गोधडी!
गावची चैत्री यात्रा झाली की पुढच्या दोन दिवसात आई गोधडी शिवायला घ्यायची. यात्रेला आलेले पाहुणे - रावळे आपापल्या गावी परतलेले असायचे. शेता- शिवारातील कामंही आटोपलेली असायची. शिवाय यात्रेच्या आधीच आईने पापड, शेवई , कुरडई, सांडगे आणि इतर काही वाळवणाचे पदार्थ तयार करून ठेवलेले असायचे. त्यामुळे ओसरीत चांगलं आठवडाभर गोधडी शिवण्याचं कामं चालायचं.
खरं तर गोधडीची पूर्वतयारी आधीच सहा सात महिन्यापूर्वी झालेली असायची. भाद्रपदातील पितृ पंधरवड्यात आमच्या घरातील सर्व बारीक - सारीक वस्तू व साहित्य स्वच्छ धुतले जायचे. त्यावेळी गावनदीला भरपूर पाणी आणि भादव्याचं कडक ऊन असल्यामुळे ही सर्व स्वच्छता व्हायची. या वेळी घरातील सर्व गोधड्या, चादरी, सतरंज्या, घोंगडया असे अंथरून, पांघरूनाचे सर्व साहित्यही धुतले जायचे. याचवेळी आई घरातील लहान व मोठ्यांची जुनी - पाणी कापडं स्वच्छ धुवून त्याचं गठुडं बांधून ठेवायची. असं वर्षा दोन वर्षानंतर जमलेल्या गठुड्यांतील कापडांचा अंदाज घेऊन आई गोधडी शिवायला घ्यायची.
सकाळची सगळी कामं, जेवणं आटोपली की आईचं हे कामं सुरु व्हायचं. प्रथम आई सर्व गाठुडी बाहेर काढायची. त्यातील जुनी फाटकी कापडं बाहेर काढायची. यामध्ये लुगडी, धोतरं, फेटे, पंचे, खामिस, बंडी, चोळी, टोपी तसेच लहान मुलांचे सदरे, इजारी, टकुचे, मुलींचे परकर, झंपर असे कितीतरी प्रकारचे कपडे असायचे. आई प्रथम प्रत्येक कापड निरखून पाहायची. त्याचा गोधडीच्या कोणत्या भागासाठी उपयोग होईल याचा विचार करून ती निवडून एका बाजूला ठेवायची. अशावेळी आम्हीपण आईला मदत करायचो. सदऱ्यांच्या कॉलर व गुंड्या काढणे, टीपा उसवणे, बाह्या फाडणे अशी कामं आम्ही अगदी आनंदानं करायचो. एकदा सर्व कापडं निवडून व्यवस्थित करून झाली की मग आई गोधडी बेतायला बसायची.
गोधडीसाठी वरच्या व खालच्या बाजूची दोन पालं आणि त्या दोन पालांच्यामध्ये भरण्यासाठी चिंध्या या दोन बाबी महत्त्वाच्या असतात. पालांसाठी लुगडं किंवा धोतराचा वापर केला जातो तर आतील चिंध्यासाठी उरलेल्या सर्व कापडांचा उपयोग व्हायचा. पालासाठी आई शक्यतो लुगड्याच्या फाळांचाचं वापर करत असे. कारण लुगडी वेगवेगळ्या रंगांची असायची. लुगड्याच्या फाळाचा विरलेला भाग बाजूला काढून उरलेला भाग पालासाठी वापरला जायचा. लुगड्यांच्या किनारी, पदराचा भाग हा पालासाठी वापरला जायचा. बाकी सारी कापडं चिंध्याच्या स्वरूपात भरणासाठी वापरली जायची. शिवण्यासाठी जाड दोऱ्याचा मोठा बंडल आणि चांगल्या लांबलचक पाच सहा सुया आईने आधीच आणून ठेवलेल्या असायच्या. अशी सर्व तयारी झाली की मग गोधडी शिवायला सुरवात व्हायची.
गोधडी शिवायची म्हटलं की आमच्या गल्लीतल्या कांतानानी , अंजनाआक्का, बायसामावशी, सुबाआत्या अशा चारपाच जणी जमायच्या. प्रत्येक वर्षी कोणाची ना कोणाची गोधडी असायचीच. सगळ्याजनी मिळून एकमेकींना मदत करून गोधडीचं कामं करायच्या. तीन हात रुंद आणि पाच हात लांब असा सर्व सामान्य गोधडीचा आकार असतो. यामध्ये उपलब्ध साहित्यानुसार आकार कमी अधिक होऊ शकतो. आई सुरवातीला खालचं पाल अंथरायची. त्यावर सर्व प्रकारच्या कापडांच्या निवडून ठेवलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या चिंद्या अंथरायची. हे करताना सगळीकडे जाडी सारखी राहील याची काळजी घेतली जायची. हे कामं ती अत्यंत काळजीपूर्वक करायची. या चिंद्या वाऱ्याने हलू नयेत म्हणून त्यावर छोटी लाकडं किंवा जड वस्तू ठेवायची. गोधडीचा आकार आणि जाडी याचे प्रमाण पूर्ण होईल इतक्या चिंद्या रचल्या की मग आई त्यावर वरचे पाल अंथरायची. अशा प्रकारे गोधडीचा पाहिला टप्पा पूर्ण व्हायचा.
दोन्हीही पालं मांडताना त्यांवरील नक्षी किंवा बाजूच्या किनारी नेमक्या जागेवर येतील याची आई पुरेपूर दक्षता घ्यायची. मग मोठ्या सूईत दोरा ओवून आधी चारी कडांवर लांब लांब टाके घालायची. नंतर मग आत सगळीकडे असेच लांब तुटक टाके घालायची. यामुळे गोधडी व्यवस्थित बांधली जायची. या कामासाठी आईला एक दोन लागायचे. अशी भरण पुरण झालेली ही गोधडी आई एका लांब काठीला गुंडाळून ठेवत असे. मग सर्वजणींचा मेळ बसवून गोधडी शिवायला घेतली जात असे. गोधडी शिवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. सर्व प्रथम गोधडीच्या खालच्या व वरच्या पालाच्या कडा आतल्या बाजूला मुडपून पाहिला टाका किंवा टीप घातली जाते. यास कडा दाबणे म्हणतात. हे काम अत्यंत दक्षतेने केले जाते. कडा दाबताना मध्ये घोळ राहू नये किंवा घुड्या पडणार नाहीत याची काळजी घेतली जाते. हा टप्पा चांगला झाला की गोधडी उत्तम साधलीचं असं समजायचं.
चार कडांना पाहिला टाका घातला की मग पहिल्या टाक्याच्या आत बोटभर अंतर सोडून दुसरा टाका घातला जातो. त्यामागोमाग मग एक बोट अंतरावर आतल्या बाजूने इतर टाके घातले जातात. पूर्ण चारी बाजूनी टीप टाकत तो टाका जिथून सुरवात झाली तिथंच पूर्ण व्हायचा. असे टाक्यांचे फेरे पूर्ण केले जायचे. अशावेळी चारजणी चार बाजूला बसून ती सुई टाके टाचत एकमेकींकडे पुढे सरकवत असत. कोपऱ्यावरचा काटकोनातला टाका घेताना मात्र शिवणारणीचे कौशल्य पणाला लागत असे. बेमालुमपणे तो टाका घातला जाई. टाके शिवले जात असताना पालावरील रंग, वेगवेगळे आकार आणि दोऱ्यांची शिवण यामुळे गोधडीला नवे नक्षीदार रुप प्राप्त होत असे. खरी कमाल तर शेवटी असायची. चार बाजूनी शिवण आत आत सरकत आल्यामुळे मध्यभागी एक चौकोनी आकार राहायचा. हा आकार शिवताना त्यास पोट लावणे असे म्हंटले जाते. काही प्रदेशात हा भाग शिवण्याआधी मुहूर्त पाहून गोधडीची ओटी भरण्याचीही प्रथा आहे. अनेक वेळा गोधडीच्या मध्यावर दोन्ही बाजूला रंगीत चौकोनी किंवा कापनीच्या आकाराचे ठिगळही लावलेले आढळते.
अशा प्रकारे कित्येक वर्षाच्या जुन्या कापडांना नवा, सुंदर आकार आणि देखणं रुप प्राप्त व्हायचं. आणि जणू त्यांचा पूनर्ररजन्मच व्हायचा. अशी ही गोधडी पूर्ण करायला किमान आठ ते दहा दिवस लागायचे. गोधडी ही भारतीय संस्कृतीचे पारंपरिक अंथरून आणि पांघरूणाचे प्रमुख साधन आहे. गोधडी, वाकळ आणि लेपाटं अशा विविध नावाने ती ओळखली जाते. मानवी जीवनामध्ये गोधडीला महत्त्वाचे आणि मानाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून गोधडी मानवी संस्कृतीत सांस्कृतिक, भावनिक आणि पूनर्वापरदुष्ट्या अविभाज्य भाग असलेली दिसते.
भारतीय प्राचीन संस्कृतीत वैदिक काळात वस्त्र निर्मिती ही प्रामुख्याने हस्तनिर्मित वहातमागावर आधारित होती. स्त्रिया कापडांचे तुकडे शिवून अपत्यासाठी मऊ, उबदार अंथरुण तयार करीत असत. पुढे त्याचेच गोधडीमध्ये रूपांतर झाले असावे. गुप्तांचा काळ समृद्धीचा होता. त्यामुळे याकाळात नविन कपडे सहज उपलब्ध होत होते. पण गृहिणींनी जुने कपडे वापरून तयार केलेलीगोधडी घरातील गरजू, लहान मुलांसाठी वापरली जात. त्यामुळे याच काळात गोधडीला मातृत्व, ममताव सुगरणपणा याचे प्रतीक मानले जात असे. नंतर मध्ययुगीन काळात ग्रामीण भागात स्त्रिया आपलीकलात्मकता गोधडीद्वारे व्यक्त करू लागल्या. सुशोभित शिवणकाम, भरतकाम याचा गोधड्यांमध्ये प्रवेश होत गेला.
ब्रिटिशकाळात कापड उद्योगामुळे जुन्या कपड्यांचे प्रमाण वाढले आणि गोधड्या मोठ्याप्रमाणात तयार होऊ लागल्या. आजी-आईकडून नातवंडांना दिली जाणारी गोधडी ही त्याकाळापासून एक भावनिक व संस्कृतिक परंपरा बनली. याचकाळात स्वदेशी चळवळीनंतर हस्तकलेला आणि हाताने तयार होणाऱ्या वस्तूंना प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे गोधडी ही स्वावलंबनाचं आणि स्त्रियांच्या कौशल्याचं प्रतीक बनली. याचं काळात काही स्त्रिया तर गोधडी विक्री करून घरखर्चास हातभार लावत असत. ‘गोधडी शिलाई’ ही कला म्हणून याकाळात ओळखली जाऊ लागली.
स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक क्रांतीमुळे बाजारात विविध प्रकारची नवी तयार पर्यायी अंथरूणे सहज उपलब्ध होऊ लागली. याच काळात भारतीय लोकांचे जीवनमान आणि जीवनशैलीही बदलली. नोकरी व्यवसाय निमित्ताने कुटुंबं विखूरली गेली. त्यामुळे आई, आजीसह नातवंडांचा गोतावळाही विखूरला. शिवाय घरातील, बाहेरील व शेतातील कामाचे स्वरुपही बदलले. त्यातच हव्या तशा अंथरून पांघरूनाची सहज उपलब्धता व ते खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचीही अनुकूलता यामुळे पारंपरिक गोधडी हळू हळू मागे पडत गेली.
आज मात्र ही पारंपरिक गोधडी अडगळीत पडलेली दिसते. विशेषतः हल्लीच्या या चमकोगिरीच्या युगात तर तिचं स्थान अगदीच गौण झालेलं आहे. घरी पाहुणे आल्यावर तर ती दिसणारच नाही अशी व्यवस्था केली जाते. खरं तर गोधडी म्हणजे आपल्या घरातली संस्कृतीचा खजिना होय. आईच्या हाताने शिवलेली गोधडी म्हणजे केवळ घरीतील जुनी कपडे वापरून नव्याने वापरात आणलेलं साधन नव्हे, तर ती गोधडी म्हणजे पुनःपुन्हा जन्म घेणारी आठवण असते . आईच्या प्रेमाची उब आणि घराच्या ओसरी अंगणात जन्माला आलेली कलासंस्कृती होय.
गोधडी केवळ अंथरूण नसते तर ती एक ‘टाकाऊ तून टिकाऊ’ अशा गृहसंस्कृतीची साक्ष असते. मानवी संस्कृतीच्या वैभवशाली काळाची ती साक्षीदार आहे. ती स्त्रीच्या सर्जनशीलतेची, कुटुंबप्रेमाची आणि पुनर्वापराच्या शहाणपणाची निशाणी असते. भारतीय पूनर्वापर संस्कृतीचा गोधडी उत्तम नमुना समजली जाते. ती कधीच वाया जात नाही. तिचं पाल अनेक वेळा बदलले जाते. शिवाय जेंव्हा तिला डोळे पडतात म्हणजेच ती: काहीशी जीर्ण होते, तेंव्हा तिचा वापर लेपाटं म्हणून केला जातो. हे लेपाटं एकदम एकजीव आणि मऊसूद असते.
याकाळात तर ते अधिकच ऊबदार असते. त्यामुळे ते बाळंतिनीच्या बाजेवर टाकले जाते. पुढे ते अनेक काळ घरातील लेकीबाळींच्या बाळंतपणात बाळ आणि बाळंतिनींना ऊब देण्याचे काम ते करते. त्यानंतर काही काळ लोटल्यावर ते झिजून झिजून जेंव्हा त्याचे लक्तर होते तेंव्हा ते कुंभाराकडे सुपूर्त केले जाते. गाडगी, मडकी, घागरी व माठ घडवताना ते मऊ मुलायम लक्तर खाली आधार देण्याचे काम करते. पुढे ते अधिकच जीर्ण होते तेंव्हा ते आवा पेटवण्याच्या कामी येते. अशा प्रकारे एका पिढीचे जीवन प्रतिनिधित्त्व करणारी ही गोधडी आपल्या अखेरच्या अंशापर्यंत उपयोगी ठरते. म्हणूनच गोधडी हे पुणत: स्व -समर्पणाचे उत्तम साधन आहे असे मला वाटते.
गोधडी ही कौटुंबिक आठवणींचे आणि भावनांचे प्रतीक असते. ती आईच्या प्रेमाची उब आहे. लहान मुलांसाठी आजीने केलेली गोधडी ही एक जिव्हाळ्याची गोष्ट असते. ती घरातील स्त्रीच्याकलात्मकतेचा दाखला आणि कुटुंबाच्या आठवणींचा थर असते. प्रत्येक गोधडी ही काहीतरी कथा सांगते. तिच्या प्रत्येक तुकड्यात एक एक गोड आठवण लपलेली असते. घरातील सगळ्यांचे कपडे एकत्रितपणे तिच्यात गुंफले जातात. आई, आजीने एकेक तुकडा हाताने सावकाश शिवून, प्रेमाने टाचून गोधडी साकारलेली असते. त्यातील प्रत्येक कापडाशी आपला स्नेह जुळलेला असतो. ते कसे, केंव्हा, कुठे, कोणी घेतले याबाबतच्या गोड स्मृती असतात. या स्मृती कलात्मक धाग्यांनी सुंदरपणे तिच्यात रेखलेल्या असतात. कधी काळी जेंव्हा तिला डोळे पडतात तेंव्हाही त्या डोकावणाऱ्या अवशेषातून त्या स्मृती पुन्हा नव्याने जाग्या होत होतात. स्मृतीशेष झालेल्या वा परिवारातून दूर गेलेल्या सदस्यांच्या आठवणीचं कोंदण गोधडीत दडलेलं असतं आणि कौटुंबिक भावनांचा उमाळा गोधडीत टाचून भरलेला असतो.
आईच्या हातून गोधडी घडणे म्हणजे एखादं भावगोफ विनणंचं असत. एका पालावर धोतराचा, तर दुसऱ्यावर अजून न फाटलेला पैठणीचा काठ असतो. त्या गोधडीच्या प्रत्येक शिवणीत एक स्मृती भरलेली असते, आई, आजी, आजोबा आणि घरातील कित्येकांची. गोधडी जरी जुन्या कपड्यांनी बनलेली असली तरीही तिच्यातील प्रत्येक तुकडा एक जीवंत आठवण घेऊन समोर उभा राहतो. आजंचीर, शालू, पैठणी, इतर साड्या, पंचे, फेटे यांचे तुकडे म्हणजे त्या घराचं वैभवचं गोधडीत साठलेले असे. गोधडी पिढ्यानंपिढ्यांचा वारसा संक्रमनाचे मोठे साधन असते. आजीकडून आईला आणि आईकडून मुलीकडे हा कला वारसा पुढे दिला जातो. गोधडी शिवताना स्त्री फक्त टाके टाकत नसते, ती संसाराचा एकेक थर गुंडाळते. एखादी आठवण खुणावते, डोळे पाणावतात, पण हात थांबत नाहीत. कारण या टाक्यांतून ती पिढ्यांना प्रेम, सुरक्षा आणि आपुलकीचं आच्छादन देत असते. गोधडी एक कपड्यांची घडी नसते. ती असते काळाचं स्मरण. एका आईच्या, आजीच्या ममतेच्या हातांनी शिवलेली उबदार आठवण. ही फक्त शिवण नसते, तर ती काळाच्या नात्यांची गुंफण असते. त्यामुळेच गोधडी ही कौटुंबिक इतिहासाचा सुरेख वास्तुरूप ऐवज ठरते.
ही पारंपरिक गोधडी म्हणजे एक प्रकारची सांस्कृतिक हस्तकलाचं होती. गोधडीतून सांस्कृतिक व सामाजिक वीण गुंफली जात असे. यामध्ये स्त्रियांच्या कौशल्याला आणि कलेला एक व्यक्त होण्याचं व्यासपीठ मिळायचं. काही ठिकाणी गोधडीवर पारंपरिक कड्या, देवी-देवतांचे प्रतिकात्मक आकृतीचित्रे, सुबक भरतकामही केले जात असे. कपड्यांचचे वेगवेगळे आकार तिच्यावर रेखले जात असत. गोधडीतून शिवण्याच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द वाढीस लागत असे . शेजारणी एकमेकींच्या मदतीने हें काम पूर्ण करत. त्यानिमित्ताने सुख दुःखाच्या गप्पा गोष्टी होत असत. तसेच परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागत असे. घरी लग्न समारंभाच्या निमित्ताने नव्या सोयऱ्यासाठी गोधडी शिवण्याची प्रथा होती . यामुळे गोधडी बरोबरच स्नेहाचे धागेही भक्कम होत असत. भारतीय स्त्रीच्या जीवनातील एक सजीव आठवण म्हणून गोधडीचे स्थान आपल्या संस्कृतीत मोलाचे आहे. आजही ग्रामीण भागात गोधडीची परंपरा टिकून आहे. मात्र त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे.
आज ग्रामीण महिला गटांनी व्यवसाय म्हणून गोधडी शिलाई सुरू केली. मात्र या गोधड्या मशीनवर शिवल्या जातात. आजच्या आधुनिक काळात गोधडी एक पारंपरिक हस्तकला म्हणून नावारूपाला आलेली दिसते. शहरी बाजारात हातावर तयार केलेली गोधडीला एक आकर्षक आणि पर्यावरणपूरक उत्पादन म्हणून मागणी आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, महिलांचे स्वयंसहायता गट, तसेच डिजाईन क्षेत्रातील लोकांनी गोधडी शिलाईला एक नवसाज दिला आहे. मात्र पारंपरिक गोधडीचा बाज या आधुनिक रूपातील गोधडीला नक्कीच नाही. आतल्या चिंद्या जरी घरातल्या वापरल्या तरी त्या नायलॉन, टेरिकॉट किंवा कृत्रिम धाग्यांच्या असतात. त्यातच इतके पटापट नवनवे कपडे वापरले जातात कीं त्यामुळे कपड्यांशी संबंधित स्मृतीच राहत नाहीत. आणि पालासाठी तर अलीकडे नवीनच किंवा मूळत: नक्षीदार साड्या वापरल्या जातात. त्यामुळे हा केवळ दिखाऊपणा ठरतोय.
आईच्या हाताने बेतलेल्या, शिवलेल्या गोधडीची ऊब आणि माया जिव्हाळा आजच्या गोधडीत जाणवतं नाही. आईच्या स्पर्शाची आणि संस्काराची घट्ट वीण तिच्या गोधडीत असते. आज आई नाही ...! मात्र शेवटच्या तिच्या स्पर्शाची ऊब अजूनही माझ्या मनाच्या आत खोल कुठे तरी घर करून आहे. आई एक कलाकार होती, एक संस्कारक होती. तिने शिवलेली एक रंगीत गोधडी मात्र घरात आहे. माझ्या अंथरुणात आजही तिच्या हातांची ती ऊब अजूनही साठवून ठेवलेली आहे.
गोधडीत आठवणीच्या साठवणी लपलेल्या असतात. गोधडी जशी जीर्ण होतं जाते तासातश्या आठवणीचे रंगींबरंगी पदर खुलून येतात. तिला अंथरताना, पांघरताना, धुताना, वाळत घालतानाच्या सर्व आठवणी तिच्यात दडलेल्या असतात. गोधडी म्हणजे आईच्या कुशीतली झोप, आजीच्या मायेचा उबदार थर, आणि आयुष्याच्या आठवणींचं थरथरणारं वस्त्र असते. अशी गोधडी अडगळीत पडू देऊ नका, हरवू नका… ती जपून ठेवा.
कारण गोधडी ही केवळ आठवणी जपणारी वस्तू नसून, ती आठवणी घडवणारी संस्कृतीआहे. या वैभवशाली संस्कृतीचं जतन व्हावं हीच अपेक्षा !
✍️ डॉ. अशोक शिंदे
मुधोजी महाविद्यालय, फलटण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा