मंगळवार, २५ मार्च, २०२५

अडगळीतील समृद्धी - लेख क्र.६

           नांगर 

          वाटच्या वाटसरा sss काय बघतो भवताला sss ! बघतो भवताला न् जोडी खिलारी नांगराला sss !! हं राजाsss चल परधान्या sss !!! अशा गोड सुरात तांबडं फुटायच्या वेळेला गोमाईच्या मळ्यातून माणिक भाऊंचं गाणं ऐकू यायचं. खरं तर या दिवसात सगळ्याच शिवारात असे नांगरणीचे सूर घुमत असत. मात्र गोमायचा मळा गावच्या वऱ्हालाकडं असल्याने त्याबाजूचा आवाज अधिक ठळक यायचा. त्यात भाऊंचा  आवाज जरा पहाडी. त्यामुळे  त्यांचं गाणं सहज ऐकू यायचं. गोमाईचं शिवार तसं अख्ख बागायतीचकुठं काळीकुठं पोयट्याची तर कुठं काहींसीचोपनाची जमीन.  त्यामुळे किमान चार बैलांची नांगरट या रानात चालायची. उन्हाच्या आत पहिला पारुग मारायचा असा भाऊंचा बेत असायचा.  त्यामुळे चांदणी उगवली की भाऊंची  नांगरणीची तयारी सुरु व्हायची. त्यासाठी सायंकाळच्या पाहरीच  भाऊ दोन शिळवटी, नांगर आणि लांबलचक दोन वडी असा सारा सर्जाम गाडीत भरून ठेवायचे. मग पहाटे पहाटे बैलगाडी जुपून दोन बैलं माघं साटीला बांधून एका जोडीदाराला संग घेऊन रानात निघायचे. 

          रानात पोहोचताच गाडीतील सर्व सामान खाली घेतलं जायचं. भाऊंकडं नऊ नंबरी लोखंडी नांगर होता. या नांगराला सहा - सात फूट लांबीच्या दोन लोखंडी पट्ट्या म्हणजेच दांड्या होत्या. ठराविक अंतरावर नट बोल्टांनी जोडलेच्या या दांड्याच्या पुढच्या टोकाला एक त्रिकोणी कडी बसवलेली होती. या कडीत आधीच एक छोटी लोखंडी गोल कडी ओवलेली असे. त्रिकोणी कडीची पुढची बाजू तीन ठिकाणी वळवल्याने तिच्या महिरूपी आकारासारख्या तीन खाचा दिसत असत. प्रत्यक्ष नांगरताना नागराचं तास सरळ येईल अशा हिशोबानं यातील छोटी कडी नेमक्या हव्या त्या खाचेत अडकवली जायची. ही कडी मधल्या खाचेत असेल तर नागराचं तास सरळ पडायचं. मात्र नांगर तिरका किंवा वाकडा चालत असेल तर ही कडी त्यानुसार डाव्या उजव्या खाचेत ठेवावी लागायची.

            या त्रिकोणी कडीच्या मागे जमिनीवर चालेल असं लोखंडी चाक बसवलेलं होतं. लोखंडी दांडीच्या मागच्या बाजूला नट बोल्टांनी एक मजबूत लोखंडी तिकाटणं जोडलेलं होतं. या तिकाटण्याची दोन टोके दांडीला तर एक टोक खालच्या बाजूला होतं. या खालच्या टोकाला एक वक्राकार लोखंडी फळी अडकवली होती. या फळीच्या पुढच्या टोकाला एक टोकदार पोलादी फाळ बसवलेला होता. जमिनीत घुसून नांगरण्याचं मुख्य काम या फाळाचंच असे. ही लोखंडी फळी एका विशिष्ट रितीने तिकाटण्याला अडकवलेली असे, जेणेकरून मुरडानाच्या वेळी नांगर उचलताच ती फळी तिकाटण्याच्या दोन्ही बाजूला येऊ शकेल.  या फळीला खाली व वर अशी दोन छोटी छिद्रे होती. त्यात एक लोखंडी सळी अडकवली जायची. त्यामुळे नांगरताना फळी हालत नसे. मुरडानाच्या वेळी नांगराची पलटी करताना ती लोखंडी सळी आधी काढून घेतली जात असे. मग नांगर पलटी करताच फळीची खालची बाजू वर यायची. लोखंडी सळी पुन्हा फळीच्या वर आलेल्या छिद्रात अडकवली जायची. तिकाटण्याचा मागच्या टोकाला नंगाराच्या मुठीचा भाग जोडलेला होता. या भागाला हातात धरता येतील अशा दोन मुठी आणि खाली दोन आडवे लोखंडी गज असा सीडीसारखा भाग जोडलेला होता.

          सुरुवातीला हा नांगर बांदाला लावला जायचा. मग भाऊ या नांगराची झुपाझुपी करायचे. प्रथम नांगराच्या पुढं दोन शिलवटी ठेवल्या जायच्या. पहिल्या शिळवटीच्या मध्यभागी वडीचा कासरा घट्ट बांधून वडीची मुदन नांगराच्या पुढल्या बाजूच्या कडीतून ओवून तिच्यात एक बुटारणं अडकवलं जायचं. हे बुटारणं म्हणजे लाकडी तुकडा होय. अशारितीने दुसऱ्या शिळवटचीही वड बांधली जात असे. मग दोन्ही शिळवटीत बैलं जुंपली जायची. पहिल्या बैलजोडीच्या वेसनीला कासारा बांधून तो जोडीदाराच्या हाती असायचा. नागराचं तास सोडून बैलं बाजूला जायला लागली तर या कासऱ्याच्या द्वारे बैलं जाग्यावर आणली जात असत. नांगर सुरु करताना भाऊ दोन्ही हातांनी नांगाराच्या मुठी धरायचे आणि जोडीदार नांगराच्या चाकावर कधी उभा तर कधी एका पायानं दाब देत बैलं हाकायचा. नांगरटीला अशी सुरुवात व्हायची. 

           नागराचं पहिलं तास बांदाच्या विरुद्ध बाजूला पडेल अशा रितीने नांगराची फळी लावली जात असे. नांगरट नेहमी रानाच्या लांबीच्या बाजूने म्हणजेच उभी केली जात असे. उभी नांगरणी झाल्यावर मग शेवटी आडव्या बाजूवर आडतासं घालून नांगरट पूर्ण केली जात असे. बांदाच्या शेवटच्या टोकाला नांगर गेला की मग बैलं मागे वळवली जायची. नांगरही मागे फिरायचा. यावेळी भाऊ दोन मुठी वर उचलून तिकाटण्यातून नांगराची फळी पलटी करायचे. त्याआधी भाऊ ती लोखंडी सळी आधी काढायचे. पलटीमुळे फळीची खालची बाजू वर आली की, भाऊ ती लोखंडी सळी पुन्हा फळीच्या वर आलेल्या छिद्रात अडकवायचे आणि नांगर पुन्हा तासाला लागायचा. असे प्रत्येक मुरडानाच्या वेळी केले जायचे. अशी दोन - तीन तासं चांगली पडली की, मग भाऊंचं गाणं सुराला लागायचं आणि नांगरटही सुताला लागायची. बैलांना कामाचा त्रास जाणवू नये म्हणूनच अशी गाणी गायली जात असत. उन्हाचा प्रहर सुरु होण्याआधी नांगर चालवला जायचा. एकदा ऊन चटकायला लागलं की, नांगर सोडला जायचा. शिवार मोठं असेल तर मग दिवस कलल्यावर शिरवाळ असताना नांगर पुन्हा जुपला जायचा.

             साधारणतः सुगी उरकली आणि धान्य कणगीत पडून गुडाच्या गंजी लागल्या की नांगरटीला सुरुवात व्हायची. मात्र त्याआधी उकिरड्यातील वर्षभराचे खत रानात पसरवले जात असे. तो पर्यंत उन्हाळाही चांगलाच जाणवू लागलेला असायचा. नांगरणी ही उन्हाळ्यातच केली जात असे. कारण या दिवसात उन्हामुळे रान चांगलेच भाजून निघायचे. नांगरटीची ढेकळे उन्हामुळे तापतात आणि ठिसूळ बनतात. पुढे पाऊस पडला की सर्व नांगरट विरघळून रान आपोआप हावार होऊन जाते. नांगरट हा जमिनीच्या मशागतीचा पहिला टप्पा होय. जमिनीत योग्यरित्या हवा खेळती राहावी, पिकांना पोषण मिळावे आणि तणांचे नियंत्रण व्हावे यासाठी नांगरणीची प्रक्रिया केली जात असे. नांगरणीसाठी प्राचीन काळापासून वेगवेगळी साधने आणि तंत्रे विकसित होत गेलेली दिसतात. प्राचीन काळात जमिनीला फक्त कुदळी किंवा कोयत्याच्या साहाय्याने उकरून पेरणी केली जात असे. आदिवासी समाजांमध्ये आणि काही दुर्गम भागांमध्ये आजही ही पद्धत दिसून येते.पुढे नांगर तयार केला गेला. त्यानंतर मात्र भारतीय कृषी संस्कृतीत शेती मशागतीचे पारंपरिक साधन म्हणून हा नांगर सर्वकालीन उपयुक्त ठरलेला दिसतो. नांगर या साधनास भारतीय कृषी संस्कृतीत मोलाचे स्थान असलेले दिसते.

            भारतात प्राचीन काळापासून नांगर शेतीसाठी एक महत्त्वाचे साधन राहिले आहे. नांगराचा विकास हा तांत्रिक आणि सामाजिक बदलांनुसार होत गेलेला दिसतो. सिंधु संस्कृतीमध्ये सिंधु खोऱ्यातील लोथल आणि कालीबंगन या ठिकाणी नांगराच्या खुणा आढळतात. या काळातील नांगर लाकडी असायचा आणि तो बैलांच्या साहाय्याने ओढला जात असे. याकाळात शेतीसाठी सरळ रेषेत चर पाडण्याची पद्धतही प्रचलित होती. वैदिक काळात ऋग्वेद आणि अथर्ववेद यामध्ये ‘हल’ (नांगर) चा उल्लेख आढळतो. याकाळातही नांगरासाठी बैलांचा उपयोग केला जात असे. जमिनीची नांगरणी करून गहू, तांदूळ आणि जवसासारखी पिके या काळात घेतली जात असत. महाजनपद काळात नांगराचा उपयोग अधिक प्रमाणात वाढला आणि तो शेतीसाठी अत्यावश्यक बनला. पुढे लोखंडाचा शोध लागल्यानंतर, लाकडी नांगराला लोखंडी टोक (फाळ) जोडण्यात आले. अधिक खोलवर नांगरणी करण्यासाठी नांगर असा सुधारला गेला. पुढे मौर्यकाळात कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात नांगरलेल्या आणि नांगर न केलेल्या जमिनीचा उल्लेख आढळतो. याकाळात मोठ्या प्रमाणावर शेती करण्यासाठी लोखंडी फाळ असलेल्या नांगराचा उपयोग वाढलेला दिसतो. तसेच बियाणे पेरण्यासाठी नांगरासोबत विशेष चर खोदणाऱ्या साधनांचाही विकास याचा काळात झालेला होता. 

          सातवाहन व गुप्तकाळात हा नांगर अधिक विकसित झाला आणि खोलवर नांगरणी होऊ लागली. याकाळात शेती अधिक उत्पादनक्षम बनली. याकाळात काही ठिकाणी दुहेरी नांगरणी सुरू झाली. चोल, चालुक्य, राष्ट्रकूट आणि पाल या राजवंश काळातही मोठ्या भूभागावर शेती करण्यासाठी नांगराचे मोठे प्रकार तयार झाले होते. विशेषतः या काळात दक्षिण भारतात भातशेतीसाठी विशिष्ट प्रकारचे हलके नांगर प्रचलित झालेले होते. तर उत्तर भारतात गहू व ज्वारीसाठी जड लोखंडी नांगर वापरण्यात येऊ लागले. मुघलकाळात मोठ्या जागेवर शेती करण्यासाठी नांगर सुधारण्यात आला. या काळात नांगरणीसाठी बैलांसोबत कधी कधी घोड्यांचाही उपयोग केला जाऊ लागला. भात शेतीसाठी हलके नांगर आणि इतर पिकांसाठी जड नांगर याकाळात प्रचलित होते. ब्रिटिश कालखंडात भारतात नांगरणी अधिक सोपी करण्यासाठी विविध प्रकारचे लोखंडी नांगरही उपलब्ध होत गेले. किर्लोस्कर कंपनीने याचा काळात १९०३ साली भारतात पहिला लोखंडी नांगर तयार केला होता. या नांगरामुळे भारतीय शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षमतेने शेती करणे शक्य झाले. पारंपरिक लाकडी आणि लोखंडी नांगराबरोबरच इंग्रजांनी ट्रॅक्टरसाठी उपयुक्त असे यांत्रिक नांगरही याच काळात आणले.

             स्वातंत्र्यानंतरचा काळात नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. पारंपरिक लाकडी व लोखंडी नांगरासोबत आधुनिक रोटावेटर  आणि हायड्रॉलिक नांगर वापरले जाऊ लागले. हरितक्रांती नंतरच्या काळात तर लाकडी नांगर पूर्णतः बंदच झाले आणि लोखंडी नांगर देखील हळू हळू मागे पडत गेले. आज तर आदिवासी आणि दुर्गम भाग वगळता महाराष्ट्रात लोखंडी नांगरट होताना दिसतच नाही.  अत्याधुनिक तंत्र आणि यंत्राच्या माध्यमातून अशा साधनाची निर्मिती होत असल्याने आज शेती पूर्णतः या साधनांच्या द्वारेच केली जात आहे.  नगदी पिकांच्या माध्यमातून  हाती येणारा पैसा आणि शासकीय तथा खाजगी संस्थांच्या माध्यमातून शेती आणि शेती पूरक उद्योगासाठी सहज आणि मुबलक उपलब्ध होणारं अर्थसहाय्य यामुळे शेतीच्या मशागतीची सर्वच साधने आज यांत्रिकी स्वरूपाची दिसत आहेत. त्यामुळे शेतीसाठी बैल किंवा इतर प्राण्यांचा वापर होताना  दिसत नाही. आज शेतीच्या मशागतीच्या सर्वच कामात ट्रॅक्टरचा वापर होत आहे. ट्रॅक्टरमुळे बैल - गोठा ही पारंपरिक साधने अंगणातून नाहीशी होताना दिसत आहेत.            

            एकेकाळी बारा बैलांच्या दावणीने शोभून दिसणारा गोठा आज ट्रॅक्टरसाठी पार्किंग शेड बनलाय. गाई - वासरांच्या हंबरण्या - चेकाळण्याने आणि बैलांच्या डरकाळीने घुमणाऱ्या गोठ्यात आज ट्रॅक्टरचं यांत्रिक थरथरणं घरघरत आहे. नांगर लाकडी असो की लोखंडी त्यामुळे जमिनीची नैसर्गिक सर्जनता राखली जात असे. पिकासाठी आवश्यक तितकीच भुई उकरली जात असे. त्यामुळे काळ्या आईची  कूस सतत सुदृढ व समृद्धतेने भरली जायची. आता ट्रॅक्टरचा फाळ जमिनीच्या गर्भाचा काळ बनल्याने निर्मितीची सर्व प्रक्रियाच अनैसर्गिक होत आहे. यामुळे जमिनीची सकसता नि सक्षमताच नष्ट होत असल्याचे जाणवत आहे. 

            नांगरट करणे हे कष्ट आणि कोशल्याचे काम असते. नांगरणीच्या कामात नांगर धरणारा आणि हाकलणारा ही दोघेही कुशल असावी लागतात.  रानाच्या प्रतवारीनुसार नांगरटीची खोली आणि तासाचा घास यांचे विशिष्ट प्रमाण ठरवून नांगरणी करावी लागते. याकामी नांगरधाऱ्याची कुशलता महत्त्वाची असते. नांगराच्या पुढच्या चाकाची दिशा व जागेचे अंतर यानुसार तो नांगर लावत असतो. नांगराच्या तासात फाटा पडणार नाही याची काळजी तो घेत असतो. यासाठी बैलं तासाबाहेर जाणार नाहीत याची काळजी हाकलणाराने घ्यायची असते. बैलांना आणि आपल्याही कष्टाला गती आणि विरगुळा म्हणून हे दोघेही सतत मोठमोठ्यानं गाणं गात राहतात. ही गाणी म्हणजे लोकजीवनातील विविध भावभावना व्यक्त करणाऱ्या ओव्याच असतात. या गाण्यातील विशिष्ट लय आणि तालामुळे बैलांमध्ये उत्साह निर्माण होऊन त्यांचा श्रमपरिहार होत असे. याकाळात बैलांच्या वैरणीचीही विशेष काळजी घेतली जायची. त्यांना वेळच्या वेळी पेंड, खुराक दिले जात असे. या बैल मेहनतीतूनच शेतात मोती पिकतात याची जाणीव ठेऊन विशेषत: या काळात बैलांना खूपच जपले जात असे. नांगरणी संपल्यावर अंगातील नांगरला कधी कधी वासरे बांधली जायची. यावेळी अल्लड खोंडांणा आपल्या ताकतीचा काहीसा अंदाजही घेण्याची संधी दिली जात असावी असं मला वाटते. मात्र नांगरटीला जो टिकतो तोच खरा बैलं असं एक सूत्रच त्याकाळी ठरलेले असे. म्हणूनच त्याकाळी नांगरटीसाठी खास बैलं पाळले जायचे. कारण बैलं नांगराने केलेली नांगरणी ही बरकत आणि समृद्धीची नांदीच असायची. 

         नांगर हे केवळ जमिनीच्या मशागतीचं साधन नव्हते, तर नांगरामुळे लोकजीवनाचे सामाजिक आणि सांस्कृतिक बंध घट्ट होत असत. नांगरट हा कृषी संस्कृतीचा एक उत्सवच असायचा. यामध्ये सर्व घटक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होऊन आपली जबाबदारी पार पडायचे. शेतकरी अल्पभूधारक असो वा मोठा जमीनदार असो, त्यांच्या शेताची नांगरट करावीच लागत असे. मोठ्या बगाईतदारकडे तर खास नांगरणीसाठी सोयरे - धायरे आपल्या नांगरणीच्या सर्व सर्जामासह येऊन मुक्कामीच राहायचे. सगळ्या शिवराची नांगरट झाल्याशिवाय ते माघारी घरी जात नसत. ज्यांच्याकडे बैलं व साधनाची कमतरता आहे अशा घटकांनाही शेजारी वा गावातील बड्या असामीकडून सहकार्य केले जायचे. नांगरणीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी सावडीही होत असत. नांगरणीच्या काळात शिवरातच न्याहाऱ्या व्हायच्या. त्यामुळे स्वयंपाक घरात गृहिणी खास नांगरकऱ्यांच्या शिदोरीची विशेष दक्षता घेत असत. यानिमित्ताने सायंकाळी घरी स्वादिस्ट आणि सुरुची अशा विशेष भोजनाच्या पंगती बसायच्या. अशावेळी पाहुण्यांसाठी आणि कामकऱ्यांसाठी जेवणाचा हा खास बेतंच असायचा. अशारितीने नांगरणीच्या निमित्ताने संगत, सहभोजन आणि सहकार्य यातून सामाजिक सौहार्द वाढीस लागायचे. 

         नांगर जुंपणे आणि हाकलणे हे आनंदाचे आणि मजेचे काम समजून लहान मूले या कामात उगीच घोटाळत असायची. विशेषतः नांगराच्या मुठीजवळच्या लोखंडी शिडीवर बसायला खूप मज्जा यायची. कधी कधी शिरवाळाच्या वेळी भाऊ आम्हाला आळीपाळीने त्यावर बसवायचे. रान जर कडक लागलं तर आम्ही चाकाच्या जवळ दांडीवर तोल सांभाळून बसायचो. नांगरटीच्या आवाजात आवाज मिसळत चालणाऱ्या चाकाकडे पाहणे आमच्यासाठी खूप औसुक्याचे असायचे. कुतूहल किंवा जिज्ञासापूर्ती म्हणून कधी कधी लहानग्यांच्या हाती भाऊ नांगर सोपवायचे तेंव्हा कृषी संस्कृतीत नकळत नाळ जोडली जायची. यातूनच कृषी कर्म- कर्तव्याची जाणीवही व्हायची आणि नांगरटीची शिकवण व संस्कार ही सहजपणे घडत जायचे. 

            नांगर केवळ जमिनीची नांगरणी करण्याचे साधन नव्हते तर ते लोक संस्कृतीच्या मशागतीचेही उत्तम माध्यम होते. नांगर हे कृषी संस्कृतीत निर्माण झालेले पहिले साधन आहे. तो लाकडाचा असो वा लोखंडाचा, त्याने भुई नांगरण्याचे काम अगदी चोख आणि प्रामाणिकपणे पार पारलेले आहे. म्हणूनच जमीन उकरून काळ्या आईचा कस आणि कुशीला सदैव चिरंजीवित्त्व बहाल करणारा हा नांगर मानवी जीवनाच्या वैभवाचा खरा साक्षीदार होता असे मला वाटते. मानवीसंस्कृतीत नांगरास सुफलीकरणाचं प्रतिक मानले जाते. कृषी संस्कृतीचा प्रारंभच नांगरणीच्या प्रक्रियेतून झाला आहे. मात्र मानव, पशु आणि पक्ष्यांच्या दाणा - चारासाठी जमीन उकरून पिकं फुलविणारा नांगर आज स्वतःच कुठंतरी धुळीत बुजून गेलेला दिसत आहे. एकेकाळी जोमदार पिकाच्या माध्यमातून तमाम कृषीजीवनाला समृद्धी बहाल करणारा हा नांगर आज क्षीण होऊन अडगळीत पडलेला  दिसत आहे. धन्याच्या शिवारात फाळ रुतवून दिमाखात उभा राहणारा नांगर आज मात्र भंगारात अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. आपल्या नऊ नंबरी नांगर आणि चाव्हरी बैलांचं कौतुक अभिमानाने सांगणाऱ्या शेतकऱ्यांच्या वैभवाला जणू आज या नव्या युगाची दृष्टचं लागलेली दिसतेय.  आधुनिकतेच्या या युगात यांत्रिकीकरणाची चाकं थांबवता येणं कठीण आहे. मात्र तरीही कृषी संस्कृतीचा हा मौलिक पारंपरिक ठेवा जपायला हवा आणि जोपसला जावा. हा गत वैभवाचा मळा पुन्हा बहरावा असं वाटत असेल, तर साऱ्या शिवारात समृद्धीचा हा नांगर पुन्हा फिरावा हीच अपेक्षा!  

✍️ डॉ. अशोक शिंदे, फलटण

9860850344


शनिवार, ८ मार्च, २०२५

अडगळीतील समृद्धी - लेख क्र. 5

            कणगी 

           खळ्यावर धान्याची रास लागली की, प्रथम त्या  राशीची विधिवत पूजा केली जाते. नंतर खळ्यावरचं धान्य पांगवून चांगली तीन - चार उन्हं दिली जातात. एकदा धान्य वाळलं याची खात्री झाली की लगेच पुढची लगभग सुरु होते. खळ्यावरंच धान्याची एक - एक किंवा सव्वा - सव्वा मणाची पोती भरली जातात. एकदा सर्व धान्य भरून झालं की पोती मोजून ठरल्याप्रमाणे खोतीची वा वाट्याची वाटणी बाजूला काढली जात असे. आमचे वडील दरवर्षी कोयना भैजींची खोती घेत असत. त्यामुळे वाटणीवेळी आम्हीही खळ्यावरच असायचो. आधी खोतीवाल्याचा माल त्यांच्या घरी पोहोच करायचा असा भैजींचा दंडक. त्यामुळे मालाने भरलेल्या बैलगाडीत बसून आम्हीही घराकडे निघायचो. आपल्या घरी आज धान्य येणार याचा लई आंनद व्हायचा आम्हाला. घरी आई पुन्हा एकदा बैलांसह पोत्यांचीही पूजा करायची. खोतकरांचा माल त्यांच्या घरी जाईपर्यंत भैजीला चैन पडत नसे. त्यामुळे भैजी स्वतः बैलगाडीबरोबर खोतकराच्या घरापर्यंत जात असत. खोतकरांचा माल त्यांच्या घरात पडला की मग खळ्यावरचा उरलेला सगळा माल भैजींच्या वाड्यावर नेला जात असे. एकदा ओसरीला पोत्यांची थापी लागली की, मग पुढं भैजी कणगीच्या तजविजीला लागत. 

                कणगी म्हणजे त्याकाळी धान्य सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याचं एक महत्वाचं साधन. आमच्या गावात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी कणगी असायची. शेतकरी छोटा असो वा मोठा त्याच्याकडे कणगी हमखास असायचीचं. प्रतिवर्षी शिवारात होणारे धान्याचे उत्पादन लक्षात घेऊन कणगी करून घेतली जात असे. विशेषतः ज्वारी, बाजरी आणि गहू ही अन्नधान्ये साठवण्यासाठी कणगी वापरली जात असे. कमीत कमी पाच तर जास्तीत जास्त वीस मण धान्य साठवलं जाईल अशा आकाराच्या कणग्या त्याकाळी असत. मोठ्या जमीनदाराकडं तर अशा दोन - तीन कणग्या असायच्या. कणग्यांच्या आकारावरून त्याकाळी श्रीमंतीचं मोजमाप देखील केले जात असे. पतींगराव जामदारांच्या वाड्यात अशा खंडी, दोन खंडीच्या मोठमोठ्या कणग्या त्याकाळी होत्या. एकदा कणगीत माल पडला की मग मात्र शेतकरी निसूर होत असत. 

               साधारण डोक्याएवढ्या उंचीची व रांजनासारख्या आकाराची दिसणारी ही कणगी बांबूपासून बनवली जात असे. कणगी विणण्याचे काम बुरुड लोक करत असत. आमच्या पंचक्रोशीत त्याकाळी धनुदादा कणगी बनवण्यासाठी नावाजले जात होते. दादा सर्वप्रथम बांबूपासून जाड, पातळ, चपट्या आकाराच्या पट्ट्या सोलून काढत असत. कणगी बांधताना सुरुवातीला कणगीचं बूड बांधलं जायचं. हे बुड साधारण वाव - दीड  वाव व्यासाचं गोलाकार असे. यासाठी बांबू सोलून काढलेले लांब चपट्या आकाराचे पण जाडसर व मजबूत असे तोडे वापरले जात असत. दणकट व टिकाऊ कणगीसाठी नऊ तोडे वापरले जात असत. सर्वप्रथम हे नऊ तोडे मध्यावर एकत्र घट्ट बांधले की एका तोड्याचे दोन भाग होत असत. या भागांना पाऊके म्हटले जात असे. अशा प्रकारे नऊ तोड्यांचे अठरा पाऊक सुरुवातीला तयार होत असत.

                  त्यानंतर ही सर्व पाऊके एका मजबूत चपट्या कामठीने विणले जायचे. त्यास बेळसा असे म्हटले जात असे. बुडाचा असा वाव- दीड वाव व्यासाचा गोलाकार भाग या बेळसांनी विणला की जेथून पाऊके वरच्या दिशेला वळवले जातात तिथे एक वळ विणला जात असे. हा वळ तीन पात्यांचा किंवा काड्यांचा असे. या काड्यांना वळकाडी असं म्हटले जात असे. अशा वळामुळे बुडाचा भाग मजबूत व्हायचा. येथून कणगीच्या उभ्या भागाला सुरुवात व्हायची. नंतर सर्व अठरा उभे पाऊके मग पुन्हा बेलस्यांनी विनले जायचे. साधारण वीत - दीड वितीवर पुन्हा एक वळ विणला जायचा. यामुळे कणगीला भक्कम व मजबूतपणा येत असे. बुडाच्या आकारापेक्षा कणगीचा मधल्या भागाचा व्यास थोडासा मोठा व तोंडाचा थोडासा लहान असायचा. त्यामुळे धान्याचे वजन संतुलित राहत असे.

                अशा रितीने साधारण सहा - सात फूट उंचीपर्यँत कणगी विणली जात असे. पाऊके वितभर वर राहतील अशा बेताने शेवटचा मोठा वळ विणला जात असे. त्यास तोंडाची मुदन म्हटले जात असे. नंतर वर शिल्लक राहिलेले पाऊके थोडे तासून पातळ केले जात. हे पाऊके वरून मुडपून पुन्हा शेवटच्या वळातून आतल्या बाजूने खोवले म्हणजेच पाचले जात असत. अशा रितीने कणगीचं तोंड तयार होत असे. कणगीत धान्य भरण्याआधी ती ओसरीत किंवा आत घरात व्यवस्थित स्वच्छ व हवेशीर जागेत ठेवली जात असे. जमिनीवर लाकडे टाकून त्यावर लाकडी फळ्या अंथरून त्यावर कणगी ठेवली जात असे. अशा कणगीत वर्षभराची सर्व चंदी एकदम सुरक्षित राहत असे. दादाकडून अशी कणगी एकदा करून घेतली की ती सालोसाल टिकायची. अशा कणगीसाठी दादा जीव लावून मेहनत घेत असत. दादाच्या हातच्या अशा कितीतरी कणग्या गावोगावी आणि घरोघरी दिसायच्या. 

                 धान्य टाकण्याआधी कणगी माती, गवत, शेणाच्या मिश्रणाने आतून बाहेरून लिपली जात असे. कणगी मजबूत आणि हवेशीर जागेवर ठेवली जात असल्यामुळे तिच्यात धान्य दीर्घकाळ टिकत असे. शिवाय  कणगीमुळे धान्याचे किडा, मुंगी पासूनही संरक्षण होत असे. कणगीत धान्य टाकण्या आधी ते पूर्णत: वाळवले जात असे. धान्य कणगीत टाकले आणि कणगीचे तोंड लिंबाचा पाला टाकून वरून पुन्हा शेणाने लिपले की, धान्य अगदी तिजोरीत ठेवल्यासारखे सर्वांगाने सुरक्षित होत असे. अशारितीने नैसर्गिकपणे सुरक्षित धान्य साठवण्याचं कणगी हे अत्यंत उपयुक्त असे साधन होते. कृषीसंस्कृतीत अशा कणगीत धान्य साठवण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

                भारतात प्राचीन काळापासून स्थानिक हवामान, जमीन, आणि उपलब्ध साधन सामग्रीनुसार धान्य साठवण्यासाठी विविध पारंपरिक पद्धती वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विकसित झालेल्या दिसतात. काही ठिकाणी धान्य साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘कोठी’ किंवा ‘कोठारे’ वापरण्यात येत असत. यासाठी माती, लाकूड, बांबू, किंवा दगडांचा वापर केला जात असे. मातीच्या भांड्यांमध्ये धान्य साठवण्याची पद्धतही काही भागांमध्ये प्रचलित होती. या भांड्यांना आतून तेलकट पदार्थांनी लिंपले जाई, ज्यामुळे त्यात किडी होत नसत. विशेषतः गहू, तांदूळ आणि डाळींचे साठवण यामध्ये केले जात असे. 

             पूर्व भारत, पश्चिम घाट आणि ईशान्येकडील प्रदेशात बांबूच्या मोठ्या टोपल्या धान्य साठवण्यासाठी वापरल्या जात. या टोपल्यांना शेण आणि मातीच्या थराने लिंपले जात असे. काही ठिकाणी धान्य सुती पोत्यांमध्येही साठवले जात असे. काही भागांत छताला वारा खेळता राहील अशा पद्धतीने खपरेल बसवून धान्य साठवण गृह तयार केले जात असे. काही ठिकाणी लाकडी पेट्या, किंवा झाडाच्या खोडापासून खोदलेल्या मोठ्या खोल्यांमध्येही धान्य साठवले जात असे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात धान्य साठवण्याचे साधन म्हणून  ‘कणगी’ चा वापर केला जात असे. कालानुसार कणगीच्या निर्मितीत आणि वापरात काही महत्त्वाचे बदल झालेले दिसतात.

               प्राचीन काळात सिंधू संस्कृतीमध्ये हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे आढळलेल्या धान्यागारांमध्ये कणगी समान काही लहान साठवण यंत्रणा असल्याचे पुरावे मिळतात. वैदिक काळातील वाङ्मयात ‘कोष्ठ’ किंवा ‘कोष्ठागार’ असा कणगीच्या संकल्पनेशी जुळणारा उल्लेख सापडतो. त्या काळात मातीच्या मोठ्या घटांमध्ये धान्य साठवले जात असे, ज्यामध्ये कणगीसारखी रचना होती. मौर्य आणि गुप्त काळात कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात धान्य साठवण्याच्या विविध पद्धतींचा उल्लेख आहे. याकाळात कणगीसारखी मोठी मातीची भांडी वापरली जात असत. ही भांडी हवेशीर आणि दमटपणापासून संरक्षित असत. या काळात घरगुती साठवणुकीसाठी लहान कणग्यांचा वापरही अधिक प्रमाणात होत असे.

              मध्ययुगीन काळात घरगुती आणि गावपातळीवर धान्य साठवण्यासाठी कणगीसारख्या मातीच्या भांड्यांचा मोठा उपयोग होत असे. काही ठिकाणी बांबूच्या चौकटींना शेणमातीचे मिश्रण लावून मोठ्या ‘कणगी’ सारख्या वस्तू  तयार केल्या जात असत. यामध्ये विशेषतः तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांची दीर्घकालीन साठवणूक होत असे. मराठा आणि पेशवे काळात शेतकऱ्यांसाठी धान्य साठवणुकीच्या पारंपरिक पद्धती प्रचलित होत्या. मोठ्या कोठारांमध्ये आणि घरगुती कणग्यांमध्ये धान्य साठवले जात असे. या काळात कणगी बांधताना बाहेरून गेरू लावण्याचीही प्रथा होती, ज्यामुळे ती अधिक टिकाऊ होत असे.      

                    ब्रिटिशकालीन भारतात मोठ्या प्रमाणावर धान्य साठवण्यासाठी ब्रिटिश सरकारने आधुनिक गोदामे आणि लोखंडी संरचना आणल्या, पण ग्रामीण भागात कणगीचा वापर सुरूच राहिला. काही ठिकाणी मातीऐवजी लाकडाच्या कणग्या वापरण्यास सुरुवात झाली. धान्य टिकवण्यासाठी कणगीत निंबाची व इतर वनस्पतीची पाने यांचा उपयोग होऊ लागला. स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक काळात आधुनिक गोदामे उपलब्ध झाल्यानंतरही ग्रामीण भागात कणगीचा वापर होत असे. मात्र या काळात काही ठिकाणी प्लास्टिक किंवा सिमेंटपासून तयार केलेल्या कणग्या वापरण्यात येऊ लागल्या. 

                काळानुरूप महाराष्ट्रातही अशाप्रकारे धान्य साठवण्याच्या विविध साधन सामग्रींचा वापर केला जात होता.  याकाळात महाराष्ट्रात विशेषतः कणगी हेच पारंपरिक पद्धतीने धान्य साठवण्याचे प्रमुख साधन म्हणून अधिक प्रमाणात वापरले जात असे. याकाळात महाराष्टात ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ इ. पिकांचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जात असे. कृषी पणन व विपणनाची व्यवस्था त्याकाळी प्रभावी नसल्याने ही सर्व धान्य घरातच साठवली जात असत. यासाठी कणगी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असत. कणगीमधील धान्य बराच काळ सुरक्षितपणे टिकत असल्यामुळे अस्मानी संकटात ते उपयोगी ठरत असे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात देखील महाराष्ट्रात पारंपरिक शेती केली जात होती. साखर कारखाने, औद्योगिकीकरण, सिंचन प्रकल्प यामुळे शेती व्यावसायला काही प्रमाणात चालना मिळू लागली होती. मात्र याकाळातही कणगीचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जात होता. यानंतरच्या काळात मात्र कणगीचा वापर हळूहळू कमी होत गेला. 

               साधारणपणे हरितक्रांती नंतरच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीक्षेत्राशी संबंधित विविध शासकीय धोरणे आणि विविध जलसिंचन प्रकल्प यामुळे शेती व्यवस्थापनात कमालीचे बदल झाले. यांत्रिक साधने, अत्याधुनिक अवजारे, संकरीत बियाणे, आधुनिक पिक व पाणी पद्धती यामुळे पारंपरिक शेती हळूहळू कमी होत गेली. नगदी पिकांचे प्रमाण व संख्याही वाढत गेली. बाजार समित्यांची निर्मिती झाल्यामुळे धान्य साठवून ठेवण्यापेक्षा विकण्याचं प्रमाण वाढलं. अन्नधान्यांच्या आयात - निर्यातीमुळे धान्याची उपलब्धता वाढली गेली. बाजारात सर्व प्रकारचे धान्य मिळू लागल्याने शेतकऱ्यांचा कल अन्नधान्य पिकविण्यापेक्षा नगदी पिकाकडेच अधिक वळला.  ज्वारी, बाजरी, गहू यांचे उत्पादन गरजेपुरते किंवा मर्यादित होऊ लागले. त्यामुळे ओसरीतील कणगीने तळ गाठला. 

                जसजसा काळ पुढे सरकू लागला तसतसा आधुनिकतेचा प्रवाह अधिकच जोम धरू लागला. नगदी पिकांमुळे तसेच सहज कर्ज उपलब्ध होऊ लागल्याने शेतकऱ्यांचा हाती पैसा खेळू लागला. कृषी क्षेत्रातील प्रगतीमुळे भौतिक साधनांची खरेदी आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार होऊ लागला. याशिवाय शेती पूरक व्यवसाय, विविध क्षेत्रातील रोजगारांची उपलब्धता यामुळे पारंपरिक शेती व जीवनशैलीत कमालीचा बदल झाला. आहार, विहार, निवाऱ्याची साधनात आधुनिकता दिसू लागली. चौसोपी वाडे , धाब्याची घरे जाऊन त्याठिकाणी वाळू, गज, सिमेंटचे बंगले उभे राहू लागले. धान्य साठवण्याची नवनवी साधने आज बाजारात येऊ लागली आहेत. घराची खोली, आकार, रंग आणि चकचकितपणाला शोभेल अशी आधुनिक धान्य साठवण साधने आता घरात दिसू लागली आहेत. त्यातच घराच्या अघळ - पघळ वट्टा - ओसरीची जागा बंगल्याच्या चकचकित पोर्चने बळकावली आणि ओसरीतील दिमाखदार कणगी आता अडगळीत जाऊन पडली आहे. 

             एकेकाळी सर्वांना पोट भरून धान्य पुरवणारी कणगी आज स्वतःच  रिकामी होऊन अखेरच्या घटका मोजताना दिसत आहे. स्वतःच्या भक्कमतेबरोबरच मालकाच्या सक्षमतेचाही परिचय करून देणारी कणगी आता मात्र खिळखीळी झालेली दिसत आहे. घरा- ओसरीत भरलेली कणगी एकेकाळी श्रीमंतीचं आणि समृद्धीचं प्रतिक समजली जात असे. अडी- नडीच्या काळात पाव्हणे- रावळे, गरीब, भिक्षेकरू यांच्याप्रति धन्याच्या ठायीच्या औदार्य आणि सहकार्यवृत्तीला बळ देणारी ही कणगी स्वतःच आज आधारहीन झालेली दिसत आहे. कणगी लिपताना, तिच्यात धान्य भरताना, तिच्यातून धान्य काढताना तिच्याशी एक वेगळंच नातं जुळले जात असे. लहान मुलांना तर कणगीतून धान्य काढायला खूप मज्जा येत असे. तिच्यातील गारवा हवाहवासा वाटत असे. हा आनंद आज लोप पावत चालला आहे. 

              वर्षानुवर्षे सर्व प्रकारचे धान्य सुरक्षित, ठेऊन सर्वत्र समृद्धीचं भरलेपण बहाल करणाऱ्या कणगीचं एकेकाळी मानवी जीवनात महत्वपूर्ण स्थान होतं. काळ्या आईच्या कुशीतून मिळालेलं धन्याच्या कष्टाचं सोनं इमाने, इतबारे, चोख आणि सुरक्षित ठेवण्याचं अनमोल कार्य कारणारी कणगी ही निष्ठेची परिसिमा होती. म्हणूनच ग्रामीण तथा कृषी संस्कृतीला आपल्या कर्तव्याने समृद्धीचं दान देणारा हा पारंपरिक वारसा जपण्याचं कार्य व्हायला हवं. कणगीमुळेच तोडा, पाऊक, बेलसी, वळ इ. सामग्रीची एक साठवण संस्कृती निर्माण झाली. कणगी अस्तंगत झाली तर ही धान्य रक्षक संस्कृतीही लय पावेल. म्हणूनच हा ग्रामजीवनाला शतकानुशतके आधार देणारा कृषी संस्कृतीचा वारसा आणि सुख - समृद्धीचा साक्षीदार आपणास जपून ठेवायलाच हवा. बस्स एवढीच अपेक्षा ! 

✍️ डॉ. अशोक शिंदे, 

प्राध्यापक, मराठी विभाग,

मुधोजी कॉलेज, फलटण. 


मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

अडगळीतील समृद्धी - लेख क्र. ४

                                       वावडी 

                 काढणी एकदाची उरकलली की सगळेच जण खळ्याच्या कामाला लागतात. शेत आणि घरापासून जवळ किंवा योग्य अंतरावर थोडी उमाठाची व मुरूमाड जमीन असलेली जागा खळ्यासाठी निवडली जाते. खळ्याची ही जागा वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी असल्याचेही दिसून येते. आमच्या गावात तुकाईच्या माळावर अशी अनेक खळी होती. सर्व साधारणपणे खळ्यासाठी कमीत कमी पाच ते दहा गुंठे जागा गरजेची असते. ही सगळी जागा प्रारंभी स्वच्छ व सपाट केली जाते. प्रत्यक्ष खळ्यासाठी यातील मध्यभागाची आठ - दहा हात त्रिज्या असलेल्या गोल आकाराची जागा वापरली जाते. उरलेल्या मोकळ्या जागेत ज्वारीच्या सूड्या, गव्हाचे भारे आणि करडी व हरभऱ्याचे पेटे लावले जातात. प्रत्यक्ष खळ्याच्या मध्यभागी एक लाकडी डांब म्हणजेच तिवडा रोवला जातो. मग ही गोलाकार जागा पाण्याने भिजवली जात असे. अशावेळी चिखलात नाचायला लहान मुलांना लई मज्जा वाटायची. नंतर तिवड्याला एक जाड कासरा बांधून त्याला बैलांची पाथ जुंपून त्यांना गोल गोल फिरवून भिजवलेले खळे खुरवतले जायचे. यामुळे खळ्याची जमीन एकजीव व घट्ट बनत असे. असे खळे शेणाने सारवले की मग ते खुडणी - मोडणीसाठी सज्ज व्हायचे.         

             खळ्याचं काम चालू असतानाच रानात काढून पडलेलं गुड बैलगाडीतून  खळ्यावर आणून त्याच्या सूड्या लावल्या जायच्या. एकदा खळं वाळलं की मग खुडणीला सुरुवात व्हायची. एव्हाना उन्हात बरेच दिवस वाळलेली कणसं मोडून वा खुडून खळ्यात टाकली जायची. या कामात अधूनमधून लहानग्यांची लुडबुड ठरलेलीच असायची. गुडाची कणसं एकदा खुडून झाली की मग उरलेला कडबा गंजीसाठी बाजूला टाकला जायचा. खळ्यातल्या कणसांची मग मळणी सुरु व्हायची. मळणी करताना खळ्यातील कणसं बाजूला जाऊ नयेत म्हणून कणसांच्या कडेने कडब्याच्या पेंढ्यांची कडणी लावली जायची. मळणीवेळी पून्हा बैलांची पाथ जुंपून त्यांना खळ्यात फिरवले जायचे. या बैलांच्या मागे चालायला लहान मुलांना खूप मज्जा येत असे. कधी कधी चालणाऱ्या बैलाचं पडणारं शेण वरचेवर झेलून बाहेर टाकण्याची कामं ही मंडळी  अगदी आनंदाने, उत्साहाने आणि काटेकोरपणे करत असत. खळ्यात कणसाचं मदन होईपर्यंत ही मळणी चालत असे. नंतर मग उफणनीला सुरुवात व्हायची. या उफणणीसाठी खळ्यात मग एक वावडी ठेवली जायची. 

               तीन पायावर उभा असलेल्या या वावडीचा वरचा भाग चांगल्या दणकट जाड फळीचा असतो. एकावेळी एकालाच उभा राहून धान्य उफाणता येईल अशा आकाराची ही फळी असते. साधारणपणे चार पाच फूट उंचीची ही वावडी सुताराकडून करून घेतली जायची. वावडीसाठी चांगल्या लाकडाचा वापर केला जात असे. त्यामुळे अशी वावडी पुढे कित्येक वर्ष वापरली जायची. तीन पायामुळे ही वावडी खळ्याच्या उंच सखल जागेवर अगदी सुस्थीर उभी राहायची. काही भागात चार पायाची वावडीही असायची. या वावडीवर उभा राहून धान्य उफणण्याचे काम अगदी सोपे होत असे. मळणीतून मळलेल्या मदनातून सार आणि असार बाजूला करण्याचे महत्त्वाचे कार्य करणारी ही वावडी सुगीच्या सर्व प्रक्रियांतील एक उपयुक्त साधन होते. सुगीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम यावावडीचंच असायचंनैसर्गिक पद्धतीने शेती करण्याच्या काळात वावडी हे धान्य उफणण्यासाठी वापरले जाणारे प्रमुख आणि उपयुक्त असे साधन होते. प्राचीन काळापासून सुगी करताना धान्य उफणण्याच्या कामात वापरले जाणारे एक पारंपरिक साधन म्हणून कृषी संस्कृतीत वावडीला खूप महत्वाचे स्थान असलेले दिसते. 

              भारतीय कृषी परंपरेत वावडी या साधनाचा वापर व प्रारंभ प्राचीन काळात झाला असल्याचे दिसते. वैदिक काळातील साहित्यात शेतीविषयक विविध साधनांचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये विशेषतः ‘शूळ’ आणि ‘सुप’ या साधनांचा उपयोग धान्य वेगळे करण्यासाठी केला जात असे. वाऱ्याच्या मदतीने धान्य आणि भुसा वेगळे करण्यासाठी लाकडी किंवा बांबूची हलकी साधने याकाळात वापरण्यात येत असत. त्या संदर्भात ‘वावडी’ ही संकल्पना याच काळात अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. महाजनपद आणि मौर्यकाळात वावडी चे काही संदर्भ आढळतात.  कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये मळणी, धान्य साठवणूक, आणि शुद्धीकरणाच्या पद्धतींचा उल्लेख केला आहे. अशा प्रक्रियांसाठी पारंपरिक साधनांचा उपयोग होत असावा. त्यामुळे या काळात ‘वावडी’ सारख्या साधनांचा वापर वाऱ्याच्या सहाय्याने भुसा वेगळा करण्यासाठी होत असावा असे वाटते. 

                  मध्ययुगीन काळात शेतीमध्ये पारंपरिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला होता. या काळात धान्य उफणून त्यातून भुसा वेगळा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांमध्ये सुधारणा झालेली दिसते. याच काळात काही भागांत बांबूची किंवा लाकडाची ‘वावडी’ हा अधिक प्रगत प्रकार विकसित झालेला होता. पुढे ब्रिटिश कालखंडात शेतीमध्ये काही प्रमाणात आधुनिक साधनांचा प्रवेश झाला, पण याकाळात पारंपरिक साधनेही मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. स्वातंत्र्योत्तर काळातही भारतातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बैलांच्या साहाय्याने मळणी केली जात आणि उफणनीसाठी ‘वावडी’ चा वापर सुरू होता. 

         महाराष्ट्रात देखील प्राचीन काळापासून धान्य उफणनीसाठी ‘वावडी’ चा केला जात असे. विशेषत: ज्वारी, बाजरी, गहू या भरडधान्य पिकांसाठी येथे वावडी अधिक प्रमाणात वापरली जात असे. ज्वारी हे महाराष्ट्राचे मुख्य पिक मानले जाते. त्यामुळे ज्वारीच्या सुगीवेळी तर खळ्यावर सर्वत्र ही वावडी उभी असलेली दिसायची. मळणी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या वावडीचं काम सुरु होते. मळणीवेळी बैलांच्या खुरांनी खळ्यात कणसं तुडवली जातात. त्यामुळे कणसातील दाणे बोंडातून वेगळे होतात. हे होत असतानाच कणसाच्या इतर भागाचाही चुरा होतो. खळ्यात मळणीतून तयार झालेल्या या मिश्रणाला मदन असे म्हटले जाते. अशाच प्रकारची मळणी बहुतेक सर्वच पिकांची होत असे. खळ्यात मळणीचे मदन झाले की मग उफणनीला सुरुवात होते.        

              उफणनी म्हणजे खळ्यातील मदनातून धान्य आणि इतर भुसा वेगवेगळे करणे. उफणनीसाठी खळ्यातील मदान गोळा करून त्याचा एका बाजूला मोठा ढीग लावला जातो. मग स्वच्छ केलेल्या खळ्यात वावडी उभी केली जाते. उफणनीसाठी किमान तीन जनांची गरज असते.  एक जण उफाणणारा, जो वावडीवर उभा राहून उफणनी करतो. दुसरा पाटी देणारा, जो मदनाची पाटी भरून पहिल्याच्या हातात देतो. आणि तिसरा हातनीवाला, जो उफणनताना खाली पडलेल्या धान्याबरोबर आलेल्या कणसाच्या काड्या किंवा बोंडे बाजूला काढण्याचं काम करतो. खळ्यातील मदनाचे कमी अधिक प्रमाण लक्षात घेऊन यामध्ये आणखीही काही जणांची मदत घेतली जाते. 

              उफणनीचं हे काम कष्टाचं, कोशल्याचं आणि वेळखाऊपणाचं असते. खालच्याने पाटी भरून दिल्यावर वावडी वरचा माणूस ती पाटी वाऱ्याच्या दिशेला धरतो आणि  हळूहळू हलक्या हाताने ती पाटी विशिष्टरितीने हलवतो. त्यामुळे पाटीतील मदान हळूहळू खाली येते. हे खाली येत असतानाच भुसा वा कूस, बोंडं वाऱ्यामुळे विरुद्ध बाजूला वाहून जातात. याचवेळी दाणे व जे वाऱ्याने वाहून जाऊ शकले नाही ते सर्व खाली पडते. याचवेळी हातानीवाला दाण्याबरोबर खाली पडणारे गबाळ आपल्या हातातील हातनीने अगदी हलक्या हाताने बाजूला करतो. ही हातनी आघाड्याच्या काड्यांपासून तयार केली जात असे. आघाड्याच्या तीन चार झुडपाच्या काड्या बांबूच्या कामठीने पसरट बांधून हातनी तयार केली जात असे.  उफणनीच्या वेळी हातनी चालवणे हे कौशल्याचे काम असायचे. उफणनीचे असे काम चालू असतानाच खाली मोत्या प्रमाणे दाण्यांची रास रचली जात लागते. 

              या उफणनीचे काम तसे जोखमीचे असते. पाऊस, वादळ अशा अस्मानी संकटाची काळजी असायची. त्यामुळे अखंडपणे हे काम चालू असायचं. उफणनी कधी एका दिवसात आटपायची तर कधी कधी दोन - तीन दिवसही चालायची. कारण हे काम पूर्णतः वाऱ्यावर अवलंबून असे. या काळात शेतं - शिवारं उघडी,  मोकळी झालेली असतात. शिवाय उन्हाचा जोर वाढत असल्याने त्याचा हवेचा दाबावर परिणाम होऊन वाऱ्याची दिशा बदलून गतीही वाढलेली असते. त्यामुळे या वातावरणाचा उफनणीसाठी नेमका फायदा करून घेतला जात असे. मात्र हा वारा कधी येईल याचा भरोसा नसायचा. त्यामुळे कधी कधी अनेक दिवस हे उफणनीचे काम चालत असे. वारा जमिनीपेक्षा उंचावर अधिक जाणवतो म्हणून या कामी वावडी खूप उपयोगी पडत असे.  शिवाय वावडीमुळे या कामाचा कंटाळाही येत नसे. 

             उफणनीचं हे कामं कितीही मेहनतीचं असलं तरी उफणनीनंतर खळ्यात धान्याची रास पाहून कुणब्याचा आनंदाला मात्र पारावर राहत नसे. राशीची विधिवत पूजा करून मग धान्य पोत्यात भरले जायचे. नंतर बैलगाडीतून शेतातले हे धन घरी नेले जात असे. उफणन्याचं काम चोखपणे बजावणारी वावडीही मग व्यवस्थित ठेवली जायची. पुढच्या वर्षी खळ्याच्या वेळी ही वावडी पुन्हा कामासाठी सज्ज असायची. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालू असल्याचे दिसते. मात्र अलीकडच्या काही वर्षात सुगीची प्रक्रियाच बदलून गेली असल्याचे दिसते.

               स्वातंत्रोत्तर काळात विविध जलसिंचन प्रकल्प आणि शेतीशी संबंधित मूलभूत संशोधन यामुळे कृषीक्षेत्रात अनेक अमूलाग्र बदल घडून येत आहेत.  विशेषतः हरितक्रांती नंतर अनेक आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यांत्रिक साधने विकसित झाली आहेत. त्यामुळे पिकाच्या पेरणीपासून ते धान्य कणगीत पडेपर्यँतच्या सर्व प्रक्रिया आज अध्ययावत यंत्राद्वारे पूर्ण केल्या जात आहेतत्यामुळे शेतातील कामाची व सुगीच्या काळात उपयोगात येणारी सर्व साधने हळूहळू बाजूला पडलेली दिसतात. वावडी हे साधनही आज असंच कुठेतरी अडगळीत पडलेलं दिसत आहे. 

             आज पेरणी यंत्रापासून ते मळणी यंत्रापर्यंत सर्व आधुनिक यंत्रे सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे काढणी, कापणी, खुडणी, मळणी आणि उफाणनी या सुगीच्या सर्व क्रिया आता एकाच वेळी यंत्राच्या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत. परिपूर्ण पक्वता, शुद्धता आणि निर्मळता या बाबी यंत्राने साधण्यास मर्यादा येते. त्यामुळे श्रम, वेळ, पैसा यांची बचत आणि अस्मानी  संकटांपासून काहीशी सुटका होत असली तरी नैसर्गिकपणे केली जाणारी सुगीची ही कामे यांत्रिकतेत तितकीशी योग्य तथा व्यवस्थितपणे साधली जात नाहीत. एक साधन वापरातून कमी झाले की त्यामागे त्याच्याशी संबंधित संस्कृतीच नाहीशी होताना दिसते. वावडी ही देखील मानवी सामाजिक आणि सांस्कृतिक समृद्धीचे एक अविभाज्य अंग होती.

              वावडीचं कामं केवळ खळ्यातील धान्य उफणनी करण्याचं असलं तरी सुगी संस्कृतीशी तिचे घट्ट नाते जोडले गेलेले होते. त्याकाळी सुगीचं प्रत्येक काम एकमेकांशी परस्पर संबंधाने जोडले गेलेले असायचे. काढणीच्या वेळी गायली जाणारी भलरी व घातली जाणारी इर्जिक आता होताना दिसत नाही. भलरी हे लोकगीताचं तर इर्जिक हे लोकजीवनातील सहकार्याचं अनमोल संचितचं होतं.  शिवाराच्या कोपऱ्यात ठेवली जाणारी सीतामाई केवळ श्रद्धा नव्हती तर आपल्या ओटीत टाकलेले दान कित्येक पटीनं भरभरून देणाऱ्या काळ्या माईविषयी व्यक्त केलेली ती कृतज्ञता असायची. सर्वा वेचताना होणाऱ्या प्रापंचिक गप्पा, काढणी, मळणी, खुडणीवेळी केली जाणारी सावड, साधनाची केली जाणारी देवाण घेवाण यातून सामाजिक सौख्य आणि सोहार्द वाढीस लागत असे. प्रत्यक्ष खळ्यात जमा झालेल्या राशींतून एखाद्याच्या झोळीत ओतलेल्या शेर - आठव्यानं दातृत्त्व वृद्धिंगत व्हायचं. सुगीच्या वेळी खोती किंवा वाट्यानं काम करणाऱ्यांना खळ्यावरच त्यांचा हिस्सा दिला जायचा. अशा कष्ट आणि मेहनतीतून मिळालेल्या फळाचा आनंद किती स्वादिष्ट असतो याचं दर्शन घडायचं. अशा सुगीशी संबंधित कामातील भावभावनांचा साक्षीदार असायची ती वावडी. 

               शिवारातील धन आणि कष्टाचं फळ यातून मिळणाऱ्या समुद्धीत खळ्यावर उभा असलेल्या वावडीचं मोठं योगदान असायचं. आज यांत्रिकीकरणामुळे वावडीचं काम संपलं आहे. वावडी तर दिसेनाशी झालीच आहे; परंतु त्याबरोबर बैलगाडीने वाहताना गुडाचा रचला जाणारा हेल, खळे, खळ्याभोवतीच्या सूड्या, भारे, पेटे, मदान, हातनी, रास, कडबा आणि गंज या गोष्टीही आज यांत्रिकीकरणाच्या अंधारात गेल्या आहेत. त्यांच्या  बरोबर त्यांची ओळख, अस्तित्त्व व संस्कृतीही अंधारली आहे. 

              आज अजूनही काही भागात पारंपरिक नैसर्गिक सुगी होत असेल. मात्र आधुनिकतेच्या वेगात ही पारंपरिक सुगीसंस्कृती विनाशाच्या मार्गांवर आहे हे मात्र खरे. त्यामुळे एकेकाळी खळ्यात दिमाखात उभा राहून आपल्या पुढ्यात सौख्याची रास पाहणारी ही वावडी आज अडगळीत आडवी होऊन पडलेली आहे. ज्या वावडीमुळे मोत्यासारखे तेजस्वी व स्वच्छ दाणे मिळाले ती मात्र आज अंधाऱ्या जागेत अखेरच्या घटका मोजत आहे. मानवी जीवनातील समुद्धीचा हा साक्षीदार पुन्हा केंव्हा एकदा दिमाखात उभा राहील हे काळंच ठरविल ; पण प्रयत्न करूयात या वावडीचं  कार्य आणि अस्तित्त्व जपण्याचं ! 

                  ✍️ डॉ. अशोक शिंदे 

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२५

अडगळीतील समृद्धी लेख क्र. 3 - माळा

 माळा 

            पहाट जसजशी उजळत जाई, तसतसा सोनमाळाकडचा आवाज वाढतंच जायचा. हा ss, हा sss! हुर्रर्र ss, हुर्रर्रर्र sss! लांडी बघ ss लांडी बघ sss! असा एकच गलका तिकडं चालू असायचा. अधून मधून गोफणीचाही आवाज यायचा. ऐन थंडीच्या दिवसात एका विशिष्ट लयीत जेवढा जोरात आवाज काढता येईल तेवढा काढला जायचा. अगदी पहाटे पासूनच ही मंडळी सोनमाळाकडं निघायची. नदी ओलांडून सौंदर ओढ्यातून पुढं पांदीला लागलं की पलीकडंच्या चढावर सपाट सोनमाळ लागायचं. तांबडी, काळी माती असलेलं चांगलं तीन - चार नंबराचं हे शिवार होतं. त्यामुळे दोन्ही हंगामातील पिकं इथं घेतली जायची. गावातल्या तीन चार बड्या असामींच्या सुग्याही याच माळावर लागायच्या. 

            पावसाळ्यात बाजरी,  हुलगा, मूग, मटकी अशी खरिपाची पिकं याच मळ्यात घेतली जायची. तर रब्बीच्या हंगामात गरजेपुरता गहू, हरबरा आणि साऱ्या सोनमाळावर ज्वारीच अधिक पेरली जात असे. ज्वारीच्या मध्ये मध्ये काही करडईचे तर काही जवसाचे पाटेही पेरले जात असत. त्यामुळे राखणीच्या दिवसात सोनमाळावर दरवर्षी सात - आठ ‘माळं’ हमखास उभा राहायचे. उजाडू लागताच या माळ्यांवर उभा राहून मोठमोठ्यानं आरोळ्या देत पाखरं राखणीचं काम जोरजोरानं चालू असायचं. पिकाची राखण तशी दिवसभर चालूच असायची; पण सकाळ -  संध्याकाळच्या वेळी राखणीचा आवाज अधिकच वाढायचा. माळ्यावर उभा राहून राखण करायलाही खूपच मज्जा यायची. सुगीच्या दिवसात वडील जेंव्हा चाव्हराच्या मळ्यात खोती घ्यायचे तेंव्हा माळ्यावर उभा राहून गोफण फिरवायचा आनंद आम्हीही खूप वेळा घेतलाय.

            ज्वारी पोठऱ्यात येऊ लागली की शिवारात माळा बांधायची लगबग सुरु होत असे. एका वेळी दोघं तिघं बसतील किंवा उभा राहतील असा दणकट बैलगाडीच्या साटीच्या आकाराचा हा माळा बांधला जात असे. जेथून सर्व शिवार सहज पणे नजरेखाली येईल अशी शिवारातील उंच किंवा चढाची जागा माळ्यासाठी निवडली जायची. शक्यतो एखाद्या मोठ्या झाडाजवळ जर अशी जागा मिळाली तर ती अधिक सोयीची मानली जात असे. कारण त्या झाडावरची पाखरं सहज हाकलता यायची आणि दिवसभर माळ्यावर सावलीही राहायची.

            माळ्यासाठी बाभूळ, लिंब किंवा कोणत्याही चिवट झाडाची आठ दहा दणकट लाकडं जमा केली जात असत. सुरुवातीला सहा सात फूट लांबीची चार मोठी लाकडं मेढीसारखी जमिनीत रोवली जायची. नंतर या मेढींच्या वरच्या टोकाला मांडीसारखे चार आडवे वासे काथ्या किंवा सुताच्या दोरीने घट्ट  बांधले जात. हे वासे मेढीच्या दुबाळक्यात किंवा ज्या ठिकाणी उभ्या लाकडाला आडवा खण आहे अशा ठिकाणी बांधले जायचे. ते खाली निसरू नयेत म्हणून ज्या ठिकाणी ते बांधले जायचे तिथे मेढीवर कुऱ्हाडीने खाच पाडली जात असे. 

            अशा रितीने माळ्याचा सांगाडा उभा झाला की, वरच्या चार आडव्या वास्यांवर मग आडवी उभी लाकडं किंवा बाभळीचा साळा अंथरला जायचा. त्यावर बाजरीचं सरमाड किंवा वैरणीच्या पेंढ्या अंथरून खालच्या लाकडातून ओवून त्या काथ्याने घट्ट आवळल्या जायच्या. माळा डळमळू नये म्हणून चारही मेढींना आधारासाठी तिरकी लाकडे उभी केली जात असत. या माळ्यावर सहजपणे चढता उतरता यावे म्हणून छोटीशी सीडीदेखील केली जात असे. अशा रितीने एकदा माळा बांधला की शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडत असे. पिकाच्या राखणीचं मोलाचं काम हा माळा करत असे. माळ्यावर उभा राहून राखण करणे ही पिक राखणीची अत्यंत प्राचीन पारंपरिक पद्धत असल्याने शिवारात सुगीच्या काळात सर्वत्र असे माळे उभा केलेले दिसत असत. 

            शेतीसाठी माळा किंवा मचान ही पिकं राखण्याची पद्धत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. भारतासह जगभरात शेतजमिनीचे संरक्षण करण्यासाठी या पद्धतीचा  उपयोग केला गेला आहे. वैदिक काळात भातशेती, गहू, ज्वारी, बाजरी यांसारखी पिके घेतली जात होती. या पिकांवर पशुपक्ष्यांचा मोठा उपद्रव होत असे. पशुपक्ष्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी या काळात “मचान” हा प्रकार प्रथम उदयास आला. लाकडी ओंडके व बांबू वापरून एक उंच व्यासपीठ उभारले जाई, जिथे एक व्यक्ती बसून पिकांची राखण करीत असे. प्रामुख्याने दक्षिण भारतात आणि गंगा-यमुना खोऱ्यात या प्रकारचा वापर त्याकाळी अधिक प्रमाणात होत होता.

              महाजनपद व मौर्यकाळात शेती अधिक सुव्यवस्थित झाली. तसेच या काळात सिंचन व्यवस्थेतही सुधारणा झाली. मौर्य सम्राट अशोकाच्या काळात तर मोठ्या शेतजमिनींवर मचानासारखी वास्तू उभारली जात असे, यासाठी ‘रक्षापद’ या शासकीय पदाची निर्मिती केली गेली होती. या माध्यमातून माळी किंवा राखणदार या व्यक्ती शेताची निगराणी करत असत. म्हणूनच राखणदार किंवा माळी ज्या मचानावर उभा राहायचा त्यास ‘माळा‘ असे म्हटले जाऊ लागले असावे. पुढे गुप्त व उत्तरगुप्त काळात विकसित शेतीसाठी विविध पारंपरिक तंत्रांचा स्वीकार केला गेला. या काळात उंचावर मचान उभारून तिथे लाकडी घंटा किंवा मोठा आवाज करणारी उपकरणे ठेवली जाऊ लागली. याच काळात नदी काठच्या शेतीसाठी उंच उंच माळे उभारण्याला प्रारंभ झाला होता.

               मध्ययुगात राखण पद्धती आणखीचं विकसित झाली. या काळात मोठमोठे जमीनदार आपल्या शेतजमिनींसाठी राखणदार नेमू लागले. या काळात बांबू, लाकूड आणि गवताचा उपयोग करून मजबूत माळे बांधले जात असत. काही ठिकाणी मोठ्या शिवारात एकापेक्षा जास्त माळे उभारून एकमेकांशी संवाद साधण्यासाठी शिट्या किंवा ढोल-ताश्यांचा वापर केला जात असे. पुढे ब्रिटिश काळात पारंपरिक शेती बरोबरच नवीन तंत्रज्ञानयुक्त शेती करण्यात येऊ लागली. खास करून ऊस, तंबाखू, कापूस या बागायती पिकांसाठी मोठ्या जमिनींवर लाकडी माळे उभारले जात असत. स्वातंत्र्योत्तर काळ तथा आधुनिक युगामध्ये तांत्रिक प्रगतीमुळे पिक संरक्षणासाठी नवीन उपाय आले. विजेचे कुंपण, ट्रॅप कॅमेरे आणि यांत्रिक अलार्म यांचा वापर होऊ लागलेला दिसतो. 

            महाराष्ट्रात  पारंपरिक पद्धतीनेचं शेतीची राखण केली जात असे. काळाबरोबर इथल्या राखण पद्धतीतही बदल होत गेलेला दिसतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ ही मुख्य अन्नधान्याची पिके केली जातात. कोकण वगळता इतर भागात अन्नधान्य म्हूणन प्रामुख्याने ज्वारीचेच पिक अधिक प्रमाणात काढले जाते. ज्वारी हेच महाराष्ट्राचे मुख्य पिक मानले जाते. ज्वारीची भाकरी हेच इथल्या लोकांचे प्रमुख अन्न आहे. ज्वारीला पोषक बागायती आणि जिरायती जमीन, अनुकूल नैसर्गिक वातावरण आणि योग्य बाजारपेठ या घटकांची उपलब्धता असल्यामुळे महाराष्ट्रात ज्वारीचे मुबलक उत्पादन मिळत असे. त्यामुळे महाराष्ट्रात कोकण व्यतिरिक्त उर्वरित सर्वच भागातील सर्वच गावांमध्ये ज्वारी हे पिक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. मात्र महाराष्ट्रात ऊस, भूईमूग व कापूस ही नगदी पिकेही माफक प्रमाणात पिकविली जात होती. एकूणच या काळात शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले जात नव्हते. 

            एक काळ असा होता की गावाच्या सर्व शिवारात सुगीच्या दिवसात ज्वारीच्या राखणीचा एकच हंगामा चालयचा. रब्बीच्या हंगामात ज्वारीच्या शिवारातच माळे असायचे. इतर पिकांवर सहसा पाखरं बसत नसत. दाणे चिकात येण्याच्या सुमारास चिमणी, मैना अशा लहान अंगकाठीची तथा बारीक चोचीची पाखरं दाणे चाखण्यासाठी वा टिपण्यासाठी कणसांवर बसत असत. करडीच्या बोडांवर मात्र करकोचा किंवा लांब चोचीचे पक्षी ताव मारत असत. सकाळ, सायंकाळ तथा शिरवाळाच्या वेळी पाखराची जास्त वर्दळ असे. दुपारच्या पहारी मात्र उन्हं अन् उजेड असल्यामुळे या वेळी पाखरं पिकावर फारशी येत नसत. पाखरांपासून पिकाचं राखण करायचे म्हणजे पाखरं जीव मारायची असा या राखणीचा उद्देश नसायचा. पाखरांनी चिकात आलेले किंवा हुरड्यात आलेले सर्वच दाणे खाल्ले तर उत्पादन कमी होईल असा विचार असल्याने केवळ आरडून ओरडून वा गोफणीच्या माध्यमातून आवाज काढून पाखरांना घाबरवायचे काम केले जायचे. गोफणीच्या माध्यमातून कधी बारीक खडे वा एकदा कच्चा ढेकूळ फेकला जायचा. गोफणीचा आवाज अन् त्यातून फिस्करल्या जाणाऱ्या बारीक खड्यांच्या आवाजामुळे पाखरं दूर उडून जायची. असं असलं तरी राखणीच्या काळात पिकाचे अनेक वेळा नुकसानही ही पाखरं करायची. अशा  पाखरांपासून पिकाचे राखण करायला माळा खूप उपयोगी पडायचा. 

                  त्याकाळी माळा म्हणजे मळ्याचं वैभवच समजलं जायचं. शेतकऱ्याच्या शेतात समृद्धीचं दान देण्यात या पुरुषभर उंचीच्या माळ्याचं मौलिक योगदान होतं. माळा म्हणजे त्या शिवरातलं शेतकऱ्याचं एक छोटंस घरटंच असायचं. सुगीच्या वेळी माळ्याच्या जवळपास एखादी खोप केली जायची. त्यामध्ये थंडगार पाण्याची घागर, दुपारी जेवण वा थोडीशी वामकुक्षी घेण्यासाठी एखादी घोंगडी वा चादर असायची. अगदी दानं भरण्याच्या सुमारास तर वस्तीपासून दूर असलेल्या शिवारात राखणकऱ्यांचा मुक्कामच असायचा. 

                 सगळीकडे ज्वारीचं पिकं असल्यामुळे मोठ्या शिवारात आजूबाजूला  चार - पाच तरी माळे असायचेच. राखण करता करता माळ्यावरूनच एकमेकांबरोबर गप्पा मारल्या जात असत. प्रत्येक जण जरी आपले शेत राखत असला तरी त्यांच्या आरडण्या ओरडण्याने किंवा गोफणीच्या आवाजाने शेजारच्या पिकाचेही राखण घडायचं. कधी सकाळची न्याहरीही माळ्यावरच व्हायची. अशावेळी कारभारनिशी सुगीसंबंधाच्या किंवा इतर गुजगप्पा रंगायच्या.  सुट्टीच्या दिवशी घरातल्या लहानांच्या पलटनी शिवरातच घुसायच्या. माळ्यावर उभा राहून राखणीचं कामं त्यांच्यासाठी अप्रूपच असायचं. त्यांच्या बारीक कोवळ्या हाकारीनं देखील सारं शिवार गजबजून जायचं. शाळेचा गृहपाठ देखील कधी कधी माळ्यावरचं रेखाटला जायचा. चार भिंतीच्या वर्गातून मिळणाऱ्या पुस्तकी ज्ञानापेक्षा चरचराचं सर्व ज्ञान या चार पायाच्या माळ्यावर बसून त्यांना अगदी सहजपणे मिळायचं. दुपारी जेवणाच्या निमित्ताने सर्व मळेकरी एकत्र येऊन माळ्या भोवती गोल पंगत धरत असत. त्यातून पिक पाण्याच्या, सुख - दुःखाच्या गप्पांचा फड रंगत असे.

            राखणीचा काळ साधारण महिनाभर चालायचा. त्यामुळे या काळातील सगळी कामे माळ्याभोवतीच असायची. सकाळ, रात्रीची शकोटी असो वा हरभऱ्यांची आगटी असो ती माळ्याजवळच पेटवली जायची. मित्र मंडळी, पाहुणे- रावळे वा सोयरे - धायरे यांच्या मैफली सजविणारी हुरडा पार्टीही रंगायची ती या माळ्याजवळच. दुपारच्या वेळी वाळकं, काकडी, खरबूज, शेंदाडं यांचा मनसोक्त आस्वादही माळ्यावरच घेतला जायचा. कणसाचे बेढे होऊन खळं तयार होईपर्यंत शिवारातील सर्व कामाच्या तजविजी चालायच्या त्या या माळ्यापासूनच. त्यामुळे माळा हे त्याकाळी सुगीच्या हंगामातील नियोजनाचं एक मुख्य केंद्रचं बनलेलं असायचे. ज्वारी पोठऱ्यात आल्यापासून ते काढणी, खुडणी आणि खळ्याचे सर्व सोपस्कार पूर्ण होऊन धान्याची रास सजेपर्यंतच्या शेतातील सर्व घडामोडींचा एकमेव साक्षीदार म्हणजे हा माळा असायचा. असा हा समुद्धीचा साक्षीदार आज मात्र आधुनिक कृषी विकासाच्या युगात अंधार कोठडीत पडलेला दिसत आहे. 

            स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात अनेक सिंचन प्रकल्प उभारले गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू जमिनी पाण्याखाली आल्या.  शिवाय याच काळात अगदी कमी प्रमाणात सुरु असलेली खाजगी साखर कारखानदारी सहकारात परावर्तीत झाली. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने उभे राहिले. हरित क्रांतीच्या काळात आधुनिक तंत्रज्ञान युक्त नवनवीन साधने, उपकरणे, रसायनिक खतांची निर्मिती व उपलब्धता, संकरीत बियाणे, नव्या पिक पद्धती, बाजारपेठांची निर्मिती, कृषी मालाची आयात - निर्यात यामुळे शेतीतून शेतमाला शिवाय इतर आर्थिक स्रोत उत्पन्न होऊ लागले. याच काळात शेतीविषयक सरकारी धोरणे, सहकारी बँका व सोसायट्यांची निर्मिती, कर्ज उपलब्धता यामुळे पारंपरिक शेतीचे पूर्णत: बाजारीकरण झाले. अशातच ट्रॅक्टर वा तत्सम साधनांनी जमीनीचे सहजपणे सपाटीकरण होऊ लागले. आधुनिक सिंचन पद्धतीमुळे तर बहुतांश कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली आले ; आणि महाराष्ट्राचे प्रमुख पिक असलेल्या ज्वारीच्या शेतांत हळूहळू ऊस, कापूस, कांदा, भुईमूग अशा हातात पैसा खेळवणाऱ्या पिकांनी दाटी होऊ लागली. विशेषतः ऊसपिकाचे मळे आज सर्वत्रच फुललेले दिसत आहेत. 

              त्यामुळे आज कमी पर्जन्य छायेचा किंवा पुरेशा सिंचन सुविधा उपलब्ध नसलेला, डोंगराळ तथा माळरानाचं काही क्षेत्र सोडलं तर महाराष्ट्राच्य अनेक भागातून ज्वारीचं पिकं हद्दपार झालेलं दिसत आहे. परिणामी माळ्यावर उभा राहून गोफण फिरवण्याचा आनंद आज हिरवला गेला आहे. शेतातील पिकं तर बदलली आहेतच; शिवाय संकरीत बियाणे आणि पिकाची कणसं पाखरांना खाताच येणार नाहीत असं नवीन संशोधित वाण यामुळे राखणीचं काम खूप सोपं झालं आहे. फटाके, वेगवेगळा आवाज काढणारी स्वयंचलित यंत्रे यामुळे आज जिथं ज्वारी पिकतेय तिथे आज माळा बांधलाच जात नाही. संकरीत वाणांच्या निर्मितीमुळे दाण्यातील सकसता व पोषकता लोप पावली असल्याने पाखरंही आता पाहिल्यासारखे पिकाकडे फिरकत नाहीत. मळ्यात पाखरांची   चैतन्यदायी किलबिल आज ऐकूच येत नाही. शिवारात फिरताना हिरवपण असूनही सर्वत्र उदासीनताच भरून येते आहे. माळा नसल्यानं मळ्याचं सत्त्वच आज हरवल्यासारखं झालं आहे. 

             सुगीचं कामं आटोपलं की जवळच्या झाडाखाली माळ्याची लाकडं जनावरांच्या गव्हाणीला वापरली जायची. आयत्या वेळी पर्याय म्हणून या माळ्याच्या छोट्या लाकडाचे कुऱ्हाड वा खोऱ्यांसाठी दांडे बनवले जायचे. दणकटपणा कमी झाला तर स्वयंपाकासाठी जळणाच्या कामी माळा उपयोगी पडायचा. आता चुलीही निर्धूर झाल्या आहेत. त्यामुळे आपलं स्वतःच समग्र अस्तित्व समर्पित करून शेतकरी जीवनात वैभव फुलवणारा हा माळा आज मात्र अडगळीत कुजत पडलेला दिसत आहे. 

            आशा एकचं आहे की, अजूनही अनेक आदिवासी भागांत आणि पारंपरिक शेती करणाऱ्या लोकांमध्ये माळ्यांचा वापर काही प्रमाणात सुरू आहे. सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती पुनरुज्जीवित होत असल्याने माळ्याचा पुनर्वापर वाढू लागल्याचं सुचिन्ह दिसत आहे.  शेतकरी, कष्टकरी जीवनात सुख समृद्धीची श्रीमंती फुलविणारा हा माळा पुन्हा एकदा सन्मानाने आणि दिमाखाने उभा राहावा. मळा पाखरांनी गजबजून जावा. माळ्यावरून गोफणीचा पुन्हा आवाज घुमावा. आणि शिवारात राखणीचा सोहळा पुन्हा सजावा. समृद्धीचा वसा आणि वारसा उंचावणारा हा माळा पुन्हा शिवारात दिमाखात उभा राहावा. मानवी जीवन आणि लोकसंस्कृतीला वैभवाचे दान देणारा आणि शिवाराचा मान राखणारा हा माळा पुन्हा डोलात उभा राहवा हीच अपेक्षा. प्रयत्न करूया मळ्यात माळा जपण्याचा ! 


डॉ. अशोक शिंदे,
प्राद्यापक, मराठी विभाग, 
मुधोजी कॉलेज, फलटण
मोबाईल- 9860850344


रविवार, २६ जानेवारी, २०२५

पाक्षिक सदर - अडगळीतील समृद्धी लेख-2 - मोट

                           मोट
         भल्या पहाटे गावखरीच्या विहिरीवर घुमणाऱ्या मोटंच्या मंजुळ ललकारीने गाव हळूहळू जागं व्हायचंनाना आपल्या गोड आवाजात वडिलावंss वडिलावंss! गवळ्याss बैलाला रंss वडिलावंss! हरण्याss बैलाला रं वडिलावंss! असं म्हणत एकेका बैलाचे नाव घ्यायचाथोडा वेळ थांबायचा आणि मग हांss चलंss! असं म्हणताच कुई कुई कुई कुई आवाज आणि तो संपता चलगेच भडाडाडाss असा आवाज व्हायचानानाच्या या ललकारी बरोबरच सारं गावंही कामाला जुंपायचंआम्हा लहानग्यांची जाग देखील त्या ललकारीनेच उमलायचीबाहेर ओटा-अंगण सडा सारवनाने सुगंधीत झालेलं असायचंउगवतीचं तांबूस पिवळं ऊन हळूहळू उजेडात मिसळून जाऊ लागायचंगडद सावल्याही हळूहळू उजळू लागतघराघरात कामाची एकच घाईगर्दी सुरु होतमग गावखरीच्या बाजूने येणारा आवाजही हळूहळू कमी होत जायचामात्र एव्हाना नानाचा एक पारुग पुरा झालेला असायचा
         गावखरीची विहीर आमच्या घरापासून जवळच होतीगाव आणि विहिरीच्या मधून एक मोठी वाट जात होतीत्यामुळे तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ असायचीचांगली पाच परसाची ही विहीर अख्या गावखरीच्या नंबराला पाणी पुरवत होतीसात हाताचा घेर असलेली ही विहीर काळ्या पाषानी दगडांनी बांधलेली होतीकाठापासून एक परस उंच आणि पुढे उतार असलेली धावदेखील भक्कम कोरीव चिरांची होतीधावेचा उतार चांगला पन्नास-साठ फूट लांबीचा असावाविहिरीच्या बाजूला धावेवर मजबूत दोन दगडी पायटे बसवलेले होतेत्यांच्या खाली दगडी तोडी बसवल्यानं एक थारुळं तयार झालं होतंया पायट्यांच्या आतल्या तोंडाला जी भोकं होतीत्यात दोन चौकोनी मजबूत लाकडी खांब उभे केले होतेया खांबाना आधार म्हणून धावेच्या उताराच्या बाजूला दोन तिरके लाकडी खांब विशिष्ट पद्धतीने जोडले गेले होतेउभ्या  खांबांच्या खालच्या वरच्या अशा दोन्ही टोकांना गोल भोकं होतीवरच्या बाजूला एक  जाड लोखंडी सळी घालून त्यात मघोमध एक लाकडी चाक वसवलेले होतेतर खालच्या बाजूला एक लांब लाकडी पसरट चाक बसवलेलं होतं.  या खालच्या पसरट चाकाला कणा असं म्हटलं जायचंआणि या सर्व व्यवस्थेलावडवान ’ असं म्हटलं जातं असे.  या वडवानामुळेच मोटंचं पाणी थारूळ्यात पडून पाटातून पिकाला जायचंविहिरीच्या काठावर मावळतीच्या दिशेला मोठा लिंबोरा होताविहिरीच्या धावेवर दिवस भरत्याची सावली पडायचीत्यामुळे मोट दिवसभर चालली तरी बैलं थकत नसतं
          मात्र गावखरीवर पाण्याची पाळी असली की चांदणी उगवताच नाना खरसड वस्तीवरून मोटंचा सारा सर्जाम गाडीत भरून निघायचासंग कोणीतरी जोडीदार असायचाचमग विहिरीवर पोहोचताच दोघेजण गाडीतून एकेक करत मोटंसह सारं सामान खाली घ्यायचे अन मग मोटंची जुपाजूपी व्हायचीनानाची मोट म्हणजे लोखंडी जाड पत्र्याचा वरची बाजू उघडी असलेला एक घनाकार डबाच होतामोटंचा वरचा उघडा भाग बुडाच्या भागापेक्षा थोडा लांब होताया खालच्या बाजूच्या मधोमध पत्र्याची एक गोल झडप (दरवाजावर उचलली जाईल अशारितीने बिजागरीने बसवलेली होती. मागच्या बाजूच्या दोन्ही बाजूला एक साखळी बसवून साखळीच्या मध्यावर एक लोखंडी कडी होतीतशीच साखळी पुढच्या तोंडालाही होतीसुमारे दीड-दोनशे लीटर पाणी मावेल असा तिचा आकार होता. 
              सुरवातीला मोट थारूळ्यावर ठेवली जायची. एक लांब जाड असा दोर ज्याला नाडा म्हटलं जायचं तो नाडा वडवानाच्या वरच्या चाकातून ओवून मोटंच्या मागच्या बाजूच्या साखळीच्या कडीला घट्ट बांधला जायचा. नंतरमोटंच्या पुढच्या बाजूच्या साखळीच्या कडीला आणखी एक दोर घट्ट बांधला जायचा. त्यास सौंदर म्हटले जायचं. मग नाना शिळवटीत दोन बैल झुंपायचा. आधी शिळवटीच्या वरच्या जुवावर नाडा आणि मग शिळवटीच्या खालच्या पट्टीला सौंदर गुंडाळून घट्ट बांधले जायचे. हे करताना नाडा सौंदरापेक्षा लांबीने जास्त घेतला जायचा.  मोट विहिरीच्या पाण्यात समतल राहावी म्हणून ही व्यवस्था असायची. मग दोन्ही बैलं धावेच्या पुढच्या टोकाला उभी करून नाना आपल्या जोडीदाराच्या मदतीने मोट हळू हळू विहिरीत सोडत असे. एकदा का मोट वडवानातून विहिरीत गेली की मग दोन्ही बैलं मागे मागे सरकत वडवानापासून विशिष्ट अंतरावर येऊन थांबत आणि येथूनच नानाची ललकारी सुरु होत. 
          मोट पाण्यात टेकताच खालच्या बाजूची झडप पाण्यामुळे वर उचलली जात  मोटेत पाणीभरू लागेमोट पाण्याने पूर्ण भरेपर्यंत नाना बैलांची नावं घेऊन आळवत असतमोट पूर्ण भरताच नाना हांsss चलंsss!असं म्हणायचादोन्ही बैलं जोर लावून धावेवर चालू लागायचीमोट पाण्याच्या पातळीच्या वर येताच खालून उचललेली झडप वरच्या पाण्याच्या दाबाने पुन्हा खालीघट्ट बसायचीपाण्याने पूर्णपणे भरलेली मोट वर येत असताना चाकांचा  नाडा-सौंदर यांचा कुईकुई असा मंजुळ आवाज यायचामोट वडवानाजवळ येताच वरचा नाडा ताणला जाऊन मोटचे तोंडनेमकं थारूळ्यावर टेकत  आतील पाणी भडाडाss! आवाज करत थारूळ्यात पडायचं आणि पाटाने पिकाला जायचंयावेळी बैलं धावेच्या पुढच्या टोकापर्यंत पोहचत असतमोट रीती झाली की नाना दोन्ही बैलांच्या मोरखीला लावलेला कासरा मागे ओढत आणि बैलं पुन्हा मागे मागे सरकू लागतयाचवेळी नानाच्या ललकारीचा अंतरा सुरु व्हायचादुसरा जोडीदार दारूळ्या म्हणून शेतातदारं धरायचाअशा प्रकारे न्याहारीच्या वक्तापर्यँत नानाची मोट चालायचीमोट ओढताना बैलांना थकवा येऊ नये आणि पिकालाही पाणी मिळावे असा दुहेरी हेतू या ललकारी गाण्यात होता
               साधारणत: पावसाळा संपून हिवाळा सुरु व्हायच्या दरम्यान या मोटा विहिरीवर दिसायच्या. खरीपाची पिकं शक्यतो पावसावर येत होती. दुष्काळाचा काही काळ वगळता पाऊसकाळ त्याकाळी अधिक असायचा. त्यामुळे विशेषतः रब्बी हंगामातच मोटा चालवल्या जात असत. पिकांना पाणी पुरविण्याचं मोट हे त्याकाळी एकमेव साधन होतं. आमच्या गावात सर्वच विहिरीवर अशा मोटा चालायच्या. पिकांना पाणी पुरविण्यासाठीची ही मोटंची योजना म्हणजे कृषी संस्कृतीला समृद्ध करणारी क्रांतिकारी घटना म्हटली पाहिजे. 
          भारतीय कृषी संस्कृतीचा प्रारंभ प्राचीन काळात झाला आहेभटकंतीचे जीवन सोडून स्थीर जीवन स्वीकारल्यावर मानवाने हळूहळू शेती आणि पशुपालन हे दोन मुख्य व्यवसाय सुरु केलेसामान्यतभारतीय कृषी संस्कृतीची सुरुवात नवाश्मयुगात झाली असे म्हटले जातेयाच काळात मानवाने अन्न पिकवायला आणि स्थीर जीवन जगायला सुरुवात केली..पू७००० च्यासुमारास ‘मेहरगढ’ (बलुचिस्तानपाकिस्तानयेथे शेती आणि पशुपालनाचा पुरावा आढळतोयाच काळात मानवाने शेतीसाठी प्राणी (बैलआणि गहू  जवस ही पिकं घ्यायला सुरू सुरुवात केली होतीही शेती पूर्णतः नैसर्गिक आणि हंगामी स्वरूपाची होतीप्रारंभीच्या काळात लहान लहान गटवा समूह करून मानव त्याकाळी शेती करत असेपुढे हळूहळू शेतीसाठी पाण्याची साठवण करत पिकाच्या सिंचनाला प्रारंभ झाला
           सिंचनाचा प्रारंभ साधारणतः सिंधू संस्कृतीच्या काळात झाल्याचे मानले जाते.  या काळातसिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित असलेल्या हडप्पा संस्कृतीत शेतीचे विस्तृत पुरावे आढळतातयाच काळात नहर किंवा पाटयाद्वारे पाणी आणणे आणि जमिनीचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे हीकामे सुरू झालेली होतीपुढे वैदिक काळात शेतीला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले दिसतेशेतीच्या नांगरटीसाठी बैलांचा उपयोग आणि पाणी व्यवस्थापनाचे प्रारंभिक स्वरूप यांचा उल्लेखही ऋग्वेदात आढळतोत्यानंतर मौर्य साम्राज्याच्या काळात कृषीसंस्था अधिक सुव्यवस्थित झाली असल्याचे दिसतेनंतर मध्ययुगीन काळात शेतजमिनींचा विस्तार होऊन विविध पिके घेतली जाऊ लागलीविशेषतः याच काळात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून लोखंडी औजारेपाणी उपसण्यासाठीची साधने आणि त्यासाठी प्राण्यांचा वापर सुरु झालायावरून याच काळात विहीर मोट यांचा शेतीसाठी वापर सुरु झाल्याचे दिसून येते
        भारतात विहिरीतून पाणी उपसण्यासाठी मोटेचा वापर वैदिक काळात ..पू१५०० -१०००या दरम्यान  सुरू झाल्याचे उल्लेख आहेतसिंधू संस्कृती आणि नंतरच्या हडप्पा संस्कृतीमध्ये विहिरी आणि पाण्याच्या व्यवस्थेचे ठळक पुरावे सापडतातसिंधू संस्कृतीतील काही स्थळांवर विहिरींचे अवशेष आढळले आहेतया विहिरींचा उपयोग सिंचनासाठी करण्यात येत असेनंतर वैदिक काळात उत्तर भारतात गंगेच्या खोऱ्यात विहिरींच्या पाण्याचा सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग सुरू झाला होताया काळात मोटेचा थेट उल्लेख नसला तरी बैलाच्या साहाय्याने सिंचन केले जात असल्याचे सूचित केले आहेदक्षिण भारतातील याच काळात दुष्काळी भागांमध्ये देखील मोटेचा वापर केला जात होतामौर्य साम्राज्याच्या काळात चाणक्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात मोटेचा उल्लेख आहेया काळात लोखंडी नांगरासोबतच मोटेचा वापर शेतीच्या कामासाठी केला जात होतापुढे मध्ययुगीन काळात पर्शियन चाकाचा (रेहटभारतात मोठ्या प्रमाणावर वापर सुरूझालाउत्तर भारतात आणि राजस्थानात विशेषतः दुष्काळी भागांमध्ये विहिरी आणि मोट यांचा उपयोग वाढलाया काळात मोटेसाठी बैल किंवा उंटासारख्या प्राण्यांचा उपयोग केला जाऊ लागला
                 महाराष्टाच्या कृषीसंस्कृतीत मध्ययुगीन काळापासूनच सिंचनासाठी विहीर व मोट यांच्या वापर अधिक प्रमाणात असल्याचा पाहावयास मिळतो. मोट हेच पिकांना पाणी देण्याचे प्रमुख साधन म्हणून त्याकाळी वापरले जात होते. महाराष्ट्र हा तसा विषम हवामानाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे पावसाचे प्रमाणही कमी जास्त असल्याचे जाणवते. त्यामुळे महाराष्ट्रात कधीओला तर कधी सुका दुष्काळ पडल्याचे अनेक संदर्भ सापडतात. सिंचनाची ही परंपरा येथे कित्येक शतकांपासून चालू होती. महाराष्ट्रात लोखंडी पत्रा आणि कातडी अशा दोन प्रकारच्या मोटा वापरल्या जात होत्या. दोन्हीचेही कार्य सारख्याच प्रकारचे होते.  
         एक काळ असा होता की पहाटे तांबडं फुटल्यावर कोंबड्याचं आरवणं आणि मोटेवरची ललकारी यांनी गाव शिवार दुमदुमून जात असेआपला मुख्य व्यवसाय शेती हाच असल्यामुळे गावातील सर्वच लोक या व्यवसायात गुंतून राहत होतेप्रारंभीच्या काळात घरातील सर्वच लोक शेतीची सर्व कामं करायचीप्रत्येकाची आवड  कामातील गती वा कोशल्य यानुसार कामं केली किंवा वाटली जात असतमोटकरी हे आपल्या कृषी संस्कृतीतील महत्वाचं आणि मानाचं पात्र होतेमोट हाकालने ही एक कलाच होतीबैलांशी लळा जिव्हाळा आणि गाता गोड गळा याद्वारे मळा फुलविण्याचे उत्तम कसब मोटकऱ्याकडे असेमोटकरी आणि दारूळ्या यांची जोडी जमली तर सुगी भरभरून साजरी होत असेदरवर्षी पडलेल्या पावसाचं प्रमाणविहिरीच्या पाण्याचा अंदाज घेऊन त्याकाळी बागायती शेती केली जात असेत्यामुळे अन्नधान्य पिकांसह काहीच नगदी पिकांचे उत्पादन घेतलं जात असेलहरी किंवा बेभरवश्याच्या हवामानाच्या काळात मोटंच्या माध्यमातूनच वर्षभर लागणारी चंदी पिकत होतीधान्याच्या रूपातून घरात समृद्धीचं भरलेपण आणण्याचं मोलाचं कार्य त्याकाळी मोट करत असे
             विहिरीवर मोट सुरु असली की आसपासचे लोक पाण्याशी संबंधित कामं उरकून असतंपिण्याचं पाणी असो की सडा शिंपणासाठी लागणारं पाणी असोआसपासच्या बायांबापड्या बिनदिक्कत विहिरीवर येत असंतकोणी धुणं धुवायचंतर कोणी घरी पाणी घेऊन जायचंयाकामांच्या निमित्ताने गावात आलेल्या नव्याने आलेल्या सुनाबाळींच्या एकमेकींशी ओळखी व्हायच्यासुखदुःखाच्या गप्पा गोष्टी बोलल्या जायच्याकाही पुरुष मंडळी तर आपल्या आंघोळी देखील यापाण्यानं उरकून घेत असतंमोट चालू असली की जनावरांना पोटभर पाणी प्यायला मिळायचंशेळ्या-मेंढ्याचा कळप असो वा दुभती जनावरं असो त्यांची पाण्याची जागा हीच असायचीकामाला जाणारे लोक असोत वा शाळकरी मुलं असोत मोटंचं पाणी पिल्याशिवाय पुढं पाय टाकतनसंतवाटेनं जाणारा वाटसरूही मोटंच्या थंडगार पाण्यानं आपली तहान भागवूनच पुढच्या मार्गाला लागायचासणासुदीच्या काळात तर आमच्या गावखरीच्या विहिरीवर लोकांची खूपच वर्दळ असायची
          मोट हे केवळ पिकांना पाणी देण्याचं साधन होतं असं नव्हे तर मोटंच्या माध्यमातून गावची सामाजिकभावनिक  कौटुंबिक वीण अधिक घट्ट होत असेत्याकाळी विहिरीची संख्या खूपच मर्यादित होतीपांद किंवा खोलगट उताराच्या तळाशी विहिरी असायच्यात्यामुळे मोटचं पाणी ठराविक भागातच पोहचत असेम्हणूनच बागायची क्षेत्र त्याकाळी कमी प्रमाणात असायचेविहिरीवर एका वेळी एक किंवा दोनंच मोटा चालायच्याकधी कधी भावाभावात शेताच्या वाटण्या व्हायच्यात्यामुळे मोटच्या बाबतीत सर्वजण एकमेकाशी गुण्यागोविंदाने व सामंजस्याने वागायचेपिक  पाण्याची गरज पाहून एकमेकांना मदत करायचेविहिरीला पाणी अधिक असेल तर कधी कधी मोट आणि बैलासह शेजारच्या शेतकऱ्याला आपल्या वाटणीचं पाणी देखील दिले जायचेशेजारीपाजारीपाहुणेसोयरे यांना देखील मोटंच्या माध्यमातून मदत केली जात होती
            मोटकऱ्याला आणि दारूळ्याला न्याहरी घेऊन कारभारीन येत असे तेंव्हा नात्यांचे गोड नाजूक धागे अधिक बळकट होत असत. मोट हाकलणं हे मजेचे कामं वाटत असल्यामुळे घरातील अनेक मुलं मोटेकडं आकर्षिली जात होती. काही मुलं तर मोटेत बसून विहिरीत खाली वर येण्या- जाण्याचा आनंद घेत असत. शेती- मातीशी त्यांचा लळा- जिव्हाळा अधिक घट्ट होत असे. विहिरीवर पाण्या- धुण्याच्या निमित्ताने आलेल्या आसपासच्या व्यक्तींचे आपसात प्रेमाचे स्नेहाचे संबंध निर्माण होत असत. कधी कधी नवी नातीही जुळली जायची. खरंच मोट हे त्या काळात ग्रामीण लोकजीवनाशी जोडले गेलेले एक प्रमुख असं कृषी साधन होतं. या मोटेशी संबंधीत गाव शिवाराशी अनेक प्रकारचे अनुभव व आठवणी जोडल्या गेलेल्या असायच्या. 
         आज आधुनिक काळात यंत्रतंत्राच्या माध्यमातून कृषी  ग्रामजीवनात अनेक नवनवी साधनेहत्यारे अवतरली आहेतयामुळे कृषी  ग्राम जीवन पूर्णतबदलून गेले आहेनवनव्या तंत्रज्ञानाने सिंचनाच्या नव्या पद्धती अवतरल्या आहेतशेतकरी देखील आता काळाप्रमाणे बदलत अशा सहजसुलभ व्यवस्थेचा अंगीकार करू लागले आहेतसाधारणतः स्वातंत्रोत्तर काळात भारतीय शेतीमध्ये विविधांगी बदल सुरु झालेकेरोसिन वा इंधनाची उपलब्धता जसजशी वाढत गेली तसतशी त्याच्याशी संबंधित साधनेही निर्माण होऊ लागलीयाच काळात यांत्रिकीकरणातून ‘इंजिन’ यापाणी उपसणाऱ्या साधनाचा जन्म झालायाचकाळात मोठ्या नद्यांवर मोठमोठे धरणे बांधली गेली.त्यामाध्यमातून कालवे  पाटांच्याद्वारे जलसिंचन प्रकल्प उभारले गेलेया धरण प्रकल्पाच्यारूपाने जलविद्युत या आणखी एका नव्या ऊर्जास्रोताचा जन्म झाला.
          या आधुनिक तथा यांत्रिक साधनांचा शेतीमध्ये वापर  वावर वाढू लागला आणि शेकडो वर्षपारंपरिक पद्धतीने पाटातून झुळझुळखळखळ नाद निर्माण करणारी मोट अंगणात तोंड खाली घालून बसू लागलीविहिरीवरची तिची ललकारी हळूहळू ठॉक ठॉकss ठॉक ठॉकss अशा कर्णकर्कश आवाजात रूपांतरित झालीजलविद्युत क्रांतीमुळं पुढील काळात विहिरीवरील उरल्या सुरल्या मोटा जाऊन तिथं विद्युत मोटारी बसल्याविहिरी शेजारी ‘इंजिनघर’ नावाच्या नव्यावास्तूचा अवतार झाला आणि धाव  वडवान उदास भासू लागलंकाळ लोटेल तसा यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढू लागलाआधी लोखंडी आणि नंतर प्लास्टिकचे पाईप निर्माण झालेथारूळ्यात पडून पाटानं झुळझुळू वाहणारं पाणीही थेट पिकाच्या वाफ्यात मूकपणे वाहू लागलेएवढं कमी होते की काय म्हणून आता तर ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीने पाणी थेट पिकाच्या मुळातच टिपकत असताना दिसत आहेएके काळी ‘मोट चालली मळ्यात माझ्याचाकं वाजतंय कुई कुईपाटाचं पाणी झुळूझुळूवांनी फुलवत जातंय जाई जुई!!’ असं मळ्याच्या समृद्धीचं गाणंगाणारा मोटकरी मात्र आज मुकपणे या व्यवस्थेचा गोंगाट सहन करत आहे.
          एकेकाळी मोटंनं निर्माण केलेले वैभव आज आधुनिकीकरणाच्या क्रूर झडपेने उध्वस्थ केले गेलेआहेविहिरीवर रुबाबाने ताल धरणारी मोट मागील काही काळात अंगणात राहून कोंबड्या डालण्याचं वा इतर वस्तू झाकण्याचं कामं निमूटपणे करत होतीएक निर्जीव वस्तू म्हणून गप्प बसलेल्या या मोटेकडे बघताना मागील सारा काळ सजीव होऊन जाईतिला पाहून वा स्पर्श केल्याने तिच्या अस्तिवाचा  कर्तृत्वाचा आठव येईमात्र आज ती मोट अंगणातही दिसेनाशी झालीयकारण अंगणच नाहीसं झालंयकाळानुसार बदल होणं हा निसर्गाचा स्वभावच आहेमानव त्याला उपवाद नसेलचमात्र एकेकाळी लोकजीवनात अमाप सौख्य आणि अफाट वैभव उभा करणारी सिंचनाची ही पारंपरिक व्यवस्था हळूहळू डोळ्याआड होताना मनाला खूप वेदना होतातपरिवर्तन अटळ आहेनवसंस्कृतीचं निर्माणही अनिवार्यच आहेया बदलात नवनवे संस्कारनवे शब्दनव्या संकल्पना अवतरणारचंहे जगरहाटीच चक्रही सतत फिरतच राहणार आहेते सर्व स्वीकारावेच लागणारमात्र यामुळे आज अडगळीत पडलेल्या हा समृद्ध वारसा किती काळ टिकणार?
           मोटनाडासौंदरचाककणावडवानशिळवट ही केवळ साधने नव्हतीतर मानवी जीवनाच्या प्रगतीत मानसिक  भावनिक आधार  आकार देणाऱ्या अमूल्य ठेवी होत्याआज अडगळीत का होईना त्या दिसतात तरीमात्र धावपायटाथारुळंपाट या वास्तुंचं कायएकादवेळी अडगळीत असलेली समृद्धी अजूनही काही काळ जपता येईल अथवा टिकेलहीमात्र तो ललकारी देणारा मोटकरी आणि बांधावरून आरुळ्या ठोकणारा तो दारूळ्या कसा साठवायचाशिवाय अवघ्या गावात पहाटेची घुमणारी ती ललकारीचाककण्याची कुईकुई धून अन् पाण्याची मंजुळ झूळझूळ हा ध्वनीनाद कशा आळवायचा
                     एखादवेळी शब्दचित्रशिल्पलिपी या अक्षर साधनाद्वारे वा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हे सर्व टिकवताही येईलपण त्या साधनांशी जोडले गेलेले आणि त्या साधनांमुळं जोडले गेलेले भावनिक नातं कसं जपायचंया सर्वच व्यवहारात  केवळ चैतन्यहीन निर्जीवता असेल नाही कानव्याचा उदय होताना जुन्याचं नष्ट होतं जाणं किती वेदणादायी असतं नाप्रयत्न व्हावा ही समृद्धी जपण्याचा
डॉ. अशोक शिंदे 
मोबाईल - ९८६०८५०३४४