शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५

पोहरा - अडगळीतील समृद्धी लेख - 12

              पोहरा 

           दिवस उगवायच्या वेळेला गावच्या सरकारी आडावर महिलांचा एकच गलका उठायचा. पाणी भरण्यासाठी त्यांची जणू झुंबडचं उडायची. सरकारी आड आमच्या गावच्या नागनाथ मंदिराच्या पूर्वेला होता. गोल आकाराचा हा आड आतल्या पक्क्या खडकापासून ते वर जमिनीपासून दोन अडीच फूटापर्यँत चौकोनी चिऱ्यांनी बांधलेला होता. त्याचा शेवटचा म्हणजेच वरचा थर अर्धगोलाकार घडीव तोडीचा होता. वाऱ्या वादळात धूळ किंवा कचरा आडात पडू नये म्हणून अशा चौथरा किंवा कट्याची बांधणी केली जात असावी. तसेच मोकाट जनावरं आणि लहान मुलांचे संरक्षण व्हावे म्हणूनही अशी व्यवस्था केलेली असावी. आडाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूला दोन  रहाट बसवलेले होते. रहाटासाठी दोन्ही बाजूला वावभर रुंद जागा सोडलेली होती. तेथे जमिनीलगत एक आडवी व दोन उभ्या लांब दगडी तोंडी बसवलेल्या होत्या. उभ्या दोन तोडींच्या तोंडाला प्रत्येकी एक भोक पाडलेले होते. यामध्ये रहाटाचे उभे दोन लोखंडी खांब बसवलेले होते. या दोन खांबांच्या वरच्या टोकातून एक आरपार लोखंडी पाईप बसवलेला होता. त्या पाईपच्या मधोमध एक लोखंडी चाक किंवा कप्पी बसवलेली होती. असे हे राहाट दोन्ही बाजूला होते.

            खरं तर आमच्या गावात दोन - तीन आड होते. मात्र रहाट असलेला आणि सभोवती मोकळी जागा असलेला हा एकमेव सरकारी आड होता. हा आड तसा खूप खोल नव्हता. साधारण दोन- तीन परस खोली असलेला हा आड जवळून गावनदी वाहत असल्यामुळे वर्षभर गावाला पाणी पुरवायचा. उन्हाळ्यात मात्र याचं पाणी बरच खाली जायचं. कधी कधी आडाचा तळही दिसायचा. मात्र गावाला पुरेल एवढं पाणी या आडात हमखास असायचं. त्यामुळे या अडावर पाणी भरणारांची सतत वर्दळ असे. म्हणूनच डोक्यावर हंडा, त्यावर कळशी आणि हातात पोहरा घेऊन गावातील बायकांची या आडावर पाणी भरण्याची लगभग सुरु असायची. त्यांच्या एकमिकींशी बोलण्यामुळे एकच कालवा होत असे. या आडावर पाणी शेंदण्यासाठी एका मागोमाग एक असे महिलांचे नंबर लागलेले असत. काही वेळेला देवाला पाणी घालायला आलेली भाविक मंडळी देखील या आडावर आपला गडवा भरून घ्यायला यायची. रहाटामुळे पाणी खोल असले तरी शेंदण्यास कमी कष्ट पडत असे. त्यामुळे अगदी आनंदाने एखादी महिला आपला पोहरा भाविकांच्या भांड्यात ओतत असे. पोहरा हे त्याकाळी आडातून किंवा विहिरीतून पाणी शेंदण्याचे एक प्रमुख साधन होते. त्याकाळी प्रत्येक घरी पोहरा हमखास असायचाचं 

            पोहरा म्हणजे लाकडी किंवा धातूच्या पत्र्यांपासून बनवलेला एक शंकूच्या आकाराचे साधन होय. लोखंड किंवा लाकडाला उभट लंबगोल आकार देऊन पोहरा बनवला जात असे. त्याला वरच्या बाजूला समोरासमोर दोन कान बसवलेले असत. त्यातून एक लोखंडी गजाची कडी ओऊन बसवलेली असे. त्या कडीला दोर बांधून रहाटाच्या कप्पीतून पोहरा आडात सोडला जायचा. लोखंडी पोहरा वजनदार असल्याने लगेच पाण्यात बुडायचा. पोहरा लाकडी किंवा बांबूच्या असेल तर मात्र त्याच्या कानाला काही वजनदार वस्तू बांधाव्या लागायच्या. कधी हातातील दोर विशिष्ट रीतीने हलवूनही पोहरा भरला जात असे. आडातील पोहरा पाण्याने पूर्ण भरला की मग कप्पीवरून दोर हळूहळू वर ओढीत पाणी शेंदले जायचे. पोहरा खालून वर रहाटाच्या मधोमध आला की मग एका हाताने दोर घट्ट पकडून दुसऱ्या हाताने पाण्याने भरलेला पोहरा बाहेरच्या बाजूला ओढला जायचा. अशा रीतीने आडातील पाणी पोहऱ्याने शेंदले जायचे. 

           आडातून किंवा विहिरीतून पिण्यासाठी पाणी शेंदण्याची ही पारंपरिक पद्धत होती. आडातील पाणी शेंदण्यासाठी लोखंडी रहाट तयार केले जायचे. ते खूप  भक्कम असायचे. काही आडावर लाकडी राहाट देखील बसवलेले असायचे. ते लाकडी रहाट सुद्धा अतिशय भक्कम असायचे. या रहाटाद्वारे पाणी शेंदण्यासाठी पोहरा हे साधन वापरले जात असे. मानवी संस्कृतीत या साधनाचे मोलाचे योगदान आहे. प्राचीन काळापासून पाणी शेंदण्यासाठी पोहरा हे साधन वापरले जात होते.

           पोहरा हे भारतातील पारंपरिक पाणी शेंदण्याचे साधन असून प्राचीन काळापासून त्याचा वापर आड, विहिरीमधून पाणी शेंदण्यासाठी केला जात आहे. वैदिक काळात ऋग्वेद व अथर्ववेदात विहिरींचा आणि जलसाठ्यांचा उल्लेख सापडतो. त्याकाळी ‘पोहरा’ या साधनासारखे पाणी  काढणारे साधन हे लाकडाच्या किंवा मातीच्या साह्याने बनवले जात होते. या काळात त्याचा उपयोग यज्ञासाठी पवित्र जल काढणे अथवा झाडांसाठी पाणी देण्यासाठी होई.  महाजनपद व मौर्य काळात विहिरी व आड अधिक प्रमाणात खणले गेले. या काळात काठावर लाकडी किंवा धातूचे पिंप (पोहरा) टांगलेले असायचे, जे दोरीने खाली जाई व वर पाणी घेऊन यायचे. याकाळी स्त्रिया घरातील पाणी वापरासाठी असा पोहरा वापरत होत्या. 

गुप्त व उत्तर गुप्त काळात जलसंवर्धनाची पद्धती अधिक विकसित झाली. विहिरी भोवती चौथरा आणि त्यावर पोहरा ठेवायचे यंत्र (कधी कधी हाताने फिरवले जाणारे चक्र) लावले जाई. याकाळात लोखंडी हुक, दोर व मातीचा मोठा घडा म्हणजेच पोहरा याचा वापर वाढला.

           मध्ययुगीन काळात दाट वस्तीतील गावांमध्ये पोहरा अत्यावश्यक झालेला होता. या काळात स्त्रिया विहिर वा अडातून पोहरा वापरून पाणी काढून ‘घागरी’मध्ये भरत असत.

पेशवाई काळात लोखंडी पोहरा वापरात होता.

स्वातंत्र्योत्तर काळात हातपंप, मोटारपंप, नळयोजना आल्याने पोहऱ्याचा वापर हळूहळू घटू लागला. मात्र अजूनही काही ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी पारंपरिक पाणवठ्यांवर पोहऱ्याचा वापर सुरू आहे. या ठिकाणी पितळ, स्टील, प्लास्टिकच्या बादल्यांचा वापर पोहरा म्हणून केला जातो. मात्र जो पारंपरिक लोखंडी किंवा लाकडी पोहरा होता तो आज शक्यतो पाहायला मिळत नाही आणि उपयोगातही येताना दिसत नाही.

           पोहरा हा केवळ पाणी शेंदण्याचे पारंपरिक साधन नव्हता तर तो भारतीय ग्रामीण 

संस्कृतीचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा होता. श्रमसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण आधार होता.  त्याद्वारे आड वा विहिरीतील खोल पाणी काढण्याचे कष्टप्राय काम अगदी कमी कष्टात आणि सहजपणे होत असे. मानवी संस्कृतीच्या विकासात व प्रवासात नदी, नाला, ओढा, आड, विहीर या जलस्त्रोताचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. विशेषत: स्त्री जगताचे आणि या जलस्त्रोतांचे एक भावनिक व जिव्हाळ्याचे नाते आहे. स्वयपाक, कपडे, भांडी याकामासाठी पाणी महत्वाचे असते. पाणी आणण्याचे हे  

काम पूर्वांपार स्त्रियाचं करत आल्या आहेत. आजही हे काम स्त्रियाचं करत आहेत. त्यामुळे या कामाशी संबंधित घटकांची त्यांचे एक नाते निर्माण झालेले असते. पोहरा हे त्यापैकीच एक साधन आहे. 

            पोहऱ्याने पाणी काढणं म्हणजे केवळ एक श्रमिक क्रिया नव्हती, तर ती एक परंपरा होती. एक नित्यनेमाची पूजा. प्रत्येक पहाटेला, गावातल्या बायकांचा गजर सुरू व्हायचा. कुणाच्या डोक्यावर तांब्याची घागर, कुणाच्या हातात पोहरा, तर कुणाच्या ओठांवर गाणं. घागर, हंडा, कळशी आणि पोहरा या वस्तूंशी स्त्रीचे भावविश्व जोडले असे गेलेले असायचे. आडापासून ओसरीपर्यंतचं अंतर म्हणजे स्त्रीचा एक नियमित प्रवास असायचा. हा प्रवास कधी प्रेमाचा, कधी हक्काचा, कधी दुःखाचा असायचा. या सर्व प्रसंगाचा सच्चा साक्षीदार म्हणजे तिच्या हातातील हा पोहरा असायचा. पोहरा हे केवळ आडातील पाणी शेंदण्याचे साधन नव्हते, तर स्त्रीच्या मनातील भावनांची उकल करणारे माध्यम होते. आडातील खोल पाण्याबरोबरच तिच्या मनातील खोल सलही यनिमित्ताने वर यायची. पाणी आणण्याच्या निमित्ताने स्त्रियांचे एकमेककींशी मैत्रीचे नाते जुळून यायचे. पोहऱ्यामुळे कष्ट तर कमी व्हायचेच;  शिवाय मैत्रिणींशी जोडीदारच्या, संसाराच्या, सुख दुःखाच्या गप्पाही व्ह्यायच्या. या गप्पातून मनातील दुःख भरून यायचे आणि  संसाराचे धागे अधिक घट्ट होत जायचे. 

             कधी कधी आडावर एकच पोहरा असायचा. त्यावेळी सगळ्याजनी आळी पाळीने पोहरा वापरत असतं. स्त्रियांच्या बरोबर कधी पुरुष मंडळींदेखील पाणी भरण्यासाठी आडावर येत असत. कधी दोर तूटून किंवा हातातून दोर निसटून पोहरा आडात पडायचा. अशावेळी पोहणारा कोणीतरी तळाला जाऊन तो पोहरा वर काढायचा. तर कधी याकामी अनेक हुकं एकत्रित करून त्या हुकांचा जुडगा म्हणजेच गळ आडात टाकूनही बुडालेला तो पोहरा काढला जात असे. हा गळ गावातील कोणा एकदोन जणांकडेच असत. अशावेळी त्याची खूप मदत होतं असे. त्याचा मेहनताना म्हणून त्याला प्रेमाने आणि आग्रहाणे काहीतरी वस्तू भेट देण्याची प्रथाही अनेक गावांमध्ये होती. असा पोहरा हा ग्रामीण लोकजीवनाची अगदी घट्ट जोडला गेलेला होता. या निमित्ताने सामाजिक सौख्य व सहकार्यवृत्तीचेही दर्शन घडायचे. 

            विहिरीवर पोहरा घेऊन येणाऱ्या स्त्रिया ही ग्रामीण संस्कृतीची आज एक चित्रमय आठवण वाटतेय. ‘पोहरा’ हा भारतीय ग्रामीण जीवनशैलीचा भाग होता. या पारंपरिक साधनाने इतिहास, संस्कृती, स्त्रीजीवन आणि जलव्यवस्थापन यांना एकत्र गुंफून ठेवलेले होते. आई, आजी, सासू अशा घरातील कित्येक स्त्रियांचे भावविश्व या पोहऱ्याशी जोडलेले असायचे. म्हणूनच पोहरा हे स्त्रीचे श्रम आणि भावना यांचा खरा साक्षीदार होता. आज ग्रामीण संस्कृती पूर्णत: बदलली आहे. नदी, ओढा, विहीर, आड हे पारंपरिक जलस्रोत आता घरकामासाठी वापरले जात नाहीत. नदी, ओढे आता पूर्वी सारखी वाहतच नाहीत आणि विहिरी व आडही आता आटून गेलेले दिसतात. आड तर केवळ अवशेषरूपी उरलेले दिसतात. काही गावातील आणि वाड्यातील आड तर गाडून टाकलेले आहे. त्या बरोबरच त्याच्या संबंधीच्या हजारो आठवणी व भावनाच गाडल्या गेल्या आहेत. पारंपरिक जलस्रोत मिटले, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित वस्तूही हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. 

              आज शहराबरोबरच गावखेड्यातही आधुनिक स्वरूपाचे राहणीमान दिसत आहे. अनेकांच्या अंगणात आज कूपनलिका आहेत. गावात हातपंप आणि आणि नळ योजना आल्या आहेत. औद्यागिक क्रांतीमुळे सिमेंट व प्लॅस्टिकच्या वा रबरी पाईपच्या आधुनिक जलवाहिन्या निर्माण झाल्या आहेत. पाणी पुरवठ्याच्या शासकीय योजनांबरोबरच काहीजन आपल्या घरी वैयक्तिक पाणी पुरवठ्याची व्यवस्था करत आहेत. यासाठी लागणारे तंत्र, यंत्र आणि आर्थिक कुवत यांची सहज उपलब्धता आहे. आज स्वयंपाक घरात व न्हाणीघरात हवे तितके व हवे तसे पाणी उपलब्ध होत आहे. या आधुनिक जीवनशैलीमुळे पाणी पुरवठ्याची सर्व पारंपारिक साधनेच आज अडगळीत पडलेली आहेत. 

          घागर, हंडा, कळशी ही साधने आज घरात किमान पाणी साठविण्यासाठी तरी कधी कधी वापरली जातात. मात्र पोहरा आज कुठेच दिसत नाही. एक साधन वापरातून बाजूला झालं कीं,  त्याबरोबर त्याच्याशी संबंधित संस्कृतीही लोप पावते. आज पोहरा दिसत नाही. त्याबरोबरच आड, रहाट, कप्पी दिसेनाशी झाली आहेत. आणि आडात पडलेल्या पोहऱ्याला शोधून काढणारा गळ तर स्वतःच हरवलेला आहे. पोहरा नाही त्यामुळं संवाद मुका झाला आहे. अंगणातील हौद आणि छतावरील टाकी तील पाण्यात स्त्रीच्या भावना साठून आटून जात आहेत.

          काळानुसार नवंनिर्माण, नवं संस्कृतीचा स्वीकार अनिवार्यचं आहे. मात्र मानवी ग्राम संस्कृतीचे वैभवशाली साक्षीदार आसलेल्या साधनाचे जतन करणे हेही आपले कर्तव्य आहे. श्रमसन्मानाचा व भावनिकतेचचा वारसा असणारा पोहरा पुन्हा वापरता येईल कां नाही हे सांगता येणार नाही. मात्र आज तो जिथं आहे आणि जसा आहे , तसा तिथं आणि तसाच जपला जायला हवा. किमान पुढील पिढ्यांना हा पिढ्यांपिढ्याचा वैभवशाली वारसा वस्तू रूपाने कां होईना पाहता येईल. आज अडगळीतील पोहरा किती मोलाचा आणि मूल्याचा आहे हे निश्चित सांगता येणार नाही परंतु; तो ज्याच्याकडे आहे त्याची श्रीमंती मात्र कोणालाच मोजता येणारं नाही एवढं खरं. म्हणूनच स्त्रीजीवनाचा श्रमाचा आणि प्रेमाचा हा मौलिक साक्षीदार असलेला पोहरा आपण जपायलाच हवा! 


डॉ. अशोक शिंदे

प्राध्यापक, मराठी विभाग

मुधोजी महाविद्यालय, फलटण. 

मोबाईल - ९८६०८५०३४४


मंगळवार, ८ जुलै, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र. ११

 काठवट

           सकाळी झाड- लोट आणि अंघोळ आवरली की आई स्वयपाकाला लागायची. आधी चूल पेटवली जायची. मग पिठाचा डबा जवळ घेऊन आई भाकरीची तयारी करायची. प्रथम चुलीवर तवा ठेवून ती डब्यातलं पीठ चाळणीत घायची. काठवटीत ते हळुवारपणे चाळायची. नंतर काठवटीतील पिठात ओंजळीने गरजेपूरतं पाणी घेऊन ती पीठ मळायची. आईचं पीठ मळणं म्हणजे तिच्या दोन तळहातांनी पिठात जीव ओतनंचं असायचं. हे मळणं म्हणजे भाकरीवरचा प्रथम संस्कारच असायचा. आपल्या हातांनी जणू काही पिठामध्ये प्राण यावा अशीचं ती कसरत असायची. पिठात पाणी मिसळून त्याचा एकजीव उंडा होईपर्यंत तिची मेहनत चालायची. काठवटीत पीठ आणि पाणी एकजीव होताना पाहणं हा एक दिव्य अनुभव असतो. मी हा अनुभव अनेकदा घेतलाय.        

              भाकरीला बसण्याची आईची विशिष्ट पद्धत असे. दोन्ही पायाचे अंगठे काठावटीच्या दोन्ही कानावर अलगदपणे ठेऊन आई पीठ मळायला बसायची. काठवटीतील पिठात पाणी टाकून ती प्रथम एका हाताच्या बोटांनी त्याचं मिश्रण करायची. मग पीठ थोडं घट्ट झालं की ती एका तळहाताने पिठाचा गोळा धरून त्याला जोराचा हिसका देऊन तो काठवटीच्या तळावर घसरायची. पुन्हा तो गोळा काठवटीत गोल फिरवत तळातलं उरलेलं पीठ त्यात मिसळून त्या गोळ्याला एक दोन वेळा काठवटीतचं आपटायची. जोपर्यंत पीठ एकजीव होत नाही तोपर्यत ती असं करत असे. एकदाका पिठाचा उंडा मनाजोगा झाला की मग त्या उंड्याला दोन्हा हातांनी विशिष्टरित्या चाळवून त्याला हातातचं गोल आकार देत असे. नंतर काठावटीच्या तळात चाळणीने थोडे पीठ पसरून ती भाकरी थापत असे. काठवटीच्या तळाच्या आकाराची ती गोल भाकरी मग तव्यावर जात असे. या कामात आईच्या मेहनतीबरोबरचं काठवटीची देखील महत्त्वाची भूमिका असे. मळणे, उंडा करणे व थापणे हे भाकरीवरील संस्कार केवळ काठवटीमुळेच उत्तमपणे साधले जायचे.  

            थोडीशी लंबगोल, खोलगट आणि दोन बाजुला कान असलेली ही लाकडी काठवट माझ्या लहानपनापासून मी पहात आलो आहे. गेली तीन पिढ्या ही काठवट आमच्या घरी आहे. माझी आजी सांगायची की भिंगारला असताना तिच्या सासूने ही काठवट घेतली होती. काठवट म्हणजे काष्ट + वाटी वा पात्र किंवा लाकडी परात होय. काठ असलेलं पीठ मळायचं लाकडी भांड म्हणजे काठवट असाही एक अर्थ घेतला जातो. साधारणपणे लांबट गोल, थोडे खोलगट आणि दोन्ही बाजूला कान अशी रचना म्हणजे काठवट. लाकडाच्या एका गोलाकार ओंडक्याला कोरुन परातीच्या आकाराचं हे भांड बनवलं जातं. काही काठवटींच्या वरच्या दर्शनी भागावर नक्षीकाम देखील केलेलं असते. तर काही काठवटींचे कान नक्षीदार व आकर्षक असतात. काठवट बनवणं हे अस्सल कलाकाराचं कामं असतं. काठवट हे स्वयंपाक घरातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि मौल्यवान साधन आहे. भारतातीय परंपरेत या पारंपरिक साधनास वैभवशाली इतिहास आहे. 

            प्राचीन काळात अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्वयंपाक घरातच नव्हे तर घराच्या अंगणात पारंपरिक पद्धतीने केली जात असे. त्या काळात दगडी उखळ-मुसळ, मातीची भांडी यांसोबत लाकडी पट्टी अथवा गुळगुळीत दगडाची पाटी यांचा उपयोग पीठ मळण्यासाठी होत होता. असे एक सपाट, मजबूत पृष्ठभाग असलेले साधन म्हणजेच काठवटीचे पूर्वरूप असावे. मौर्य - गुप्तकाळात काठवटीचे स्वरूप अधिक विकसित झाले. एक प्रकारचे लाकडी साधन ज्यात पीठ सांडू नये म्हणून थोडी कड असलेली योजना करण्यात आली.  पुढे मध्ययुगात लाकडी काठवटीला मूळ रुप मिळाले. त्यामुळे त्यामध्ये एकत्रितपणे पीठ मळणं अधिक सुटसुटीत आणि सोपं व्हायला लागलं. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आधुनिक वस्तू बाजारात येऊ लागल्या. परंतु ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये पारंपरिक काठवटीचाच वापर सुरू होता. ज्या प्रदेशात ज्वारी व बाजरीचे उत्पन्न अधिक त्या प्रदेशात काठवट वापरली जात असे. 

            स्वातंत्र्योत्तर काळात स्वयंपाक घरात आधुनिक उपकरणांची भर पडली, परंतु तरीही गावाकडे काही प्रमाणात काठवटीचे स्थान टिकून राहिले होते. विसाव्या शतकाच्या अखेरच्या काही दशकात प्लास्टिक व स्टीलची भांडी स्वयंपाक घरात वापरली जाऊ लागली.  याचं काळात आधुनिक घराचीही निर्मिती होऊ लागली. यामध्ये स्वयंपाकघर म्हणजेच आजच्या किचनची योजना झाली. यामध्ये किचन ओटा तयार करण्यात आला. यामुळे स्वयंपाकाची पारंपरिक पद्धतच निकालात निघाली. ओट्याशेजारी उभा राहून स्वयंपाक केला जाऊ लागला. 

           याच काळात नोकरी, व्यवसाय तथा उद्योग धंद्यामुळे जीवन व्यवहाराला गती मिळाली. अधिक उत्पन्न आणि सहज उपलब्धतेमुळे गहू व तांदूळ या अन्नधान्यांचे आहारात प्रमाण वाढू लागले. त्यामुळे स्वयंपाकात भाकरीपेक्षा चपाती व भाताचे प्रमाण वाढले. यातच काठवटीला पर्याय म्हणून बाजारात स्टीलची मोठी ताटं आली आणि काठवट स्वयंपाक घरातून हद्दपार झाली. काळाच्या ओघात काठवट दुर्मिळ झाली आहे. सहसा खेड्यामध्ये काही लोकांकडे ती आहे; पण तीही तुटलेल्या अवस्थेत आणि अडगळीच्या खोलीत. 

            आज अनेक घरात काठवट पहायलाच मिळत नाही. आणि असली तरी तिचा वापर होत नाही. काठवट हे आहाराला स्वादिष्ठता व सात्विकता प्राप्त करून देणारं पारंपरिक साधन आहे. आई, आजी आणि पणजीच्या सुगरणपणात अनोखी चव भरणारं हे साधन आज नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. काठवटीत केवळ पीठ मळलं जातं नसे; तर तिच्यात कौटुंबिक आहार आणि शरीरस्वास्थ तथा आरोग्याचे पिंडं मळले जात असत. काठवट ही पिढ्यांपिढ्याच्या संस्काराची शिदोरी आहे. तिला पारंपरिक पाककलेची साक्षीदार समजली जाते. पारंपरिक लाकडी काठवटीला आजही संस्कार, शिस्त आणि मातृत्वाची प्रतिकात्मक महती आहे.

            कोणती स्त्री काठवटीत चांगलं पीठ मळते, यावरून तिच्या स्वयंपाक कौशल्याचं मूल्यमापन केलं जात असे. काठवटीवर आईने मळलेले पीठ, थापलेली भाकरी आणि तव्यावरून सुटणारा सुवास ही आठवण प्रत्येक ग्रामीण भारतीयाच्या मनात आजही दरवळत आहे. ‘काठवट’ हे फक्त एक स्वयंपाकी साधन नसून ते आपल्या संस्कृतीचं वैभव, स्त्रीच्या कलेचा नि श्रमाचा पुरावा आणि कुटुंबाच्या पोषणाचा आधार असते. काळानुसार तिचे उपयोग, रचना आणि साहित्य बदलले असले तरी आजही तिचे अस्तित्व टिकून राहणे गरजेचे आहे. 

             आई, आजीच्या हातून मळलेलं पीठ, काठवटीवर थापलेली भाकरी आणि ते चविष्ट जगणं आज फार दूर होत चाललंय. आज स्वयंपाक घरात स्टीलच्या परातीत भाकरी मळली जाते पण तिच्यात काठवटीवर मळलेल्या पिठातली ओल, तो स्वाद आणि आपुलकीचा वास कुठेच जाणवत नाही. म्हणूनच कित्येक पिढ्यांच्या स्वयंपाक कलेचा आणि कला संस्काराचा हा अमूल्य वारसा आपण जपायला हवा. स्वयंपाक घराचा ‘वट‘ आणि ’रुबाब‘ सांभाळण्याचं नेमकं काम करणारी काठवट आज निस्तेज होऊन पडली आहे. अडगळीत पडलेल्या गृहकला संस्कृतीच्या या साक्षीदाराचा स्वादिष्ट नाद पुन्हा स्वयंपाक घरात घुमायला हवा. आपल्या माईच्या मायेच्या हातातलं हे कणखर चैतन्य आपण टिकवून ठेवायलाचं हवं. एवढीच अपेक्षा ! 


✍️ प्रा. डॉ. अशोक नामदेव शिंदे 

      मराठी विभाग,

      मुधोजी महाविद्यालय, फलटण 

बुधवार, २५ जून, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख -१०

 गोधडी! 

               गावची चैत्री यात्रा झाली की पुढच्या दोन दिवसात आई गोधडी शिवायला घ्यायची. यात्रेला आलेले पाहुणे - रावळे आपापल्या गावी परतलेले असायचे. शेता- शिवारातील कामंही आटोपलेली असायची. शिवाय यात्रेच्या आधीच आईने पापड, शेवई , कुरडई, सांडगे आणि इतर काही वाळवणाचे पदार्थ तयार करून ठेवलेले असायचे. त्यामुळे ओसरीत चांगलं आठवडाभर गोधडी शिवण्याचं कामं चालायचं. 

             खरं तर गोधडीची पूर्वतयारी आधीच सहा सात महिन्यापूर्वी झालेली असायची. भाद्रपदातील पितृ पंधरवड्यात आमच्या घरातील सर्व बारीक - सारीक वस्तू व साहित्य स्वच्छ धुतले जायचे. त्यावेळी गावनदीला भरपूर पाणी आणि भादव्याचं कडक ऊन असल्यामुळे ही सर्व स्वच्छता व्हायची. या वेळी घरातील सर्व गोधड्या, चादरी, सतरंज्या, घोंगडया असे अंथरून, पांघरूनाचे सर्व साहित्यही धुतले जायचे. याचवेळी आई घरातील लहान व मोठ्यांची जुनी - पाणी कापडं स्वच्छ धुवून त्याचं गठुडं बांधून ठेवायची. असं वर्षा दोन वर्षानंतर जमलेल्या गठुड्यांतील कापडांचा अंदाज घेऊन आई गोधडी शिवायला घ्यायची. 

             सकाळची सगळी कामं, जेवणं आटोपली की आईचं हे कामं सुरु व्हायचं. प्रथम आई सर्व गाठुडी बाहेर काढायची. त्यातील जुनी फाटकी कापडं बाहेर काढायची. यामध्ये लुगडी, धोतरं, फेटे, पंचे, खामिस, बंडी, चोळी, टोपी तसेच लहान मुलांचे सदरे, इजारी, टकुचे,  मुलींचे परकर, झंपर असे कितीतरी प्रकारचे कपडे असायचे. आई प्रथम प्रत्येक कापड निरखून पाहायची. त्याचा गोधडीच्या कोणत्या भागासाठी उपयोग होईल याचा विचार करून ती निवडून एका बाजूला ठेवायची. अशावेळी आम्हीपण आईला मदत करायचो. सदऱ्यांच्या कॉलर व गुंड्या काढणे, टीपा उसवणे, बाह्या फाडणे अशी कामं आम्ही अगदी आनंदानं करायचो. एकदा सर्व कापडं निवडून व्यवस्थित करून झाली की मग आई गोधडी बेतायला बसायची.

              गोधडीसाठी वरच्या व खालच्या बाजूची दोन पालं आणि त्या दोन पालांच्यामध्ये भरण्यासाठी चिंध्या या दोन बाबी महत्त्वाच्या असतात. पालांसाठी लुगडं किंवा धोतराचा वापर केला जातो तर आतील चिंध्यासाठी उरलेल्या सर्व कापडांचा उपयोग व्हायचा. पालासाठी आई शक्यतो लुगड्याच्या फाळांचाचं वापर करत असे. कारण लुगडी वेगवेगळ्या रंगांची असायची. लुगड्याच्या फाळाचा विरलेला भाग बाजूला काढून उरलेला भाग पालासाठी वापरला जायचा. लुगड्यांच्या किनारी, पदराचा भाग हा पालासाठी वापरला जायचा. बाकी सारी कापडं चिंध्याच्या स्वरूपात भरणासाठी वापरली जायची. शिवण्यासाठी जाड दोऱ्याचा मोठा बंडल आणि चांगल्या लांबलचक पाच सहा सुया आईने आधीच आणून ठेवलेल्या असायच्या. अशी सर्व तयारी झाली की मग गोधडी शिवायला सुरवात व्हायची. 

             गोधडी शिवायची म्हटलं की आमच्या गल्लीतल्या कांतानानी , अंजनाआक्का, बायसामावशी, सुबाआत्या अशा चारपाच जणी जमायच्या. प्रत्येक वर्षी कोणाची ना कोणाची गोधडी असायचीच. सगळ्याजनी मिळून एकमेकींना मदत करून गोधडीचं कामं करायच्या. तीन हात रुंद आणि पाच हात लांब असा सर्व सामान्य गोधडीचा आकार असतो. यामध्ये उपलब्ध साहित्यानुसार आकार कमी अधिक होऊ शकतो. आई सुरवातीला खालचं पाल अंथरायची. त्यावर सर्व प्रकारच्या कापडांच्या निवडून ठेवलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या चिंद्या अंथरायची. हे करताना सगळीकडे जाडी सारखी राहील याची काळजी घेतली जायची. हे कामं ती अत्यंत काळजीपूर्वक करायची. या चिंद्या वाऱ्याने हलू नयेत म्हणून त्यावर छोटी लाकडं किंवा जड वस्तू ठेवायची. गोधडीचा आकार आणि जाडी याचे प्रमाण पूर्ण होईल इतक्या चिंद्या रचल्या की मग आई त्यावर वरचे पाल अंथरायची. अशा प्रकारे गोधडीचा पाहिला टप्पा पूर्ण व्हायचा. 

               दोन्हीही पालं मांडताना त्यांवरील नक्षी किंवा बाजूच्या किनारी नेमक्या जागेवर येतील याची आई पुरेपूर दक्षता घ्यायची. मग मोठ्या सूईत दोरा ओवून आधी चारी कडांवर लांब लांब टाके घालायची. नंतर मग आत सगळीकडे असेच लांब तुटक टाके घालायची. यामुळे गोधडी व्यवस्थित बांधली जायची. या कामासाठी आईला एक दोन लागायचे. अशी भरण पुरण झालेली ही गोधडी आई एका लांब काठीला गुंडाळून ठेवत असे. मग सर्वजणींचा मेळ बसवून गोधडी शिवायला घेतली जात असे. गोधडी शिवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. सर्व प्रथम गोधडीच्या खालच्या व वरच्या पालाच्या कडा आतल्या बाजूला मुडपून पाहिला टाका किंवा टीप घातली जाते. यास कडा दाबणे म्हणतात. हे काम अत्यंत दक्षतेने केले जाते. कडा दाबताना मध्ये घोळ राहू नये किंवा घुड्या पडणार नाहीत याची काळजी घेतली जाते. हा टप्पा चांगला झाला की गोधडी उत्तम साधलीचं असं समजायचं. 

                चार कडांना पाहिला टाका घातला की मग पहिल्या टाक्याच्या आत बोटभर अंतर सोडून दुसरा टाका घातला जातो. त्यामागोमाग मग एक बोट अंतरावर आतल्या बाजूने इतर टाके घातले जातात. पूर्ण चारी बाजूनी टीप टाकत तो टाका जिथून सुरवात झाली तिथंच पूर्ण व्हायचा. असे टाक्यांचे फेरे पूर्ण केले जायचे. अशावेळी चारजणी चार बाजूला बसून ती सुई टाके टाचत एकमेकींकडे पुढे सरकवत असत. कोपऱ्यावरचा काटकोनातला टाका घेताना मात्र शिवणारणीचे कौशल्य पणाला लागत असे. बेमालुमपणे तो टाका घातला जाई. टाके शिवले जात असताना पालावरील रंग, वेगवेगळे आकार आणि दोऱ्यांची शिवण यामुळे गोधडीला नवे नक्षीदार रुप प्राप्त होत असे. खरी कमाल तर शेवटी असायची. चार बाजूनी शिवण आत आत सरकत आल्यामुळे मध्यभागी एक चौकोनी आकार राहायचा. हा आकार शिवताना त्यास पोट लावणे असे म्हंटले जाते.  काही प्रदेशात हा भाग शिवण्याआधी मुहूर्त पाहून गोधडीची ओटी भरण्याचीही प्रथा आहे. अनेक वेळा गोधडीच्या मध्यावर दोन्ही बाजूला रंगीत चौकोनी किंवा कापनीच्या आकाराचे ठिगळही लावलेले आढळते. 

               अशा प्रकारे कित्येक वर्षाच्या जुन्या कापडांना नवा, सुंदर आकार आणि देखणं रुप प्राप्त व्हायचं. आणि जणू त्यांचा पूनर्ररजन्मच व्हायचा. अशी ही गोधडी पूर्ण करायला किमान आठ ते दहा दिवस लागायचे. गोधडी ही भारतीय संस्कृतीचे पारंपरिक अंथरून आणि पांघरूणाचे प्रमुख साधन आहे. गोधडी, वाकळ आणि लेपाटं अशा विविध नावाने ती ओळखली जाते. मानवी जीवनामध्ये गोधडीला महत्त्वाचे आणि मानाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून गोधडी मानवी संस्कृतीत सांस्कृतिक, भावनिक आणि पूनर्वापरदुष्ट्या अविभाज्य भाग असलेली दिसते. 

               भारतीय प्राचीन संस्कृतीत वैदिक काळात वस्त्र निर्मिती ही प्रामुख्याने हस्तनिर्मित हातमागावर आधारित होती. स्त्रिया कापडांचे तुकडे शिवून अपत्यासाठी मऊउबदार अंथरुण तयार करीत असत. पुढे त्याचेच गोधडीमध्ये रूपांतर झाले असावे.  गुप्तांचा काळ समृद्धीचा होता. त्यामुळे याकाळात नविन कपडे सहज उपलब्ध होत होते. पण गृहिणींनी जुने कपडे वापरून तयार केलेलीगोधडी घरातील गरजू, लहान मुलांसाठी वापरली जात. त्यामुळे याच काळात गोधडीला मातृत्वममता सुगरणपणा याचे प्रतीक मानले जात असे. नंतर मध्ययुगीन काळात ग्रामीण भागात स्त्रिया आपलीकलात्मकता गोधडीद्वारे व्यक्त करू लागल्या. सुशोभित शिवणकाम, भरतकाम याचा गोधड्यांमध्ये प्रवेश होत गेला.         

                ब्रिटिशकाळात कापड उद्योगामुळे जुन्या कपड्यांचे प्रमाण वाढले आणि गोधड्या मोठ्याप्रमाणात तयार होऊ लागल्या. आजी-आईकडून नातवंडांना दिली जाणारी गोधडी ही त्याकाळापासून एक भावनिक  संस्कृतिक परंपरा बनली. याचकाळात स्वदेशी चळवळीनंतर हस्तकलेला आणि हाताने तयार होणाऱ्या वस्तूंना प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे गोधडी ही स्वावलंबनाचं आणि स्त्रियांच्या कौशल्याचं प्रतीक बनली. याचं काळात काही स्त्रिया तर गोधडी विक्री करून घरखर्चास हातभार लावत असत. ‘गोधडी शिलाई’ ही कला म्हणून याकाळात ओळखली जाऊ लागली. 

                 स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक क्रांतीमुळे बाजारात विविध प्रकारची नवी तयार पर्यायी अंथरूणे सहज उपलब्ध होऊ लागली. याच काळात भारतीय लोकांचे जीवनमान आणि जीवनशैलीही बदलली. नोकरी व्यवसाय निमित्ताने कुटुंबं विखूरली गेली. त्यामुळे आई, आजीसह नातवंडांचा गोतावळाही विखूरला. शिवाय घरातील, बाहेरील व शेतातील कामाचे स्वरुपही बदलले. त्यातच हव्या तशा अंथरून पांघरूनाची सहज उपलब्धता व ते खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचीही अनुकूलता  यामुळे पारंपरिक गोधडी हळू हळू मागे पडत गेली. 

              आज  मात्र  ही पारंपरिक गोधडी अडगळीत पडलेली दिसते. विशेषतः हल्लीच्या या चमकोगिरीच्या युगात तर तिचं स्थान अगदीच गौण झालेलं आहे. घरी पाहुणे आल्यावर तर ती दिसणारच नाही अशी व्यवस्था केली जाते. खरं तर गोधडी म्हणजे  आपल्या घरातली संस्कृतीचा खजिना होय. आईच्या हाताने शिवलेली गोधडी म्हणजे केवळ घरीतील जुनी कपडे वापरून नव्याने वापरात आणलेलं साधन नव्हे, तर ती गोधडी म्हणजे पुनःपुन्हा जन्म घेणारी आठवण असते . आईच्या प्रेमाची उब आणि घराच्या ओसरी अंगणात जन्माला आलेली कलासंस्कृती होय. 

               गोधडी केवळ अंथरूण नसते तर ती  एक ‘टाकाऊ तून टिकाऊ’ अशा गृहसंस्कृतीची साक्ष असते. मानवी संस्कृतीच्या वैभवशाली काळाची ती साक्षीदार आहे. ती स्त्रीच्या सर्जनशीलतेचीकुटुंबप्रेमाची आणि पुनर्वापराच्या शहाणपणाची निशाणी असते. भारतीय पूनर्वापर संस्कृतीचा गोधडी उत्तम नमुना समजली जाते. ती कधीच वाया जात नाही. तिचं पाल अनेक वेळा बदलले जाते. शिवाय जेंव्हा तिला डोळे पडतात म्हणजेच ती: काहीशी जीर्ण होते, तेंव्हा तिचा वापर लेपाटं म्हणून केला जातो. हे लेपाटं एकदम एकजीव आणि मऊसूद असते. 

              याकाळात तर ते अधिकच ऊबदार असते. त्यामुळे ते बाळंतिनीच्या बाजेवर टाकले जाते. पुढे ते अनेक काळ घरातील लेकीबाळींच्या बाळंतपणात बाळ आणि बाळंतिनींना ऊब देण्याचे काम ते करते. त्यानंतर काही काळ लोटल्यावर ते झिजून झिजून जेंव्हा त्याचे लक्तर होते तेंव्हा ते कुंभाराकडे सुपूर्त केले जाते. गाडगी, मडकी, घागरी व माठ घडवताना ते मऊ मुलायम लक्तर खाली आधार देण्याचे काम करते. पुढे ते अधिकच जीर्ण होते तेंव्हा ते आवा पेटवण्याच्या कामी येते. अशा प्रकारे एका पिढीचे जीवन प्रतिनिधित्त्व करणारी ही गोधडी आपल्या अखेरच्या अंशापर्यंत उपयोगी ठरते. म्हणूनच गोधडी हे पुणत: स्व -समर्पणाचे उत्तम साधन आहे असे मला वाटते.

            गोधडी ही कौटुंबिक आठवणींचे आणि भावनांचे प्रतीक असते. ती आईच्या प्रेमाची उब आहे. लहान मुलांसाठी आजीने केलेली गोधडी ही एक जिव्हाळ्याची गोष्ट असते. ती घरातील स्त्रीच्याकलात्मकतेचा दाखला आणि कुटुंबाच्या आठवणींचा थर असते. प्रत्येक गोधडी ही काहीतरी कथा सांगते. तिच्या प्रत्येक तुकड्यात एक एक गोड आठवण लपलेली असते. घरातील सगळ्यांचे कपडे एकत्रितपणे तिच्यात गुंफले जातात. आई,  आजीने एकेक तुकडा हाताने सावकाश शिवून, प्रेमाने टाचून गोधडी साकारलेली असते. त्यातील प्रत्येक कापडाशी आपला स्नेह जुळलेला असतो. ते कसे, केंव्हा, कुठे, कोणी घेतले याबाबतच्या गोड स्मृती असतात. या स्मृती कलात्मक धाग्यांनी सुंदरपणे तिच्यात रेखलेल्या असतात. कधी काळी जेंव्हा तिला डोळे पडतात तेंव्हाही त्या डोकावणाऱ्या अवशेषातून त्या स्मृती पुन्हा नव्याने जाग्या होत होतात. स्मृतीशेष झालेल्या वा परिवारातून दूर गेलेल्या सदस्यांच्या आठवणीचं कोंदण गोधडीत दडलेलं असतं आणि कौटुंबिक भावनांचा उमाळा गोधडीत टाचून भरलेला असतो. 

              आईच्या हातून गोधडी घडणे म्हणजे एखादं भावगोफ विनणंचं असत.  एका पालावर  धोतराचा, तर दुसऱ्यावर अजून न फाटलेला पैठणीचा काठ असतो. त्या गोधडीच्या प्रत्येक शिवणीत एक स्मृती भरलेली असते, आई, आजी, आजोबा आणि घरातील कित्येकांची. गोधडी जरी जुन्या कपड्यांनी बनलेली असली तरीही तिच्यातील प्रत्येक तुकडा एक जीवंत आठवण घेऊन समोर उभा राहतो. आजंचीर, शालू, पैठणी, इतर साड्या, पंचे, फेटे यांचे तुकडे म्हणजे त्या घराचं वैभवचं गोधडीत साठलेले असे. गोधडी पिढ्यानंपिढ्यांचा वारसा संक्रमनाचे मोठे साधन असते. आजीकडून आईला आणि आईकडून मुलीकडे हा कला वारसा पुढे दिला जातो. गोधडी शिवताना स्त्री फक्त टाके टाकत नसते, ती संसाराचा एकेक थर गुंडाळते. एखादी आठवण खुणावते, डोळे पाणावतात, पण हात थांबत नाहीत. कारण या टाक्यांतून ती पिढ्यांना प्रेमसुरक्षा आणि आपुलकीचं आच्छादन देत असते. गोधडी एक कपड्यांची घडी नसते. ती असते काळाचं स्मरण. एका आईच्या, आजीच्या ममतेच्या हातांनी शिवलेली उबदार आठवण. ही फक्त शिवण नसते, तर ती काळाच्या नात्यांची गुंफण असते. त्यामुळेच गोधडी ही कौटुंबिक इतिहासाचा सुरेख वास्तुरूप ऐवज ठरते. 

              ही पारंपरिक गोधडी म्हणजे एक प्रकारची सांस्कृतिक हस्तकलाचं होती. गोधडीतून सांस्कृतिक व सामाजिक वीण गुंफली जात असे. यामध्ये स्त्रियांच्या कौशल्याला आणि कलेला एक व्यक्त होण्याचं व्यासपीठ मिळायचं. काही ठिकाणी गोधडीवर पारंपरिक कड्या, देवी-देवतांचे प्रतिकात्मक आकृतीचित्रे, सुबक भरतकामही केले जात असे. कपड्यांचचे वेगवेगळे आकार तिच्यावर रेखले जात असत. गोधडीतून शिवण्याच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द वाढीस लागत असे . शेजारणी एकमेकींच्या मदतीने हें काम पूर्ण करत. त्यानिमित्ताने सुख दुःखाच्या गप्पा गोष्टी होत असत. तसेच परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागत असे. घरी लग्न समारंभाच्या निमित्ताने नव्या सोयऱ्यासाठी गोधडी शिवण्याची प्रथा होती . यामुळे गोधडी बरोबरच स्नेहाचे धागेही भक्कम होत असत. भारतीय स्त्रीच्या जीवनातील एक सजीव आठवण म्हणून गोधडीचे स्थान आपल्या संस्कृतीत मोलाचे आहे. आजही ग्रामीण भागात गोधडीची परंपरा टिकून आहे. मात्र त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. 

             आज ग्रामीण महिला गटांनी व्यवसाय म्हणून गोधडी शिलाई सुरू केली. मात्र या गोधड्या मशीनवर शिवल्या जातात. आजच्या आधुनिक काळात गोधडी एक पारंपरिक हस्तकला म्हणून नावारूपाला आलेली दिसते. शहरी बाजारात हातावर तयार केलेली गोधडीला एक आकर्षक आणि पर्यावरणपूरक उत्पादन म्हणून मागणी आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, महिलांचे स्वयंसहायता गट, तसेच डिजाईन क्षेत्रातील लोकांनी गोधडी शिलाईला एक नवसाज दिला आहे. मात्र पारंपरिक गोधडीचा बाज या आधुनिक रूपातील गोधडीला नक्कीच नाही. आतल्या चिंद्या जरी घरातल्या वापरल्या तरी त्या नायलॉन, टेरिकॉट किंवा कृत्रिम धाग्यांच्या असतात. त्यातच इतके पटापट नवनवे कपडे वापरले जातात कीं त्यामुळे कपड्यांशी संबंधित स्मृतीच राहत नाहीत. आणि पालासाठी तर अलीकडे नवीनच किंवा मूळत: नक्षीदार साड्या वापरल्या जातात. त्यामुळे हा केवळ दिखाऊपणा ठरतोय. 

               आईच्या हाताने बेतलेल्या, शिवलेल्या गोधडीची ऊब आणि माया जिव्हाळा आजच्या गोधडीत जाणवतं नाही. आईच्या स्पर्शाची आणि संस्काराची घट्ट वीण तिच्या गोधडीत असते. आज आई नाही ...!  मात्र शेवटच्या तिच्या स्पर्शाची ऊब अजूनही माझ्या मनाच्या आत खोल कुठे तरी घर करून आहे. आई एक कलाकार होती, एक संस्कारक होती. तिने शिवलेली एक रंगीत गोधडी मात्र घरात आहे. माझ्या अंथरुणात आजही तिच्या हातांची  ती ऊब अजूनही साठवून ठेवलेली आहे.

              गोधडीत आठवणीच्या साठवणी लपलेल्या असतात. गोधडी जशी जीर्ण होतं जाते तासातश्या आठवणीचे रंगींबरंगी पदर खुलून येतात. तिला अंथरताना, पांघरताना, धुताना, वाळत घालतानाच्या सर्व आठवणी तिच्यात दडलेल्या असतात. गोधडी म्हणजे आईच्या कुशीतली झोप, आजीच्या मायेचा उबदार थर, आणि आयुष्याच्या आठवणींचं थरथरणारं वस्त्र असते. अशी गोधडी अडगळीत पडू देऊ नका, हरवू नका… ती जपून ठेवा.

                कारण गोधडी ही केवळ आठवणी जपणारी वस्तू नसून, ती आठवणी घडवणारी संस्कृतीआहे. या वैभवशाली संस्कृतीचं जतन व्हावं हीच अपेक्षा ! 


✍️ डॉ. अशोक शिंदे

मुधोजी महाविद्यालय, फलटण 

      

रविवार, ८ जून, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र.९ बाज

 बाज 

           संध्याकाळचं जेवण झालं की लगेचचं आबांची झोपण्याची तयारी सुरु व्हायची. ओसरीच्या भिंतीला एका अंगावर टेकवून ठेवलेली उभी ’बाज‘ ते अलगदपणे खाली ओढून चार पायावर आडवी टेकवायचे. हे काम ते एकटेच आणि सहजपणे करत असत. एकदा बाज टाकून झाली की मग आबा त्यावर एक घोंगडी अंथरायचे. ज्या बाजूला डोकं करायचे आहे त्या बाजूला एक उशी ठेवायचे. पायाकडच्या बाजूला चादर किंवा गोधडी असायची. आबांची झोपायची जागा तशी ठरलेली नसायची. कधी ते आत ओसरीत झोपायचे, तर कधी बाहेर अंगणात गोठ्याजवळ. जेंव्हा त्यांना अंगणात झोपायचं असेल तेंव्हा मात्र अंगणात बाज घेऊन जाण्यासाठी ते कोणाची तरी मदत घेत असत. या कामात कित्येक वेळा मी आबांना मदत करत असे. सकाळी उठल्यानंतर आबा आपले अंथरून पांघरून उचलायचे आणि नेहमी प्रमाणे नेहमीच्या जागी बाज ठेवली जायची. कित्येक वर्षांपासून आबा ही बाज वापरत होते. लाकडी सांगाडा आणि काथ्याच्या दोरीने विनलेली ती बाज अत्यंत मजबूत आणि देखणी दिसत असे. 

           आबांनी ही बाज बयाजी नानांकडून बनवून घेतलेली होती. बयाजी नाना म्हणजे आमच्या गावातील एक प्रसिद्ध लाकडी साधने, वस्तू बनविणारा कारागीर. घर, शेती आणि इतर कामासाठी लागणाऱ्या सर्व लाकडी वस्तू नानांच बनवायचे. आबांनी शेतातील जांभळीच्या लाकडाची ही खास  स्वतःसाठी बाज बनवून घेतलेली होती. नानांनीही आपली सर्व कला - कारागिरी ओतून ही बाज तयार केलेली होती. सुबक व रेखीव आकाराचे चार पाय आणि त्या पायांमध्ये तशाच प्रकारच्या घट्ट वसवलेल्या चार बगला यामुळे आबांजी ही बाज एकदम भक्कम झाली होती. नानांनी फक्त बाजेचा हा सांगाडा बनवला होता. या बाजेचे विणकाम मात्र आबांनी स्वतःचं केलेले होते. बाज विनण्याच्या कामात आमचे आबा चांगलेच पटाईत होते. 

           आबांकडे ही कला असल्यामुळे लोक आबांकडून बाज विणून घेण्यासाठी कायम आमच्या घरी येत असत. बाजेचा आकार हा सर्वसाधारणपणे सारखाच असतो. साधारणत: चार हात लांब आणि दोन हात रुंद असा बाजेचा आकार असायचा. त्यामुळे  पूर्वतयारी म्हणून आबा त्यांना विणण्यासाठी  आवश्यक असणारा काथ्या व दावं आणून ठेवायला सांगत असत. एकदा सर्व तयारी झाली की मग आबा ज्यांची बाज विणायची आहे त्यांच्या घरी जायचे. अशावेळी मी सुद्धा अनेक वेळा त्यांच्याबरोबर गेलेलो आहे. प्रथम आबा मोकळ्या जागी किंवा अंगणात बाजेचा सांगाडा घ्यायचे. सुरवातीला आबा बाजेच्या लांब बाजूंवर पायापासून एक दीड फूट अंतर सोडून एक दोरखंड किंवा दावं बांधायचे. बाजेच्या एका बगलेपासून हे दावं गुंडाळत दुसऱ्या बगलेला गाठ देऊन बांधले जायचे. हे करत असताना दाव्याचे दोन्ही पदर एकमेकांशी गुंडाळले जात असत. त्यामुळे या दोन पदरांना भक्कमपणा यायचा. आता हे गुंडालेले दोन्ही पदर ताणून राहावेत म्हणून या  दाव्याला मध्यभागी एका लाकडी दांडक्याने पिळकावणे दिले जायचे. या लाकडी दांडक्याचे एक टोक दाव्याच्या पिळ्यात तर दुसरे टोक बाजेच्या आडव्या रुंद बाजूच्या बगलेत अडकवले जात असे. हे काम म्हणजे बाजेच्या विणीचा महत्वाचा टप्पा होय. एकदा हा टप्पा पार पडला की आबा बाज विणण्याच्या कामाकडे वळायचे. 

             प्रत्यक्ष बाज विणायच्या आधी काथ्याचा लांबलचक दोर एका लाकडी कांडकीला गुंडाळला जायचा. शक्यतो हे काम आबा तिथे यायच्या आधीच केले जात असे. आबा काथ्याची ती गुंडाळी घेऊन विणायला सुरुवात करत. प्रथम ते काथ्याच्या दोरीचे एक टोक आधी आडव्या बांधलेल्या दाव्याच्या एका बाजूला गाठ देऊन गठ्ठ बांधायचे. त्यानंतर मग हातात काथ्याची दोरी घेऊन बाजेच्या  बांधलेल्या टोकाच्या विरुद्ध कोपऱ्याच्या दोन्ही बगलांना दोन बोटं अंतर ठेऊन गुंडाळायचे. असे करताना ते आधी उजव्या बगलेच्या वरच्या भागावरून खाली काथ्याचा पदर ओढायचे आणि खालून पुन्हा त्याच पदराच्या वरून आढा देत डाव्या लांब बगलेच्या वरच्या भागावरून खाली ओढून पुन्हा वर घेऊन त्याच पदराला आढा देत असत. अशावेळी काथ्याचा दोर बाजेच्या पायाखालून हव्या त्या बाजूला घेतला जात असे. विरुद्ध कोपऱ्यातून काथ्याचा पदर जिथून सुरुवात केली त्या बाजूच्या कोपऱ्यात याच पद्धतीने ओवला जात असे. अशा रितीने बाजेचा पाहिला वेढा पूर्ण केला जात असे. असेच एकामागोमाग एक असे चार वेढे ओवले की बाजेची चार पदराची पाहिली वीण तयार व्हायची. नंतर दोन बोटं जागा सोडून दुसरी वीण केली जायची. 

           एकदा बाजेची पाहिली वीण झाली की,  मग मात्र आबा पटपट बाकी बाज विणायचे. बाज विणताना काथ्याची गुंडाळी खालच्या खाली इकडून तिकडे फेकली वा ओढली जात असे. कधी ती गुंडाली गरगर देखील फिरत असे. माझे त्या गुंडाळीकडेच अधिक लक्ष असायचे. उजवीकडून डावीकडे अशा रितीने बाज विनली जात असे. बाज विणत असताना आबा अधून मधून काथ्याचा दोराला ताण देत असत. शेवटी ज्या बाजूने विणायला सुरुवात केली गेली होती अगदी त्याच आडव्या दोराच्या दुसऱ्या बाजूला शेवटच्या विणीतील पदर गठ्ठ गाठ देऊन आबा बांधायचे. अशा रितीने बाजेची वीण पूर्ण व्हायची. मात्र ही वीण काहींसी सैल वा ढिली असायची. बाजेवर झोपल्यावर झोल पडू नये यासाठी आबा विणेला ताण द्यायचे. हा ताण देताना ते बोटाएव्हढी जाड सुती दोरी वापरत असत. ही दोरी प्रथम पिळा दिलेल्या दोरखंडाळा बांधून जवळच्या आडव्या बगलेत ओवून पुन्हा दोरखंडात ओवली जायची अशा रितीने एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे ही दोरी ओवली जात असे. अधिक ताण यावा म्हणून आबा तीन, चार वेढ्यांनंतर पुन्हा मागचे वेढे चाळवून घेत असत. शेवटी ओढून ताणून दोरीचे शेवटचे टोक बगलेच्या दुसऱ्या बाजूला असाडी गाठ देऊन बांधले की आबाचं कामं फत्ते होत असे. शेवटी पिळक्याचं लाकडी दांडके काढून घेत आबा बाजेवर स्वतः बसत आणि बाज पक्की झाल्याची खात्री करून घेत. 

            आवश्यक तेवढं सर्व साहित्य तयार असेल तर आबा अर्ध्या - पाऊण तासातच बाज विणून पुरी करायचे. बाज विणत असताना आबांची अनेक मित्रमंडळी गप्पा टप्पा मारत असत. आबांच्या या कलेचे सर्व जण तोंड भरून कौतुक करायचे. मात्र आबांनी या कलेचा आर्थिक स्वरूपात कधीच मोबदला घेतला नाही. बाज पूर्ण विणून झाली की मग सर्वांसाठी चहापान व्हायचे. हाच आबांसाठी खूप मोठा आनंद असायचा. आजपासून आपल्या ओसरीत वा अंगणात बाज टाकली जाणार या कल्पनेने बाजंचा मालक तर लई खुश असायचा. त्याकाळी बाज हे घरातले झोपण्यासाठी वापरली जाणारे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. आपल्या ग्राम संस्कृतीत बहुउद्देशीय पारंपरिक साधन म्हणून बाजेला मानाचे स्थान आहे. अनादी काळापासून आपल्या संस्कृतीत या बाजेचे अस्तित्व असल्याचे आढळून येते. 

            प्राचीन काळातील ‘बाज’ हे पलंगासारखे परंतु काहीसे वेगळ्या रचनेचे झोपण्याचे व बसण्याचे पारंपरिक साधन होते. याचा उपयोग केवळ झोपेसाठी नव्हे, तर धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक संदर्भांतही होत असत. वैदिक व उत्तरवैदिक काळात शय्या’, ‘आसन’, ‘पर्वतिका’ अशा संज्ञांचा उल्लेख वेद व ब्राह्मण ग्रंथांमध्ये आढळतो. झोपण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये लाकूड, काठी व दोऱ्यांनी तयार केलेली चौकट होती. तीच पुढे बाज म्हणून ओळखली जाऊ लागली असावी. याच काळात एक प्रकारचे उच्च शय्यासन‘ राजांकडे व ऋषी-मुनींकडे असायचे. बौद्ध-जैन कालखंडातील बौद्ध ग्रंथांमध्ये ’काठकं मंच‘ (लाकडी पलंग), ’पल्लङ्कं‘ (बाज) असे उल्लेख आहेत. याच काळात बाजेसदृश्य अशा लाकडी चौकट, दोरी व चटईसदृश झोपण्याची साधने वापरली जात होती. जैन साधूंच्या नियमांमध्येही अत्यंत साधी बाज वापरण्याचे संकेत दिले गेले होते. गुप्तकाळात दरबारांमध्ये  शाही मंडळींत ‘सुशोभित बाज’ वापरली जात असे. याकाळात काष्ठहस्तिदंत  सुवर्ण अलंकारांनी सजवलेली बाज राजांमध्ये प्रतिष्ठेचे मानलली जात असे. सामान्य लोक मात्र साध्या लाकडी चौकटीची म्हणजेच दोऱ्यांनी विणलेले बाज वापरत असत. 

           मध्ययुगीन काळात बाज हे साधन केवळ झोपण्यापुरते मर्यादित नव्हते. याकाळात  संत मंडळी बाजेचा उपयोग प्रवचन, भजन, बैठक अशा पारमार्थिक कार्यासाठी करत असत. याच काळात गावोगावी लाकूड व दोऱ्यांपासून स्थानिक कारागीर बाज तयार करीत. बाजेचे वैभवशाली रूप मोगल दरबारात आढळते. जडजवाहीर लावलेली  दिवाणखाना बाज मोगल कालखंडडात अस्तित्वात होती. याच मराठा सम्राज्यात किल्ल्यांमध्ये व वाड्यांमधील दरबारात व खासदारांच्या खोलीत बाज ठेवली जात असे. ब्रिटिशकाळात इंग्रजांच्या आगमनानंतर लोखंडी पलंग आले, पण ग्रामीण व मध्यमवर्गात पारंपरिक बाज टिकून राहिलेली होती.

            पुढे स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिकिकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे घरगुती वापराच्या अनेक वस्तूंसाठी अनेक पर्याय निर्माण झाले. हरित क्रांतीनंतर तर गाव- खेड्यातील सर्वच घटकांच्या जीवनमानात आमुलाग्र बदल होत गेला. पारंपरिक भारतीय ग्राम संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होऊ लागले. त्यामुळे हळू हळू घर व दैनंदिन जीवनातील नित्य नैमित्तिक साधने वा वस्तुंच्या जागी आधुनिक शैलीच्या वस्तू वापरल्या जाऊ लागल्या. त्यामुळे पारंपरिक लाकडी व काथ्या - सुती दोरांच्या बाजेलाही विविध पर्याय उभे राहिले. आज ओसरी - अंगणात दिमाखात ठाण मांडून बसलेली बाज कुठेतरी अडगळीत पडलेली दिसते. 

               बाजेला आपल्या संस्कृतीत खूप मानाचे स्थान आहे. भारतात प्राचीन काळापासून वापरली जाणारी बाज, चारपाई, खाट ही पलंगसदृश पारंपरिक झोपण्याची व बसण्याची अत्यंत महत्त्वाची साधने होती. आज ही सर्व साधने आपल्या अस्तित्वाच्या कडेलाटावर आहेत.  बाजेसह लोखंडी खाट आणि पलंगदेखील आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहेत. लोखंडी खाटा तर अडगळीत गंजलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत. पलंगाचे स्थानही राजवाडा, देव - देवतांची मंदिरे यापुरतेच मर्यादित असलेले दिसून येत आहे. आणि बाज तर आज बाजूलाच पडलेलीच दिसत आहे. बाजेला धार्मिकसामाजिक  सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान असल्याचे दिसते. काही प्रदेशांमध्ये श्रीकृष्ण जयंती किंवा राम जन्म यासारख्या उत्सवांत बालमूर्ती झोपविण्यासाठी बाजेचा वापर करण्याची प्रथा आहे. विशेषतः मृत व्यक्तीला आंघोळ घालण्यासाठी बाज उपयोगी पडायची. तसेच प्राचीन काळी काही भागांमध्ये अंत्ययात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या तिरडीसाठीदेखील बाजेचीच वरची चोकट वापरली जायची. काही ठिकाणी तर लग्नात नवदाम्पत्य बसण्यासाठी सजवलेलली बाज वापरण्यात येत असे. स्त्रीच्या सासरी जाण्याच्या वेळीही तिचा सगळा संसार एका बाजभोवतीच गुंफलेला असायचा.

               बाज हे फक्त झोपण्याचे साधन नसून ती भारतीय संस्कृतीचापरंपरेचा आणिजीवनपद्धतीचा एक अविभाज्य भाग होती. 

बाजेमध्ये संवादशिस्तश्रद्धाआणि सौंदर्यबुद्धीचा संगम पाहायला मिळतो. बाज ही त्याकाळी ग्रामीण भागात सामाजिक संवाद व चर्चेची केंद्रबिंदू होती. सायंकाळी वा फावल्या वेळात लोक एकत्र येऊन बाजेवर बसून गप्पा मारत असत. पै - पाहुण्यांचे स्वागत वा आदरातिथ्य या बाजेवरच होत असे. बाळ आणि बाळंतीन यांच्यासाठी तर बाज संजीवनी असायची. आईप्रमाणेच बाजेबरोबरही बाळाची नाळ जुळली जात असे. बाजेखालून दिलेला शेक बाळ आणि बाळंतीनीसाठी खूप मौलिक असायचा. आई बरोबरच बाजेचीही ऊब बाळाला अनुभवायला मिळत असे. पुढं वाढत्या वयात वेळ मिळेल तेंव्हा घरातील लहानगे बाजेवर उड्या मारण्याचा मनसोक्त आनंद घेत असतं. आम्ही सुद्धा आबांचा वा मोठ्यांचा डोळा चुकवत बाजेवर उड्या मारण्याची मज्जा अनुभवली आहे. संध्याकाळचे जेवण झाल्यावर याच बाजेवर बसवून आबा आम्हाला छान छान गोष्टी, गमती- जमती सांगायचे.  कधी कधी आम्हाला बाजेवर झोपायलाही मिळत असे. तो आनंद तर काय वर्नावा! उन्हाळ्यात केल्या जाणाऱ्या वाळवणामध्येही गृहिणींना बाज अतिशय उपयोगी पडायची. सुगीच्या काळातही खळ्यावर बाज टाकली जायची. 

             आज नवसंस्कृतीचं युग अवतरताना दिसत आहे. घर आणि अंगण आज पूर्णत: बदलून गेलं आहे. सुंदर, सुरेख, टापटीप आणि सुव्यवस्थितपणाच्या अभिलषेपायी पारंपरिक साधने व वस्तू घरातून हद्दपार होऊ लागल्या आहेत. पारंपरिक लाकडी बाजेच्या जागी आज लोखंडी नायलॉनयुक्त बाजा आज सर्वत्र दिसत आहेत. आजच्या काळात फायबरचे पलंग, लोखंडी खाट, फोल्डिंग बेड यांनी ‘बाज’चे स्थान घेतले आहे. अशा आधुनिक डिझायनिंगमध्ये पारंपरिक बाजेचे पुन्हापुनरुज्जीवन होत आहे. काही शहरी घरांत इंटेरियर डिझाईनमध्ये पारंपरिक बाज शोभेचा भाग बनताना दिसतात. या नव्या रूपातील बाजा सुंदर, सुरेख, मजबूत, दणकट आणि आकर्षक आहेत; मात्र ओसरी अंगणात दिमाखात उभी असलेल्या काथ्या - सुताची बाजेची ऊब आणि रुबाब त्या देऊ शकतील का ? 

             एकेकाळी बाज हे आपल्या घराचं वैभव मानलं जात असे. बाज आपल्या संस्कृतीचा कला वारसा पुढे घेऊन जाणारे महत्वाचे साधन आहे. पारंपरिक लाकडी बाजांवर केलेले कोरीव काम, रंगकाम आणि विणकाम हे स्थानिक कारागिरीचा उत्कृष्ट नमुना मानले जात असे. विशेषत: हातानेविणलेल्या दोऱ्यांची बाज हा आपल्या विणकलेचा उत्कृष्ठ आविस्कार समजला जातो.  कला संस्कृतीसह कुटुंब संस्कृतीलाही खंबीरपणे पेलण्याचं आणि आधार देणाचं मोलाचं कामं बाज करत असे. बाज घरातील अनेक सुख - दुःखाच्या गोष्टींची साक्षीदार असे. दिवस उगवल्या पासून ते रात्रीअखेर आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मानवी जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनांची साक्षीदार असलेली ही बाज आज मात्र आपल्या जीवनातून पूर्णतः बाजूला होताना दिसत आहे. 

               आजच्या यंत्रयुगात या पारंपरिक साधनांना जपणे म्हणजे आपल्या संस्कृतिशी  जोडून राहणे होय. बाज जशी भूतकाळाची साक्षीदार आहे, तशीच ती आजही घराघरांत शांतीस्नेह आणिसौंदर्य यांचा आधारभूत गाभा असावी असे वाटते.  म्हणूनच ग्रामसंस्कृतीचे हे कला प्रतिक आज जपून ठेवणे गरजेचे आहे. बाज आज अडगळीत जातेय.  त्याबरोबर नानांची शिल्पकला आणि आबांची विणण्याची कलाही काही काळात अस्तंगत होईल. म्हणूनच ग्राम संस्कृतीचं हे कला वैभव, भारतीय संस्कृतीचा, श्रद्धेचा, प्रेमाचा आणि घरगुती संवादाचा आधार, कुटुंबाच्या संवादाचा आसरा,  ग्रामीण सौंदर्याचा एक जीवंत वारसा आणि पिढ्यानपिढ्यांना संस्कारांची शिदोरी देणारी ही बाज ओसरीत पुन्हा सजावी हीच अपेक्षा!


✍️ डॉ. अशोक शिंदे, 

प्राद्यापक, मराठी विभाग,

मुधोजी कॉलेज, फलटण

मोबाईल - ९८६०८५०३४४