गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

अडगळीतील समृद्धी- लेख क्र. १४

 अडकित्ता

           रात्रीची जेवणं आटोपली की ओसरीत आजोबांचा एक छोटासा मुखशुद्धीचा कार्यक्रम सुरु व्हायचा. ओसरीतल्या देवळीत आजोबांचा एक चौकोनी डबा असे. आजोबा त्याला पानपुडा म्हणायचे. हा पानपुडा घेऊन ते ओसरीत बैठक मारत असत. कधी सतरंजी अंथरून तर कधी बाजेवर बसून आजोबांचा हा कार्यक्रम चांगलाच रंगायचा. पांढरे शुभ्र धोतर नेसलेले आजोबा मांडी घालून बसायचे. आजोबांची मांडी म्हणजे घरातल्या सर्व लहानग्यांची हक्काची जागा. मात्र या जागेवर पहिला अधिकार असायचा तो सगळ्यात धाकट्याचा. पण यावेळी आजोबांच्या मांडीवर मात्र कोणीही बसायचे नाही.

           सगळे जण आजोबांच्या पुढे अर्धगोलाकार बसायचे. प्रत्येकाची जागा ठरलेलीच असायची. ज्याने त्याने आपापली जागा घेतली की मग आजोबांच्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायची. आजोबांचा पानपुडा म्हणजे एक आखीव, रेखीव , कोरीव व जाळीदार नक्षी असलेली सुंदर पेटी होती. आजोबांच्या या पानपुड्यात अनेक पदार्थ आणि वस्तू असायच्या. ही पेटी म्हणजे लहानग्यांसाठी अलीबाबाची गुहाच असायची. आजोबा या पेटीतून एक एक रत्न काढावे तशी एकेक वस्तू बाहेर काढायचे. सर्व जण अगदी कुतूहलाने या वस्तूंकडे बघत असत. 

           सर्वप्रथम आजोबा हिरवी दोन पानं बाहेर काढायचे. ती पाने वाटीतल्या पाण्याने धुवून घ्यायचे. मग त्यांच्या देठांना चिमटीत धरून त्यातील पाणी शिपडायचे. नंतर एक एक करत ती पाने आपल्या उजव्या मांडीवर चोळायचे आणि पुसून घ्यायचे. मग एकाखाली एक जुळवून पानांचे दोन्ही देठ बोटांनी हळूच खुडायचे व ते देठ दाताखाली दाबून ठेवायचे. नंतर आजोबा पानपुड्यातून छोटीशी नाजूक कात्री काढायचे. ही कात्री म्हणजे लहानग्यांचे भारी आकर्षण पण तिला कोणीही हात लावायचा नाही अशी आजोबांची तंबी असायची. या नाजूक कात्रीने आजोबा पानाचा काही खराब भाग कापायचे. दोन्ही पानांचे आकार एकसमान करायचे आणि ती पाने उजव्या मांडीवर ठेवायचे.

           त्यांनतर आजोबा पेटीतून चुन्याची नाजूक डबी काढायचे. उजव्या अनामिकेच्या नखाच्या वरच्या बाजूने त्यातील चुना काढायचे आणि वरच्या पानावर लावायचे.  मग आजोबा एक छोटीशी पांढरी सुती पिशवी बाहेर काढायचे. तिचे तोंड एका बंदाने गाठ मारून बंद केलेले असायचे. आजोबा हळूच तो बंद ओढायचे. तोंड उघडले की त्यातून एक छोटासा लालसर काताचा खडा बाहेर काढायचे. त्याची भुकटी करून ते चुन्यावर टाकायचे. त्यानंतर आजोबा एक सुपारी बाहेर काढायचे. 

            सुपारी बाहेर काढली की आतापर्यंत अगदी शांतपणे बसलेले सर्वजण आणखी सुदरून बसायचे. आता त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असायची. कारण ज्या क्षणाची ते आतुरतेने वाट पाहत असायचे तो सुपारी कातरण्याचा क्षण समीप आलेला असायचा. आजोबा सुपारी बाहेर काढायचे. तिच्यावर जोराची फूक मारून ती स्वच्छ करायचे. नंतर ते पेटीतून एक अत्यंत देखणी वस्तू बाहेर काढायचे. ती वस्तू म्हणजे अडकित्ता. सुपारी कातरण्याचे हे हत्यार. त्याचा आकार आणि त्याचं कार्य या दोन्हीही गोष्टी अगदीच कुतूहलाच्या असायच्या. हा अडकित्ताच लहानग्यांचे खास आकर्षण असायचा.     

           आजोबांचा हा अडकित्ता साधारण अर्धा फूट लांबीच्या दोन पोलादी दांड्यांनी जोडलेला होता. वरच्या दांडीला निम्म्यापर्यंत एक धारदार पाते व बाकी निम्मा भाग गोल आकाराचा दांडा होता. खालची बाजू निम्यापर्यंत थोडीशी सपाट तर बाकी निम्मा भाग गोल दांडा अशी होती. आजोबा उजव्या हातात हा अडकित्ता घ्यायचे. याची खालची दांडी हाताच्या चार बोटावर व वरची दांडी अंगठ्याखाली येईल अशा रीतीने ते आडकित्ता हातात धरायचे. मग डाव्या हाताचा अंगठा व शेजारच्या दोन बोटांच्या चिमटीत ते सुपारी धरायचे. सुपारी कातरताना आजोबा आडकित्त्याच्या दोन्ही दांड्यांच्या मध्ये सुपारी धरायचे आणि अशा रीतीने तो चालवायचे की सुपारीचे अगदी पातळ पदर खालच्या हाताच्या बोटाच्या चिमटीत जमा व्हायचे. मुलांना याचीच मोठी गंमत वाटायची. आजोबांचा हा अडकित्ता आणि त्यांचे सुपारी कातरणे या दोन्ही गोष्टी लहानग्यांना खूपच आवडत असत. 

           कातरलेल्या सुपारीचे दोन तीन पातळ पापुडे आजोबा पानावर ठेवत आणि त्या पानांची त्रिकोणी घडी घालून ते पान खात असत. यावेळी आजोबा घरातील काही मंडळींनाही अशा पानाचे विडे बनवून देत असत. याचा लाभ काही लहान्यांनाही मिळायचा. पण यावेळी ते लहान मुलांना पान खाण्याबाबतचे नियम व अटीही सांगत असत. मात्र पान खाण्यापेक्षा आजोबांचा अडकित्ता व त्याने कातरली जाणारी सुपारी हे पाहण्यासाठीच घरातील ही लहान मंडळी रोज रात्री आजोबांजवळ येऊन बसत असत. ते जसे अडकित्ता हातात घेऊन सुपारी कातरतात तसाच प्रयत्न ही मंडळी करत असत. अडकित्ता हे पानपुड्यातील सर्वात महत्त्वाचे आणि लहान मुलांच्या आवडीचे साधन होते. अडकित्त्याशिवाय पानपुड्याला व पानविड्याला शोभा नसायची. म्हणूनच प्रत्येक घरात हे साधन असायचेच. 

           अडकित्ता हे दुहेरी तरफेच्या तंत्राचे एक हत्यार असते. सुपारी कातरणे आणि तिचे तुकडे करणे यासाठी ते वापरले जाते. मूळ ‘अडकोत्तू’ या कानडी शब्दाचे अडकित्ता हे मराठी रूप असावे. अडकित्त्याची निर्मिती लोकसंस्कृतीतील इतर उपयुक्त साधनांप्रमाणेच मानवी गरजेतून झाली आहे.  या साधनास सौंदर्याची जोड देण्याच्या प्रयत्नातून त्यावरील नक्षीकाम व त्याचे विविध आकार निर्माण झाले आहेत. काही अडकित्त्याच्या सपाट भागावर सोन्याचांदीचा मुलामा चढवून वेलबुट्या व नक्षी कोरलेल्या असतात. काहींवर आरसे, रंगीबेरंगी काचांचे तुकडे बसविलेले असतात, तर काही अडकित्त्यांना घुंगरेही जोडलेली असतात. तसेच काही अडकित्त्यांचा आकार देवदेवता व पशुपक्ष्यांप्रमाणे असतो. काही खानदानी घरातील अडकित्त्यात सोने, चांदी, पितळ, ब्राँझ इत्यादींचा मौल्यवान धातूंचाही वापर करण्यात आलेला दिसतो. भारतीय संस्कृतीत वेगवेगळ्या काळांत विविध प्रकारांचे असे अडकित्ते दिसून येतात.

           अडकित्ता हे साधन भारतीय पारंपारिक आहार संस्कृतीशी संबंधित एक प्रमुख साधन मानले जाते. हे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचे साधन आहे. ते केवळ घरगुती उपयोगापुरते मर्यादित नसून लोकजीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात ते खोलवर रुजलेले साधन आहे. प्राचीन काळात लोखंडाची साधने कमी प्रमाणात वापरले जात होती.  याकाळात सुपारी फोडण्यासाठी साधे लोखंडी किंवा तांब्याची धारदार पाती असलेली हत्यारे अस्तित्वात होती. सातवाहन व नंतरच्या दक्षिण भारतीय राजवटींमध्ये पान–सुपारी संस्कृती अत्यंत महत्त्वाची मानली जाऊ लागली. या काळात साधे, दांड्या–फळीचे लोखंडी साधन वापरले जात असे. या काळात शिल्पकला व कौशल्यातून लहान आकाराचे कातरणारे अवजार तयार झाले हे अडकित्त्याचे पहिले रूप असावे. 

              पुढे यादव, बहामनी व मोगल काळापर्यंत पान–सुपारीला राजाश्रय मिळाला. तो एक प्रकारचा शिष्टाचार बनला. या काळात अडकित्ता कलात्मक व शोभेची वस्तू झाली होती. याच काळात पितळ, कांस्य, चांदी, हत्तीचे दात, हाड, आणि कधी कधी सोन्याच्या पत्र्याने मढवलेलेही अडकित्ते बनू लागले. तसेच अडकित्त्याच्या पातीवर हत्ती, मोर, वेली, नक्षीकाम होऊ लागले. या काळात श्रीमंत वा राजेशाही परिवारात अडकित्ते वापरले जात होते. ब्रिटिश राजवटीत ग्रामीण व शहरी भागात पान–सुपारी खाण्याची प्रथा रूढ झाली होती. या काळातच अडकित्ते घराघरात सर्वसामान्य झाले. याच काळात विविध आकार नक्षी काम असलेले अडकित्ते तयार झाले. 

               आधुनिक काळात मात्र शहरी जीवनशैलीत बदल होत गेले. आहारशैली व पदार्थही बदलले. विभक्त कुटुंबपद्धती मूळ रोऊ लागली. नोकरी व्यवसायामुळे जेवणाच्या वेळा बदलल्या गेल्या. घरातील एकत्र पंगती जेवण कमी झाले. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी आजोबांचा वावर कमी होत गेला. अलीकडच्या काळात तर खाणावळी, उपहारगृहे, अतिथीगृहे, हॉटेल्स, रेस्टोरेंट यांची रेलचैल वाढली आहे. पाहुणे आल्यावर तर हमखास एखाद्या हॉटेलवर जेवणाचा बेत ठरवला जातो. तेथे पान स्टॉल असतेच. आता तर केवळ शहरातच नव्हे तर अगदी खेडोपाडी सुद्धा चौका चौकात पानाचे ठेले उभा राहिलेले दिसतात. आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे पानांचे प्रकारही प्रसिद्ध होत आहेत. शिवाय अशा पानांचे पार्सल देखील घरी आणण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे आज घरातून पान–सुपारी खाण्याची प्रथा हळूहळू कमी होत चालली आहे. 

             घरात पानपुडा आहे मात्र तो दिवाणखान्यातील काचेच्या कपाटाची शोभा व घराची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम करत आहे. आणि त्यातील अडकित्ता तर आहे की नाही ते दिसत सुद्धा नाही. एकेकाळी घराचे पारिवारिक सौख्य जोपासणारा हा अडकित्ता आज मात्र दिसेनासा झाला आहे. अडकित्ता केवळ कौटुंबिक भोजन संस्कृतीचा घटक नव्हता तर तो धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातही महत्त्वाची भूमिका बजावत होता. आपल्या आतिथ्य परंपरेचा प्रतिक म्हणून या साधनास खूप मान दिला जात असे. 

            धार्मिक विधी, सणवार, किंवा कौटुंबिक विशेष कार्यासाठी उपस्थित पै-पाहुण्यांच्या मेजवानी नंतर मुखशुद्धीच्या पाना इतकाच पान खाण्याचा कार्यक्रम सुद्धा रंगायचा. पाहुण्यांच्या हातात सुपारी कापून देणे हा पाहुण्याचा सन्मान समजला जायचा. पाहुण्यांना पानविडा देताना अतिथ्यसेवेचे समाधान मिळत असे. तोंडातील पान रंगण्यावरूनही यावेळी खूप चेष्टा, मस्करी व्हायची. याप्रसंगी इतर वस्तूंपेक्षा आडकित्ता हाच खास आकर्षण आणि चर्चेचा विषय असायचा.

            अडकित्ता हा कला संस्कृतीचा मौलिक ठेवा आहे. नक्षीकलेची विविध रूपे यामध्ये आढळतात. कारागिराची कलाकुसर वा सर्जनशीलता यामध्ये शिगोशिग भरलेली असते.  घरातील प्रतिष्ठा तथा कुलीनतेचे प्रतिक म्हणूनही अडकित्ता रुबाबात मिरवत असे. राजेशाही काळात तर राणीच्या महालात पानपुड्याचा मोठा थाट असे. त्यातील अडकित्ता सर्वात सुंदर रूपात असायचा. घरातील प्रतिष्ठेच्या वस्तूंमध्ये सर्वात रुबाब असायचा तो या अडकित्त्याचाच. जसा अडकित्त्याचा रुबाब असायचा तसाच तो अडकित्ता चालणाऱ्याचा सुद्धा असायचा. अडकित्त्याने सुपारी कातरणे हे एक कौशल्यच असायचे. यामध्ये घरातील वा गावातील ठराविकच लोक असतात. आमच्या गावचे साळीकराम तात्या सुपारी कातरण्यामध्ये अत्यंत प्रवीण होते. एक अख्खी सुपारी ते एकसलग एकाच वेळी कापून समोरच्यांच्या हातात ठेवत असे. गावात काही लोक तर असे असतात की ते भेट होताच सुपारी कातरून हातात ठेवतात आणि भेटीचा आनंद घेतात. 

            आदरातिथ्य आणि कौटुंबिक, सामाजिक सन्मान आणि समाधानाचे प्रतिक असणारा हा अडकित्ता सुपारी कातरण्याशिवाय इतर कामातही उपयोगी पडत असे. धान्याच्या पोत्याला शिवलेली सुतळी, चपलेची निसटलेली वादी आणि जनावरांच्या दाव्याची न सुटणारी गाठ कापण्यासाठी ऐनवेळी हा अडकित्ताच धावून येत असे. जनावरांचा चारा कातरणे तसेच उन्हाळ्यात लोणच्याच्या कैऱ्या फोडणे यासाठी जे अडकित्ते वापरले जायचे ते या अडकित्त्याचे थोरले भाऊबंदच होत. एकूणच कौशल्ययुक्त कापकामासाठी ग्रामीण संस्कृतीत अडकित्त्याचे स्थान खूप महत्त्वपूर्ण होते. 

           सद्या बदलत्या काळचा परिणाम म्हणा किंवा आधुनिक जीवनशैलीचे प्राबल्य म्हणा, यामुळे आपल्या ग्रामीण परंपरेचा हा मौलिक ठेवा आज आपल्या आहार संस्कृतीतून दूर होत चालला आहे. एकेकाळचा घराची प्रतिष्ठा दिमाखात मिरवणारा हा कुटुंब सोहार्द संस्कृतीचा साक्षीदार आज कुठेतरी निपचित पडला आहे. त्याचे सुबक व रेखीव नक्षीकाम व वैविध्यपूर्ण आकर्षक रूप-सौंदर्य एका बंद कपाटातील बंद डब्यात निस्तेज होऊन पडले आहे. अडकित्त्या बरोबर त्याची कातर कलाही अखेरच्या घटका मोजत आहे. अडकित्ता वापरातून कायमचा बंद झाला तर हळूहळू त्याबरोबर पानपुडा, कात, सुपारी हे पदार्थही दुष्टीआड जातील. 

               दुर्दैवाने आज घरातील एकत्र पंगती भोजनाचे औचित्यच कमी झाले आहे. यास्तव  अडकित्त्याची जागा घेणारे नवे आधुनिक वा तंत्रज्ञानयुक्त पर्यायी साधनही निर्माण झालेले दिसत नाही. तसे असते तर किमान पुढील पिढीला अडकित्त्याचे पूर्वरूप वा अवशेष तरी सांगता आले असते. अडकित्त्याप्रमाणेच बहुतेक घरातील ओसरी आणि आजोबांच्या जागेलाही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. मग तो रात्रीच्या जेवणानंतरचा त्यांच्या मांडीवरचा संवाद असो वा मुखशुद्धीच्या निमित्ताने कुतूहल आणि औसुक्याने भरलेला आनंद असो. या पिढीजात संस्कार परंपरेला आजचे बालपण मुकत चालले आहे. 

             म्हणूनच आज दिसेनासा झालेला, अडगळीत गेलेला हा समृद्ध परंपरेचा वारसा असलेला हा अडकित्ता पुन्हा आजोबांच्या हाती दिसावा. नातवाला या कलेचा समृद्ध वारसा लाभावा. यासाठी भारतीय संस्कृतीतील आदरातिथ्य, मंगलकार्य व कलात्मक अभिरुचीचा रुबाबदार साक्षीदार अडकित्ता पुन्हा पानपुड्यासह ओसरीत दिमाखात दिसावा हीच अपेक्षा! 


✍️ डॉ. अशोक शिंदे,

प्राध्यापक, मराठी विभाग

मुधोजी महाविद्यालय, फलटण 

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

आगळ लेख क्र. १३

 आगळ 

             आमच्या गावच्या पूर्वेला एक वस्ती आहे. पूर्वी तिथे अनेक वाडे होते. यामध्ये एक मोठा वाडा होता. भाऊंचा वाडा म्हणून हा वाडा ओळखला जायचा. चहूबाजूंनी उंच व रुंद चिरेबंदी भिंती, उंच भव्य जोतं, पश्चिमेला मुख्य दरवाजा तर पूर्व व उत्तरेला दोन दरवाजे, आत दोन चौक आणि मागच्या बाजूला गोठा असा हा भक्कम वाडा. इथं सतत माणसांची वर्दळ असे. शेतमजूर, गुराखी आणि इतर काही लोक यांचा इथं सतत राबता असे. आमचे वडिलही अधून मधून कामानिमित्ताने या वाड्यात जायचे. त्यांच्या बरोबर मीही कधी कधी या वाड्यात जायचो. 

        मुख्य दरवाज्यातून वाड्यात प्रवेश करताना मोठी चौकट ओलांडावी लागत असे. वाड्याला शोभेल असाच भक्कम देखणा असा हा मुख्य दरवाजा होता. सागाची चौकट आणि दोन पाखी दरवाजावर कोरीव काम करण्यात आले होते. सात- साडेसात फूट उंचीचा हा दरवाजा इतका जड आणि मजबूत होता की, लहान मुलांना सहजपणे तो लावता - उघडता येत नसे. मात्र जवळ कोणी मोठी माणसे नाहीत अशी संधी साधून कधी - कधी आम्ही लहान मुले हा दरवाजा आतून बंद करण्याचा प्रयत्न करायचो. मोठ्या नेटाने दरवाजाच्या दोन्ही बाजू ढकलून तो बंद करण्याचा आमचा प्रयत्न असे.   कधीतरी दरवाजा बंद करण्यात आम्हाला यश यायचं. 

             या दरवाजाच्या आतील बाजूने चौकटीच्या मध्यावर दगडी भिंतीत दोन्ही बाजूंना दोन चौकोनी खाचा किंवा खोबण्या होत्या. यातील उजवीकडील खोबणी दरवाजाच्या रुंदीपेक्षा थोडी लांब होती. तिच्यात एक चौकोनी लाकडाचा ओंडका ठेवलेला होता. हा लाकडी ओंडका लाकडी खणा सारखाच चौरस आणि गुळगुळीत होता. त्याच्या तोंडाला गोलाई देऊन बरोबर मध्यावर एक लोखंडी कडी बसवलेली होती. दरवाज्याच्या डाव्या बाजूची खोबणी भिंतीत साधारण एक फूट आत होती. दरवाजा आतून बंद केला की लोखंडी ओंडक्याच्या कडीला ओढून त्याचे तोंड डाव्या बाजूच्या चौकोनी खोबणीत घुसवले जायचे. एकदा हा लाकडी चौकोनी दांडा आडवा झाला की बाहेरून दरवाजा कितीही ढकलला तरी दार उघडले जायचे नाही. हा चौकोनी लाकडी ओंडका म्हणजेच ‘आगळ’. 

             दरवाजा आतून बंद करून हा आगळ दोन्ही भिंतीत सरकवला की वाडा अगदी पोलादी पेटीत बंद झाल्यासारखा वाटायचा. अशा प्रकारचे आगळ या वाड्याच्या सर्वच दरवाजांना होते. त्यामुळे दरवाजे आतून लावून घेऊन आगळ सरकवला की मग अख्खा वाडाच सुरक्षित व्हायचा. प्राचीन काळापासून वाडा किंवा घराच्या सुरक्षेचं चोख कार्य करणारे  ‘आगळ’ हे ग्रामीण संस्कृतीतील पारंपरिक साधन आहे. साधारणपणे लांबट गोलसर किंवा चौकोनी कडीसारखा लाकडी तुकडा म्हणजे आगळ. मानवी ग्रामीण संस्कृतीत सुरक्षा आणि आधार देण्याचे मोलाचे कार्य ‘आगळ’ या साधनाने साधलेले आहे. भारतीय संस्कृतीच्या विविध कालखंडात या आगळाला विशेष महत्त्व असलेले पहावयास मिळते. 

            प्राचीन काळी सिंधू संस्कृतीत घरांना व्यवस्थित दारे होती. उत्खननात दिसणारे चौकट, खाचा, सरकवणारे आडवे लाकडी साधन हे आगळाचे प्राथमिक रूप असावे असे समजले जाते. वैदिक व उत्तरवैदिक काळात ‘गृहसंरक्षण’ ही महत्त्वाची संकल्पना आली. धार्मिक ग्रंथांत गृहपालक देवता व द्वारपाल यांचा उल्लेख आहे. याच संकल्पनेतून दरवाजा आतून घट्ट बंद करण्याची पद्धत उदयास आली असावी.  गुप्तकालीन व प्राचीन नगररचना या काळात राजवाडे, मठ, देवळे यामध्ये भक्कम लाकडी दरवाजे प्रचलित होते. दरवाजा आतून बंद करण्यासाठी लाकडी सरकवटा किंवा आगळ याच काळात वापरले जाऊ लागले.

          मध्ययुगीन काळात इस्लामी स्थापत्यशैलीत व हिंदू-मराठा स्थापत्यशैलीत आगळाचे व्यापक रूप आढळते. किल्ल्यांचे मोठे दरवाजे आतून अडवण्यासाठी जाडसर लाकडी आगळ वापरले जात असत. गावातील वाड्यांत, हवेल्यांत मात्र साधे लाकडी आगळ लावले जात. आक्रमण किंवा दरोडे यावेळी हे आगळ मोठे बळकट रक्षण साधन ठरायचे. शिवकालीन रायगड, जंजिरा, प्रतापगड या किल्ल्यांत दुहेरी-तिहेरी आगळ आढळतात. ग्रामीण घरांत मात्र आगळ साधेच असायचे. वाडे व देवळात मात्र जाडसर, लांब लाकडी पट्ट्या चौकटीवर लावल्या जायच्या. पारतंत्र्याच्या काळात इंग्रजांनी कुलूप, चावी, धातूचे सरकवटे आणले, तरी ग्रामीण वाड्यांत व किल्ल्यांत पारंपरिक आगळ टिकून राहिलेले  होते. 

          आधुनिक काळात शहरी भागात लोखंडी व काँक्रीट गज, लोखंडी बोल्ट अशी पर्यायी व्यवस्था आली. मात्र या काळातही ग्रामीण भागात काही ठिकाणी लाकडी आगळाचा वापर होतच होता. कारण ग्रामीण भागात या काळात वाडे टिकून होते. पुढे वाडा संस्कृती हळूहळू लोप पावत गेली. नवीन घरे बांधली जाऊ लागली. त्यामुळे अशा घरात काही ठिकाणी लाकडी आगळाऐवजी लोखंडी सरकवटे बसवले जाऊ लागले. या काळात आगळाचे स्वरूप बदलले असले तरी त्याचा  वापर मात्र सुरूच होता. 

             अलीकडच्या काळात मात्र संपूर्ण देशात आधुनिक पद्धतीची गृहरचना होत आहे. जुणे वाडे, देवळे, गढ्या आज जीर्ण होऊन गेल्या आहेत. या वास्तुंचे बुरुंज, तटबंदी आणि प्रवेशद्वारे देखील ढासळत चालले आहेत. अनेक जूने वाडे पाडून तेथे नवी इमारत वा बंगला उभारला जात आहे. आधुनिक घरांप्रमाणे आज आधुनिक सुरक्षा व्यवस्था देखील निर्माण होत आहे. घरांच्या सुरक्षेसाठी आता नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामध्ये सीसीटीव्ही, इलेक्ट्रॉनिक लॉक, अलार्म सिस्टीम अशी आधुनिक सुरक्षा उपकरणे बाजारात आली आहेत. त्यामुळे आगळ ही संकल्पना आता हळूहळू लोप पावत चालली आहे. त्यामुळे जुन्या वाड्या, हवेल्या व देवळातील आगळ आज जीर्ण अवस्थेत दिसत आहेत. 

          आगळ हे केवळ आपल्या घराचे सुरक्षा साधन नव्हते तर ते घराची मर्यादा, सुरक्षितता आणि संस्कृतीचेही प्रतीक होते. प्रारंभी आगळ फक्त शारीरिक सुरक्षा आणि 

गृहसंरक्षणाचे साधन होते. नंतर मात्र ते सार्वत्रिक तथा साम्राज्य संरक्षणाचा अविभाज्य भाग बनले. दुर्गरक्षणाचा मुख्य घटक म्हणून आगळ महत्त्वाचा ठरला. आजच्या आधुनिक काळात त्याचे स्थान लोखंडी वा तांत्रिक साधनांनी घेतले असले तरी  आपल्या ग्रामीण संस्कृती व परंपरेचे प्रतिक म्हणून आगळ जपून ठेवणे गरजेचे आहे. 

            आपल्या घर आणि मालकाला हल्ले, दरोडे, आक्रमण यापासून वाचण्यासाठी भक्कमपणे बंदोबस्त करणारा हा आगळ मात्र आज स्वतःच असुरक्षित झाला आहे. कुठेतरी अडगळीत किंवा वाड्याच्या पडक्या अवशेषात अस्ताव्यस्तपणे तो बुजून गेला आहे. घर, गाव, साम्राज्य आणि संस्कृतीच्या सुरक्षेचा साक्षीदार असलेला हा आगळ आज अस्तंगत पावत चालला आहे. बाहेरच्या जगाचा धक्का बाहेरच्या बाहेर थोपवून मालकाशी इमान राखत अख्या कुटुंबाला शांत व निर्घोरपणे झोपी घालणारा हा आगळ आज मात्र अखेरच्या घटका मोजत आहे. आजच्या यांत्रिक कुलपांच्या आणि इलेक्ट्रॉनिक गजांच्या जगात या साध्या दिसणाऱ्या आगळाचे अस्तित्त्व जपणे  आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. 

            आपली पारंपारिक घरे साधी, पण भक्कम होती. दरवाजा बंद केला आणि आतून आडवा लाकडी आगळ सरकला की घर जणू अभेद्य किल्ला व्हायचं. हे आगळ म्हणजे केवळ लाकूड नव्हतं, तर मनःशांतीचं आणि निर्धोकपणाचं ते औषध होतं. बाहेर दरोडेखोर, लांडगे, वादळं असली तरी आत बसलेलं कुटुंब निश्चिंत झोपायचं ते केवळ आगळाच्या भरवशावर. आगळाने बंद केलेला दरवाजा म्हणजे फक्त बाहेरच्या माणसाला अडवणं नव्हे, तर आतल्या जगाला सुरक्षित ठेवणं होतं. 

          आज मानवी सुरक्षा, मालमत्ता सुरक्षा याकरिता वैयक्तिक, सामूहिक व शासकीय स्तरावर अनेक उपाय योजना वा विविध उपक्रम राबविले जातात. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काही कायदेही करण्यात आले आहेत. मात्र आगळाची मजबुती आणि विश्वासार्हतेची सर त्याला येणार नाही. 

              ज्या आगळाने मानवी संस्कृतीला स्वसंरक्षणाचा मूलमंत्र दिला, सुरक्षिततेची हमी दिली असे हे विश्वासचं प्रतिक आणि घराचा खंबीर राखणदार आपण आहे त्या स्थितीत जपायला हवा. घराच्या सुरक्षेबरोबरच घराचं घरपण शाबूत राखणारा हा ‘आगळ’ सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. म्हणूनच अडगळीत पडलेला हा ‘आगळ’ उचित जागेवर सरकला जावा एवढीच अपेक्षा!


डॉ. अशोक शिंदे

प्राध्यापक, मराठी विभाग

मुधोजी महाविद्यालय, phalatan

Mob. 9860850344

शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०२५

पोहरा - अडगळीतील समृद्धी लेख - 12

              पोहरा 

           दिवस उगवायच्या वेळेला गावच्या सरकारी आडावर महिलांचा एकच गलका उठायचा. पाणी भरण्यासाठी त्यांची जणू झुंबडचं उडायची. सरकारी आड आमच्या गावच्या नागनाथ मंदिराच्या पूर्वेला होता. गोल आकाराचा हा आड आतल्या पक्क्या खडकापासून ते वर जमिनीपासून दोन अडीच फूटापर्यँत चौकोनी चिऱ्यांनी बांधलेला होता. त्याचा शेवटचा म्हणजेच वरचा थर अर्धगोलाकार घडीव तोडीचा होता. वाऱ्या वादळात धूळ किंवा कचरा आडात पडू नये म्हणून अशा चौथरा किंवा कट्याची बांधणी केली जात असावी. तसेच मोकाट जनावरं आणि लहान मुलांचे संरक्षण व्हावे म्हणूनही अशी व्यवस्था केलेली असावी. आडाच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूला दोन  रहाट बसवलेले होते. रहाटासाठी दोन्ही बाजूला वावभर रुंद जागा सोडलेली होती. तेथे जमिनीलगत एक आडवी व दोन उभ्या लांब दगडी तोंडी बसवलेल्या होत्या. उभ्या दोन तोडींच्या तोंडाला प्रत्येकी एक भोक पाडलेले होते. यामध्ये रहाटाचे उभे दोन लोखंडी खांब बसवलेले होते. या दोन खांबांच्या वरच्या टोकातून एक आरपार लोखंडी पाईप बसवलेला होता. त्या पाईपच्या मधोमध एक लोखंडी चाक किंवा कप्पी बसवलेली होती. असे हे राहाट दोन्ही बाजूला होते.

            खरं तर आमच्या गावात दोन - तीन आड होते. मात्र रहाट असलेला आणि सभोवती मोकळी जागा असलेला हा एकमेव सरकारी आड होता. हा आड तसा खूप खोल नव्हता. साधारण दोन- तीन परस खोली असलेला हा आड जवळून गावनदी वाहत असल्यामुळे वर्षभर गावाला पाणी पुरवायचा. उन्हाळ्यात मात्र याचं पाणी बरच खाली जायचं. कधी कधी आडाचा तळही दिसायचा. मात्र गावाला पुरेल एवढं पाणी या आडात हमखास असायचं. त्यामुळे या अडावर पाणी भरणारांची सतत वर्दळ असे. म्हणूनच डोक्यावर हंडा, त्यावर कळशी आणि हातात पोहरा घेऊन गावातील बायकांची या आडावर पाणी भरण्याची लगभग सुरु असायची. त्यांच्या एकमिकींशी बोलण्यामुळे एकच कालवा होत असे. या आडावर पाणी शेंदण्यासाठी एका मागोमाग एक असे महिलांचे नंबर लागलेले असत. काही वेळेला देवाला पाणी घालायला आलेली भाविक मंडळी देखील या आडावर आपला गडवा भरून घ्यायला यायची. रहाटामुळे पाणी खोल असले तरी शेंदण्यास कमी कष्ट पडत असे. त्यामुळे अगदी आनंदाने एखादी महिला आपला पोहरा भाविकांच्या भांड्यात ओतत असे. पोहरा हे त्याकाळी आडातून किंवा विहिरीतून पाणी शेंदण्याचे एक प्रमुख साधन होते. त्याकाळी प्रत्येक घरी पोहरा हमखास असायचाचं 

            पोहरा म्हणजे लाकडी किंवा धातूच्या पत्र्यांपासून बनवलेला एक शंकूच्या आकाराचे साधन होय. लोखंड किंवा लाकडाला उभट लंबगोल आकार देऊन पोहरा बनवला जात असे. त्याला वरच्या बाजूला समोरासमोर दोन कान बसवलेले असत. त्यातून एक लोखंडी गजाची कडी ओऊन बसवलेली असे. त्या कडीला दोर बांधून रहाटाच्या कप्पीतून पोहरा आडात सोडला जायचा. लोखंडी पोहरा वजनदार असल्याने लगेच पाण्यात बुडायचा. पोहरा लाकडी किंवा बांबूच्या असेल तर मात्र त्याच्या कानाला काही वजनदार वस्तू बांधाव्या लागायच्या. कधी हातातील दोर विशिष्ट रीतीने हलवूनही पोहरा भरला जात असे. आडातील पोहरा पाण्याने पूर्ण भरला की मग कप्पीवरून दोर हळूहळू वर ओढीत पाणी शेंदले जायचे. पोहरा खालून वर रहाटाच्या मधोमध आला की मग एका हाताने दोर घट्ट पकडून दुसऱ्या हाताने पाण्याने भरलेला पोहरा बाहेरच्या बाजूला ओढला जायचा. अशा रीतीने आडातील पाणी पोहऱ्याने शेंदले जायचे. 

           आडातून किंवा विहिरीतून पिण्यासाठी पाणी शेंदण्याची ही पारंपरिक पद्धत होती. आडातील पाणी शेंदण्यासाठी लोखंडी रहाट तयार केले जायचे. ते खूप  भक्कम असायचे. काही आडावर लाकडी राहाट देखील बसवलेले असायचे. ते लाकडी रहाट सुद्धा अतिशय भक्कम असायचे. या रहाटाद्वारे पाणी शेंदण्यासाठी पोहरा हे साधन वापरले जात असे. मानवी संस्कृतीत या साधनाचे मोलाचे योगदान आहे. प्राचीन काळापासून पाणी शेंदण्यासाठी पोहरा हे साधन वापरले जात होते.

           पोहरा हे भारतातील पारंपरिक पाणी शेंदण्याचे साधन असून प्राचीन काळापासून त्याचा वापर आड, विहिरीमधून पाणी शेंदण्यासाठी केला जात आहे. वैदिक काळात ऋग्वेद व अथर्ववेदात विहिरींचा आणि जलसाठ्यांचा उल्लेख सापडतो. त्याकाळी ‘पोहरा’ या साधनासारखे पाणी  काढणारे साधन हे लाकडाच्या किंवा मातीच्या साह्याने बनवले जात होते. या काळात त्याचा उपयोग यज्ञासाठी पवित्र जल काढणे अथवा झाडांसाठी पाणी देण्यासाठी होई.  महाजनपद व मौर्य काळात विहिरी व आड अधिक प्रमाणात खणले गेले. या काळात काठावर लाकडी किंवा धातूचे पिंप (पोहरा) टांगलेले असायचे, जे दोरीने खाली जाई व वर पाणी घेऊन यायचे. याकाळी स्त्रिया घरातील पाणी वापरासाठी असा पोहरा वापरत होत्या. 

गुप्त व उत्तर गुप्त काळात जलसंवर्धनाची पद्धती अधिक विकसित झाली. विहिरी भोवती चौथरा आणि त्यावर पोहरा ठेवायचे यंत्र (कधी कधी हाताने फिरवले जाणारे चक्र) लावले जाई. याकाळात लोखंडी हुक, दोर व मातीचा मोठा घडा म्हणजेच पोहरा याचा वापर वाढला.

           मध्ययुगीन काळात दाट वस्तीतील गावांमध्ये पोहरा अत्यावश्यक झालेला होता. या काळात स्त्रिया विहिर वा अडातून पोहरा वापरून पाणी काढून ‘घागरी’मध्ये भरत असत.

पेशवाई काळात लोखंडी पोहरा वापरात होता.

स्वातंत्र्योत्तर काळात हातपंप, मोटारपंप, नळयोजना आल्याने पोहऱ्याचा वापर हळूहळू घटू लागला. मात्र अजूनही काही ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी पारंपरिक पाणवठ्यांवर पोहऱ्याचा वापर सुरू आहे. या ठिकाणी पितळ, स्टील, प्लास्टिकच्या बादल्यांचा वापर पोहरा म्हणून केला जातो. मात्र जो पारंपरिक लोखंडी किंवा लाकडी पोहरा होता तो आज शक्यतो पाहायला मिळत नाही आणि उपयोगातही येताना दिसत नाही.

           पोहरा हा केवळ पाणी शेंदण्याचे पारंपरिक साधन नव्हता तर तो भारतीय ग्रामीण 

संस्कृतीचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा होता. श्रमसंस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण आधार होता.  त्याद्वारे आड वा विहिरीतील खोल पाणी काढण्याचे कष्टप्राय काम अगदी कमी कष्टात आणि सहजपणे होत असे. मानवी संस्कृतीच्या विकासात व प्रवासात नदी, नाला, ओढा, आड, विहीर या जलस्त्रोताचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. विशेषत: स्त्री जगताचे आणि या जलस्त्रोतांचे एक भावनिक व जिव्हाळ्याचे नाते आहे. स्वयपाक, कपडे, भांडी याकामासाठी पाणी महत्वाचे असते. पाणी आणण्याचे हे  

काम पूर्वांपार स्त्रियाचं करत आल्या आहेत. आजही हे काम स्त्रियाचं करत आहेत. त्यामुळे या कामाशी संबंधित घटकांची त्यांचे एक नाते निर्माण झालेले असते. पोहरा हे त्यापैकीच एक साधन आहे. 

            पोहऱ्याने पाणी काढणं म्हणजे केवळ एक श्रमिक क्रिया नव्हती, तर ती एक परंपरा होती. एक नित्यनेमाची पूजा. प्रत्येक पहाटेला, गावातल्या बायकांचा गजर सुरू व्हायचा. कुणाच्या डोक्यावर तांब्याची घागर, कुणाच्या हातात पोहरा, तर कुणाच्या ओठांवर गाणं. घागर, हंडा, कळशी आणि पोहरा या वस्तूंशी स्त्रीचे भावविश्व जोडले असे गेलेले असायचे. आडापासून ओसरीपर्यंतचं अंतर म्हणजे स्त्रीचा एक नियमित प्रवास असायचा. हा प्रवास कधी प्रेमाचा, कधी हक्काचा, कधी दुःखाचा असायचा. या सर्व प्रसंगाचा सच्चा साक्षीदार म्हणजे तिच्या हातातील हा पोहरा असायचा. पोहरा हे केवळ आडातील पाणी शेंदण्याचे साधन नव्हते, तर स्त्रीच्या मनातील भावनांची उकल करणारे माध्यम होते. आडातील खोल पाण्याबरोबरच तिच्या मनातील खोल सलही यनिमित्ताने वर यायची. पाणी आणण्याच्या निमित्ताने स्त्रियांचे एकमेककींशी मैत्रीचे नाते जुळून यायचे. पोहऱ्यामुळे कष्ट तर कमी व्हायचेच;  शिवाय मैत्रिणींशी जोडीदारच्या, संसाराच्या, सुख दुःखाच्या गप्पाही व्ह्यायच्या. या गप्पातून मनातील दुःख भरून यायचे आणि  संसाराचे धागे अधिक घट्ट होत जायचे. 

             कधी कधी आडावर एकच पोहरा असायचा. त्यावेळी सगळ्याजनी आळी पाळीने पोहरा वापरत असतं. स्त्रियांच्या बरोबर कधी पुरुष मंडळींदेखील पाणी भरण्यासाठी आडावर येत असत. कधी दोर तूटून किंवा हातातून दोर निसटून पोहरा आडात पडायचा. अशावेळी पोहणारा कोणीतरी तळाला जाऊन तो पोहरा वर काढायचा. तर कधी याकामी अनेक हुकं एकत्रित करून त्या हुकांचा जुडगा म्हणजेच गळ आडात टाकूनही बुडालेला तो पोहरा काढला जात असे. हा गळ गावातील कोणा एकदोन जणांकडेच असत. अशावेळी त्याची खूप मदत होतं असे. त्याचा मेहनताना म्हणून त्याला प्रेमाने आणि आग्रहाणे काहीतरी वस्तू भेट देण्याची प्रथाही अनेक गावांमध्ये होती. असा पोहरा हा ग्रामीण लोकजीवनाची अगदी घट्ट जोडला गेलेला होता. या निमित्ताने सामाजिक सौख्य व सहकार्यवृत्तीचेही दर्शन घडायचे. 

            विहिरीवर पोहरा घेऊन येणाऱ्या स्त्रिया ही ग्रामीण संस्कृतीची आज एक चित्रमय आठवण वाटतेय. ‘पोहरा’ हा भारतीय ग्रामीण जीवनशैलीचा भाग होता. या पारंपरिक साधनाने इतिहास, संस्कृती, स्त्रीजीवन आणि जलव्यवस्थापन यांना एकत्र गुंफून ठेवलेले होते. आई, आजी, सासू अशा घरातील कित्येक स्त्रियांचे भावविश्व या पोहऱ्याशी जोडलेले असायचे. म्हणूनच पोहरा हे स्त्रीचे श्रम आणि भावना यांचा खरा साक्षीदार होता. आज ग्रामीण संस्कृती पूर्णत: बदलली आहे. नदी, ओढा, विहीर, आड हे पारंपरिक जलस्रोत आता घरकामासाठी वापरले जात नाहीत. नदी, ओढे आता पूर्वी सारखी वाहतच नाहीत आणि विहिरी व आडही आता आटून गेलेले दिसतात. आड तर केवळ अवशेषरूपी उरलेले दिसतात. काही गावातील आणि वाड्यातील आड तर गाडून टाकलेले आहे. त्या बरोबरच त्याच्या संबंधीच्या हजारो आठवणी व भावनाच गाडल्या गेल्या आहेत. पारंपरिक जलस्रोत मिटले, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित वस्तूही हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. 

              आज शहराबरोबरच गावखेड्यातही आधुनिक स्वरूपाचे राहणीमान दिसत आहे. अनेकांच्या अंगणात आज कूपनलिका आहेत. गावात हातपंप आणि आणि नळ योजना आल्या आहेत. औद्यागिक क्रांतीमुळे सिमेंट व प्लॅस्टिकच्या वा रबरी पाईपच्या आधुनिक जलवाहिन्या निर्माण झाल्या आहेत. पाणी पुरवठ्याच्या शासकीय योजनांबरोबरच काहीजन आपल्या घरी वैयक्तिक पाणी पुरवठ्याची व्यवस्था करत आहेत. यासाठी लागणारे तंत्र, यंत्र आणि आर्थिक कुवत यांची सहज उपलब्धता आहे. आज स्वयंपाक घरात व न्हाणीघरात हवे तितके व हवे तसे पाणी उपलब्ध होत आहे. या आधुनिक जीवनशैलीमुळे पाणी पुरवठ्याची सर्व पारंपारिक साधनेच आज अडगळीत पडलेली आहेत. 

          घागर, हंडा, कळशी ही साधने आज घरात किमान पाणी साठविण्यासाठी तरी कधी कधी वापरली जातात. मात्र पोहरा आज कुठेच दिसत नाही. एक साधन वापरातून बाजूला झालं कीं,  त्याबरोबर त्याच्याशी संबंधित संस्कृतीही लोप पावते. आज पोहरा दिसत नाही. त्याबरोबरच आड, रहाट, कप्पी दिसेनाशी झाली आहेत. आणि आडात पडलेल्या पोहऱ्याला शोधून काढणारा गळ तर स्वतःच हरवलेला आहे. पोहरा नाही त्यामुळं संवाद मुका झाला आहे. अंगणातील हौद आणि छतावरील टाकी तील पाण्यात स्त्रीच्या भावना साठून आटून जात आहेत.

          काळानुसार नवंनिर्माण, नवं संस्कृतीचा स्वीकार अनिवार्यचं आहे. मात्र मानवी ग्राम संस्कृतीचे वैभवशाली साक्षीदार आसलेल्या साधनाचे जतन करणे हेही आपले कर्तव्य आहे. श्रमसन्मानाचा व भावनिकतेचचा वारसा असणारा पोहरा पुन्हा वापरता येईल कां नाही हे सांगता येणार नाही. मात्र आज तो जिथं आहे आणि जसा आहे , तसा तिथं आणि तसाच जपला जायला हवा. किमान पुढील पिढ्यांना हा पिढ्यांपिढ्याचा वैभवशाली वारसा वस्तू रूपाने कां होईना पाहता येईल. आज अडगळीतील पोहरा किती मोलाचा आणि मूल्याचा आहे हे निश्चित सांगता येणार नाही परंतु; तो ज्याच्याकडे आहे त्याची श्रीमंती मात्र कोणालाच मोजता येणारं नाही एवढं खरं. म्हणूनच स्त्रीजीवनाचा श्रमाचा आणि प्रेमाचा हा मौलिक साक्षीदार असलेला पोहरा आपण जपायलाच हवा! 


डॉ. अशोक शिंदे

प्राध्यापक, मराठी विभाग

मुधोजी महाविद्यालय, फलटण. 

मोबाईल - ९८६०८५०३४४


मंगळवार, ८ जुलै, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र. ११

 काठवट

           सकाळी झाड- लोट आणि अंघोळ आवरली की आई स्वयपाकाला लागायची. आधी चूल पेटवली जायची. मग पिठाचा डबा जवळ घेऊन आई भाकरीची तयारी करायची. प्रथम चुलीवर तवा ठेवून ती डब्यातलं पीठ चाळणीत घायची. काठवटीत ते हळुवारपणे चाळायची. नंतर काठवटीतील पिठात ओंजळीने गरजेपूरतं पाणी घेऊन ती पीठ मळायची. आईचं पीठ मळणं म्हणजे तिच्या दोन तळहातांनी पिठात जीव ओतनंचं असायचं. हे मळणं म्हणजे भाकरीवरचा प्रथम संस्कारच असायचा. आपल्या हातांनी जणू काही पिठामध्ये प्राण यावा अशीचं ती कसरत असायची. पिठात पाणी मिसळून त्याचा एकजीव उंडा होईपर्यंत तिची मेहनत चालायची. काठवटीत पीठ आणि पाणी एकजीव होताना पाहणं हा एक दिव्य अनुभव असतो. मी हा अनुभव अनेकदा घेतलाय.        

              भाकरीला बसण्याची आईची विशिष्ट पद्धत असे. दोन्ही पायाचे अंगठे काठावटीच्या दोन्ही कानावर अलगदपणे ठेऊन आई पीठ मळायला बसायची. काठवटीतील पिठात पाणी टाकून ती प्रथम एका हाताच्या बोटांनी त्याचं मिश्रण करायची. मग पीठ थोडं घट्ट झालं की ती एका तळहाताने पिठाचा गोळा धरून त्याला जोराचा हिसका देऊन तो काठवटीच्या तळावर घसरायची. पुन्हा तो गोळा काठवटीत गोल फिरवत तळातलं उरलेलं पीठ त्यात मिसळून त्या गोळ्याला एक दोन वेळा काठवटीतचं आपटायची. जोपर्यंत पीठ एकजीव होत नाही तोपर्यत ती असं करत असे. एकदाका पिठाचा उंडा मनाजोगा झाला की मग त्या उंड्याला दोन्हा हातांनी विशिष्टरित्या चाळवून त्याला हातातचं गोल आकार देत असे. नंतर काठावटीच्या तळात चाळणीने थोडे पीठ पसरून ती भाकरी थापत असे. काठवटीच्या तळाच्या आकाराची ती गोल भाकरी मग तव्यावर जात असे. या कामात आईच्या मेहनतीबरोबरचं काठवटीची देखील महत्त्वाची भूमिका असे. मळणे, उंडा करणे व थापणे हे भाकरीवरील संस्कार केवळ काठवटीमुळेच उत्तमपणे साधले जायचे.  

            थोडीशी लंबगोल, खोलगट आणि दोन बाजुला कान असलेली ही लाकडी काठवट माझ्या लहानपनापासून मी पहात आलो आहे. गेली तीन पिढ्या ही काठवट आमच्या घरी आहे. माझी आजी सांगायची की भिंगारला असताना तिच्या सासूने ही काठवट घेतली होती. काठवट म्हणजे काष्ट + वाटी वा पात्र किंवा लाकडी परात होय. काठ असलेलं पीठ मळायचं लाकडी भांड म्हणजे काठवट असाही एक अर्थ घेतला जातो. साधारणपणे लांबट गोल, थोडे खोलगट आणि दोन्ही बाजूला कान अशी रचना म्हणजे काठवट. लाकडाच्या एका गोलाकार ओंडक्याला कोरुन परातीच्या आकाराचं हे भांड बनवलं जातं. काही काठवटींच्या वरच्या दर्शनी भागावर नक्षीकाम देखील केलेलं असते. तर काही काठवटींचे कान नक्षीदार व आकर्षक असतात. काठवट बनवणं हे अस्सल कलाकाराचं कामं असतं. काठवट हे स्वयंपाक घरातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि मौल्यवान साधन आहे. भारतातीय परंपरेत या पारंपरिक साधनास वैभवशाली इतिहास आहे. 

            प्राचीन काळात अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्वयंपाक घरातच नव्हे तर घराच्या अंगणात पारंपरिक पद्धतीने केली जात असे. त्या काळात दगडी उखळ-मुसळ, मातीची भांडी यांसोबत लाकडी पट्टी अथवा गुळगुळीत दगडाची पाटी यांचा उपयोग पीठ मळण्यासाठी होत होता. असे एक सपाट, मजबूत पृष्ठभाग असलेले साधन म्हणजेच काठवटीचे पूर्वरूप असावे. मौर्य - गुप्तकाळात काठवटीचे स्वरूप अधिक विकसित झाले. एक प्रकारचे लाकडी साधन ज्यात पीठ सांडू नये म्हणून थोडी कड असलेली योजना करण्यात आली.  पुढे मध्ययुगात लाकडी काठवटीला मूळ रुप मिळाले. त्यामुळे त्यामध्ये एकत्रितपणे पीठ मळणं अधिक सुटसुटीत आणि सोपं व्हायला लागलं. ब्रिटिशांच्या आगमनानंतर आधुनिक वस्तू बाजारात येऊ लागल्या. परंतु ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये पारंपरिक काठवटीचाच वापर सुरू होता. ज्या प्रदेशात ज्वारी व बाजरीचे उत्पन्न अधिक त्या प्रदेशात काठवट वापरली जात असे. 

            स्वातंत्र्योत्तर काळात स्वयंपाक घरात आधुनिक उपकरणांची भर पडली, परंतु तरीही गावाकडे काही प्रमाणात काठवटीचे स्थान टिकून राहिले होते. विसाव्या शतकाच्या अखेरच्या काही दशकात प्लास्टिक व स्टीलची भांडी स्वयंपाक घरात वापरली जाऊ लागली.  याचं काळात आधुनिक घराचीही निर्मिती होऊ लागली. यामध्ये स्वयंपाकघर म्हणजेच आजच्या किचनची योजना झाली. यामध्ये किचन ओटा तयार करण्यात आला. यामुळे स्वयंपाकाची पारंपरिक पद्धतच निकालात निघाली. ओट्याशेजारी उभा राहून स्वयंपाक केला जाऊ लागला. 

           याच काळात नोकरी, व्यवसाय तथा उद्योग धंद्यामुळे जीवन व्यवहाराला गती मिळाली. अधिक उत्पन्न आणि सहज उपलब्धतेमुळे गहू व तांदूळ या अन्नधान्यांचे आहारात प्रमाण वाढू लागले. त्यामुळे स्वयंपाकात भाकरीपेक्षा चपाती व भाताचे प्रमाण वाढले. यातच काठवटीला पर्याय म्हणून बाजारात स्टीलची मोठी ताटं आली आणि काठवट स्वयंपाक घरातून हद्दपार झाली. काळाच्या ओघात काठवट दुर्मिळ झाली आहे. सहसा खेड्यामध्ये काही लोकांकडे ती आहे; पण तीही तुटलेल्या अवस्थेत आणि अडगळीच्या खोलीत. 

            आज अनेक घरात काठवट पहायलाच मिळत नाही. आणि असली तरी तिचा वापर होत नाही. काठवट हे आहाराला स्वादिष्ठता व सात्विकता प्राप्त करून देणारं पारंपरिक साधन आहे. आई, आजी आणि पणजीच्या सुगरणपणात अनोखी चव भरणारं हे साधन आज नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. काठवटीत केवळ पीठ मळलं जातं नसे; तर तिच्यात कौटुंबिक आहार आणि शरीरस्वास्थ तथा आरोग्याचे पिंडं मळले जात असत. काठवट ही पिढ्यांपिढ्याच्या संस्काराची शिदोरी आहे. तिला पारंपरिक पाककलेची साक्षीदार समजली जाते. पारंपरिक लाकडी काठवटीला आजही संस्कार, शिस्त आणि मातृत्वाची प्रतिकात्मक महती आहे.

            कोणती स्त्री काठवटीत चांगलं पीठ मळते, यावरून तिच्या स्वयंपाक कौशल्याचं मूल्यमापन केलं जात असे. काठवटीवर आईने मळलेले पीठ, थापलेली भाकरी आणि तव्यावरून सुटणारा सुवास ही आठवण प्रत्येक ग्रामीण भारतीयाच्या मनात आजही दरवळत आहे. ‘काठवट’ हे फक्त एक स्वयंपाकी साधन नसून ते आपल्या संस्कृतीचं वैभव, स्त्रीच्या कलेचा नि श्रमाचा पुरावा आणि कुटुंबाच्या पोषणाचा आधार असते. काळानुसार तिचे उपयोग, रचना आणि साहित्य बदलले असले तरी आजही तिचे अस्तित्व टिकून राहणे गरजेचे आहे. 

             आई, आजीच्या हातून मळलेलं पीठ, काठवटीवर थापलेली भाकरी आणि ते चविष्ट जगणं आज फार दूर होत चाललंय. आज स्वयंपाक घरात स्टीलच्या परातीत भाकरी मळली जाते पण तिच्यात काठवटीवर मळलेल्या पिठातली ओल, तो स्वाद आणि आपुलकीचा वास कुठेच जाणवत नाही. म्हणूनच कित्येक पिढ्यांच्या स्वयंपाक कलेचा आणि कला संस्काराचा हा अमूल्य वारसा आपण जपायला हवा. स्वयंपाक घराचा ‘वट‘ आणि ’रुबाब‘ सांभाळण्याचं नेमकं काम करणारी काठवट आज निस्तेज होऊन पडली आहे. अडगळीत पडलेल्या गृहकला संस्कृतीच्या या साक्षीदाराचा स्वादिष्ट नाद पुन्हा स्वयंपाक घरात घुमायला हवा. आपल्या माईच्या मायेच्या हातातलं हे कणखर चैतन्य आपण टिकवून ठेवायलाचं हवं. एवढीच अपेक्षा ! 


✍️ प्रा. डॉ. अशोक नामदेव शिंदे 

      मराठी विभाग,

      मुधोजी महाविद्यालय, फलटण 

बुधवार, २५ जून, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख -१०

 गोधडी! 

               गावची चैत्री यात्रा झाली की पुढच्या दोन दिवसात आई गोधडी शिवायला घ्यायची. यात्रेला आलेले पाहुणे - रावळे आपापल्या गावी परतलेले असायचे. शेता- शिवारातील कामंही आटोपलेली असायची. शिवाय यात्रेच्या आधीच आईने पापड, शेवई , कुरडई, सांडगे आणि इतर काही वाळवणाचे पदार्थ तयार करून ठेवलेले असायचे. त्यामुळे ओसरीत चांगलं आठवडाभर गोधडी शिवण्याचं कामं चालायचं. 

             खरं तर गोधडीची पूर्वतयारी आधीच सहा सात महिन्यापूर्वी झालेली असायची. भाद्रपदातील पितृ पंधरवड्यात आमच्या घरातील सर्व बारीक - सारीक वस्तू व साहित्य स्वच्छ धुतले जायचे. त्यावेळी गावनदीला भरपूर पाणी आणि भादव्याचं कडक ऊन असल्यामुळे ही सर्व स्वच्छता व्हायची. या वेळी घरातील सर्व गोधड्या, चादरी, सतरंज्या, घोंगडया असे अंथरून, पांघरूनाचे सर्व साहित्यही धुतले जायचे. याचवेळी आई घरातील लहान व मोठ्यांची जुनी - पाणी कापडं स्वच्छ धुवून त्याचं गठुडं बांधून ठेवायची. असं वर्षा दोन वर्षानंतर जमलेल्या गठुड्यांतील कापडांचा अंदाज घेऊन आई गोधडी शिवायला घ्यायची. 

             सकाळची सगळी कामं, जेवणं आटोपली की आईचं हे कामं सुरु व्हायचं. प्रथम आई सर्व गाठुडी बाहेर काढायची. त्यातील जुनी फाटकी कापडं बाहेर काढायची. यामध्ये लुगडी, धोतरं, फेटे, पंचे, खामिस, बंडी, चोळी, टोपी तसेच लहान मुलांचे सदरे, इजारी, टकुचे,  मुलींचे परकर, झंपर असे कितीतरी प्रकारचे कपडे असायचे. आई प्रथम प्रत्येक कापड निरखून पाहायची. त्याचा गोधडीच्या कोणत्या भागासाठी उपयोग होईल याचा विचार करून ती निवडून एका बाजूला ठेवायची. अशावेळी आम्हीपण आईला मदत करायचो. सदऱ्यांच्या कॉलर व गुंड्या काढणे, टीपा उसवणे, बाह्या फाडणे अशी कामं आम्ही अगदी आनंदानं करायचो. एकदा सर्व कापडं निवडून व्यवस्थित करून झाली की मग आई गोधडी बेतायला बसायची.

              गोधडीसाठी वरच्या व खालच्या बाजूची दोन पालं आणि त्या दोन पालांच्यामध्ये भरण्यासाठी चिंध्या या दोन बाबी महत्त्वाच्या असतात. पालांसाठी लुगडं किंवा धोतराचा वापर केला जातो तर आतील चिंध्यासाठी उरलेल्या सर्व कापडांचा उपयोग व्हायचा. पालासाठी आई शक्यतो लुगड्याच्या फाळांचाचं वापर करत असे. कारण लुगडी वेगवेगळ्या रंगांची असायची. लुगड्याच्या फाळाचा विरलेला भाग बाजूला काढून उरलेला भाग पालासाठी वापरला जायचा. लुगड्यांच्या किनारी, पदराचा भाग हा पालासाठी वापरला जायचा. बाकी सारी कापडं चिंध्याच्या स्वरूपात भरणासाठी वापरली जायची. शिवण्यासाठी जाड दोऱ्याचा मोठा बंडल आणि चांगल्या लांबलचक पाच सहा सुया आईने आधीच आणून ठेवलेल्या असायच्या. अशी सर्व तयारी झाली की मग गोधडी शिवायला सुरवात व्हायची. 

             गोधडी शिवायची म्हटलं की आमच्या गल्लीतल्या कांतानानी , अंजनाआक्का, बायसामावशी, सुबाआत्या अशा चारपाच जणी जमायच्या. प्रत्येक वर्षी कोणाची ना कोणाची गोधडी असायचीच. सगळ्याजनी मिळून एकमेकींना मदत करून गोधडीचं कामं करायच्या. तीन हात रुंद आणि पाच हात लांब असा सर्व सामान्य गोधडीचा आकार असतो. यामध्ये उपलब्ध साहित्यानुसार आकार कमी अधिक होऊ शकतो. आई सुरवातीला खालचं पाल अंथरायची. त्यावर सर्व प्रकारच्या कापडांच्या निवडून ठेवलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या, रंगाच्या चिंद्या अंथरायची. हे करताना सगळीकडे जाडी सारखी राहील याची काळजी घेतली जायची. हे कामं ती अत्यंत काळजीपूर्वक करायची. या चिंद्या वाऱ्याने हलू नयेत म्हणून त्यावर छोटी लाकडं किंवा जड वस्तू ठेवायची. गोधडीचा आकार आणि जाडी याचे प्रमाण पूर्ण होईल इतक्या चिंद्या रचल्या की मग आई त्यावर वरचे पाल अंथरायची. अशा प्रकारे गोधडीचा पाहिला टप्पा पूर्ण व्हायचा. 

               दोन्हीही पालं मांडताना त्यांवरील नक्षी किंवा बाजूच्या किनारी नेमक्या जागेवर येतील याची आई पुरेपूर दक्षता घ्यायची. मग मोठ्या सूईत दोरा ओवून आधी चारी कडांवर लांब लांब टाके घालायची. नंतर मग आत सगळीकडे असेच लांब तुटक टाके घालायची. यामुळे गोधडी व्यवस्थित बांधली जायची. या कामासाठी आईला एक दोन लागायचे. अशी भरण पुरण झालेली ही गोधडी आई एका लांब काठीला गुंडाळून ठेवत असे. मग सर्वजणींचा मेळ बसवून गोधडी शिवायला घेतली जात असे. गोधडी शिवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. सर्व प्रथम गोधडीच्या खालच्या व वरच्या पालाच्या कडा आतल्या बाजूला मुडपून पाहिला टाका किंवा टीप घातली जाते. यास कडा दाबणे म्हणतात. हे काम अत्यंत दक्षतेने केले जाते. कडा दाबताना मध्ये घोळ राहू नये किंवा घुड्या पडणार नाहीत याची काळजी घेतली जाते. हा टप्पा चांगला झाला की गोधडी उत्तम साधलीचं असं समजायचं. 

                चार कडांना पाहिला टाका घातला की मग पहिल्या टाक्याच्या आत बोटभर अंतर सोडून दुसरा टाका घातला जातो. त्यामागोमाग मग एक बोट अंतरावर आतल्या बाजूने इतर टाके घातले जातात. पूर्ण चारी बाजूनी टीप टाकत तो टाका जिथून सुरवात झाली तिथंच पूर्ण व्हायचा. असे टाक्यांचे फेरे पूर्ण केले जायचे. अशावेळी चारजणी चार बाजूला बसून ती सुई टाके टाचत एकमेकींकडे पुढे सरकवत असत. कोपऱ्यावरचा काटकोनातला टाका घेताना मात्र शिवणारणीचे कौशल्य पणाला लागत असे. बेमालुमपणे तो टाका घातला जाई. टाके शिवले जात असताना पालावरील रंग, वेगवेगळे आकार आणि दोऱ्यांची शिवण यामुळे गोधडीला नवे नक्षीदार रुप प्राप्त होत असे. खरी कमाल तर शेवटी असायची. चार बाजूनी शिवण आत आत सरकत आल्यामुळे मध्यभागी एक चौकोनी आकार राहायचा. हा आकार शिवताना त्यास पोट लावणे असे म्हंटले जाते.  काही प्रदेशात हा भाग शिवण्याआधी मुहूर्त पाहून गोधडीची ओटी भरण्याचीही प्रथा आहे. अनेक वेळा गोधडीच्या मध्यावर दोन्ही बाजूला रंगीत चौकोनी किंवा कापनीच्या आकाराचे ठिगळही लावलेले आढळते. 

               अशा प्रकारे कित्येक वर्षाच्या जुन्या कापडांना नवा, सुंदर आकार आणि देखणं रुप प्राप्त व्हायचं. आणि जणू त्यांचा पूनर्ररजन्मच व्हायचा. अशी ही गोधडी पूर्ण करायला किमान आठ ते दहा दिवस लागायचे. गोधडी ही भारतीय संस्कृतीचे पारंपरिक अंथरून आणि पांघरूणाचे प्रमुख साधन आहे. गोधडी, वाकळ आणि लेपाटं अशा विविध नावाने ती ओळखली जाते. मानवी जीवनामध्ये गोधडीला महत्त्वाचे आणि मानाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून गोधडी मानवी संस्कृतीत सांस्कृतिक, भावनिक आणि पूनर्वापरदुष्ट्या अविभाज्य भाग असलेली दिसते. 

               भारतीय प्राचीन संस्कृतीत वैदिक काळात वस्त्र निर्मिती ही प्रामुख्याने हस्तनिर्मित हातमागावर आधारित होती. स्त्रिया कापडांचे तुकडे शिवून अपत्यासाठी मऊउबदार अंथरुण तयार करीत असत. पुढे त्याचेच गोधडीमध्ये रूपांतर झाले असावे.  गुप्तांचा काळ समृद्धीचा होता. त्यामुळे याकाळात नविन कपडे सहज उपलब्ध होत होते. पण गृहिणींनी जुने कपडे वापरून तयार केलेलीगोधडी घरातील गरजू, लहान मुलांसाठी वापरली जात. त्यामुळे याच काळात गोधडीला मातृत्वममता सुगरणपणा याचे प्रतीक मानले जात असे. नंतर मध्ययुगीन काळात ग्रामीण भागात स्त्रिया आपलीकलात्मकता गोधडीद्वारे व्यक्त करू लागल्या. सुशोभित शिवणकाम, भरतकाम याचा गोधड्यांमध्ये प्रवेश होत गेला.         

                ब्रिटिशकाळात कापड उद्योगामुळे जुन्या कपड्यांचे प्रमाण वाढले आणि गोधड्या मोठ्याप्रमाणात तयार होऊ लागल्या. आजी-आईकडून नातवंडांना दिली जाणारी गोधडी ही त्याकाळापासून एक भावनिक  संस्कृतिक परंपरा बनली. याचकाळात स्वदेशी चळवळीनंतर हस्तकलेला आणि हाताने तयार होणाऱ्या वस्तूंना प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे गोधडी ही स्वावलंबनाचं आणि स्त्रियांच्या कौशल्याचं प्रतीक बनली. याचं काळात काही स्त्रिया तर गोधडी विक्री करून घरखर्चास हातभार लावत असत. ‘गोधडी शिलाई’ ही कला म्हणून याकाळात ओळखली जाऊ लागली. 

                 स्वातंत्र्योत्तर काळात औद्योगिक क्रांतीमुळे बाजारात विविध प्रकारची नवी तयार पर्यायी अंथरूणे सहज उपलब्ध होऊ लागली. याच काळात भारतीय लोकांचे जीवनमान आणि जीवनशैलीही बदलली. नोकरी व्यवसाय निमित्ताने कुटुंबं विखूरली गेली. त्यामुळे आई, आजीसह नातवंडांचा गोतावळाही विखूरला. शिवाय घरातील, बाहेरील व शेतातील कामाचे स्वरुपही बदलले. त्यातच हव्या तशा अंथरून पांघरूनाची सहज उपलब्धता व ते खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या रकमेचीही अनुकूलता  यामुळे पारंपरिक गोधडी हळू हळू मागे पडत गेली. 

              आज  मात्र  ही पारंपरिक गोधडी अडगळीत पडलेली दिसते. विशेषतः हल्लीच्या या चमकोगिरीच्या युगात तर तिचं स्थान अगदीच गौण झालेलं आहे. घरी पाहुणे आल्यावर तर ती दिसणारच नाही अशी व्यवस्था केली जाते. खरं तर गोधडी म्हणजे  आपल्या घरातली संस्कृतीचा खजिना होय. आईच्या हाताने शिवलेली गोधडी म्हणजे केवळ घरीतील जुनी कपडे वापरून नव्याने वापरात आणलेलं साधन नव्हे, तर ती गोधडी म्हणजे पुनःपुन्हा जन्म घेणारी आठवण असते . आईच्या प्रेमाची उब आणि घराच्या ओसरी अंगणात जन्माला आलेली कलासंस्कृती होय. 

               गोधडी केवळ अंथरूण नसते तर ती  एक ‘टाकाऊ तून टिकाऊ’ अशा गृहसंस्कृतीची साक्ष असते. मानवी संस्कृतीच्या वैभवशाली काळाची ती साक्षीदार आहे. ती स्त्रीच्या सर्जनशीलतेचीकुटुंबप्रेमाची आणि पुनर्वापराच्या शहाणपणाची निशाणी असते. भारतीय पूनर्वापर संस्कृतीचा गोधडी उत्तम नमुना समजली जाते. ती कधीच वाया जात नाही. तिचं पाल अनेक वेळा बदलले जाते. शिवाय जेंव्हा तिला डोळे पडतात म्हणजेच ती: काहीशी जीर्ण होते, तेंव्हा तिचा वापर लेपाटं म्हणून केला जातो. हे लेपाटं एकदम एकजीव आणि मऊसूद असते. 

              याकाळात तर ते अधिकच ऊबदार असते. त्यामुळे ते बाळंतिनीच्या बाजेवर टाकले जाते. पुढे ते अनेक काळ घरातील लेकीबाळींच्या बाळंतपणात बाळ आणि बाळंतिनींना ऊब देण्याचे काम ते करते. त्यानंतर काही काळ लोटल्यावर ते झिजून झिजून जेंव्हा त्याचे लक्तर होते तेंव्हा ते कुंभाराकडे सुपूर्त केले जाते. गाडगी, मडकी, घागरी व माठ घडवताना ते मऊ मुलायम लक्तर खाली आधार देण्याचे काम करते. पुढे ते अधिकच जीर्ण होते तेंव्हा ते आवा पेटवण्याच्या कामी येते. अशा प्रकारे एका पिढीचे जीवन प्रतिनिधित्त्व करणारी ही गोधडी आपल्या अखेरच्या अंशापर्यंत उपयोगी ठरते. म्हणूनच गोधडी हे पुणत: स्व -समर्पणाचे उत्तम साधन आहे असे मला वाटते.

            गोधडी ही कौटुंबिक आठवणींचे आणि भावनांचे प्रतीक असते. ती आईच्या प्रेमाची उब आहे. लहान मुलांसाठी आजीने केलेली गोधडी ही एक जिव्हाळ्याची गोष्ट असते. ती घरातील स्त्रीच्याकलात्मकतेचा दाखला आणि कुटुंबाच्या आठवणींचा थर असते. प्रत्येक गोधडी ही काहीतरी कथा सांगते. तिच्या प्रत्येक तुकड्यात एक एक गोड आठवण लपलेली असते. घरातील सगळ्यांचे कपडे एकत्रितपणे तिच्यात गुंफले जातात. आई,  आजीने एकेक तुकडा हाताने सावकाश शिवून, प्रेमाने टाचून गोधडी साकारलेली असते. त्यातील प्रत्येक कापडाशी आपला स्नेह जुळलेला असतो. ते कसे, केंव्हा, कुठे, कोणी घेतले याबाबतच्या गोड स्मृती असतात. या स्मृती कलात्मक धाग्यांनी सुंदरपणे तिच्यात रेखलेल्या असतात. कधी काळी जेंव्हा तिला डोळे पडतात तेंव्हाही त्या डोकावणाऱ्या अवशेषातून त्या स्मृती पुन्हा नव्याने जाग्या होत होतात. स्मृतीशेष झालेल्या वा परिवारातून दूर गेलेल्या सदस्यांच्या आठवणीचं कोंदण गोधडीत दडलेलं असतं आणि कौटुंबिक भावनांचा उमाळा गोधडीत टाचून भरलेला असतो. 

              आईच्या हातून गोधडी घडणे म्हणजे एखादं भावगोफ विनणंचं असत.  एका पालावर  धोतराचा, तर दुसऱ्यावर अजून न फाटलेला पैठणीचा काठ असतो. त्या गोधडीच्या प्रत्येक शिवणीत एक स्मृती भरलेली असते, आई, आजी, आजोबा आणि घरातील कित्येकांची. गोधडी जरी जुन्या कपड्यांनी बनलेली असली तरीही तिच्यातील प्रत्येक तुकडा एक जीवंत आठवण घेऊन समोर उभा राहतो. आजंचीर, शालू, पैठणी, इतर साड्या, पंचे, फेटे यांचे तुकडे म्हणजे त्या घराचं वैभवचं गोधडीत साठलेले असे. गोधडी पिढ्यानंपिढ्यांचा वारसा संक्रमनाचे मोठे साधन असते. आजीकडून आईला आणि आईकडून मुलीकडे हा कला वारसा पुढे दिला जातो. गोधडी शिवताना स्त्री फक्त टाके टाकत नसते, ती संसाराचा एकेक थर गुंडाळते. एखादी आठवण खुणावते, डोळे पाणावतात, पण हात थांबत नाहीत. कारण या टाक्यांतून ती पिढ्यांना प्रेमसुरक्षा आणि आपुलकीचं आच्छादन देत असते. गोधडी एक कपड्यांची घडी नसते. ती असते काळाचं स्मरण. एका आईच्या, आजीच्या ममतेच्या हातांनी शिवलेली उबदार आठवण. ही फक्त शिवण नसते, तर ती काळाच्या नात्यांची गुंफण असते. त्यामुळेच गोधडी ही कौटुंबिक इतिहासाचा सुरेख वास्तुरूप ऐवज ठरते. 

              ही पारंपरिक गोधडी म्हणजे एक प्रकारची सांस्कृतिक हस्तकलाचं होती. गोधडीतून सांस्कृतिक व सामाजिक वीण गुंफली जात असे. यामध्ये स्त्रियांच्या कौशल्याला आणि कलेला एक व्यक्त होण्याचं व्यासपीठ मिळायचं. काही ठिकाणी गोधडीवर पारंपरिक कड्या, देवी-देवतांचे प्रतिकात्मक आकृतीचित्रे, सुबक भरतकामही केले जात असे. कपड्यांचचे वेगवेगळे आकार तिच्यावर रेखले जात असत. गोधडीतून शिवण्याच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द वाढीस लागत असे . शेजारणी एकमेकींच्या मदतीने हें काम पूर्ण करत. त्यानिमित्ताने सुख दुःखाच्या गप्पा गोष्टी होत असत. तसेच परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागत असे. घरी लग्न समारंभाच्या निमित्ताने नव्या सोयऱ्यासाठी गोधडी शिवण्याची प्रथा होती . यामुळे गोधडी बरोबरच स्नेहाचे धागेही भक्कम होत असत. भारतीय स्त्रीच्या जीवनातील एक सजीव आठवण म्हणून गोधडीचे स्थान आपल्या संस्कृतीत मोलाचे आहे. आजही ग्रामीण भागात गोधडीची परंपरा टिकून आहे. मात्र त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. 

             आज ग्रामीण महिला गटांनी व्यवसाय म्हणून गोधडी शिलाई सुरू केली. मात्र या गोधड्या मशीनवर शिवल्या जातात. आजच्या आधुनिक काळात गोधडी एक पारंपरिक हस्तकला म्हणून नावारूपाला आलेली दिसते. शहरी बाजारात हातावर तयार केलेली गोधडीला एक आकर्षक आणि पर्यावरणपूरक उत्पादन म्हणून मागणी आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, महिलांचे स्वयंसहायता गट, तसेच डिजाईन क्षेत्रातील लोकांनी गोधडी शिलाईला एक नवसाज दिला आहे. मात्र पारंपरिक गोधडीचा बाज या आधुनिक रूपातील गोधडीला नक्कीच नाही. आतल्या चिंद्या जरी घरातल्या वापरल्या तरी त्या नायलॉन, टेरिकॉट किंवा कृत्रिम धाग्यांच्या असतात. त्यातच इतके पटापट नवनवे कपडे वापरले जातात कीं त्यामुळे कपड्यांशी संबंधित स्मृतीच राहत नाहीत. आणि पालासाठी तर अलीकडे नवीनच किंवा मूळत: नक्षीदार साड्या वापरल्या जातात. त्यामुळे हा केवळ दिखाऊपणा ठरतोय. 

               आईच्या हाताने बेतलेल्या, शिवलेल्या गोधडीची ऊब आणि माया जिव्हाळा आजच्या गोधडीत जाणवतं नाही. आईच्या स्पर्शाची आणि संस्काराची घट्ट वीण तिच्या गोधडीत असते. आज आई नाही ...!  मात्र शेवटच्या तिच्या स्पर्शाची ऊब अजूनही माझ्या मनाच्या आत खोल कुठे तरी घर करून आहे. आई एक कलाकार होती, एक संस्कारक होती. तिने शिवलेली एक रंगीत गोधडी मात्र घरात आहे. माझ्या अंथरुणात आजही तिच्या हातांची  ती ऊब अजूनही साठवून ठेवलेली आहे.

              गोधडीत आठवणीच्या साठवणी लपलेल्या असतात. गोधडी जशी जीर्ण होतं जाते तासातश्या आठवणीचे रंगींबरंगी पदर खुलून येतात. तिला अंथरताना, पांघरताना, धुताना, वाळत घालतानाच्या सर्व आठवणी तिच्यात दडलेल्या असतात. गोधडी म्हणजे आईच्या कुशीतली झोप, आजीच्या मायेचा उबदार थर, आणि आयुष्याच्या आठवणींचं थरथरणारं वस्त्र असते. अशी गोधडी अडगळीत पडू देऊ नका, हरवू नका… ती जपून ठेवा.

                कारण गोधडी ही केवळ आठवणी जपणारी वस्तू नसून, ती आठवणी घडवणारी संस्कृतीआहे. या वैभवशाली संस्कृतीचं जतन व्हावं हीच अपेक्षा ! 


✍️ डॉ. अशोक शिंदे

मुधोजी महाविद्यालय, फलटण