मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र. १७ सूप

                   सूप 

           सायंकाळच्या वेळेला आजी ओट्यावर धान्य नीट करायला बसायची. दोन-चार दिवसातून एकदा असं तिचं हे काम चलायचं. आधी ती कणगीतून एका घमेल्यात ज्वारी काढायची आणि तिच्या नेहमीच्या जागेवर आणून ठेवायची. मग ती ओसरीत खुंटीला अडकवलेलं सुप घ्यायची. यावेळी एक रिकामं घमेलंही तिच्याजवळ असायचं. कधी कधी मी तिला कणगीतील धान्य आणि खुंटीवरचं सूप काढून देत असे. हे काम करताना मी नेहमी तिच्याजवळ बसूनच असायचो. यामध्ये तिला कसलीही घाई गडबड चालायची नाही. तिची धान्य निवडण्याची एक आगळी- वेगळी पद्धत असायची.

            एका पायाची मांडी तर दुसरा पाय पुढे पसरून आजी धान्य नीट करायला बसायची. तिच्या एका बाजूला ज्वारीचं भरलेलं तर दुसऱ्या बाजूला मोकळं घमेलं ठेवलेलं असायचं. आणि पुढ्यात सूप असायचं. या सुपानचं ती ज्वारी नीट करायची. सुरवातीला ती दोन ओंजळी ज्वारी सुपाच्या खोलगट भागात घ्यायची. मग दोन्ही हाताने सूप धरून ते विशिष्ट रीतीने हालवायची. या हलवण्याला ती घोळणं असं म्हणायची. सुपात धान्य घोळताना ती तिचे दोन्ही हात कधी खालीवर तर कधी मागेपुढे करत ती घोळवत असे. या घोळण्यामुळं ज्वारीतील हलका कचरा वर यायचा. यामध्ये हलक्या काड्या- कुड्या, बोंड, फोलकटं असायची. मग आजी हळूच त्यावर फूक घालायची.  त्यामुळे काही हलके पदार्थ पुढे उडून जायचे. मग हाताच्या बोटाच्या मागच्या अंगाने वर आलेलं उरलेलं सगळं हलकेपणे सूपाच्या पुढच्या सपाट उतरत्या बाजूने खाली सारायची. 

           घोळून झाल्यावर आजी मग पाखडायला लागायची. आजीचं पाखडणं मोठं गमतीचं असायचं. मी तिच्याकडे बघतच बसायचो. पाखडताना ती सूपाच्या दोन्ही बाजू घट्ट पकडायची. सूप पकडताना दोन्ही आंगठे सूपाच्या आतल्या बाजूला असायचे आणि तळहात व उरलेली चार बोटे सूपाच्या खालच्या बाजूला धरलेली असायची. सुपातली ज्वारी आतल्या आत मोकळी होऊन, नको असणारा कचरा हळूच पुढे ढकलला जाईल असं तिचं पाखडणं असायचं. त्यामुळे ती दोन्ही हातांनी सुपाला वर- खाली, मागे - पुढे आणि सुपातील ज्वारी आतल्या आत खाली वर होईल अशी हलवत असे. हे करताना ती सुपाला हळूच उलटा झटकाही देत असे. हा उलटा झटका देताना आजी सुपाच्या खालच्या अंगाला आपल्या बोटांनी चटकवायची. त्यावेळी ‘चटक’ ‘चटक’ असा आवाज यायचा. आणि गंमत म्हणजे याच वेळी ती तोंडानेही तसाच ‘चटक’ ‘चटक’ आवाज काढत असे. हे पाहताना मला खूप मज्जा वाटायची. आजी जेव्हा सूप हलवायची, तेव्हा तिच्या हातांच्या हालचालीत एक विलक्षण ताल असायचा. सूप हलक्या झोक्याने पुढे ढकलले की जड दाणे सूपात टिकून राहायचे आणि हलका कचरा उडून दूर जायचा. 

             या पाखडण्यामुळे सुपातील ज्वारी आतल्या आत उलट्या उद्या मारायची. त्यामुळे छोटे छोटे मातीचे कण, बारीक खडे किंवा काही इतर जड पदार्थ सुपाच्या पसरट भागात जमा व्हायचे. मग आजी पुन्हा हलक्या हाताने सुपाला थोडासा झटका देऊन तो कचरा खाली पाडायची. यावेळी सुपात स्वच्छ झालेली  किंवा निवडलेली ज्वारी आजी दोन्ही हातांनी मोकळ्या घमेल्यात भरायची. घोळून आणि पाखडूनही शेवटी सुपात अगदीच बारीक खडे, धूळ किंवा काही जड काड्या, बोंडं शिल्लक राहायची, तेंव्हा आजी त्यातील ज्वारी निवडून काढायची तो कचरा टाकून द्यायची. हे झाल्यावर पुन्हा दोन ओंजळी धान्य सुपात घेऊन ते नीट करायची. असं आजीच हे घोळणं आणि पाखडणं सगळी घमेलेभर ज्वारी संपेपर्यंत चालायचं. मग ही निवडलेली ज्वारी दळणासाठी तयार असायची. अशाच प्रकारे ती बाजरी, गहू आणि काही कडधान्ये निवडून स्वच्छ करून ठेवत असे. 

               धान्य निवडणं किंवा ते स्वच्छ करणं हे काम सर्व घरोघरी चालायचं. आजी, आई किंवा घरातील एखादी प्रौढ बाई हे सगळं काम करायच्या. यावेळी त्या हमखास लहान मुलींना जवळ घेऊन बसायच्या. धान्य कसं निवडावं याचं शिक्षणचं असायचं ते. धान्य निवडणं ही एक प्रक्रिया असली तरी ती एक कला देखील आहे. या कामी ‘सूप’ हे साधन खूप उपयोगी पडायचं. प्रत्येक घरात हे सूप असायचेच. बांबूच्या पट्ट्या विशिष्टरितीने विणून हे ‘सूप’ तयार केलं जायचं. बुरुड समाजाचे कारागीर हे काम करायचे. पेठेच्या गावात किंवा बाजारच्या गावात हे सूप मिळायचे. आमच्या परिसरात दादा पवार यांचा सूप विणण्यात हातखंडा होता. सूपाची रचना म्हणजे ग्रामीण कलेचा एक सुंदर नमुनाच. बांबूच्या किंवा त्यासदृश्य वनस्पती यासाठी वापरल्या जायच्या. 

            सूप बांधताना त्याच्या विशिष्ट आकार व भक्कमतेकडे अधिक लक्ष दिले जात असे. प्रथम बांबूच्या बारीक पट्ट्या काढून सूपाचे मागच्या बाजूचा अर्धगोलाकार भाग तयार केला जायचा. हे विणकाम करताना मागील बाजूच्या कडा साधारण चार बोटं उंच केल्या जातात. त्यामुळे सूप चालवताना धान्य खाली सांडत नाही. सुपाचे विणकाम नेहमी मागून पुढे केले जाते. मागचा उंचवट्याचा भाग विणून तसाच मागच्या बाजूने खालून पुढे आणला जातो. यावेळी उंच कडा जराशा उतरवल्या जातात आणि सूपाच्या पुढच्या भागात तर त्या एकदम तळात मिळावल्या जातात. यावेळी पुढील बाजूस थोडा झुकाव किंवा उतार दिला जातो. ही तिरकी किंवा चढती रचना वाऱ्याचा झोत आणि धान्याची घसरण यासाठी आवश्यक असते. सूपाची वीण आडवी उभी असते. ही वीण इतकी तंतोतंत असते की त्यातून धान्याचे कण खाली गळणार नाहीत याची काळजी घेतली जाते. अशा प्रकारे साधारण दीड फूट रुंद आणि दीड-पावणे दोन फूट लांब सूप तयार केले जाते. 

           सूप विणताना विणीचा ताण आणि कडांची मजबुती या दोन बाबी विशिष्टपणे संतुलित करणे हे कारागिरीचे कसब असते. दादाला हे कौशल्य उत्तमपणे आत्मसात होते. आमच्या गावात प्रत्येक घराच्या ओसरीत किंवा आत खुंटीला असे सूप अडकवलेले असायचे. धान्य निवडणे किंवा दळण करणे याकामी महत्त्वाचे साधन म्हणून सूप उपयोगी पडते. कृषी संस्कृतीच्या प्रारंभापासूनच सूप वापरले जात होते. भारतीय ग्रामीण संस्कृतीत प्राचीन काळापासून सूप हे धान्य निवडण्याचे प्रमुख साधन असल्याचे दिसते. कृषी संस्कृती विकसित झाल्यानंतर धान्य पाखडण्याची गरज गरज निर्माण झाली. त्यातून सूप हे साधन तयार झाले. सुरुवातीचे सूप विविध वनस्पतींच्या काड्या, पानं, किंवा गवत यांच्या जाळ्या करून बनवले जात असे. पुढील काळात यासाठी बांबू ही वनस्पती सर्वांत सोयीची व टिकाऊ असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याच्या बारीक चपट्या, गोल पट्ट्यांची वीण करून सूप  बनवले जाऊ लागले. 

                मध्ययुगीन काळात ते सूप सर्वत्र रूढ झालेले दिसते. संस्कृत भाषेतील शूर्प किंवा सूर्प या शब्दापासून 'सूप' हा शब्द तयार झाला आहे. सुपडू, सुपली, सुपू अशी त्याची अन्य रूपे वा नावे आहेत. या काळातच सूपाचा चौकोनी आकार निश्चित झाला. या काळात काही भागांत लाकडी सूप, तर काही ठिकाणी तांब्याचे किंवा पितळेचे सूपही वापरले जात होते. या काळात अनेक पारंपारिक कार्यात सूपाचा वापर होत असे. परंतु धान्य पाखडणे हे गृहिणीचे अनिवार्य काम असल्याने हे सूप घराघरात आवश्यक वस्तू म्हणून हमखास वापरले जात असे. साधारणत: चौकोनी आकाराचे हे सूप विविध प्रकारचे धान्य घोळणे, पाखडणे याशिवाय प्राचीन काळापासून लोकजीवनातील इतर अनेक कामातही उपयोगी पडत असे. अगदी स्वातंत्र्योत्तर काळातही लोक संस्कृतीत सूप आपले स्थान टिकवून होते. 

           मात्र आज आधुनिक काळात कृषी आणि ग्रामीण जीवनात विविध बदल झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरण यामुळे नवनवीन यंत्र सामग्री विकसित होत आहेत. लोकजीवनातील सर्वच कामांचे स्वरूप आज बदललेले दिसते आहे. घरकाम व इतर कामासाठी लागणाऱ्या सर्वच पारंपरिक साधनांचे मूळ रूप बदलून आज त्याचे नवीनीकरण वा आधुनिकीकरण झालेले आहे. यामुळे  अनेक साधनांना नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. सूपाबाबत देखील असाच बदल घडलेला दिसतो. यांत्रिकीकरणाने आज घराघरांत इलेक्ट्रिक ग्राइंडर, क्लीनिंग मशीन इ. साधने उपलब्ध झाली आहेत. शिवाय आज तर तयार पीठ देखील बाजारात सहजपणे मिळत आहे. त्यामुळे घरोघरी सूपाने पाखडण्याची वा दळण करण्याची पद्धत आज बंदच झाली आहे. या यंत्रांमुळे सूपाचा वापर घटला आहे. तसेच सूपाचे मूळ बांबूचे रूप जावून त्याजागी फायबर वा प्लास्टिकची सुपेही बाजारात येऊ लागली आहेत. त्यामुळे त्यात यांत्रिकता येऊन त्याविषयीची आत्मीयता नष्ट होत आहे. मूळ  सूप मात्र आज घरात कुठेतरी कोनाड्यात सुकून पडलेलं दिसतेय. 

           आमच्या काळात सूप ग्रामीण जीवनाशी  एकरूप होऊन गेलेले साधन होते. धान्य निवडण्याशिवाय लोकजीवनात इतर बाबतीत देखील सुपाचा वापर होत असे. सूपाच्या रुपाने कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपली जायची. कोणताही विधी, सण, समारंभ सूपाशिवाय पूर्ण व्ह्यायचा नाही. सूपाला समृद्धीचे व शुचिर्भूततेचे प्रतिक मानले जायचे. काही प्रदेशात बाळ जन्माला आल्यावर त्याची प्रकृती खूपच नाजूक असेल तर त्याला दुपट्यात घालून सुपामध्ये ठेवले जाते. त्यामुळे त्याला उचलणे व हलवणे सोपे होते. श्रावणात खेळल्या जाणाऱ्या मंगळागौरीमध्ये ‘नाच ग घुमा' या खेळात, उजव्या व डाव्या हातात सूप उडवून नाचविले जाते. लग्नामधील देवकं अगदी आजसुद्धा सुपामध्ये पुजली जातात. लग्नकार्य पूर्ण झाल्यावर देवक पुजल्यानंतर हे सूप जाहीरपणे वाजविले जात असे. त्यामुळे ‘कार्याचे सूप वाजले' हा शब्द समूह बोलीत कायमचा रुजला आहे. 

          आज तर विविध कार्याची सांगता झाल्यावर ‘सूप वाजले’ हा वाक्प्रचार वापरला जातो. धार्मिक विधींमध्ये विविध पूजा मांडणे, यज्ञकर्मामध्ये अग्नीला वारा घालणे आणि विविध व्रतांमध्ये दान करणे इत्यादींमध्ये सुपाचा वापर केला जात असे. दारी आलेल्या उपासकास सूपातून धान्य दान करण्याची प्रथाही आपल्याकडे आहे. याशिवाय उन्हाळ्यात वाळवणाच्या कामात शेवया वाळवण्यासाठी सुपं वापरली जात असत. काही प्रदेशात अंतिम संस्कार आणि अस्थी विसर्जनावेळी सुपात नैवेद्य घेऊन जाण्याचीही प्रथा आहे. 

         सूप हे केवळ धान्य निवडण्याचे साधन नव्हते; तर ती एक कला होती. विणकाम कलेचा सूप एक उत्तम नमुना होतं. ग्राम संस्कृती आणि कारागिरीचा सुंदर संगम सुपात दिसायचा. तसेच सूप ग्रामीण लोकजीवनाचा अविभाज्य भाग होता. आहार संस्कृतीचे सूप महत्त्वपूर्ण साधन होते. विशेष म्हणजे ते  स्त्रियांच्या श्रमसंस्कृतीचे, घरगुती अर्थव्यवस्थेचे आणि निसर्गपूरक जीवनशैलीचे प्रतिक होते. सूप हाताळणे ही सुद्धा एक कलाच होती. वारा, दिशा आणि हातांची हालचाल व गतीचा योग्य मेळ घालून धान्य निवडणे व दळण करणे हे कौशल्याचे काम असायचे. या कामाच्या माध्यमातून हा कलेचा वारसा पुढच्या पिढीला दिला जात असे. सूपामुळे धान्य निवडण्याची प्रक्रिया पूर्णत: नैसर्गिकरित्या होत असे. कोणत्याही यांत्रिक प्रक्रियेशिवाय केवळ वैशिष्ट्यपूर्ण आकार, हाताची योग्य हालचाल आणि घोळणे व पाखडण्याची कला याद्वारे  धान्य निवडीची प्रक्रिया करणारे हे सूप मात्र  आज आधुनिक युगाच्या साधन सामग्रीच्या गराड्यात हरवून गेले आहे. 

              आज धान्य स्वच्छ करण्यासाठी घरात जी विविध यंत्रे आली आहेत. त्यात धान्य निवडले जात आहे. मात्र या आधुनिक साधनातून केवळ श्रीमंतीचंच दर्शन घडते. याउलट आई, आजीच्या हातातील सूप हे समृद्धीच तथा बरकतीचं लक्षण असायचं. या सूपाची खूप काळजी घेतली जायची. ते अधिक काळ टिकावं म्हणून आजी त्याला शेणाने सारवायची. त्याला जर बीळं पडली तर त्यात आजी कापडाच्या चिंध्या खोसायची. ओसरीत किंवा घरात खुंटीला अडकवलेलं सूप हे त्या घराच्या समृद्धीचं प्रतिक असायचं. सूपामुळे धान्याइतकीच नात्यातील निर्मळता देखील जपली जायची. सूपाच्या निमित्ताने घरातील स्त्रियांमध्ये श्रमसंस्काराची  परंपरा निर्माण व्हायची. सूपामुळे आज्या- नाती, माय- लेकी, सासू -सुना, नणंद -जावा ही नाती श्रम, कला आणि प्रेमानं बांधली जायची.

            मुलीच्या विवाहात सूप, दुरडी, टोपली देण्याची प्रथा आजही दिसते; मात्र ही केवळ परंपरा म्हणूनच केले जाते. काही ग्रामीण व आदिवासी भाग वगळता प्रत्यक्षात आज सूपाचा पारंपरिक वापर होताना दिसत नाही. धान्य निवडण्याचा हा पारंपरिक वारसा, गृह समृद्धीचं प्रतिक, श्रम व कलेचा सुंदर नमुना आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हे वस्तूरूप साधन आज लोप पावत चाललेलं आहे. एकेकाळच्या लोकजीवनाच्या वैभवाचा हा साक्षीदार कुठेतरी अडगळीत पडलेला दिसत आहे. केवळ विशिष्ट वेळी तो नजरेला पडत आहे. सूप फक्त घराच्या कडेला, भिंतीच्या रॅकमध्ये किंवा एखाद्या सणाच्या दिवशीच आपलं अस्तित्व दाखवतं. एकेकाळी प्रत्येक घराचा अभिमान असलेलं हे साधन, आता नष्ट होईल की काय याची भीती वाटत आहे. 

          सूपाचं अस्तित्त्व केवळ साधनरूप नाही , तर कलारूप आहे. सुप नाही चालवले गेलं तर पाखडणं, घोळणं, निवडणं या कलाही काळाच्या ओघात लोप पावतील. सूप नाही वापरलं गेलं तर विणकला व हस्तकला कारागिरीचं काय होणार? म्हणूनच सूपाचा तो खर्र… खर्र…, चटक … चटक … आवाज, 

धान्यावर खेळणाऱ्या वाऱ्याचा नाद आणि 

आजीच्या हातांची तालबद्ध, लयबद्ध हालचाल… आजच्या पिढीला अनुभवायची असेल तर लोकजीवनात कला, समृद्धी, सुफलता व सुचिर्भूततेचे प्रतिक असलेले हे सूप घराघरात पुन्हा वापरायलाच हवे!

✍️ डॉ. अशोक शिंदे

           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा