बुधवार, २५ जून, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख -१०

 गोधडी! 

               गावची चैत्री यात्रा झाली की पुढच्या दोन दिवसात आई गोधडी शिवायला घ्यायची. यात्रेला आलेले पाहुणे - रावळे आपापल्या गावी परतलेले असायचे. शेता- शिवारातील कामंही आटोपलेली असायची. शिवाय यात्रेच्या आधीच आईने पापड, शेवई , कुरडई, सांडगे आणि इतर काही वाळवणाचे पदार्थ तयार करून ठेवलेले असायचे. त्यामुळे ओसरीत चांगलं आठवडाभर गोधडी शिवण्याचं कामं चालायचं. 

             खरं तर गोधडीची पूर्वतयारी आधीच सहा सात महिन्यापूर्वी झालेली असायची. भाद्रपदातील पितृ पंधरवड्यात आमच्या घरातील सर्व बारीक - सारीक वस्तू व साहित्य स्वच्छ धुतले जायचे. त्यावेळी गावनदीला भरपूर पाणी आणि भादव्याचं कडक ऊन असल्यामुळे ही सर्व स्वच्छता व्हायची. या वेळी घरातील सर्व गोधड्या, चादरी, सतरंज्या, घोंगडया असे अंथरून, पांघरूनाचे सर्व साहित्यही धुतले जायचे. याचवेळी आई घरातील लहान व मोठ्यांची जुनी - पाणी कापडं स्वच्छ धुवून त्याचं गठुडं बांधून ठेवायची. असं वर्षा दोन वर्षानंतर जमलेल्या गठुड्यांतील कापडांचा अंदाज घेऊन आई गोधडी शिवायला घ्यायची. 

             सकाळची सगळी कामं, जेवणं आटोपली की आईचं हे कामं सुरु व्हायचं. प्रथम आई सर्व गाठुडी बाहेर काढायची. त्यातील जुनी फाटकी कापडं बाहेर काढायची. यामध्ये लुगडी, धोतरं, फेटे, पंचे, खामिस, बंडी, चोळी, टोपी तसेच लहान मुलांचे सदरे, इजारी, टकुचे,  मुलींचे परकर, झंपर असे कितीतरी प्रकारचे कपडे असायचे. आई प्रथम प्रत्येक कापड निरखून पाहायची. त्याचा गोधडीच्या कोणत्या भागासाठी उपयोग होईल याचा विचार करून ती निवडून एका बाजूला ठेवायची. अशावेळी आम्हीपण आईला मदत करायचो. सदऱ्यांच्या कॉलर व गुंड्या काढणे, टीपा उसवणे, बाह्या फाडणे अशी कामं आम्ही अगदी आनंदानं करायचो. एकदा सर्व कापडं निवडून व्यवस्थित करून झाली की मग आई गोधडी बेतायला बसायची.

              गोधडीसाठी वरच्या व खालच्या बाजूची दोन पालं आणि त्या दोन पालांच्यामध्ये भरण्यासाठी चिंध्या या दोन बाबी महत्त्वाच्या असतात. पालांसाठी लुगडं किंवा धोतराचा वापर केला जातो तर आतील चिंध्यासाठी उरलेल्या सर्व कापडांचा उपयोग व्हायचा. पालासाठी आई शक्यतो लुगड्याच्या फाळांचाचं वापर करत असे. कारण लुगडी वेगवेगळ्या रंगांची असायची. लुगड्याच्या फाळाचा विरलेला भाग बाजूला काढून उरलेला भाग पालासाठी वापरला जायचा. लुगड्यांच्या किनारी, पदराचा भाग हा पालासाठी वापरला जायचा. बाकी सारी कापडं चिंध्याच्या स्वरूपात भरणासाठी वापरली जायची. शिवण्यासाठी जाड दोऱ्याचा मोठा बंडल आणि चांगल्या लांबलचक पाच सहा सुया आईने आधीच आणून ठेवलेल्या असायच्या. अशी सर्व तयारी झाली की मग गोधडी शिवायला सुरवात व्हायची. 

             गोधडी शिवायची म्हटलं की आमच्या गल्लीतल्या कांतानानी , अंजनाआक्का, बायसामावशी, सुबाआत्या अशा चारपाच जणी जमायच्या. प्रत्येक वर्षी कोणाची ना कोणाची गोधडी असायचीच. सगळ्याजनी मिळून एकमेकींना मदत करून गोधडीचं कामं करायच्या. तीन हात रुंद आणि पाच हात लांब असा सर्व सामान्य गोधडीचा आकार असतो. यामध्ये उपलब्ध साहित्यानुसार आकार कमी अधिक होऊ शकतो. आई सुरवातीला खालचं पाल अंथरायची. त्यावर सर्व प्रकारच्या कापडांच्या निवडून ठेवलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या चिंद्या अंथरायची. हे करताना सगळीकडे जाडी सारखी राहील याची काळजी घेतली जायची. हे कामं ती अत्यंत काळजीपूर्वक करायची. या चिंद्या वाऱ्याने हलू नयेत म्हणून त्यावर छोटी लाकडं किंवा जड वस्तू ठेवायची. गोधडीचा आकार आणि जाडी याचे प्रमाण पूर्ण होईल इतक्या चिंद्या रचल्या की मग आई त्यावर वरचे पाल अंथरायची. अशा प्रकारे गोधडीचा पाहिला टप्पा पूर्ण व्हायचा. 

               दोन्हीही पालं मांडताना त्यांवरील नक्षी किंवा बाजूच्या किनारी नेमक्या जागेवर येतील याची आई पुरेपूर दक्षता घ्यायची. मग मोठ्या सूईत दोरा ओवून आधी चारी कडांवर लांब लांब टाके घालायची. नंतर मग आत सगळीकडे असेच लांब तुटक टाके घालायची. यामुळे गोधडी व्यवस्थित बांधली जायची. या कामासाठी आईला एक दोन लागायचे. अशी भरण पुरण झालेली ही गोधडी आई एका लांब काठीला गुंडाळून ठेवत असे. मग सर्वजणींचा मेळ बसवून गोधडी शिवायला घेतली जात असे. गोधडी शिवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. सर्व प्रथम गोधडीच्या खालच्या व वरच्या पालाच्या कडा आतल्या बाजूला मुडपून पाहिला टाका किंवा टीप घातली जाते. यास कडा दाबणे म्हणतात. हे काम अत्यंत दक्षतेने केले जाते. कडा दाबताना मध्ये घोळ राहू नये किंवा घुड्या पडणार नाहीत याची काळजी घेतली जाते. हा टप्पा चांगला झाला की गोधडी उत्तम साधलीचं असं समजायचं. 

                चार कडांना पाहिला टाका घातला की मग पहिल्या टाक्याच्या आत बोटभर अंतर सोडून दुसरा टाका घातला जातो. त्यामागोमाग मग एक बोट अंतरावर आतल्या बाजूने इतर टाके घातले जातात. पूर्ण चारी बाजूनी टीप टाकत तो टाका जिथून सुरवात झाली तिथंच पूर्ण व्हायचा. असे टाक्यांचे फेरे पूर्ण केले जायचे. अशावेळी चारजणी चार बाजूला बसून ती सुई टाके टाचत एकमेकींकडे पुढे सरकवत असत. कोपऱ्यावरचा काटकोनातला टाका घेताना मात्र शिवणारणीचे कौशल्य पणाला लागत असे. बेमालुमपणे तो टाका घातला जाई. टाके शिवले जात असताना पालावरील रंग, वेगवेगळे आकार आणि दोऱ्यांची शिवण यामुळे गोधडीला नवे नक्षीदार रुप प्राप्त होत असे. खरी कमाल तर शेवटी असायची. चार बाजूनी शिवण आत आत सरकत आल्यामुळे मध्यभागी एक चौकोनी आकार राहायचा. हा आकार शिवताना त्यास पोट लावणे असे म्हंटले जाते.  काही प्रदेशात हा भाग शिवण्याआधी मुहूर्त पाहून गोधडीची ओटी भरण्याचीही प्रथा आहे. अनेक वेळा गोधडीच्या मध्यावर दोन्ही बाजूला रंगीत चौकोनी किंवा कापनीच्या आकाराचे ठिगळही लावलेले आढळते. 

               अशा प्रकारे कित्येक वर्षाच्या जुन्या कापडांना नवा, सुंदर आकार आणि देखणं रुप प्राप्त व्हायचं. आणि जणू त्यांचा पूनर्ररजन्मच व्हायचा. अशी ही गोधडी पूर्ण करायला किमान आठ ते दहा दिवस लागायचे. गोधडी ही भारतीय संस्कृतीचे पारंपरिक अंथरून आणि पांघरूणाचे प्रमुख साधन आहे. गोधडी, वाकळ आणि लेपाटं अशा विविध नावाने ती ओळखली जाते. मानवी जीवनामध्ये गोधडीला महत्त्वाचे आणि मानाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून गोधडी मानवी संस्कृतीत सांस्कृतिक, भावनिक आणि पूनर्वापरदुष्ट्या अविभाज्य भाग असलेली दिसते. 

               भारतीय प्राचीन संस्कृतीत वैदिक काळात वस्त्र निर्मिती ही प्रामुख्याने हस्तनिर्मित हातमागावर आधारित होती. स्त्रिया कापडांचे तुकडे शिवून अपत्यासाठी मऊउबदार अंथरुण तयार करीत असत. पुढे त्याचेच गोधडीमध्ये रूपांतर झाले असावे.  गुप्तांचा काळ समृद्धीचा होता. त्यामुळे याकाळात नविन कपडे सहज उपलब्ध होत होते. पण गृहिणींनी जुने कपडे वापरून तयार केलेलीगोधडी घरातील गरजू, लहान मुलांसाठी वापरली जात. त्यामुळे याच काळात गोधडीला मातृत्वममता सुगरणपणा याचे प्रतीक मानले जात असे. नंतर मध्ययुगीन काळात ग्रामीण भागात स्त्रिया आपलीकलात्मकता गोधडीद्वारे व्यक्त करू लागल्या. सुशोभित शिवणकाम, भरतकाम याचा गोधड्यांमध्ये प्रवेश होत गेला.         

                ब्रिटिशकाळात कापड उद्योगामुळे जुन्या कपड्यांचे प्रमाण वाढले आणि गोधड्या मोठ्याप्रमाणात तयार होऊ लागल्या. आजी-आईकडून नातवंडांना दिली जाणारी गोधडी ही त्याकाळापासून एक भावनिक  संस्कृतिक परंपरा बनली. याचकाळात स्वदेशी चळवळीनंतर हस्तकलेला आणि हाताने तयार होणाऱ्या वस्तूंना प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे गोधडी ही स्वावलंबनाचं आणि स्त्रियांच्या कौशल्याचं प्रतीक बनली. याचं काळात काही स्त्रिया तर गोधडी विक्री करून घरखर्चास हातभार लावत असत. ‘गोधडी शिलाई’ ही कला म्हणून याकाळात ओळखली जाऊ लागली. 

                 स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक क्रांतीमुळे बाजारात विविध प्रकारची नवी तयार पर्यायी अंथरूणे सहज उपलब्ध होऊ लागली. याच काळात भारतीय लोकांचे जीवनमान आणि जीवनशैलीही बदलली. नोकरी व्यवसाय निमित्ताने कुटुंबं विखूरली गेली. त्यामुळे आई, आजीसह नातवंडांचा गोतावळाही विखूरला. शिवाय घरातील, बाहेरील व शेतातील कामाचे स्वरुपही बदलले. त्यातच हव्या तशा अंथरून पांघरूनाची सहज उपलब्धता व ते खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचीही अनुकूलता  यामुळे पारंपरिक गोधडी हळू हळू मागे पडत गेली. 

              आज  मात्र  ही पारंपरिक गोधडी अडगळीत पडलेली दिसते. विशेषतः हल्लीच्या या चमकोगिरीच्या युगात तर तिचं स्थान अगदीच गौण झालेलं आहे. घरी पाहुणे आल्यावर तर ती दिसणारच नाही अशी व्यवस्था केली जाते. खरं तर गोधडी म्हणजे  आपल्या घरातली संस्कृतीचा खजिना होय. आईच्या हाताने शिवलेली गोधडी म्हणजे केवळ घरीतील जुनी कपडे वापरून नव्याने वापरात आणलेलं साधन नव्हे, तर ती गोधडी म्हणजे पुनःपुन्हा जन्म घेणारी आठवण असते . आईच्या प्रेमाची उब आणि घराच्या ओसरी अंगणात जन्माला आलेली कलासंस्कृती होय. 

               गोधडी केवळ अंथरूण नसते तर ती  एक ‘टाकाऊ तून टिकाऊ’ अशा गृहसंस्कृतीची साक्ष असते. मानवी संस्कृतीच्या वैभवशाली काळाची ती साक्षीदार आहे. ती स्त्रीच्या सर्जनशीलतेचीकुटुंबप्रेमाची आणि पुनर्वापराच्या शहाणपणाची निशाणी असते. भारतीय पूनर्वापर संस्कृतीचा गोधडी उत्तम नमुना समजली जाते. ती कधीच वाया जात नाही. तिचं पाल अनेक वेळा बदलले जाते. शिवाय जेंव्हा तिला डोळे पडतात म्हणजेच ती: काहीशी जीर्ण होते, तेंव्हा तिचा वापर लेपाटं म्हणून केला जातो. हे लेपाटं एकदम एकजीव आणि मऊसूद असते. 

              याकाळात तर ते अधिकच ऊबदार असते. त्यामुळे ते बाळंतिनीच्या बाजेवर टाकले जाते. पुढे ते अनेक काळ घरातील लेकीबाळींच्या बाळंतपणात बाळ आणि बाळंतिनींना ऊब देण्याचे काम ते करते. त्यानंतर काही काळ लोटल्यावर ते झिजून झिजून जेंव्हा त्याचे लक्तर होते तेंव्हा ते कुंभाराकडे सुपूर्त केले जाते. गाडगी, मडकी, घागरी व माठ घडवताना ते मऊ मुलायम लक्तर खाली आधार देण्याचे काम करते. पुढे ते अधिकच जीर्ण होते तेंव्हा ते आवा पेटवण्याच्या कामी येते. अशा प्रकारे एका पिढीचे जीवन प्रतिनिधित्त्व करणारी ही गोधडी आपल्या अखेरच्या अंशापर्यंत उपयोगी ठरते. म्हणूनच गोधडी हे पुणत: स्व -समर्पणाचे उत्तम साधन आहे असे मला वाटते.

            गोधडी ही कौटुंबिक आठवणींचे आणि भावनांचे प्रतीक असते. ती आईच्या प्रेमाची उब आहे. लहान मुलांसाठी आजीने केलेली गोधडी ही एक जिव्हाळ्याची गोष्ट असते. ती घरातील स्त्रीच्याकलात्मकतेचा दाखला आणि कुटुंबाच्या आठवणींचा थर असते. प्रत्येक गोधडी ही काहीतरी कथा सांगते. तिच्या प्रत्येक तुकड्यात एक एक गोड आठवण लपलेली असते. घरातील सगळ्यांचे कपडे एकत्रितपणे तिच्यात गुंफले जातात. आई,  आजीने एकेक तुकडा हाताने सावकाश शिवून, प्रेमाने टाचून गोधडी साकारलेली असते. त्यातील प्रत्येक कापडाशी आपला स्नेह जुळलेला असतो. ते कसे, केंव्हा, कुठे, कोणी घेतले याबाबतच्या गोड स्मृती असतात. या स्मृती कलात्मक धाग्यांनी सुंदरपणे तिच्यात रेखलेल्या असतात. कधी काळी जेंव्हा तिला डोळे पडतात तेंव्हाही त्या डोकावणाऱ्या अवशेषातून त्या स्मृती पुन्हा नव्याने जाग्या होत होतात. स्मृतीशेष झालेल्या वा परिवारातून दूर गेलेल्या सदस्यांच्या आठवणीचं कोंदण गोधडीत दडलेलं असतं आणि कौटुंबिक भावनांचा उमाळा गोधडीत टाचून भरलेला असतो. 

              आईच्या हातून गोधडी घडणे म्हणजे एखादं भावगोफ विनणंचं असत.  एका पालावर  धोतराचा, तर दुसऱ्यावर अजून न फाटलेला पैठणीचा काठ असतो. त्या गोधडीच्या प्रत्येक शिवणीत एक स्मृती भरलेली असते, आई, आजी, आजोबा आणि घरातील कित्येकांची. गोधडी जरी जुन्या कपड्यांनी बनलेली असली तरीही तिच्यातील प्रत्येक तुकडा एक जीवंत आठवण घेऊन समोर उभा राहतो. आजंचीर, शालू, पैठणी, इतर साड्या, पंचे, फेटे यांचे तुकडे म्हणजे त्या घराचं वैभवचं गोधडीत साठलेले असे. गोधडी पिढ्यानंपिढ्यांचा वारसा संक्रमनाचे मोठे साधन असते. आजीकडून आईला आणि आईकडून मुलीकडे हा कला वारसा पुढे दिला जातो. गोधडी शिवताना स्त्री फक्त टाके टाकत नसते, ती संसाराचा एकेक थर गुंडाळते. एखादी आठवण खुणावते, डोळे पाणावतात, पण हात थांबत नाहीत. कारण या टाक्यांतून ती पिढ्यांना प्रेमसुरक्षा आणि आपुलकीचं आच्छादन देत असते. गोधडी एक कपड्यांची घडी नसते. ती असते काळाचं स्मरण. एका आईच्या, आजीच्या ममतेच्या हातांनी शिवलेली उबदार आठवण. ही फक्त शिवण नसते, तर ती काळाच्या नात्यांची गुंफण असते. त्यामुळेच गोधडी ही कौटुंबिक इतिहासाचा सुरेख वास्तुरूप ऐवज ठरते. 

              ही पारंपरिक गोधडी म्हणजे एक प्रकारची सांस्कृतिक हस्तकलाचं होती. गोधडीतून सांस्कृतिक व सामाजिक वीण गुंफली जात असे. यामध्ये स्त्रियांच्या कौशल्याला आणि कलेला एक व्यक्त होण्याचं व्यासपीठ मिळायचं. काही ठिकाणी गोधडीवर पारंपरिक कड्या, देवी-देवतांचे प्रतिकात्मक आकृतीचित्रे, सुबक भरतकामही केले जात असे. कपड्यांचचे वेगवेगळे आकार तिच्यावर रेखले जात असत. गोधडीतून शिवण्याच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द वाढीस लागत असे . शेजारणी एकमेकींच्या मदतीने हें काम पूर्ण करत. त्यानिमित्ताने सुख दुःखाच्या गप्पा गोष्टी होत असत. तसेच परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागत असे. घरी लग्न समारंभाच्या निमित्ताने नव्या सोयऱ्यासाठी गोधडी शिवण्याची प्रथा होती . यामुळे गोधडी बरोबरच स्नेहाचे धागेही भक्कम होत असत. भारतीय स्त्रीच्या जीवनातील एक सजीव आठवण म्हणून गोधडीचे स्थान आपल्या संस्कृतीत मोलाचे आहे. आजही ग्रामीण भागात गोधडीची परंपरा टिकून आहे. मात्र त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. 

             आज ग्रामीण महिला गटांनी व्यवसाय म्हणून गोधडी शिलाई सुरू केली. मात्र या गोधड्या मशीनवर शिवल्या जातात. आजच्या आधुनिक काळात गोधडी एक पारंपरिक हस्तकला म्हणून नावारूपाला आलेली दिसते. शहरी बाजारात हातावर तयार केलेली गोधडीला एक आकर्षक आणि पर्यावरणपूरक उत्पादन म्हणून मागणी आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, महिलांचे स्वयंसहायता गट, तसेच डिजाईन क्षेत्रातील लोकांनी गोधडी शिलाईला एक नवसाज दिला आहे. मात्र पारंपरिक गोधडीचा बाज या आधुनिक रूपातील गोधडीला नक्कीच नाही. आतल्या चिंद्या जरी घरातल्या वापरल्या तरी त्या नायलॉन, टेरिकॉट किंवा कृत्रिम धाग्यांच्या असतात. त्यातच इतके पटापट नवनवे कपडे वापरले जातात कीं त्यामुळे कपड्यांशी संबंधित स्मृतीच राहत नाहीत. आणि पालासाठी तर अलीकडे नवीनच किंवा मूळत: नक्षीदार साड्या वापरल्या जातात. त्यामुळे हा केवळ दिखाऊपणा ठरतोय. 

               आईच्या हाताने बेतलेल्या, शिवलेल्या गोधडीची ऊब आणि माया जिव्हाळा आजच्या गोधडीत जाणवतं नाही. आईच्या स्पर्शाची आणि संस्काराची घट्ट वीण तिच्या गोधडीत असते. आज आई नाही ...!  मात्र शेवटच्या तिच्या स्पर्शाची ऊब अजूनही माझ्या मनाच्या आत खोल कुठे तरी घर करून आहे. आई एक कलाकार होती, एक संस्कारक होती. तिने शिवलेली एक रंगीत गोधडी मात्र घरात आहे. माझ्या अंथरुणात आजही तिच्या हातांची  ती ऊब अजूनही साठवून ठेवलेली आहे.

              गोधडीत आठवणीच्या साठवणी लपलेल्या असतात. गोधडी जशी जीर्ण होतं जाते तासातश्या आठवणीचे रंगींबरंगी पदर खुलून येतात. तिला अंथरताना, पांघरताना, धुताना, वाळत घालतानाच्या सर्व आठवणी तिच्यात दडलेल्या असतात. गोधडी म्हणजे आईच्या कुशीतली झोप, आजीच्या मायेचा उबदार थर, आणि आयुष्याच्या आठवणींचं थरथरणारं वस्त्र असते. अशी गोधडी अडगळीत पडू देऊ नका, हरवू नका… ती जपून ठेवा.

                कारण गोधडी ही केवळ आठवणी जपणारी वस्तू नसून, ती आठवणी घडवणारी संस्कृतीआहे. या वैभवशाली संस्कृतीचं जतन व्हावं हीच अपेक्षा ! 


✍️ डॉ. अशोक शिंदे

मुधोजी महाविद्यालय, फलटण 

      

रविवार, ८ जून, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र.९ बाज

 बाज 

           संध्याकाळचं जेवण झालं की लगेचचं आबांची झोपण्याची तयारी सुरु व्हायची. ओसरीच्या भिंतीला एका अंगावर टेकवून ठेवलेली उभी ’बाज‘ ते अलगदपणे खाली ओढून चार पायावर आडवी टेकवायचे. हे काम ते एकटेच आणि सहजपणे करत असत. एकदा बाज टाकून झाली की मग आबा त्यावर एक घोंगडी अंथरायचे. ज्या बाजूला डोकं करायचे आहे त्या बाजूला एक उशी ठेवायचे. पायाकडच्या बाजूला चादर किंवा गोधडी असायची. आबांची झोपायची जागा तशी ठरलेली नसायची. कधी ते आत ओसरीत झोपायचे, तर कधी बाहेर अंगणात गोठ्याजवळ. जेंव्हा त्यांना अंगणात झोपायचं असेल तेंव्हा मात्र अंगणात बाज घेऊन जाण्यासाठी ते कोणाची तरी मदत घेत असत. या कामात कित्येक वेळा मी आबांना मदत करत असे. सकाळी उठल्यानंतर आबा आपले अंथरून पांघरून उचलायचे आणि नेहमी प्रमाणे नेहमीच्या जागी बाज ठेवली जायची. कित्येक वर्षांपासून आबा ही बाज वापरत होते. लाकडी सांगाडा आणि काथ्याच्या दोरीने विनलेली ती बाज अत्यंत मजबूत आणि देखणी दिसत असे. 

           आबांनी ही बाज बयाजी नानांकडून बनवून घेतलेली होती. बयाजी नाना म्हणजे आमच्या गावातील एक प्रसिद्ध लाकडी साधने, वस्तू बनविणारा कारागीर. घर, शेती आणि इतर कामासाठी लागणाऱ्या सर्व लाकडी वस्तू नानांच बनवायचे. आबांनी शेतातील जांभळीच्या लाकडाची ही खास  स्वतःसाठी बाज बनवून घेतलेली होती. नानांनीही आपली सर्व कला - कारागिरी ओतून ही बाज तयार केलेली होती. सुबक व रेखीव आकाराचे चार पाय आणि त्या पायांमध्ये तशाच प्रकारच्या घट्ट वसवलेल्या चार बगला यामुळे आबांजी ही बाज एकदम भक्कम झाली होती. नानांनी फक्त बाजेचा हा सांगाडा बनवला होता. या बाजेचे विणकाम मात्र आबांनी स्वतःचं केलेले होते. बाज विनण्याच्या कामात आमचे आबा चांगलेच पटाईत होते. 

           आबांकडे ही कला असल्यामुळे लोक आबांकडून बाज विणून घेण्यासाठी कायम आमच्या घरी येत असत. बाजेचा आकार हा सर्वसाधारणपणे सारखाच असतो. साधारणत: चार हात लांब आणि दोन हात रुंद असा बाजेचा आकार असायचा. त्यामुळे  पूर्वतयारी म्हणून आबा त्यांना विणण्यासाठी  आवश्यक असणारा काथ्या व दावं आणून ठेवायला सांगत असत. एकदा सर्व तयारी झाली की मग आबा ज्यांची बाज विणायची आहे त्यांच्या घरी जायचे. अशावेळी मी सुद्धा अनेक वेळा त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. प्रथम आबा मोकळ्या जागी किंवा अंगणात बाजेचा सांगाडा घ्यायचे. सुरवातीला आबा बाजेच्या लांब बाजूंवर पायापासून एक दीड फूट अंतर सोडून एक दोरखंड किंवा दावं बांधायचे. बाजेच्या एका बगलेपासून हे दावं गुंडाळत दुसऱ्या बगलेला गाठ देऊन बांधले जायचे. हे करत असताना दाव्याचे दोन्ही पदर एकमेकांशी गुंडाळले जात असत. त्यामुळे या दोन पदरांना भक्कमपणा यायचा. आता हे गुंडालेले दोन्ही पदर ताणून राहावेत म्हणून या  दाव्याला मध्यभागी एका लाकडी दांडक्याने पिळकावणे दिले जायचे. या लाकडी दांडक्याचे एक टोक दाव्याच्या पिळ्यात तर दुसरे टोक बाजेच्या आडव्या रुंद बाजूच्या बगलेत अडकवले जात असे. हे काम म्हणजे बाजेच्या विणीचा महत्वाचा टप्पा होय. एकदा हा टप्पा पार पडला की आबा बाज विणण्याच्या कामाकडे वळायचे. 

             प्रत्यक्ष बाज विणायच्या आधी काथ्याचा लांबलचक दोर एका लाकडी कांडकीला गुंडाळला जायचा. शक्यतो हे काम आबा तिथे यायच्या आधीच केले जात असे. आबा काथ्याची ती गुंडाळी घेऊन विणायला सुरुवात करत. प्रथम ते काथ्याच्या दोरीचे एक टोक आधी आडव्या बांधलेल्या दाव्याच्या एका बाजूला गाठ देऊन गठ्ठ बांधायचे. त्यानंतर मग हातात काथ्याची दोरी घेऊन बाजेच्या  बांधलेल्या टोकाच्या विरुद्ध कोपऱ्याच्या दोन्ही बगलांना दोन बोटं अंतर ठेऊन गुंडाळायचे. असे करताना ते आधी उजव्या बगलेच्या वरच्या भागावरून खाली काथ्याचा पदर ओढायचे आणि खालून पुन्हा त्याच पदराच्या वरून आढा देत डाव्या लांब बगलेच्या वरच्या भागावरून खाली ओढून पुन्हा वर घेऊन त्याच पदराला आढा देत असत. अशावेळी काथ्याचा दोर बाजेच्या पायाखालून हव्या त्या बाजूला घेतला जात असे. विरुद्ध कोपऱ्यातून काथ्याचा पदर जिथून सुरुवात केली त्या बाजूच्या कोपऱ्यात याच पद्धतीने ओवला जात असे. अशा रितीने बाजेचा पाहिला वेढा पूर्ण केला जात असे. असेच एकामागोमाग एक असे चार वेढे ओवले की बाजेची चार पदराची पाहिली वीण तयार व्हायची. नंतर दोन बोटं जागा सोडून दुसरी वीण केली जायची. 

           एकदा बाजेची पाहिली वीण झाली की,  मग मात्र आबा पटपट बाकी बाज विणायचे. बाज विणताना काथ्याची गुंडाळी खालच्या खाली इकडून तिकडे फेकली वा ओढली जात असे. कधी ती गुंडाली गरगर देखील फिरत असे. माझे त्या गुंडाळीकडेच अधिक लक्ष असायचे. उजवीकडून डावीकडे अशा रितीने बाज विनली जात असे. बाज विणत असताना आबा अधून मधून काथ्याचा दोराला ताण देत असत. शेवटी ज्या बाजूने विणायला सुरुवात केली गेली होती अगदी त्याच आडव्या दोराच्या दुसऱ्या बाजूला शेवटच्या विणीतील पदर गठ्ठ गाठ देऊन आबा बांधायचे. अशा रितीने बाजेची वीण पूर्ण व्हायची. मात्र ही वीण काहींसी सैल वा ढिली असायची. बाजेवर झोपल्यावर झोल पडू नये यासाठी आबा विणेला ताण द्यायचे. हा ताण देताना ते बोटाएव्हढी जाड सुती दोरी वापरत असत. ही दोरी प्रथम पिळा दिलेल्या दोरखंडाळा बांधून जवळच्या आडव्या बगलेत ओवून पुन्हा दोरखंडात ओवली जायची अशा रितीने एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे ही दोरी ओवली जात असे. अधिक ताण यावा म्हणून आबा तीन, चार वेढ्यांनंतर पुन्हा मागचे वेढे चाळवून घेत असत. शेवटी ओढून ताणून दोरीचे शेवटचे टोक बगलेच्या दुसऱ्या बाजूला असाडी गाठ देऊन बांधले की आबाचं कामं फत्ते होत असे. शेवटी पिळक्याचं लाकडी दांडके काढून घेत आबा बाजेवर स्वतः बसत आणि बाज पक्की झाल्याची खात्री करून घेत. 

            आवश्यक तेवढं सर्व साहित्य तयार असेल तर आबा अर्ध्या - पाऊण तासातच बाज विणून पुरी करायचे. बाज विणत असताना आबांची अनेक मित्रमंडळी गप्पा टप्पा मारत असत. आबांच्या या कलेचे सर्व जण तोंड भरून कौतुक करायचे. मात्र आबांनी या कलेचा आर्थिक स्वरूपात कधीच मोबदला घेतला नाही. बाज पूर्ण विणून झाली की मग सर्वांसाठी चहापान व्हायचे. हाच आबांसाठी खूप मोठा आनंद असायचा. आजपासून आपल्या ओसरीत वा अंगणात बाज टाकली जाणार या कल्पनेने बाजंचा मालक तर लई खुश असायचा. त्याकाळी बाज हे घरातले झोपण्यासाठी वापरली जाणारे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. आपल्या ग्राम संस्कृतीत बहुउद्देशीय पारंपरिक साधन म्हणून बाजेला मानाचे स्थान आहे. अनादी काळापासून आपल्या संस्कृतीत या बाजेचे अस्तित्व असल्याचे आढळून येते. 

            प्राचीन काळातील ‘बाज’ हे पलंगासारखे परंतु काहीसे वेगळ्या रचनेचे झोपण्याचे व बसण्याचे पारंपरिक साधन होते. याचा उपयोग केवळ झोपेसाठी नव्हे, तर धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक संदर्भांतही होत असत. वैदिक व उत्तरवैदिक काळात शय्या’, ‘आसन’, ‘पर्वतिका’ अशा संज्ञांचा उल्लेख वेद व ब्राह्मण ग्रंथांमध्ये आढळतो. झोपण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये लाकूड, काठी व दोऱ्यांनी तयार केलेली चौकट होती. तीच पुढे बाज म्हणून ओळखली जाऊ लागली असावी. याच काळात एक प्रकारचे उच्च शय्यासन‘ राजांकडे व ऋषी-मुनींकडे असायचे. बौद्ध-जैन कालखंडातील बौद्ध ग्रंथांमध्ये ’काठकं मंच‘ (लाकडी पलंग), ’पल्लङ्कं‘ (बाज) असे उल्लेख आहेत. याच काळात बाजेसदृश्य अशा लाकडी चौकट, दोरी व चटईसदृश झोपण्याची साधने वापरली जात होती. जैन साधूंच्या नियमांमध्येही अत्यंत साधी बाज वापरण्याचे संकेत दिले गेले होते. गुप्तकाळात दरबारांमध्ये  शाही मंडळींत ‘सुशोभित बाज’ वापरली जात असे. याकाळात काष्ठहस्तिदंत  सुवर्ण अलंकारांनी सजवलेली बाज राजांमध्ये प्रतिष्ठेचे मानलली जात असे. सामान्य लोक मात्र साध्या लाकडी चौकटीची म्हणजेच दोऱ्यांनी विणलेले बाज वापरत असत. 

           मध्ययुगीन काळात बाज हे साधन केवळ झोपण्यापुरते मर्यादित नव्हते. याकाळात  संत मंडळी बाजेचा उपयोग प्रवचन, भजन, बैठक अशा पारमार्थिक कार्यासाठी करत असत. याच काळात गावोगावी लाकूड व दोऱ्यांपासून स्थानिक कारागीर बाज तयार करीत. बाजेचे वैभवशाली रूप मोगल दरबारात आढळते. जडजवाहीर लावलेली  दिवाणखाना बाज मोगल कालखंडडात अस्तित्वात होती. याच मराठा सम्राज्यात किल्ल्यांमध्ये व वाड्यांमधील दरबारात व खासदारांच्या खोलीत बाज ठेवली जात असे. ब्रिटिशकाळात इंग्रजांच्या आगमनानंतर लोखंडी पलंग आले, पण ग्रामीण व मध्यमवर्गात पारंपरिक बाज टिकून राहिलेली होती.

            पुढे स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिकिकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे घरगुती वापराच्या अनेक वस्तूंसाठी अनेक पर्याय निर्माण झाले. हरित क्रांतीनंतर तर गाव- खेड्यातील सर्वच घटकांच्या जीवनमानात आमुलाग्र बदल होत गेला. पारंपरिक भारतीय ग्राम संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होऊ लागले. त्यामुळे हळू हळू घर व दैनंदिन जीवनातील नित्य नैमित्तिक साधने वा वस्तुंच्या जागी आधुनिक शैलीच्या वस्तू वापरल्या जाऊ लागल्या. त्यामुळे पारंपरिक लाकडी व काथ्या - सुती दोरांच्या बाजेलाही विविध पर्याय उभे राहिले. आज ओसरी - अंगणात दिमाखात ठाण मांडून बसलेली बाज कुठेतरी अडगळीत पडलेली दिसते. 

               बाजेला आपल्या संस्कृतीत खूप मानाचे स्थान आहे. भारतात प्राचीन काळापासून वापरली जाणारी बाज, चारपाई, खाट ही पलंगसदृश पारंपरिक झोपण्याची व बसण्याची अत्यंत महत्त्वाची साधने होती. आज ही सर्व साधने आपल्या अस्तित्वाच्या कडेलाटावर आहेत.  बाजेसह लोखंडी खाट आणि पलंगदेखील आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. लोखंडी खाटा तर अडगळीत गंजलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत. पलंगाचे स्थानही राजवाडा, देव - देवतांची मंदिरे यापुरतेच मर्यादित असलेले दिसून येत आहे. आणि बाज तर आज बाजूलाच पडलेलीच दिसत आहे. बाजेला धार्मिकसामाजिक  सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान असल्याचे दिसते. काही प्रदेशांमध्ये श्रीकृष्ण जयंती किंवा राम जन्म यासारख्या उत्सवांत बालमूर्ती झोपविण्यासाठी बाजेचा वापर करण्याची प्रथा आहे. विशेषतः मृत व्यक्तीला आंघोळ घालण्यासाठी बाज उपयोगी पडायची. तसेच प्राचीन काळी काही भागांमध्ये अंत्ययात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या तिरडीसाठीदेखील बाजेचीच वरची चोकट वापरली जायची. काही ठिकाणी तर लग्नात नवदाम्पत्य बसण्यासाठी सजवलेलली बाज वापरण्यात येत असे. स्त्रीच्या सासरी जाण्याच्या वेळीही तिचा सगळा संसार एका बाजभोवतीच गुंफलेला असायचा.

               बाज हे फक्त झोपण्याचे साधन नसून ती भारतीय संस्कृतीचापरंपरेचा आणिजीवनपद्धतीचा एक अविभाज्य भाग होती. 

बाजेमध्ये संवादशिस्तश्रद्धाआणि सौंदर्यबुद्धीचा संगम पाहायला मिळतो. बाज ही त्याकाळी ग्रामीण भागात सामाजिक संवाद व चर्चेची केंद्रबिंदू होती. सायंकाळी वा फावल्या वेळात लोक एकत्र येऊन बाजेवर बसून गप्पा मारत असत. पै - पाहुण्यांचे स्वागत वा आदरातिथ्य या बाजेवरच होत असे. बाळ आणि बाळंतीन यांच्यासाठी तर बाज संजीवनी असायची. आईप्रमाणेच बाजेबरोबरही बाळाची नाळ जुळली जात असे. बाजेखालून दिलेला शेक बाळ आणि बाळंतीनीसाठी खूप मौलिक असायचा. आई बरोबरच बाजेचीही ऊब बाळाला अनुभवायला मिळत असे. पुढं वाढत्या वयात वेळ मिळेल तेंव्हा घरातील लहानगे बाजेवर उड्या मारण्याचा मनसोक्त आनंद घेत असतं. आम्ही सुद्धा आबांचा वा मोठ्यांचा डोळा चुकवत बाजेवर उड्या मारण्याची मज्जा अनुभवली आहे. संध्याकाळचे जेवण झाल्यावर याच बाजेवर बसवून आबा आम्हाला छान छान गोष्टी, गमती- जमती सांगायचे.  कधी कधी आम्हाला बाजेवर झोपायलाही मिळत असे. तो आनंद तर काय वर्नावा! उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या वाळवणामध्येही गृहिणींना बाज अतिशय उपयोगी पडायची. सुगीच्या काळातही खळ्यावर बाज टाकली जायची. 

             आज नवसंस्कृतीचं युग अवतरताना दिसत आहे. घर आणि अंगण आज पूर्णत: बदलून गेलं आहे. सुंदर, सुरेख, टापटीप आणि सुव्यवस्थितपणाच्या अभिलषेपायी पारंपरिक साधने व वस्तू घरातून हद्दपार होऊ लागल्या आहेत. पारंपरिक लाकडी बाजेच्या जागी आज लोखंडी नायलॉनयुक्त बाजा आज सर्वत्र दिसत आहेत. आजच्या काळात फायबरचे पलंग, लोखंडी खाट, फोल्डिंग बेड यांनी ‘बाज’चे स्थान घेतले आहे. अशा आधुनिक डिझायनिंगमध्ये पारंपरिक बाजेचे पुन्हापुनरुज्जीवन होत आहे. काही शहरी घरांत इंटेरियर डिझाईनमध्ये पारंपरिक बाज शोभेचा भाग बनताना दिसतात. या नव्या रूपातील बाजा सुंदर, सुरेख, मजबूत, दणकट आणि आकर्षक आहेत; मात्र ओसरी अंगणात दिमाखात उभी असलेल्या काथ्या - सुताची बाजेची ऊब आणि रुबाब त्या देऊ शकतील का ? 

             एकेकाळी बाज हे आपल्या घराचं वैभव मानलं जात असे. बाज आपल्या संस्कृतीचा कला वारसा पुढे घेऊन जाणारे महत्वाचे साधन आहे. पारंपरिक लाकडी बाजांवर केलेले कोरीव काम, रंगकाम आणि विणकाम हे स्थानिक कारागिरीचा उत्कृष्ट नमुना मानले जात असे. विशेषत: हातानेविणलेल्या दोऱ्यांची बाज हा आपल्या विणकलेचा उत्कृष्ठ आविस्कार समजला जातो.  कला संस्कृतीसह कुटुंब संस्कृतीलाही खंबीरपणे पेलण्याचं आणि आधार देणाचं मोलाचं कामं बाज करत असे. बाज घरातील अनेक सुख - दुःखाच्या गोष्टींची साक्षीदार असे. दिवस उगवल्या पासून ते रात्रीअखेर आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मानवी जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनांची साक्षीदार असलेली ही बाज आज मात्र आपल्या जीवनातून पूर्णतः बाजूला होताना दिसत आहे. 

               आजच्या यंत्रयुगात या पारंपरिक साधनांना जपणे म्हणजे आपल्या संस्कृतिशी  जोडून राहणे होय. बाज जशी भूतकाळाची साक्षीदार आहे, तशीच ती आजही घराघरांत शांतीस्नेह आणिसौंदर्य यांचा आधारभूत गाभा असावी असे वाटते.  म्हणूनच ग्रामसंस्कृतीचे हे कला प्रतिक आज जपून ठेवणे गरजेचे आहे. बाज आज अडगळीत जातेय.  त्याबरोबर नानांची शिल्पकला आणि आबांची विणण्याची कलाही काही काळात अस्तंगत होईल. म्हणूनच ग्राम संस्कृतीचं हे कला वैभव, भारतीय संस्कृतीचा, श्रद्धेचा, प्रेमाचा आणि घरगुती संवादाचा आधार, कुटुंबाच्या संवादाचा आसरा,  ग्रामीण सौंदर्याचा एक जीवंत वारसा आणि पिढ्यानपिढ्यांना संस्कारांची शिदोरी देणारी ही बाज ओसरीत पुन्हा सजावी हीच अपेक्षा!


✍️ डॉ. अशोक शिंदे, 

प्राद्यापक, मराठी विभाग,

मुधोजी कॉलेज, फलटण

मोबाईल - ९८६०८५०३४४

शनिवार, २४ मे, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र. ८

 करंडा 

              आंघोळ झाल्यानंतर आई घरातच एका कोपऱ्यात आरसा, फणी आणि करंडा घेऊन बसायची. सुरवातीला आई केस विंचरत असे. आधी ती तीचे ओले केस एका जुन्या लुगड्याच्या धडूपाने सुकवत असे. केस सुकविण्याची तिची एक विशिष्ट पद्धती असे.  सुरवातीला काही वेळ ती केसांना धडुप गुंडाळून ठेवत असे. नंतर ती धडूपाने केस चोळून पुसून घेत असे. त्यामुळे केस कोरडे होत असत. नंतर मानेच्या एकेका बाजूला केस घेऊन धडुपाने त्यावर हलकेसे झटके देत असे. यामुळे केस मोकळे होत असत. नंतर दोन्ही हातांच्या बोटाने ती आपले केस सुटे सुटे करायची. केस मोकळे झाले की मग  लाकडी फणीने ती आपले केस विंचरत असे. यावेळी ती अगदी सहजपणे केसातील गुंता काढायची. नंतर फणीतील केसांचा गुंडाळा काढून ती डाव्या पायाचा अंगठा व शेजारच्या बोटाच्या चिमटीमध्ये घट्ट पकडून ठेवायची. मग केसांना विशिष्ट पद्धतीने पकडून दोन्ही हातांनी तिचा नेहमीचा अंबाडा ती बांधत असे. त्याला ती बुचडा म्हणायची.  अंबाडा बांधून झाला की मग आजूबाजुला पडलेले व पायाच्या अंगठ्याच्या चिमटीत धरलेले केस एकत्र करून ती वळचणीच्या बांबूत खोसून ठेवत असे.      

                 केस व्यवस्थित विंचूरून झाल्यावर आई आपल्या पदराने तोंड स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर करंडा उघडून त्यांच्या झाकणाला आतून लावलेले मेण बोटावर घेऊन कपाळावर नेहमीच्या जागी लावायची. मग आरसा समोर धरून उजव्या हातांच्या अरंगळी (करंगळी शेजारील बोट) व आंगठ्याच्या चिमटीत करंड्यातील कुंकू घेऊन ते कपाळाच्या मधोमध लावलेल्या मेणावर गोल आकाराचा टीळा भरायची. कपाळावर कुंकू लावल्यावर पदराच्या एका टोकानं ती लावलेले कुंकू अगदी गोल व रेखीव करायची. कुंकू लावायचा हा आईचा नित्यनेम होता. यामध्ये कधीही खंड पडला नाही. मी कित्येक वेळा आई कुंकू लावत असताना बारकाईने पाहीलेले आहे. तीचं कुंकू लावणं खूप निगुतीचं असायचं. यामध्ये तिला कसलीही घाई वा गडबड चालत नसे. अगदी सावकाशपणे तिचं हे कामं चालत असे. कुंकू लावून झाल्यावर पुन्हा एकदा डोक्यावरचा पदर व्यवस्थित करत ती भिंतीतल्या देवळीत आरसा, फणी व करंडा ठेऊन पुढच्या कामाला लागायची. आईचा हा करंडा म्हणजे माझी लहानपणापासूनची कुतूहल व औसुक्याची वस्तू. कित्येक वेळा कुंकू लावण्याच्या वेळी मी तिला हा करंडा नेऊन सुद्धा देत असे. 

               आईचा हा करंडा लाकडी व सुबक उभा लंबगोल आकाराचा होता. करंड्याचे दोन भाग होते. एक करंड्याचा मुख्य भाग. हा भाग म्हणजे एक प्रकारचा छोटा गोल आकाराचा डबाच होता. याचा तळाचा भाग पसरट तर तोंडाकडे तो निमूळता होत गेलेला होता. यामध्ये कुंकू ठेवले जात असे. दुसरा भाग म्हणजे करंड्याचे झाकण. या झाकणाच्या वर मध्यभागी एक छोटसं कळसाच्या आकारचं लाकडी कोरीव टोक बसवलेलं होतं. त्यामुळे झाकण एखाद्या टोपासारखे दिसत असे. या झाकणाच्या आतील खोलगट भागात मेण चिटकवून ठेवलेले असायचे. हे झाकण खालच्या कुंकवाच्या भागावर घट्ट बसावे म्हणून खालच्या भागाच्या तोंडाला एक खाच केलेली असे. एकदा का हे झाकण बसवले की आतील कुंकू अगदी सुरक्षित पेटीत ठेवल्याप्रमाणे राहत असे. आईचा हा करंडा म्हणजे वस्तूकलेचा एक सुंदर व सुबक नमुनाच होता. या करंड्याच्या झाकणावर व खाली तळाला दोन गोल रेघांच्या मध्ये कोरीव नक्षीकाम केलेले होते. साधाच पण अत्यंत देखणा असा हा करंडा आमच्या घरातील देवळीत देवासारखाच शोभून दिसत असे.

                 ‘करंडा’ ही पारंपरिक भारतीय संस्कृतीतील एक लहान पण महत्त्वाची वस्तू आहे. प्रत्येक घरात करंडा हमखास असतोच. भारतीय स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिक  असलेल्या कुंकवाचे पात्र म्हणून करंड्याला भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.  सौभाग्यचिन्ह असलेल्या कुंकवाच्या साठवणीसाठी वापरला जाणारा हा करंडा अनादी काळापासून विविध स्वरूपांत आपले अस्तित्त्व टिकवून असलेला आढळतो. भारतीय संस्कृतीच्या विविध काळात या करंड्याचे रुप व स्वरूप बदलत गेलेले दिसून येते. 

              वैदिक काळात स्त्रिया कुंकू, हळद यांसारख्या सौभाग्याचे प्रतिक असलेल्या पदार्थांचा  उपयोग करत. त्या काळी कुंकू ठेवण्यासाठी मातीचे किंवा शंख-धातूचे लहान डब्यासारखे भांडे वापरले जात असे. सिंधू संस्कृतीतील उत्खननांमध्ये लहान भांडी सापडलेली आहेत. ती हळदी कुंक ठेवण्यासाठी वापरली जात असावीत. प्राचीन काळात सौभाग्यचिन्हांना धार्मिक महत्त्व लाभलेले होते. या काळात धातू, माती, किंवा हस्तिदंतापासून करंडा तयार केला जात असे. याच काळात भरतमुनींचे नाट्यशास्त्र व कौटिल्याचचे अर्थशास्त्र यामध्ये  स्त्रियांच्या अलंकार सज्जतेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या उल्लेखांमध्ये अशा भांड्यांचा सूचक उल्लेख आढळतो. 

                पुढे मध्ययुगीन काळात  करंड्याला कलात्मक रूप प्राप्त झालेले दिसते. या काळात ग्रामीण भागात माती किंवा लाकडी करंडे वापरण्याची परंपरा होती; मात्र याच काळात राजघराण्यांमध्ये चांदी, पितळ किंवा सोने अशा मौल्यवान धातूंचे करंडे वापरले जाऊ लागले होते. यावर कोरीव नक्षीकाम, देवी-देवतांची प्रतिकं किंवा सौभाग्यचिन्हे कोरली जात होती. म्हणून या काळात करंडा ही केवळ सौभाग्याचेच नव्हे, तर सांस्कृतिक मूल्य असलेली वस्तू बनली होती. पुढे अर्वाचीन काळात करंडा हे पारंपरिक वारशाचे प्रतिक मानले  गेले. याच काळात लाकूड, धातू, काच यांचा वापर अधिक  वाढलेला दिसून येतो. काही करंडे तर लग्न, सण अशा विशेष समारंभांमध्ये भेटवस्तू म्हणून दिले जाऊ लागले. या काळात सांगली, कर्नाटक, विदर्भ अशा विविध प्रांतांमध्ये पारंपरिक लोककलांद्वारे सजवलेले करंडे प्रचलित होते.

                 स्वातंत्रोत्तर काही काळ करंडा ही कुंकवाची पारंपरिक डबी सौभाग्यवती स्त्रियांसाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली दिसते. या काळात काच, धातू, सिरेमिक, हस्तकला आणि आधुनिक डिझाइनसह विविध स्वरूपात करंडा उपलब्ध होता. मात्र स्वातंत्र्यानंतर देशात औद्योगिक क्रांती झाली. याकाळात अनेक लहान - मोठे सौंदर्य प्रसाधनं निर्मिती करणारे प्रकल्प उभे राहिले. अत्याधुनिक तंत्रज्ञान,  नाविन्याचा सोस आणि बदलती जीवनशैली यामुळे याकाळात आहार, विहार आणि आचार तथा राहणीमान यामध्ये कमालीचा बदल झाला. अलीकडील पंचवीस - तीस वर्षांत तर बहुतांश जण पाश्चात्य संस्कृतीचे अंगीकरण करताना दिसतात. आज पायाच्या नखाच्या रंगापासून ते केसांच्या रंगापर्यंत सर्वच प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा सर्रास वापर होताना दिसत आहे. स्त्रीचे सौभाग्य लेणं आणि अलंकार देखील यातून सुटलेले नाहीत. आणि कुंकवासाठी तर आज अनेक पर्याय उपलब्ध असलेले दिसतात. 

                 आज पन्नाशीच्या पुढच्याच काही ठराविक स्त्रियांच्या कपाळावर कुंकवाचा गोल रेखीव टीळा पहावयास मिळतो. अर्थात यास काही आदिवासी वा इतर जमाती अपवाद असू शकतात. मात्र ‘सौभाग्य लेणं’ ही देखील आज एक फॅशन झालेली दिसत आहे. पायातील जोडव्यापासून भांगातील बिंदीपर्यंतच्या स्त्री - सौभाग्याच्या सर्वच अलंकारात आज पारंपारिक आणि आधुनिकतेचा नावीन्यपूर्ण शैली आविष्कार पहावयास मिळतो. आज सवाष्ण किंवा धार्मिक व सांस्कृतिक कार्यातच कुंकूवाचा वापर होताना दिसत आहे. काळ बदलतो आहे. स्त्री घराबाहेर आपली क्षमता सिद्ध करत आहे. नोकरी, उद्योग, व्यापार या सर्वच क्षेत्रात स्त्रीया आघाडीवर आहेत. त्यामुळे स्थळ, काळ व परिस्थितीनुरूप स्त्रियांना आपली संस्कृती व परंपरा सांभाळण्यास मर्यादा येत आहे. तरीही पारंपारिक प्रतिकांसाठी आजची स्त्री सकारात्मक व कटिबद्ध असलेली दिसते. त्यामुळेच ती आज पर्यायी साधनांचा वापर करताना दिसत आहे. या विचारातूनच कुंकुवाला देखील आज पर्याय निर्माण झालेला दिसत आहेत. 

                आज बहुतांश स्त्रीया कुंकवाऐवजी ‘टिकली’ या पर्यायाचा अवलंब करताना दिसतात. सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानात विविध आकाराच्या टिकल्या आता उपलब्ध आहेत. विविध रंगांमध्येही त्या उपलब्ध आहेत हे वेगळं सांगायला नको. परंतु अहेवपणाचं आणि सौभाग्याचं प्रतिक असलेले कुंकू मात्र आज दुर्मिळ झालेलं दिसत आहे. आज केवळ एखादा धार्मिक विधी, सण, सांस्कृतिक व कौटुंबिक उत्सव, सवाष्ण वा ओटीभरण अशा समारंभातच हळदी - कुंकवाचा वापर होताना दिसत आहे. अशा समारंभात आज करंड्याचं दर्शन होते. मात्र करंडा देखील आज नवनव्या रंगरूपात आविष्कृत झालेला दिसत आहे. 

                   आधुनिक आणि नाविन्याच्या तथा फॅशनच्या या युगात पारंपारिक लाकडी करंडा मात्र अस्तित्वाच्या कडेलोटावर असलेला दिसतोय. आज घरांमध्ये विविध काच, धातू, सिरेमिक, हस्तकला आणि आधुनिक डिझाइनसह विविध रंग, रूप व आकर्षक आकारात कोरीव नक्षीकाम केलेले करंडे दिसतात. मात्र यातून परंपरा व संस्कृतीपेक्षा श्रीमंतीचं व प्रतिष्ठेचेचं अधिक दर्शन घडवले जात आहे. पारंपारिक लाकडी करंडा हा आपल्या लोकसंस्कृतीच्या वैभवाचं प्रतिक आहे. भारतीय स्त्रीची पतिनिष्ठा आणि तिच्या कौटुंबिक सौख्याचा तो साक्षीदार आहे. भारतीय लोकसंस्कृतीत करंडा ही केवळ घरातील एक वस्तू नसून तो स्त्रीच्या सौंदर्य, श्रद्धा आणि परंपरेचा वारसा आहे. करंड्याच्या रूपात आपणास आपला इतिहास, समाज, धर्म आणि कला यांचा संगम दिसतो.

                  पूर्वी हा करंडा देवळीत, फरताळात किंवा देवघरात असायचा. आता विभक्त कुटुंबामुळे तर तो बहुतांश घरात दिसतच नाही. पूर्वी नात, आई आणि आजी एकच करंडा वापरत असत. मुलीच्या लग्नात तिला करंडारूपी सौभाग्याचं लेणं देऊन सुवासिनीचा वसा जपला जात असे. ती देखील हाच सवाष्णतेचा वारसा पुढच्या पिढीला प्रदान करत असे. आजही लग्नात करंडा दिला जातो मात्र त्यामध्ये लोककला आणि हस्तकलेचे रूप दिसत नाही.  अशातच काही प्रादेशिक रीती - रिवाज, रूढी - परंपरेत वैविध्य तथा वेगळेपण असलेले दिसते. काही प्रदेशात स्त्रीला अहेवमरण आल्यास तिच्यासमवेत तिचा करंडा देण्याची प्रथा असल्याचे दिसते. त्यामुळे बहुतांश घरातून असे करंडे कमी होत आहेत. अशा पारंपारिक आणि आधुनिक,  तंत्रज्ञानयुक्त तथा नाविन्याच्या या गडद युगात पारंपारिक लाकडी करंडा दिसेनासा होताना दिसत आहे. 

                   आज ज्या घरात लाकडी करंडा आहे तेथे तो कुठेतरी अडगळीत पडलेला आहे. पारंपरिक कार्यक्रमाच्या वेळी मात्र आधुनिक नव्या शैलीचा करंडा वापरला जात आहे.  आमच्या घरात आईचा तो करंडा मात्र अजूनही आहे. अखेरपर्यंत आई तोच करंडा वापरत होती.  आई सवाष्ण गेली. जातानाही तिच्या कपाळावर त्याच करंड्यातील कुंकवाचा ठळक टीळा होता. आज आईला देवघरात येऊन महिना उलटला आहे. आई नेहमी सांगायची  ‘’करंडा बाईच्या स्त्रीत्वाचा जणू आरंभबिंदूच असतो. तिच्या नव्या आयुष्याचं, नव्या नात्यांचं प्रतिक म्हणजे करंडा असतो. आईच्या बोलण्यातून ‘करंडा म्हणजे फक्त हळद-कुंकवाची डबी नव्हे. तर तो एका स्त्रीच्या संपूर्ण आयुष्याचा, तिच्या आशा-अपेक्षा-श्रद्धांचा आणि मांगल्याच्या प्रवासाचा साक्षीदार आहे‘ असे सतत जाणवतं असे. आज आईच्या त्या करंड्याची तांबड्या काळ्या पॉलिशची थोडी झीज झालेली आहे , पण त्यावरची साधी नक्षी अजूनही साजिरी वाटते. जेंव्हा  त्याच्याकडे नजर जाते, तेव्हा आठवते ती माझ्या आईची शांत मुद्रा. मऊ नऊवारी सुती साडी नेसलेली, कपाळावर गडद कुंकवाचा ठसठशीत टिळा, आणि हातात तो करंडा घेतलेली आईची सात्विक सतेज मूर्ती. 

                करंडा म्हणजे केवळ लोकसंस्कृतीतील पारंपरिक सौभाग्याचं मूळ लेणं असलेलं कुंकू ठेवायची लाकडी डबी नसते; तर करंडा म्हणजे अनेक पिढ्यांच्या सण, पूजा- अर्चा, संकल्प आणि ओवाळणीच्या आठवणींचा साठा असतो. करंडा हे फक्त सवाष्ण तेचे साधन नसते, तर तो एक श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्त्रीत्वाचा कोमल साज असतो. कुळातील स्त्रियांच्या पवित्र आणि मंगल परंपरेचा तो पिढ्यानंपिढ्याचा साक्षीदार असतो. करंड्याच्या झाकणाखाली फक्त कुंकू नसतं. तर त्यामध्ये आपल्या कुळातील स्त्रीची शांतता, तिच्या आयुष्याची ओळख, तिच्या प्रेमाची आणि श्रद्धेची ओढ असते. करंडा हा स्त्रीच्या जीवनात तिच्या सौंदर्य, श्रद्धा, संस्कृती, आत्मभान आणि कुटुंबमूल्यांचा मंगल संगम घडवतो. तो स्त्रीच्या ‘सौभाग्यवती’ अस्तित्वाचे नाजूक पण अत्यंत सशक्त प्रतिक असतो. 

                 आज ज्या घरात हा करंडा आहे तिथं आजही समस्त सवाष्णतेचा वास जाणवतो. म्हणूनच आपल्या घरातील कौटुंबिक सौख्य समृद्धीचा व पवित्र स्मृतिंचा साक्षीदार असलेला हा लाकडी करंडा अडगळीत न पडता माजघरात दिमाखात दिसावा हीच अपेक्षा!   


डॉ. अशोक शिंदे

प्राध्यापक, मराठी विभाग, 

मुधोजी महाविद्यालय, फलटण 



मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

अडगळीतील समृद्धी - लेख क्र. ७ - गंज

 गंज 

            खळ्यावरील धान्याची रास एकदाची कणगीत पडली की मग गंज रचायच्या कामाला सुरुवात होत असे. याकाळात उन्हं चांगली चटकत असतात. त्यामुळं कडबाही चांगलाच वाळतो. शिवाय याच दिवसात रानं - शिवारं  उघडी, मोकळी झाली असल्यामुळे वारा - वावटळीही सुरू होतात. तसेच अधून मधून एखादा अवकाळीही बरसण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर कडबा रचून मोकळं व्हायचं या विचाराने संभाजी आबा गंजीच्या कामाला लागत असत. संभाजी आबा ही आमच्या गावातील तशी मोठी आसामी. दरवर्षी आबाचा चाव्हरातला एखादा तरी नंबर जोंधळ्याच्या असायचाचं. त्यासाठी आबांकडं दोन - चार खोतकरीही हमखास असायचे. खळं उरकलं की मग कडबा खराब होऊ नये म्हणून आबाची गंजीसाठी एकच घाई चालायची. 

               गंज नेहमी गोठ्याच्या जवळच रचली जाते. सुरवातीला खळ्यावरचा सर्व कडबा गोठ्याच्या परिसरात आणला जातो. खळं जर गोठ्याजवळ असेल तर या कडबा तिथेच गंजीला लावता येत असे. मात्र खळं दूर असेल तर बैलगाडीने हा सर्व कडबा गंजीच्या ठिकाणी वाहून आणावा लागत असे. आबांचं खळं वस्तीजवळच असल्यानं बैलगाडीची गरज पडत नसे. आबा सर्वप्रथम गंजीची जागा निश्चित करायचे. मग ती जागा सपाट व स्वच्छ केली जात असे. नंतर आबा दोन तीन गड्यांच्या मदतीनं खळ्यावरचा सर्व कडबा त्या जागेभोवती आणून घेत असत. हा कडबा ठेवताना समान उंचीच्या तथा लांबीच्या पेंढ्याचे ढीग करून ठेवले जायचे. यासाठी खुडणी चालू असतानाच खळ्याच्या परिसरात खुडलेल्या पेंढ्यांच्या ज्या बुचड्या लावल्या जातात. या बुचड्या जमिनीवर उभ्या करताना समान उंचीच्या आठ - दहा पेंढ्यांचे शेंडे जुळवून गोल आकारात त्या उभ्या करून ठेवल्या जातात. गंजीच्यावेळी या उभ्या केलेल्या बुचड्या वाहून आणून त्यांचे गंजीच्या जागेभोवती ढीग लावले जात असत. अशी सर्व पूर्वतयारी झाल्यावर मग गंज रचण्याला सुरुवात व्हायची. 

           गंज रचने हे कौशल्याचे काम असते. गंज रचणाऱ्या कलाकाराला गंजाड्या असं म्हटलं जात असे. आमचे वडील गंज रचण्यात एकदम तरबेज होते. शिवाय ते आबांचे नेहमीचे खोतकरू. त्यामुळे गंज रचण्याचे काम दरवर्षी आमच्या वडिलांकडेच असायचे. गुडाची संख्या, पेंढ्यांचा आकार व उंची यावर गंजीची लांबी, रुंदी व उंची अवलंबून असते. हे सगळं गणित विचारात घेऊन भाऊ गंज धरायचे. गंजीचा आकार खालून वर पर्यँत चारही बाजुंनी निमूळता होत जातो. त्यामुळे गंज एखाद्या दडगोलाकार शंकुप्रमाणे टुमदार दिसते. अशा आकाराच्या वीस ते पन्नास फूट  लांबी, आठ ते दहा फूट रुंदी आणि पंधरा ते वीस फूट उंची असलेल्या अनेक गंजी त्यावेळी सर्वत्र दिमाखदारपणे उभ्या असलेल्या दिसायच्या. मोठा जमीनदार असेल तर त्यांच्या वस्तीवर अशा दोन - दोन, तीन - तीन गंजी देखील लावलेल्या दिसत असत. आबांकडे देखील अशाच आकाराच्या किमान दोन गंजी दरवर्षी रचल्या जायच्या. गंज नेहमी खालतं - वरतं (पूर्व - पश्चिमअशी रचली जाते. त्यामुळे वारा, वादळ किंवा काव्हरामध्ये गंज दमदापणे उभी राहत असे. 

              गंज रचायला सुरुवात करताना भाऊ पहिल्यांदा तिचा पाया तयार करायचे. या पायावर म्हणजेच गंजीच्या खालच्या पुष्ठभागावर गुडघाभर उंचीचं पाचरट, सरमाड किंवा चघाळ अंथरलं जायचं. यामुळे भर पावसात गंजीच्या कडब्यापर्यंत जमिनीचा थेटवा पोहचत नसे. नंतर भाऊ गंजीचा पाहिला थर रचायला घ्यायचे. या थरात गंजीची रुंदी व लांबी निश्चित होत असे. या थराला कडब्याच्या सर्वात उंच पेंढ्या लावल्या जात असत. या थराची सुरुवात पेंढ्यांची बुडखे दक्षिणेकडे आणि शेंडे उत्तरेकडे अशा रितीने पूर्वेकडून पश्चिमेकडे पेंढ्या मांडून केली जाते. आता हाच पहिला थर पुन्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे पेंढ्या मांडत पूर्ण केला जात असे. मात्र या वेळी यावेळी पेंढ्यांचे बुडखे उत्तरेला व शेंडे दक्षिणेला केले जायचे. तसेच उत्तरेकडे शेंडे असलेल्या दोन पेंढ्यांच्या मध्ये या बाजूच्या पेंढ्या रचल्या जात असत. यामुळे दक्षिणोत्तर अशा दोन्ही दिशांना कडव्याची बुडखे येत असत. अशा रितीने पूर्वेकडून पश्चिमकडे आणि पुन्हा पश्चिमेकडून पूर्वेकडे पेंढ्या रचून गंजीचा पहिला थर पूर्ण होत असे. 

           दुसऱ्या थराची सुरुवात भाऊ पश्चिमेकडून करत असत. या थरालाही उंच पेंढ्याचं वापरल्या जायच्या. मात्र या थराच्या पेंढ्यांची बुडखे पश्चिमकडे केली जात असत. उत्तरेकडून दक्षिणेकडे या थराच्या पेंढ्या लावल्या जायच्या. या थराला गंजीच्या रुंदीइतक्याच पेंढ्या बसायच्या. पुन्हा अशाच प्रकारे पूर्वेकडे बुडखे व पश्चिमेकडे शेंडे करून पूर्व बाजूचा थर लावला जायचा. गंजीचा हा दुसरा थर लावताना पूर्व - पश्चिम बाजूला पेंढ्यांची बुडखे येतील अशी योजना केली जात असे. मात्र गंजीची लांबी जर पूर्व - पश्चिम बाजूने लावलेल्या पेंढ्यांच्या लांबीपेक्षा जास्त असेल तर दुसऱ्या थराच्या दोन्ही बाजूंनी रचलेल्या पेंढ्यांच्या शेंड्यांमध्ये मोकळी जागा राहत असे. शक्यतो प्रत्येक गंजीच्या दुसरा थर हा असाच असायचा; कारण कडब्याच्या उंचीच्या दुपटीपेक्षा गंजीची लांबी अधिकच असायची. या मधल्या मोकळ्या जागेत भाऊ पुन्हा पहिल्या थराप्रमाणे दक्षिण व उत्तरेला बुडखे येतील अशा पेंढ्या रचत असत. अशाप्रकारे  या दोन्हीही थरांची बुडखे ही चारही दिशांना लागलेली असायची. असे हे दोन थर रचले की गंजीची एक वीण पूर्ण होत असे. अशारितीने मग ही समान उंचीच्या सर्व पेंढ्याची दोन थरांची वीण एकावर एक विनत  भाऊ गंज वर रचत जायचे.        

               साधारणत: गंजीच्या मध्यापर्यंत किंवा त्यापेक्षा थोड्या उंचीपर्यंत अशा उंच तथा लांब पेंढ्यांच्या थरांची वीण रचली जायची. हे थर लावत असताना गंजीची रुंदी व लांबी थोडी - थोडी वाढेल अशी योजना भाऊ करत असत. यामुळे गंज मध्यभागी काहीशी फुगीर होत असे. गंजीच्या वरचा भागाला चहुबाजूंनी निमुळता आकार यावा  म्हणून ही योजना असायची. याकामात गंजाड्याचा अनुभव व कौशल्य कामी येत असते. गंजीचा हा पाहिला टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या टप्प्यात गंजीला आकार देण्याबरोबरच गंजीचा तोलही राखला जाईल याची दक्षता घ्यावी लागते. अन्यथा वारा, वादळात गंज ढासळण्याची शक्यता असते. शिवाय या टप्यात वेळोवेळी सर्व थरांची बुडखे एकसारखी दिसतील अशी रचना करावी लागते. यासाठी गंजाड्या चोपणी किंवा ठोकणीचा वापर करत असतो. गंज अशी अगदी चाहूबाजुंनी घट्ट झाल्याने पावसात देखील कडबा भिजत नसे. 

                   नंतर गंजीचा दुसरा टप्पा सुरु होत असे. या टप्प्यात कमी उंचीच्या किंवा आखूड पेंढ्यांचे थर रचले जातात. हे थर देखील खालील थरांप्रमाणेच रचले जातात. मात्र हे थर रचताना कमी लांबीच्या पेंढ्या वरच्या थराला राहतील अशी काळजी भाऊ घेत असत. हे थर वर जाताना गंजीची उंची वाढत जाते मात्र रुंदी हळूहळू कमी कमी होत जाते. यामुळे गंज चारही बाजूंनी निमुळती होत जाते. या आखूड पेंड्यांच्या निमुळत्या होत जाणाऱ्या थरांना ‘लांडे’ थर असे म्हटले जाते. हे थर रचताना मात्र गंजाड्याचं पूर्ण कसब पणाला लागते. गंजीचा आकार आणि उरलेला कडबा यांचा मेळ घालत भाऊ या थरांची रचना करत असत. हा टप्पाही चहूबाजूंनी चोपून काढला जायचा. या टप्यातचं खरी गंज आकराला येई. आखूड पेंढ्या संपल्यावर शेवटचा टप्पा म्हणजे अतिआखूड पेंढ्याची रचना करणे होय. 

             गंजीचा हा तिसरा टप्पा खूप महत्वाचा असतो. या टप्प्यात अगदी मोजक्याच पेंढ्या रचायच्या असतात. या टप्यात गंजीची लांबी व रुंदीही बरीच कमी झालेली असते. अगदी तीन - चार पेंढ्या बसतील एवढीच गंजीची रुंदी राहिलेली असते. या थरात बुडं पश्चिमेकडे व शेंडा पूर्वेकडे येईल अशी रचना केली जाते. सुरुवातीला बुडं पश्चिमेकडे येतील अशा पेंढ्या लावल्या जातात. या पेंढ्यांच्या अर्ध्यातून पुढे पुन्हा पुढच्या पेंढ्या लावल्या जातात. अशारितीने शेवटच्या थराचे शेंडे पूर्व बाजूच्या कडेवर पोहचे पर्यंत पेंढ्या लावल्या जातात. शेवटी पूर्व बाजूकडे बुडखे येतील अशारितीने शेवटच्या पेंढ्या लाऊन भाऊची गंज पूर्ण व्हायची. या शेवटच्या वरच्या थराला सरडा थर म्हटले जाते. या थरामुळे गंजीचे तोंड बंद होते. यानंतर वरच्या थरावर पाचरट किंवा सरमाड टाकून शेवटी गंज शेकारली जायची. त्यावर काही लाकडाचे ओंडकेही ठेवले जायचे. शेवटी अधिक दक्षता म्हणून गंजीच्या उजव्या - डाव्या बाजूला प्रत्येकी दोन खुंट्या ठोकून गंजीवरून दोर किंवा तारा ओढून त्यांना बांधल्या जायच्या. अशारितीने गंज पूर्ण करूनच भाऊ खाली उतरायचे. काही भागात चिखलाने देखील गंजीचा वरचा भाग लिंपण्याची पद्धत आहे. एखाद्या वेळी गंजीला आग लागली तर चिखलाच्या लेपामुळे ती अधिक वेगाने धुसमत नसे. आगीवर lakrcनियंत्रण आणता येत असे.

             गंजीचे हे काम किमान दोन - तीन दिवस चालायचे. उन्हाचा कडबा कडक होत असल्यामुळे थर रचताना अडचण येई. त्यामुळे सकाळ सायंकाळच्या वेळात पेंढ्या सादळायच्या त्यामुळे हे काम उरकलं जायचं. या कामात भाऊंना दोन तीन गड्यांची मदत व्हायची. दोघे जण कडबा वाहून आणायचे. तर एक जण नेमक्या आकाराच्या व उंचीच्या पेंढ्यांची बुडखे जमिनीवर आपटून सपाट करत भाऊंकडे फेकायचा. गंज जसजशी वरवर जाईल तसतशा पेंढ्या उंच फेकाव्या लागत असत. कधी कधी तर सीडी किंवा बैलगाडीच्या साटीत उभा राहून पेंढ्या द्याव्या लागत. त्यामुळे गंजाड्या प्रमाणेच याकामी हा गडीही चलाख व हुशार असावा लागतो. तसेच कडबा वाहणारे देखील तितकेच जाणकार असावे लागतात. नंतर चाऱ्यासाठी गंज खोलताना गंजीचा शेवटचा थर आधी काढला जातो. मग हळूहळू उलट्या क्रमाने गंज अगदी सहजतेने उलगडत जाते. अगदी शेवटचा थर उपसून घेईपर्यंत ही वीण सहज उसवत जाते. अगदी शेवटच्या थरापर्यंत गंज ठामपणे व दिमाखात उभीच असते. एकदा रचलेली गंज ढासळलेली मला तरी कधीच दिसली नाही. हेच तर खरे गंजाड्याचे कसब असते. अशी ही गंज सर्वांच्या सहकार्य आणि सहयोगातूनच पूर्णत्वाला जात असे. बाजरी आणि भाताच्या वा गवताच्या पेंढ्याची मात्र गोल सुडी लावली जाते. या सुड्याही खूप भक्कम असतात. मात्र त्या फार दिवसासाठी नसतात. ज्वारीची गंज मात्र खूप काळ टिकून राहते. अशी ही गंज एकदाची पूर्ण झाली की मग मात्र आबांचा जीव भांड्यात पडत असे. कारण गंजीमुळे जनावरांच्या वैरण वा चाऱ्याची चिंताच दूर होत असे. वर्ष दीड वर्ष सर्वच जनावरांना स्वादिष्ट व रूचकर कडवा खायला मिळायचा. जनावरांसाठी चारा साठवण म्हणून गंज अत्यंत महत्वाची चारारचना पद्धती आहे. भारतीय कृषी संस्कृतीत गंज ही अत्यंत उपयुक्त चारासाठवण मानली जाते. भारतीय कृषी संस्कृतीत गंजीला प्राचीन परंपरा देखील असलेली दिसते . 

            भारतात प्राचीन काळापासून शेती आणि पशुपालन हे परस्परपूरक घटक राहिले आहेत. गुरांसाठी आवश्यक असणाऱ्या कोरड्या चाऱ्याच्या साठवणीसाठी ‘गंज’ ही पारंपरिक पद्धत वापरण्यात येत होती. जमिनीवर चारा ठेवून त्याची शास्त्रशुद्ध रचनेत साठवण करण्याची ही एक नैसर्गिक आणि टिकाऊ पद्धत होती. गंज तयार करण्याच्या पद्धती भौगोलिक परिस्थिती, हवामान, शेतकऱ्यांची जीवनशैली आणि काळानुसार बदलत गेलेल्या दिसतात. वैदिक व प्राचीन काळात ऋग्वेद, अथर्ववेद आणि गृह्यसूत्रांमध्ये गोपालनाचा उल्लेख आढळतो. त्यामुळे गायी-म्हशींसाठी चारा साठवण्याची गरज होती हे लक्षात येते. या काळात गवताच्या ढिगांवर माती, पालापाचोळा किंवा गवताच्या चटया टाकून गंज तयार केली जात असे. गंज पावसाळ्यात वाहून जाऊ नये म्हणून त्याभोवती काटेरी झुडुपे किंवा लाकडी कुंपण घालण्याची पद्धतही याकाळी होती. काही ठिकाणी गवताचा साठा उंचावर ठेवण्यासाठी लाकडी खांबांचा आधार घेतला जात असे.

              मौर्यकाळात शेती अधिक प्रगत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुपालन आणि चारा साठवणीच्या पद्धती विकसित झालेल्या दिसतात. याकाळात गंज ही जमिनीवर वर्तुळाकृती किंवा चौकोनी स्वरूपात ठेवली जात असे आणि त्यावर थर देऊन संरक्षण केले जाई. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ‘गंजागार’ असा उल्लेख आढळतो. गुप्तकाळात पशुपालन हे कृषीसंस्कृतीचा अविभाज्य घटक झाले होते. विटांच्या भिंती किंवा बांबूंच्या चौकटीत चारा  ठेवण्याची पद्धत लोकप्रिय झाली. अशी गंज ओलसर होऊ नये म्हणून त्यावर शेण आणि मातीचा थर दिला जात असे. याकाळात शासकीय स्तरावर ‘गंजागृहे’ विकसित केली गेली होती. मध्ययुगीन कालखंडात गंज साठवणीच्या पद्धतीत अधिक सुधारणा करण्यात आलेल्या दिसतात. मुघल आणि मराठा साम्राज्यात चाऱ्याच्या साठवणीसाठी मोठी गंज तयार करण्यात आली. विशेषतः मराठा साम्राज्यात मोठ्या गोठ्यांसाठी जमिनीवर चाऱ्याचे ढीग तयार करून त्यांना दोरखंडांनी बांधून ठेवले जात असे. गंज पावसाळ्यात खराब होऊ नये म्हणून त्यावर कडबा, पालापाचोळा, विटांचे आवरण किंवा टीनपत्रे ठेवण्यात येत असत. याकाळात ग्रामीण भागात गव्हाणीमध्ये चारा संरक्षित ठेवला जात असे. 

           ब्रिटिशकाळात पारंपरिक गंज साठवणीच्या पद्धती जरी अस्तित्वात होत्या, तरी आधुनिकतेच्या प्रभावाने काही सुधारित पद्धती वापरण्यात येत होत्या. काही ठिकाणी दगडी किंवा लोखंडी पत्र्याच्या शेडखाली गंज तयार केली जात असे. मोठ्या मालकाच्या शेतांमध्ये कोरडा चारा जास्त काळ टिकावा यासाठी चाऱ्याचे गठ्ठे करून त्यावर प्लॅस्टिक वा कापडाचे आच्छादन केले जात असे. या काळात गहू, ज्वारी, बाजरी आणि गवताच्या पेंढ्या वेगवेगळ्या गंजींमध्ये साठवण्याची पद्धतही विकसित झाली होती.

            स्वातंत्र्योत्तर काळात पारंपरिक गंज अजूनही ग्रामीण भागात अस्तित्वात असल्याचे दिसते. मात्र तीचे  स्वरूप अधिक सुधारित झाले आहे. काही ठिकाणी सिमेंटच्या भिंती असलेल्या गंजींचा वापर केलेला दिसतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज ‘सिलेज’ पद्धतीही प्रचलित झाली आहे. या  पद्धतीत प्लास्टिकच्या आच्छादनाखाली चारा साठवला जातो. मोठ्या डेअरी फार्ममध्ये लोखंडी स्टोअरेज आणि शेड असलेली गंज वापरण्यात येते. अशा प्रकारे विविध काळात गंजीची रचना बदलत गेलेली दिसते. परंतु यामुळे पारंपरिक गंजीचा आकार आणि आणि दिमाखदारपणा मात्र आज दिसेनासा झालेला आहे.  

                एकेकाळी या गंजींवरून शेतकऱ्याची श्रीमंती मोजली जात असे. कारण त्यामुळे गोठ्यातील बैल वा दुभती जनावरं आणि जमिनीचाही अंदाज येत असे. आज आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधने आल्याने शेती कामात बैलांचा वापर खूप कमी झाला आहे. शिवाय सिंचन व अत्याधुनिक तथा संशोधनात्मक साधन निर्मितीमुळे शेती व्यवस्थापन पूर्ण बदलले आहे. बहुतांशी क्षेत्रात आधुनिक पद्धतीने शेती केली जात आहे. पारंपरिक व नैसर्गिक शेती पद्धतीतील अनेक पिकांचे प्रमाण कमी झाले आहे. याउलट फळ - फूल बागा व नगदी पिकांचे प्रमाण कित्येक पटीने वाढलेले दिसतेय. आहारातही तुलनेने ज्वारीचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज ज्वारीची शिवारंही खूप कमी झालेली दिसतात. गोठ्यात आता केवळ दुभती जनावरेच राहिलेली दिसतात. त्यातही संकरीत जनावरांचेच प्रमाण अधिक. आणि अशा जनावरांचे चारा व्यवस्थापनही निराळेच. 

                 या सर्व बाबींचा परिणाम म्हणून आज गंजींचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसत आहे. आज हिरवा चारा अधिक प्रमाणात वापरला जाताना दिसतोय. यामध्ये ऊसाचे वाढे, कडवळ, मका, लसूनघास याबरोबरच विविध पिकांचा हिरवा चारा म्हणून अधिक वापर होताना दिसतोय. असा चारा टिकविण्याच्या काही नवीन तथा आधुनिक पद्धतीही वापरल्या जात आहे. कुटी मशीन मुळे कमी जागेत, कमी कष्टात व कमी खर्चात चारा साठवण सुलभ झाली आहे. मुरघास ही अलीकडं नव्याने आलेली चारा साठवण पद्धती सर्वत्र दिसत आहे. या सर्व आधुनिक पद्धती जनावरांसाठी उपयुक्त वा फायदेशीर असतील देखील. मात्र त्या गंजीला पर्याय ठरू शकणार नाहीत हे तेवढेच खरे. कारण गंजीत साठवलेला कडबा केवळ टिकाऊ, चविष्ट वा स्वादिष्ट नसायचा तर तो चारा जनावरांसाठी सकस आणि पोषकही असायचा. गंजीतून पेंढी काढतानाच जनावरांच्या तोंडात लाळ उत्पन्न होत असे. गोठ्यामध्ये गव्हाणीत कडब्यावर तुटून पडलेली गुरे - वासरे पाहणे यात समाधान आणि सौभाग्याची प्रचिती येत असे. अशी ही गंज म्हणजे बळीराजा आणि गोठ्यातील पशुधनासाठी एक वैभवाची निशाणी असायची.             

            गंज ही केवळ चाऱ्यासाठीच उपयुक्त होती असे नव्हे तर गंज ही कौटुंबिक समृद्धीचं एक उत्तम प्रतिकही होती. गंजीकडे अभिमानाने पहात कुणब्याला आपल्या वैभवाची जाणीव व्हायची. अडी - अडचनीच्या काळात गंज महत्वाची भूमिका बजावत असे. दुष्काळात पाहुणे रावळे तथा शेजारी वा बांदकरी यांच्या मदतीसाठी गंज पुढे व्हायची. कौटुंबिक आर्थिक संकटाच्या काळातही गंज खंबीरपणे उभी राहायची. लग्नकार्याच्या काळात तर गंजीचं अधिकच महत्त्व असायचं. वऱ्हाडी सोयऱ्या -धायऱ्याच्या बैलांच्या कुसा भरायचं पुण्यकर्म गंजीमुळे साधलं जात असे. ओसरीत कणगी आणि अंगणात गंज दिसली की कारभारी निर्धास्त राहत असे. गंजीतून पेंढी काढून आणण्याची मजा काही वेगळीच असायची. याकामी लहान मंडळी अतिउत्साही असत. शिवाय गंजीच्या भोवतीनं लपंडाव वा पकडा पकडी खेळण्याचा आनंदही काही औरच असायचा. कधी कधी गंजीच्या अडोस्याला सावलीत जिबल्या व चंफुल्यांचाही डाव रंगत असे. लहान मुलांचं भावविश्व समृद्ध करणारं गंज हे त्याकाळी एक उत्तम ठिकाण होतं. काही पाळीव पशु पक्षीही गंजीच्या सावलीत आपला दाह शमवत असत. 

                काळाच्या गतीत गंजीचं हे सगळं वैभव आज लोप पावताना दिसत आहे. गंज ही मानवी सृष्टीला चैतन्य आणि हिम्मत देणारी रचना होती. कसलीही संकटं खंबीरपणे झेलून ठामपणे उभा राहता येते ही प्रेरणा देणारी गंज आज कडेलाटावर आहे. गंज काळाच्या पडद्याआड गेली तर त्या रचनाकलेचं काय होणार? कसल्याही अस्मानी संकटाला खंबीरपणे रोखून, तोलून धरणारी गंज हा मानवी कलाप्रतिभेचा अनोखा आविष्कार होता. रचताना तिची वीण घट्ट आणि भक्कम होत जाते;  तर उलगडताना ती तितकीच सहज व सुलभपणे सैल होते. हा अनोखा कलाविष्कार आज काळाच्या पोटात गडप होऊ पाहतोय. हे कलासंचित जपायला हवयं. पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा टिकायला हवायं. म्हणूनच मानवी जीवनाला चैतन्य, कणखरता आणि भक्कमतेची समृद्धी बहाल करणारी ही गंज पुन्हा अंगणात सदैव दिमाखात दिसायला हवी. एवढीच अपेक्षा ! 

✍️ डॉ. अशोक नामदेव  शिंदे 

प्राध्यापक, मराठी विभाग, 

मुधोजी महाविद्यालय, फलटण