऱ्या बाजूला असाडी गाठ देऊन बांधले की आबाचं कामं फत्ते होत असे. शेवटी पिळक्याचं लाकडी दांडके काढून घेत आबा बाजेवर स्वतः बसत आणि बाज पक्की झाल्याची खात्री करून घेत. 

            आवश्यक तेवढं सर्व साहित्य तयार असेल तर आबा अर्ध्या - पाऊण तासातच बाज विणून पुरी करायचे. बाज विणत असताना आबांची अनेक मित्रमंडळी गप्पा टप्पा मारत असत. आबांच्या या कलेचे सर्व जण तोंड भरून कौतुक करायचे. मात्र आबांनी या कलेचा आर्थिक स्वरूपात कधीच मोबदला घेतला नाही. बाज पूर्ण विणून झाली की मग सर्वांसाठी चहापान व्हायचे. हाच आबांसाठी खूप मोठा आनंद असायचा. आजपासून आपल्या ओसरीत वा अंगणात बाज टाकली जाणार या कल्पनेने बाजंचा मालक तर लई खुश असायचा. त्याकाळी बाज हे घरातले झोपण्यासाठी वापरली जाणारे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. आपल्या ग्राम संस्कृतीत बहुउद्देशीय पारंपरिक साधन म्हणून बाजेला मानाचे स्थान आहे. अनादी काळापासून आपल्या संस्कृतीत या बाजेचे अस्तित्व असल्याचे आढळून येते. 

            प्राचीन काळातील ‘बाज’ हे पलंगासारखे परंतु काहीसे वेगळ्या रचनेचे झोपण्याचे व बसण्याचे पारंपरिक साधन होते. याचा उपयोग केवळ झोपेसाठी नव्हे, तर धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक संदर्भांतही होत असत. वैदिक व उत्तरवैदिक काळात शय्या’, ‘आसन’, ‘पर्वतिका’ अशा संज्ञांचा उल्लेख वेद व ब्राह्मण ग्रंथांमध्ये आढळतो. झोपण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये लाकूड, काठी व दोऱ्यांनी तयार केलेली चौकट होती. तीच पुढे बाज म्हणून ओळखली जाऊ लागली असावी. याच काळात एक प्रकारचे उच्च शय्यासन‘ राजांकडे व ऋषी-मुनींकडे असायचे. बौद्ध-जैन कालखंडातील बौद्ध ग्रंथांमध्ये ’काठकं मंच‘ (लाकडी पलंग), ’पल्लङ्कं‘ (बाज) असे उल्लेख आहेत. याच काळात बाजेसदृश्य अशा लाकडी चौकट, दोरी व चटईसदृश झोपण्याची साधने वापरली जात होती. जैन साधूंच्या नियमांमध्येही अत्यंत साधी बाज वापरण्याचे संकेत दिले गेले होते. गुप्तकाळात दरबारांमध्ये  शाही मंडळींत ‘सुशोभित बाज’ वापरली जात असे. याकाळात काष्ठहस्तिदंत  सुवर्ण अलंकारांनी सजवलेली बाज राजांमध्ये प्रतिष्ठेचे मानलली जात असे. सामान्य लोक मात्र साध्या लाकडी चौकटीची म्हणजेच दोऱ्यांनी विणलेले बाज वापरत असत. 

           मध्ययुगीन काळात बाज हे साधन केवळ झोपण्यापुरते मर्यादित नव्हते. याकाळात  संत मंडळी बाजेचा उपयोग प्रवचन, भजन, बैठक अशा पारमार्थिक कार्यासाठी करत असत. याच काळात गावोगावी लाकूड व दोऱ्यांपासून स्थानिक कारागीर बाज तयार करीत. बाजेचे वैभवशाली रूप मोगल दरबारात आढळते. जडजवाहीर लावलेली  दिवाणखाना बाज मोगल कालखंडडात अस्तित्वात होती. याच मराठा सम्राज्यात किल्ल्यांमध्ये व वाड्यांमधील दरबारात व खासदारांच्या खोलीत बाज ठेवली जात असे. ब्रिटिशकाळात इंग्रजांच्या आगमनानंतर लोखंडी पलंग आले, पण ग्रामीण व मध्यमवर्गात पारंपरिक बाज टिकून राहिलेली होती.

            पुढे स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिकिकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे घरगुती वापराच्या अनेक वस्तूंसाठी अनेक पर्याय निर्माण झाले. हरित क्रांतीनंतर तर गाव- खेड्यातील सर्वच घटकांच्या जीवनमानात आमुलाग्र बदल होत गेला. पारंपरिक भारतीय ग्राम संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होऊ लागले. त्यामुळे हळू हळू घर व दैनंदिन जीवनातील नित्य नैमित्तिक साधने वा वस्तुंच्या जागी आधुनिक शैलीच्या वस्तू वापरल्या जाऊ लागल्या. त्यामुळे पारंपरिक लाकडी व काथ्या - सुती दोरांच्या बाजेलाही विविध पर्याय उभे राहिले. आज ओसरी - अंगणात दिमाखात ठाण मांडून बसलेली बाज कुठेतरी अडगळीत पडलेली दिसते. 

               बाजेला आपल्या संस्कृतीत खूप मानाचे स्थान आहे. भारतात प्राचीन काळापासून वापरली जाणारी बाज, चारपाई, खाट ही पलंगसदृश पारंपरिक झोपण्याची व बसण्याची अत्यंत महत्त्वाची साधने होती. आज ही सर्व साधने आपल्या अस्तित्वाच्या कडेलाटावर आहेत.  बाजेसह लोखंडी खाट आणि पलंगदेखील आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. लोखंडी खाटा तर अडगळीत गंजलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत. पलंगाचे स्थानही राजवाडा, देव - देवतांची मंदिरे यापुरतेच मर्यादित असलेले दिसून येत आहे. आणि बाज तर आज बाजूलाच पडलेलीच दिसत आहे. बाजेला धार्मिकसामाजिक  सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान असल्याचे दिसते. काही प्रदेशांमध्ये श्रीकृष्ण जयंती किंवा राम जन्म यासारख्या उत्सवांत बालमूर्ती झोपविण्यासाठी बाजेचा वापर करण्याची प्रथा आहे. विशेषतः मृत व्यक्तीला आंघोळ घालण्यासाठी बाज उपयोगी पडायची. तसेच प्राचीन काळी काही भागांमध्ये अंत्ययात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या तिरडीसाठीदेखील बाजेचीच वरची चोकट वापरली जायची. काही ठिकाणी तर लग्नात नवदाम्पत्य बसण्यासाठी सजवलेलली बाज वापरण्यात येत असे. स्त्रीच्या सासरी जाण्याच्या वेळीही तिचा सगळा संसार एका बाजभोवतीच गुंफलेला असायचा.

               बाज हे फक्त झोपण्याचे साधन नसून ती भारतीय संस्कृतीचापरंपरेचा आणिजीवनपद्धतीचा एक अविभाज्य भाग होती. 

बाजेमध्ये संवादशिस्तश्रद्धाआणि सौंदर्यबुद्धीचा संगम पाहायला मिळतो. बाज ही त्याकाळी ग्रामीण भागात सामाजिक संवाद व चर्चेची केंद्रबिंदू होती. सायंकाळी वा फावल्या वेळात लोक एकत्र येऊन बाजेवर बसून गप्पा मारत असत. पै - पाहुण्यांचे स्वागत वा आदरातिथ्य या बाजेवरच होत असे. बाळ आणि बाळंतीन यांच्यासाठी तर बाज संजीवनी असायची. आईप्रमाणेच बाजेबरोबरही बाळाची नाळ जुळली जात असे. बाजेखालून दिलेला शेक बाळ आणि बाळंतीनीसाठी खूप मौलिक असायचा. आई बरोबरच बाजेचीही ऊब बाळाला अनुभवायला मिळत असे. पुढं वाढत्या वयात वेळ मिळेल तेंव्हा घरातील लहानगे बाजेवर उड्या मारण्याचा मनसोक्त आनंद घेत असतं. आम्ही सुद्धा आबांचा वा मोठ्यांचा डोळा चुकवत बाजेवर उड्या मारण्याची मज्जा अनुभवली आहे. संध्याकाळचे जेवण झाल्यावर याच बाजेवर बसवून आबा आम्हाला छान छान गोष्टी, गमती- जमती सांगायचे.  कधी कधी आम्हाला बाजेवर झोपायलाही मिळत असे. तो आनंद तर काय वर्नावा! उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या वाळवणामध्येही गृहिणींना बाज अतिशय उपयोगी पडायची. सुगीच्या काळातही खळ्यावर बाज टाकली जायची. 

             आज नवसंस्कृतीचं युग अवतरताना दिसत आहे. घर आणि अंगण आज पूर्णत: बदलून गेलं आहे. सुंदर, सुरेख, टापटीप आणि सुव्यवस्थितपणाच्या अभिलषेपायी पारंपरिक साधने व वस्तू घरातून हद्दपार होऊ लागल्या आहेत. पारंपरिक लाकडी बाजेच्या जागी आज लोखंडी नायलॉनयुक्त बाजा आज सर्वत्र दिसत आहेत. आजच्या काळात फायबरचे पलंग, लोखंडी खाट, फोल्डिंग बेड यांनी ‘बाज’चे स्थान घेतले आहे. अशा आधुनिक डिझायनिंगमध्ये पारंपरिक बाजेचे पुन्हापुनरुज्जीवन होत आहे. काही शहरी घरांत इंटेरियर डिझाईनमध्ये पारंपरिक बाज शोभेचा भाग बनताना दिसतात. या नव्या रूपातील बाजा सुंदर, सुरेख, मजबूत, दणकट आणि आकर्षक आहेत; मात्र ओसरी अंगणात दिमाखात उभी असलेल्या काथ्या - सुताची बाजेची ऊब आणि रुबाब त्या देऊ शकतील का ? 

             एकेकाळी बाज हे आपल्या घराचं वैभव मानलं जात असे. बाज आपल्या संस्कृतीचा कला वारसा पुढे घेऊन जाणारे महत्वाचे साधन आहे. पारंपरिक लाकडी बाजांवर केलेले कोरीव काम, रंगकाम आणि विणकाम हे स्थानिक कारागिरीचा उत्कृष्ट नमुना मानले जात असे. विशेषत: हातानेविणलेल्या दोऱ्यांची बाज हा आपल्या विणकलेचा उत्कृष्ठ आविस्कार समजला जातो.  कला संस्कृतीसह कुटुंब संस्कृतीलाही खंबीरपणे पेलण्याचं आणि आधार देणाचं मोलाचं कामं बाज करत असे. बाज घरातील अनेक सुख - दुःखाच्या गोष्टींची साक्षीदार असे. दिवस उगवल्या पासून ते रात्रीअखेर आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मानवी जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनांची साक्षीदार असलेली ही बाज आज मात्र आपल्या जीवनातून पूर्णतः बाजूला होताना दिसत आहे. 

               आजच्या यंत्रयुगात या पारंपरिक साधनांना जपणे म्हणजे आपल्या संस्कृतिशी  जोडून राहणे होय. बाज जशी भूतकाळाची साक्षीदार आहे, तशीच ती आजही घराघरांत शांतीस्नेह आणिसौंदर्य यांचा आधारभूत गाभा असावी असे वाटते.  म्हणूनच ग्रामसंस्कृतीचे हे कला प्रतिक आज जपून ठेवणे गरजेचे आहे. बाज आज अडगळीत जातेय.  त्याबरोबर नानांची शिल्पकला आणि आबांची विणण्याची कलाही काही काळात अस्तंगत होईल. म्हणूनच ग्राम संस्कृतीचं हे कला वैभव, भारतीय संस्कृतीचा, श्रद्धेचा, प्रेमाचा आणि घरगुती संवादाचा आधार, कुटुंबाच्या संवादाचा आसरा,  ग्रामीण सौंदर्याचा एक जीवंत वारसा आणि पिढ्यानपिढ्यांना संस्कारांची शिदोरी देणारी ही बाज ओसरीत पुन्हा सजावी हीच अपेक्षा!


✍️ डॉ. अशोक शिंदे, 

प्राद्यापक, मराठी विभाग,

मुधोजी कॉलेज, फलटण

मोबाईल - ९८६०८५०३४४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा